Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग सातवा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग सातवा )

सुरुची अशा मनस्थितीत असताना तिला सांभाळणं संकेतच काम होत. पण त्याच बरोबर त्याच्या आईच्या मनात जे विचार चालले होते, त्यांना कुठेतरी कसं ही करून थांबवणं गरजेचं होतं. संकेतला त्याच्या आईला समजावणं अवघड जाणार होतं. संकेतने सुरुचीला आधार देत उठवलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला.

" तू इथे बस आणि जास्त विचार करू नकोस. मी आई बरोबर बोलतो.!" एवढ बोलून संकेत बेडरूममधून बाहेर जाऊ लागला. तसं सुरुची त्याला म्हणाली,

" राहूदे..! तुम्ही काही बोलू नका आता त्यांना.."

" का बोलू नको..? आताच काही बोलावं लागेल."

" नका बोलू म्हटलं ना..!" सुरुची जरा आवाज वाढवून बोलली.

" पण का..?" 

" आता बोलू नका. शब्दाला शब्द वाढतील आणि..." सुरुची थोडं थांबली आणि म्हणाली, " मी जेवण करायला जाते. आज उशीर झाला."

" इथे काय चाललंय आणि तुला जेवणाचं कसं सुचत..?"

" मग काय जेवायचं नाही..? आणि असं किती दिवस आपण जेवणार नाही? आता जेवण नाही बनवलं तरी सकाळी तुमच्या डब्याला बनवायचं आहेच की..!"

" एवढ सगळं ऐकून, तुला किती त्रास झाला. तरीही तुला आमची काळजी आहे. कसं करतेस तू हे सगळं...?"

सुरुची शांत होती. तिची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. ती मनात संकेतला उद्देशून हेच म्हणत होती, तुला काय माहीत की हे मी रोज ऐकते. रोज रोज तेच टोमणे ऐकून मला आता सवय झाली आहे. तू आज पहिल्यांदा इतकं स्पष्टपणे तुझ्या आईच्या मनातील विचार ऐकलेस म्हणून तुला समजलं. पण मी तर दररोज अनुभवते आहे. संसार सुखाचा व्हावा म्हणून मी सहन करतेय. फक्त ह्या आशेवर की तू तरी मला समजून घेशील, तू मला सावरशील. नाहीतर असं जगण्यापेक्षा सगळं संपवून टाकलेलं बरं. पण नाही.! मी जी आहे, तशी तुला ही नको हवी असेल तर मला स्पष्ट सांग.  तु घेतलेला कोणताही निर्णय मला मान्य असेल.

सुरुची असे विचार करत होती आणि संकेत मात्र वेगळ्याच विचारात होता. त्याला ह्या विषयात मध्यस्थीची भूमिका घ्यायची होती. सुरुचीला मुलं होणार नाही हे सत्य होतं. पण त्यामुळे तिला डिओर्स देऊन विभक्त व्हायचं आणि आपला दुसरा संसार थाटायचा हे त्याला ही पटतं न्हवतं. तो ज्याप्रमाणे सुरुची समोर व्यक्त झाला होता की, सुरुचीला लग्नाआधी थोडंच माहीत होतं की तिला मुलं होऊ शकत नाही. त्या त्याच्या विचारांप्रमाणे तो दुसऱ्या मुलीशी लग्न करणं शक्य न्हवतं. त्याच्या आईला त्याला म्हणावसं वाटत होतं की, तू म्हणतेस म्हणून दुसरं लग्न करून काय करायचं?  दुसऱ्या बायकोला ही मुलं नाही झालं तर..? हा विचार ही बरोबरच होता. पण एवढ टोकाला न जाता आईला समजणं संकेतला भाग होतं. मग तो ह्या विचारात पडला की ह्यावर आता दुसरा मार्ग काय..? आपण सुरुचिबरोबरच चर्चा करावी. असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने सुरुची बसली होती तिकडे पाहिलं तर सुरुची तिथे न्हवती.

संकेत उठला आणि किचनकडे गेला.सुरुची किचनमध्ये जाऊन जेवण बनवत होती.संकेत आता हॉलमध्ये आला. सुरुचीच्या सासूबाई टीव्ही बघत होत्या. संकेत सोफ्यावर बसला. काही वेळाने सुरुचीच्या सासूबाईंना जाणवलं की संकेत बाजूला येऊन बसला आहे. तसं त्यांनी संकेतकडे प्रश्न केला,

" काय विचार केलास..?"

" कशा बद्दल आई..?"

" मी थोड्या वेळापूर्वी काय म्हणाले होते..?"

" आई.!" संकेत थोडं वैतागून बोलला, " असा कोणताही निर्णय तासाभरात घेता येतो का..?"

" मी तासाभरापूर्वी विचारलं.! पण हा प्रॉब्लेम तासाभरापूर्वी समजला आहे का..? ह्या आधी तू काहीच विचार केला नाहीस का..?"

" नाही ग आई.! पण तू बोलतेस तसं करणं मला मान्य नाही.!" इतकं बोलून संकेत सोफ्यावरून उठला आणि बेडरूमकडे जाऊ लागला. तसं सुरुचीच्या सासूबाई बोलल्या,

" मग तुला काय वाटतं ते मला सांग."

" मला वेळ हवा आहे." असं बोलून संकेत तिथून निघाला.

बेडरूममध्ये येईन तो खिडकीजवळच्या टेबलवर बसला आणि विचारात पडला. सुरुचीबद्दल आपल्याला काही महिन्यांपूर्वी समजलं होतं. त्यावर शक्य ते उपाय करण्याचा आपण प्रयत्न ही केला. पण काही उपाय झाला नाही. पण पुढे काय करायचं ह्याचा आपण विचार केलाच नाही. खरचं.! चूक आपलीच आहे. आई असं कधी काही बोलेल ह्याची आपल्याला जाणीव असायला हवी होती आणि ती अस बोलली की त्यावर आपलं उत्तर तयार असायला हवं होतं. चूक आपलीच आहे. ह्या वैज्ञानिक जगात खूप पर्याय उपलब्ध आहेत. त्याबद्दल आपण विचार करून ठेवायला हवा होता. आईला ते पर्याय सांगितले तर ती मान्य करणार नाहीच, हे गृहीत धरून तिला कसं समजावता येईल ह्याचा ही विचार करून ठेवण गरजेचं होतं. पण आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही.  असा विचार करत संकेतचे डोळे पाणावले.

सुरुचीने जेवणं हुरकल होत. जेवण वाढायचं का हे विचारायला म्हणून ती बेडरूममध्ये आली. संकेत खिडकीतून बाहेर बघत बसला होता. सुरुचीने त्याला आवाज दिला,

" अहो..!"

संकेत मात्र भानावर न्हवता. तो खिडकीतून शून्यात पाहत होता. सुरुचीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसा तो भानावर आला. त्याने मागे वळून पाहिलं तर सुरुची उभी होती. तिला पाहून संकेत म्हणाला,

" तू कधी आलीस..? मला कळलंच नाही."

" आत्ताच आली." संकेतचे पाणावलेले डोळे सुरुचीने हेरलं. 

सुरुची संकेतच्या मांडीवर दोन हातानी जोर देत तिथेच खाली गुडग्यांवर बसली. संकेतकडे बघून ती म्हणाली,

" तुम्हीच असं खचलात तर मी काय करायचं..!"

" मी खचलो नाही. पण चूक माझी ही आहे ह्याची मला जाणीव झाली." संकेत जरा खालच्या आवाजात बोलला.

" तुमची कसली चूक ह्यात..?"

" मग..! माझी पण चूक आहेच."

" तुम्ही असा विचार नका करू..! तुमचं काही चुकत नाही आहे. माझ्या सारख्यांच्या नशिबी असे भोग येणारच. " असं बोलून सुरुची उठली.

" कसले भोग..? हे काय तू ठरवून केलेलं आहे का.? "

" चला..! राहुद्या हा विषय आता. तुम्ही जेऊन घ्या आधी.!मी ताटं वाढायला घेतेय. आईंना सांगा." असं बोलून सुरुची किचनकडे जाऊ लागली. तिच्याकडे पाहून संकेत स्वतःशीच बोलला,

' कशी आहे ही..! एवढं सगळं बोलणं ऐकून, ते सहन करून सुद्धा तिची नेहमीची काम करतेय. तिचं काम कुठे ही थांबलं नाही. '

संकेत हात धुऊन हॉल मध्ये आला आणि आईला बोलला,

" आई.! हात धुऊन घे. सुरुची ताटं वाढायला घेतेय."

हे ऐकून सासूबाई उठल्या आणि हात धुऊन हॉलमध्ये आल्या. सुरुचीने दोघांना ताटं वाढली आणि किचनमध्ये गेली. दोघांचं जेवण झालं तसं सुरुचीने ही थोडं खाऊन घेतलं. सगळी कामे आवरून ती बेडरूममध्ये आली.काही वेळाने संकेत ही बेडरूममध्ये आला. सासूबाई हॉलमध्ये झोपल्या होत्या. 

सुरुची बेडवर बसली होती. संकेत तिच्या बाजूला बसला. सुरूचीचा हात त्याने दोन हातात घेतला. सुरुचीने संकेतच्या डोळ्यात पाहिलं आणि तिने तिचा दुसरा हात संकेतच्या हातावर ठेवला. सुरुची संकेतकडे कलती झाली. तिने संकेतच्या खांद्यावर तीच डोकं टेकवलं. एकमेकांचे हात हातात घेऊन दोघे ही शांत बसले होते. पण त्या शांततेत ते एकमेकांशी खूप काही बोलत होते. एकमेकांचा आधार घेऊन विस्कटलेली घडी कशी सवरायची ह्याचा विचार करत होते. 

सकाळी तिघे ही आपापल्या दैनंदिन दिनचर्येत गर्क होते. घरात एक शांतता पसरली होती. संकेत ऑफिसमध्ये जायला तयार होऊन हॉलमध्ये बसला होता. समोरच सुरुचीच्या सासूबाई बसल्या होत्या. सुरुचीने नेहमी प्रमाणे संकेतचा डब्बा भरून संकेतकडे दिला. नंतर संकेत आणि सासूबाईंना नाष्टाची प्लेट दिली. दोघांनीही नाष्टा केला. संकेत ऑफिसला जायला उठला आणि म्हणाला,

" आई..! येतो..!"

"हं..! " एवढाच काय तो प्रतिसाद त्याच्या आईकडून आला.

संकेतने सुरुचीकडे पाहिलं. संकेतचा चेहरा पडला होता. तो स्वतःलाच ह्या परिस्थितीसाठी दोषी मनात होता म्हणून असेल कदाचित. सुरुचीने त्याला थोडावेळ डोळे मिटून 'सगळं ठीक होईल' असं खुनवल. तसा संकेत घरातून निघाला.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now