Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग दुसरा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग दुसरा )

सकाळचे ६ वाजले असतील. सुरुचीला जाग आली. तिने रात्रभर कपाळावर ठेवलेल्या तिच्या उजव्या हाताने स्वतःचे डोळे चोळले. आळस उडावा म्हणून तिने दोन्ही हात बाजूला केले खरे पण उजवा हात मध्येच अडखळला. सुरुचीने उजवीकडे पाहिलं तर संकेत तिच्या बाजूला झोपला होता. अरे देवा..! हे कधी येऊन झोपले इथे..? मला कळलंच नाही..! हंम..! रात्री सोफ्यावर झोप लागली नसेल. सवयच नाही कधी सोफ्यावर झोपायची ह्यांना..! पण रात्री रागावून झोपायला बाहेर गेले आणि झोपले सुद्धा..! मग इथे कधी आले..? रात्री झोपले न्हवते की काय..? आणि मी झोपल्यावर आत आले..? की रात्री झोपेत सोफ्यावरून खाली पडले..? असा विचार सुरुचीच्या डोक्यात आला अन तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर हसू पसरलं...!

ती क्षणभर तशीच बसून राहिली. मग तिने तिचे बऱ्यापैकी लांब सडक केस मोकळे सोडले आणि त्यांना व्यवस्थित करून डोक्यावर गुंडाळून चापात बंदीस्त केले. सुरुची बेडवरून उतरून उभी राहिली. साडी नीट करून तिने पदर कमरेला खोचला.तिने बेडरूमची विंडो थोडी उघडली आणि ती किचनमध्ये गेली. रात्री धुवून ठेवलेली भांडी वाळली होती. ती भांडी त्यांच्या त्यांच्या जागी ठेऊन दिली. बेसिनमधील नळ चालू करून स्वतःचा चेहरा पाण्याने धुतला. जवळच्या टॉवेलने चेहरा फुसला. तिच्या चेहऱ्यावर रेंगाळणारे काही केस ओले होऊन जणू त्यांच्या बारीक बटाच बनल्या. 

आज ह्यांच्या डब्याला काय बनवायचं म्हणून विचार करत तिने फ्रीज उघडला. फ्रीजमधील काही भाज्या बाहेर कडून तिने किचन ओट्यावर ठेवल्या. किचन,हॉल आणि बेडरूम मधला केर काढून झाल्यावर सुरुची आंघोळीला गेली. अंघोळ हुरकून बाहेर आल्यावर लगेच हॉलमधील देव्हाऱ्याकडे वळली. नित्यनेमाप्रमाणे तिने देव पूजा केली. देवपूजा झाली आणि तिने डोळे मिटून देवा समोर हात जोडले आणि मनात पुटपुटू लागली.

" हे गजानना..! लक्ष ठेव आमच्यावर..! काही चूक झाली तर माफ कर..! रात्री जो वाईट विचार माझ्या मनात आला तसा पुन्हा नको येऊदे.! गणपती बाप्पा, मोरया.!"

एवढं बोलून सुरुचीने डोळे उघडले. आता किचन मध्ये येऊन संकेतच्या डब्ब्याची तयारी करायला घेतली. भाजी-चपाती बनवून झाल्यावर तिने मंद आचेच्या गॅसवर चहा ठेवला. किचन आवरून ती हॉलमध्ये आली, तर सासूबाई अजून झोपल्या होत्या. मग ती बेडरूममध्ये गेली. संकेतला हलवुन उठवू लागली.

" अहो..! "

" अहो..! उठा..! "

" हणं... किती वाजले.?"संकेत उठत आळस देत म्हणाला.

" ८ वाजतील आता..!"

" ओके.! " म्हणत संकेत उठून बेडवरच बसून राहिला.

" मी पाणी आणि चहा घेऊन येते हां...!",हे बोलून सुरुची बेडरूममधून किचनमध्ये गेली.

संकेतने डोळे चोळले आणि आळस देत उठून विंडोजवळ जाऊन उभा राहिला. त्याने बाहेर इकडे तिकडे सहज नजर फिरवली. सुरुची चहा आणि पाणी घेऊन आली.

" घ्या...!" बोलून सुरुचीने पाण्याचा ग्लास संकेत समोर केला.

" थॅंक्यु..!" अस बोलून संकेत परत बोलला, " सुरुची...!"

"हं .. बोला..!"

" सॉरी... "

" हं... काय..?"

" अगं. सॉरी.! आई काल तुला जास्तच बोलली..!"

" तुम्ही कशाला सॉरी बोलताय...?"

"आई बोलणार नाही ना सॉरी म्हणून मी बोलतोय..!"

सुरुची शांत होती.

" हॅप्पी बिर्थडे टू यु..!"

" हं.. थॅंक्यु..!"

" रात्री तेच बोलायचं होत म्हणून आत आलो पण तू झोपली होतीस आणि सॉरी मी रागावून बाहेर गेलो.!"

" हं..."

" अगं..! ऑफिसमध्ये कामाचं टेन्शन असतं. त्यात ह्या मंदीमुळे खूप प्रेशर मध्ये काम करावं लागतं. ऑफिसमध्ये एक चुक झाली की नोकरी घालवला सगळे टपून बसलेयत."

" हं.."

" अशात घरी आल्यावर शांत पडून राहावंसं वाटतं..!"

सुरुची खाली मान घालून ऐकत होती.

संकेतने सुरुचीकडे पाहिलं आणि म्हणाला, 

" ए..! आई जे बोलली त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी..!"

" तुम्ही का सारख सारख सॉरी बोलताय..? मला नाही वाईट वाटलं. त्या जे खरं आहे तेच बोलल्याना...!"

" ते काही असो..!आईने अस बोलायला नको हवं होत..!"

" अजूनपर्यंत त्या असं कधीच बोलल्या न्हवत्या. पण त्यांच्या वागण्यात जाणवतं..!"

" म्हणजे..? आई काय करते..?"

" काही नाही..! त्यांना पण वाटतं असेल ना.. आपल्या एकुलत्या एक मुलाला मुलं व्हावं. त्यांना नातवंड व्हावं.! "

आता संकेत मात्र शांत झाला. नक्की काय चुकतंय, कुणाचं चुकतंय, कुणामुळे चुकतंय हेच त्याला समजत न्हवतं. सुरुचीच्या म्हणण्याप्रमाणे आई तिच्या जागी बरोबर होती. पण आईला माझ्या वागण्यातून असं जाणवलं की मी ही सुरुचीवर ह्याच कारणामुळे रागावलो आहे. म्हणजे माझी ही चूक आहे. संकेत स्वतःच्या विचारात गुंतला.

" अहो..! " संकेतचा दंड हलवून सुरुची बोलली, " पाणी आहे ग्लासात. ते चहा सारख का पिताय..? चहा थंड झाला.! तो द्या आधी.!"

" अरे हां..! विसरलोच की..!" संकेत हातातील ग्लासाकडे पाहून म्हणाला आणि त्याने ग्लास विंडोच्या कठड्यावर ठेऊन चहाचा कप तोंडाला लावला. सुरुची संकेतकडे बघत राहिली. ह्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याआधीच आपण रात्री हे काय करायला चाललो होतो.? ह्यांचा ही दोष होताच म्हणा.त्यांच्या आईला रात्रीच काही का नाही बोलले हे.? हं..! काय बोलतील.! आणि हे काही बोललेच असते तरी त्या काय शांत बसल्या असत्या. बरं झालं हे रात्री काही नाही बोलले. नाहीतर काय काय झालं असतं देव जाणे. पण आई बोलल्या ह्याच ह्यांना वाईट वाटलं हे नक्की. आता पाच मिनिटांमध्ये किती वेळ हे सॉरी बोलले.! सुरुची ह्या विचारांमध्ये होती तेवढ्या वेळात संकेतचा चहा पिऊन झाला होता. त्याने चहाचा रिकामी कप कठड्यावर ठेवला आणि आंघोळ करायला बाथरूममध्ये गेला. सुरुचीने पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप उचलून धुवायला नेला. ती किचन मध्ये असतानाच सासूबाईंचा आवाज आला,

" संकेत..! उठलास का...?"

सुरुची लगबगीने हॉलमध्ये आली आणि तिच्या सासूबाईंना बोलली,

" ते आंघोळीला गेले आहेत...!"

" चहा पियाला का तो...?"

" हो आई..! तुम्हाला पाणी देऊ..?"

" हां..! आन...!"

सुरुची किचनमध्ये गेली आणि तिने पाण्याचा ग्लास भरून आणून सासूबाईंकडे दिला. सासूबाई पाणी पियाला आणि बोलल्या, 

" त्याच्या डब्ब्याच बनवून झालं...?"

" हो आई...!"

सुरुचीच्या सासूबाई जागेवरून उठल्या आणि देवाऱ्यासमोर जाऊन हात जोडले. काही वेळाने संकेत अंघोळ करून बाहेर आला. सासूबाई त्याला बोलल्या,

" आज लवकर जाग आली का..?"

"हो आई..!"

" सोफ्यावर नीट झोप लागली नसेल...?"

" हं.... हो...! नाही.! झोप लागली व्यवस्थित..!" संकेत अडखळत बोलला आणि बेडरूममध्ये गेला. सासूबाई आंघोळीला गेल्या.ऑफिसला जायची तयारी करून संकेत हॉलमध्ये आला. सुरुची नाष्टा घेऊन हॉलमध्ये आली. संकेतने नाष्टाची प्लेट हातात घेतली आणि सुरुचीला बोलला,

" संध्याकाळी ऑफिसमधून लवकर यायचा प्रयत्न करतो."

" का ओ..?"

" संध्याकाळी तुझ्या पोटात दुखणार आहे आणि आपण डॉक्टरकडे जाणार आहोत...!"

" काय..?" सुरुची हळूच ओरडली, " माझ्या का पोटात दुखणार आहे...?"

" मी ऑफिसमधून आल्यावर तुझ्या पोटात दुखणार आहे. मग आपण डॉक्टरकडे जायला निघणार. पण डॉक्टरकडे न जाता दुसरीकडे जाणार...!"

"कुठे...?"

" ते सरप्राईज आहे..!"

सुरुची गालातल्या गालात हसली आणि बोलली,

" ठीक आहे...! पण आई..?"

" आता तू ना...! " एवढ बोलून संकेत थांबला आणि नाष्टा करू लागला. सुरुची मात्र हसत होती. ह्यातून हे समजत होत की संकेत त्याच्या आईच्या धाकात होता. पण सुरुचीवर त्याच प्रेम होतं. संकेतने नाष्टा संपवला. सुरुचीच्या सासूबाई पण अंघोळ करून हॉलमध्ये आल्या. 

" निघालास ऑफिसला..?" सुरुचीच्या सासूबाई संकेतला बोलल्या.

" हो आई..!"

" तू आत जा ग..! मला नाष्टा घेऊन ये..!" सासूबाई सुरुचीला बोलल्या.

" हो आई..!" अस बोलून सुरुची पळतच किचनमध्ये गेली आणि सासूबाईंसाठी नाष्टा घेऊन आली.

संकेत शूज घालून निघायला तयार होता. सुरुची हॉल मध्ये आल्याबरोबर तो बोलला,

" येतो आई..!"

संकेतच्या आईने होकारार्थी मान हलवली. पुढच्या क्षणीच संकेत आणि सुरूचीची नजरानजर झाली आणि लगेच संकेत बाहेर गेला. सुरुचीने दरवाजा बंद करून घेतला. सुरुची बेडरूममध्ये आली. बेडवर बसून विचारात पडली, की काल रात्री आपली सासू आपल्याला अस पटकन मनाला लागण्यासारखं बोलली. मी लगेच बेडरूम मध्ये आली. ह्या विचारात की आपलं कुणीच नाही. आपल्या नवऱ्याने त्याच्या आईला अडवलं नाही किंवा तो आपली समजूत काढायला आला नाही. आपण नको ते करायला निघालो आणि दादाचा कॉल आला म्हणून थांबलो. पण आपल्या घरातच आपली सासू आपल्याशी अशी वागली आणि आपल्या नवऱ्याला ही तसच गृहीत धरलं. आईला घाबरून की काय पण तो लगेच मला समजवायला आत आला नाही ,पण तो तर बोलला की तो आत आला पण तू झोपली होतीस. त्याला माझा बिर्थडे पण आठवणीत आहे. आज तर तो मला संध्याकाळी सरप्राईज देणार आहे बोलला. मग काल फक्त एका व्यक्तीच्या टोमन्याने आपण जीव द्यायला चाललो होतो आणि जीव दिला असता तर आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य माणसांना मुकलो असतो. खरचं..! दादा बोलला तसं, आपली माणसं असतात. पण आपण त्यांच्याकडे व्यक्त होत नाही आणि गैरसमज होतात. 

सुरुची विचारात होती आणि बाहेरून सासूबाईंचा आवाज आला,

" जागी आहेस का ग..? मला पाणी हवंय..! आणि ही डिश पण घेऊन जा...!"

ही घोषणा ऐकून सुरुची भानावर आली. 

" आणते..! " अस बोलून ती बेडवरून उठली आणि तिने सासूबाईंना पाणी नेऊन दिलं. सासूबाईंकडे बघून तिला हसायला येत होतं. ह्यांच्यामुळे मी जीव द्यायला निघाली होती. माझ्या बरोबर मला सांभाळून घेणारी माझी माणसं आहेत आणि ह्यांचा मुलगा म्हणजे माझा नवरा आहे. आणि माझा नवरा माझ्या बरोबर आहे...! हणंsssss...!!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now