Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग नववा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग नववा )

इकडे सुरुची आणि तिच्या सासूबाईचं दिवसभर कशावरून ही बोलणं झालं नाही. दोघीही आपापल्या दिनचर्येत मग्न होत्या. काल रात्री घडलेल्या सगळ्या प्रकाराने दोघींकडून मौन बाळगलं गेलं होतं. पण संकेतने मात्र त्या गोष्टीचा वारंवार विचार करून स्वतःला त्रास करून घेतला होता. कारण ह्या दोघींमध्ये मध्यस्थीची भूमिका त्याला पार पाडायची होती. दोन्ही बाजू सांभाळून घेताना तो घेईल त्या निर्णयांतून त्याच्यावर पडलेल्या जबाबदारीची परिक्षाच होणार होती. 

दरवाजाची बेल वाजली. सुरुचीने हळूच हॉलमध्ये वाकून पाहिलं. आज दरवाजाची बेल ऐकूनसुद्धा सुरुचीच्या सासूबाई सोफ्यावरून हल्ल्या नाहीत. मग सुरूचीच दरवाजा उघडायला बाहेर आली. तिने दरवाजा उघडला. समोर थकलेल्या चेहऱ्याचा संकेत उभा होता. वरवरची स्माईल दाखवत तो आत आला. सुरुचीने ही त्याला तशीच स्माईल दिली. त्याची बॅग घेऊन सुरुची आत गेली. संकेतने शूज काढले आणि सोफ्यावर बसला. समोर आई बसली होती तिच्याकडे पाहिलं. तीच लक्ष टीव्ही मध्ये होतं. आई जाणूनबुजून आपल्याकडे बघत नाही आहे हे त्याने ओळखलं. 

संकेत तसाच उठून त्याच्या आईच्या शेजारी जाऊन बसला.

" आई..!" 

" हां..! बोल..! " संकेतची आई संकेतकडे न पाहताच बोलली.

" तू काल रात्री जे बोललीस ते मला खूप चुकीचं वाटलं..!" सुरुचीने हे ऐकलं आणि ती हॉलमध्ये आली आणि संकेतला थांबायचा इशारा करू लागली. पण संकेतच मागे लक्ष न्हवतं.

" म्हणजे..? काय चुकीचं वाटलं..!" संकेतची आई संकेतला बोलली.

" तू बोललीस की दुसरं लग्न कर.! पण त्या आधी तू मला विचारायला हवं होतंस की मला काय वाटतंय."

संकेत बोलतच होता. सुरुची मात्र संकेत बोलायचं थांबावा म्हणून प्रयत्न करत होती. पण संकेतने तिच्याकडे लक्ष देऊन  सुद्धा त्याच बोलणं चालूच ठेवल. सुरुची आता रागात हॉलमधून निघून गेली.

" मग सांग आता..! काय वाटतं तुला..?" संकेतच्या आईने टीव्ही बंद केला आणि संकेतकडे वळून बोलली.

" आई..! सुरूचीचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी तिला सोडून कसं देऊ शकतो..?"

" तिच्या पोटात दुखतंय म्हणून तिला सोडून दे असं मी नाही सांगत आहे. तिला मुलं होणार नाही आहे. तुला मुलं नको का? आपल्या खानदानाला पुढे वारीस नको का?"

" तसं नाही आई..!" 

" तसं नाय काय..? तुला भविष्याचा विचार आहे की नाही..?"

" भविष्याचा विचार आहे.! पण .."

" पण काय..?"

" भविष्य घडवायला वर्तमान असा कसा डावलून चालेल."

" हे असं पुस्तकी बोलणं मला ऐकवू नकोस..!"

" पुस्तकी नाही ग आई..! जे खरं आहे ते बोललो..!"

" मग मी खोटं बोलतेय का..?"

" मी कुठे बोललो असं..! पण सुरुचीला मुलं होत नाही ह्यात तिचा काय दोष..? आपण काही विचार करू...!"

" आता कधी विचार करणार आहेस..? आणि काय विचार करणार आहेस..? "

संकेत आधीच टेन्शन मध्ये होता. आता त्याची आई त्याच्या उत्तरांवर प्रतिप्रश्न उपस्थित करत होती, त्याने तो अजूनच दुःखी झाला. 

" हं...! आता समजलं..! हे तुझं डोकं नाही. तीच तुला सांगत असेल. पण लक्षात ठेव. तिने किती काही सांगितलं तरी जे सत्य आहे ते आहे..?" संकेतची आई सुरूचीच नाव न घेता बोलली.

" आई..! ती कशाला मला काय सांगेल? मला कळतं नाही का काही..? जे मला वाटतं ते मी बोललो. ती मला ह्याबद्दल काहीच बोलली नाही." असं बोलून संकेत सोफ्यावरून उठून बेडरूमकडे निघाला.

संकेत बेडरूममध्ये आला. सुरुची बेडरूममध्ये होती. संकेत आलेला पाहून ती रागातच म्हणाली,

" काय गरज होती तुम्हाला आईंना असं बोलायची..?"

" काय..? हे तू बोलतेयस..? " संकेतही आश्चर्य चकित होऊन बोलला.

" हो..! "

" पण तू का असं बोलतेयस..?"

"तुम्ही काय बोललात आईंना..?"

" म्हणजे तू ऐकलंस ना सगळं..?"

" हो...!"

"मग..? मी तुझीच बाजू घेऊन बोललो..!" 

" माझी बाजू घेऊन म्हणे..! ह्यात तुम्ही माझी बाजू काय घेतली..! सासूबाईंनी सगळं माझ्यावरच टाकलं ना..? आता त्यांना वाटतंय की मीच तुम्हाला असं बोलायला शिकवतेय..!" असं बोलत सुरुची संकेतच्या समोरून बाजूला झाली आणि बेडवर जाऊन बसली. सुरुचीचे डोळे पाणावले.

संकेत मात्र संभ्रमात पडला. आपण असं काय बोललो ज्यामुळे आपल्या आईने सुद्धा आपल्याला समजुन नाही घेतलं आणि आता सुरुची सुद्धा मला समजून घेत नाही आहे. 

" म्हणजे तुला काय वाटतं..? मी आईला जे बोललो ते चुकीचं बोललो का..? " संकेत सुरुचीला बोलला.

सुरुची तिच्या दोन्ही हातानी बसल्याबसल्या बेडवरची चादर मुठीत धरून मूठ आवळत बसली होती.

" बोल ना..? आता तू पण बोल तुझ्या मनातलं..?" संकेतने घेतलेलं टेन्शन त्याच्या बोलण्यात दिसत होतं. पण आता मात्र त्याला होत असलेला मनस्ताप त्याच्या डोळ्यात तरळला. 

" हो.. ! तुम्हीच चुकलात..! " सुरुची रागात म्हणाली आणि तिने संकेत कडे पाहिलं. संकेतचे पाणावलेले डोळे बघून सुरुची निःशब्द झाली. तिला बरच काही बोलायचं होत. आज पर्यंत ती कित्येक वेळा रडली होती. अशातशा कारणावरून नाही, ह्याच कारणावरून. कित्येकदा ती रडून रडून उपाशी राहिली होती. आयुष्यभरासाठीचा दुःखाचा डोंगर आपल्या डोक्यावर आहे तिला कळलं तेंव्हा ती किती रडली असेल.? त्या कारणामुळे पुढे दरवेळेस लागलेल्या ठेचा तिला किती यातना देऊन गेल्या असतील..? पण...

पण जेंव्हा तिने संकेतच्या डोळ्यात अश्रू पाहिले, तेंव्हा ती हादरली. आपला नवरा, आपला सर्वस्व, आपला आधार, घरचा कर्ता पुरुष असा पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या समोर 'ह्यात माझं काय चुकलं..?' ह्या भावनेतून आपल्याकडे पाहत आहे, हे कोणत्याही स्त्रीला सहन होणार न्हवतं. भले त्याच्याबद्दल तुमची आधीची कोणतीही मतं असोत. पण सद्या तो ज्या परिस्थितीत तुमच्यासमोर त्या परिस्थितीत तुम्ही त्याचं सद्याच मन किती निर्मळ आहे ह्याची तुम्हाला खात्री पटली असेल. सुरुची बेडवरून ताडकन उभी राहिली आणि बोलली,

" अहो..! हे काय..? तुमच्या डोळ्यात पाणी...?"

संकेतने मात्र त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांनी सुरुचीकडे पाहिलं आणि बेडवर बसला. बसला कसला, त्याने स्वतःला मागे झोकून दिलं. त्याच्या हातांच्या नकळत मिळालेल्या आधारामुळे तो बेडवर बसलेला दिसला. 

" अहो ..! तुम्ही का एवढं वाईट वाटून घेताय...?" सुरुची बोलली.

संकेत मात्र स्वतःच्या विचारात बुडाला होता. त्याने केलेले विचार त्याच्या मनात गोंधळ घालत होते. तो तेच विचार घेऊन ऑफिसमध्ये जाऊन काम करत होता. तेच विचार घेऊन तो प्रवास करत होता. सुरुची घरातील काम करताना जे विचार करत असेल तसेच किंवा त्यापेक्षा थोडेफार कमी त्रासाचे पण विचार मात्र करत होता. 

संकेतने आत्तापर्यंत त्याच्या डोळ्यात साठवून ठेवलेल्या अश्रूंना वाहत जाण्यासाठी त्यांना वाट करून दिली आणि बोलला,

" हरलो ग मी आज..! हरलो..! "

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now