Jan 22, 2021
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौथा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौथा )

संकेतच्या आईने दार उघडलं. संकेत आणि सुरुची घरात आले. सुरुची लगेच आत गेली. ती आत गेलेली पाहून संकेतची आई संकेतला बोलली,

" काय रे..! जाऊन आलात डॉक्टरकडे..?"

" हो.! हो आई..!" संकेत बोलला.

" काय बोलले डॉक्टर..?"

" हं.. काय..?" संकेत चाचरत बोलला.

" मलाच काय विचारतोयस..! मी तुला विचारतेय ना..!"

" हां म्हणजे डॉक्टरांनी औषध दिली आहेत. बर वाटेल तिला." संकेत उडवाउडवीची उत्तर देत होता पण तो चुकत होता हे त्याच्या लक्षात येत न्हवत.

एवढ्यात सुरुची हातपाय धुऊन बाथरूम मधून बाहेर आली होती. तिच्या कानावर ह्या दोघांचं बोलणं पडलं.तशी ती हॉलच्या पडद्या आड थांबून ऐकू लागली.

" डॉक्टर औषध देणारच. ते त्यांचं कामच आहे. पण औषध कशासाठी ते विचारतेय...!"

" काय ग आई.! तुला बोललोना तीच पोट दुखतंय. मग पोट नको दुखायला म्हणूनच डॉक्टरने औषध दिलं."

" अच्छा..! नीट तपासलं ना त्याने..?"

" हो ग आई..! " संकेत अशी उत्तरे देत होता आणि ती ऐकून सुरुचीच्या घालमेल होत होती.

तिला समजत होत सासूबाई कोणत्या उद्देशाने एवढे प्रश्न विचारत आहेत आणि संकेत मात्र बिनधास्त उत्तरे देत होता. संकेत कपडे बदलायला हॉलमधून बेडरूममध्ये यायला लागला, तसं सुरुची बेडरूममध्ये गेली. संकेत बेडरूममध्ये आला आणि सुरुचीकडे असा पाहू लागला जस की त्याने युद्धात फत्ते हासिल केली आहे. मी सगळं सांभाळलं की नाही अशा आविर्भावात उभा होता. पण सुरुची त्याला हळूच बोलली,

" आईंनी काय विचारलं.?"

" हं..! आईने खूप काही काही विचारलं..!"

" मग तुम्ही काय-काय उत्तरे दिली..?"

" मी बोललो होतो ना तुला, तू नको टेन्शन घेऊस. मी सांभाळून घेईन सगळं. सांभाळलं मी.!" संकेत कपडे बदलता बदलता मोठ्या आविर्भावात बोलला.

" काय सांभाळलं..? समजतंय का तुम्हाला काही..?"

" काय सांभाळलं म्हणजे..? आपण डॉक्टरकडेच गेलो होतो ना, हे कन्फर्म करायला आई खूप प्रश्न विचारत होती. मी पण नीट उत्तरे दिली."

" काय नीट उत्तरे दिली..! मी सगळं ऐकलं आतून..!"

" हं.! तरी मला विचारतोयस.? "

" म्हणून तर विचारतेय..!"

" हे काय..? ऐकलंस तरी परत काय ऐकायचंय..?"

" अहो..! तुम्ही ना पागल आहात...!"

" ए...!" संकेत उगाच ओरडत सुरुचीवर ओरडला.

" आवाज कमी करा.! " सुरुचीने संकेतलाच दरडावल." तुम्ही सगळी गडबड केली आहे. "

" कसली गडबड..?"

" सासूबाईंनी एवढ विचारलं ना, ते दुसऱ्या अर्थाने.  तो अर्थ समजतोय का तुम्हाला..?" सुरुचीने संकेतच मनगट पकडून त्याला प्रश्न केला.

सुरूचीचा हा अवतार पाहून संकेतने फक्त नकारार्थी मान हलवली. सुरुचीने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. ती बेडवर बसली. संकेतने जरा विचार केला आणि त्याला ही आता समजलं की काय झालय ते..! 

" अरे देवा...! " आता संकेतनेही डोक्यावर हात मारून घेतला. " आईने त्या उद्देशाने विचारलं.? मला कळलंच नाही.."

" हं..! तुम्हाला ही हेच कारण भेटलं होत सांगायला.? ताप, सर्दी, खोकला असं काही सांगायचं ना..?"

" आता तेंव्हा जे सुचलं ते सांगितलं. पण मी आधीच सकाळीच तुला सांगितलं होतं ना की तुझ्या पोटात दुखणार आहे. तेंव्हा तुला नाही कळलं की मी हेच कारण संध्याकाळी देणार आहे..?" 

" संध्याकाळी घरी यायच्या आधी मला कॉल तरी केलात का..? तुम्हीच आल्याबरोबर सगळं सासूबाईंना सांगितलं."

" जाऊदे आता..! मी फ्रेश होतो. परत आई काही बोलली तर मी तसं तिला बोलतो." एवढ बोलून तो बाथरूममध्ये गेला. सुरुची मात्र बेडवरच बसून होती. आता ह्या नवीन प्रकरणामुळे तिला लवकरच सासूबाईंचे टोमणे खावे लागणार आहेत ह्याची तिला जाणीव झाली होती. संकेत फ्रेश होऊन बाहेर आला आणि हॉलमध्ये जाऊन बसला. हे पाहून संकेतच्या आईने संकेतला विचारलं,

" चहा पिणार आहेस का..? उशीर झाला आहे ना म्हणून विचारलं. "

" नको ग आई..! आता कुठे चहा.!"

" ठीक आहे. " अस बोलून त्यांनी सुरुचीला हाक मारली,

" सुनबाई..!" 

" आले आई..!" सुरुचीने बेडवरून उठत आवाज दिला.

"इकडे नको येऊस.! किचनमध्ये जा.! जेवण बनवायला घे लवकर.! संकेतने चहा पण नाही घेतलाय."

" हो आई..!" सुरुची एवढ बोलली आणि हळूच गालातल्या गालात हसली. मनातच बोलली, ' तुमच्या संकेतने आज चहा पिला नसला म्हणून काय झालं, एक प्लेट पाणीपुरी तरी खल्ली आहे.' अशी सारखीच प्रतिक्रिया संकेतच्याही मनात आली. 

सुरुची आता किचनमध्ये जाऊन जेवणाची तयारी करायला लागली. संकेत आणि त्याची आई टीव्ही बघत बसले होते. संकेत ह्याच विचारात होता की आईने परत काही विचारायला नको. आता मात्र त्याला उत्तरे द्यावी लागतील, ह्याची भीती वाटू लागली होती. 

काही वेळाने सुरुची सगळं जेवण बनवून हॉलमध्ये आली आणि सासूबाईंना म्हणाली,

" आई..! जेवण झालं आहे. वाढायला घेऊ का..?"

" हो..!" सासूबाई टीव्ही बघतच बोलल्या.

सुरुचीने संकेतकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसली. संकेतने मात्र त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव दाखवला नाही. सुरुची किचनमध्ये गेली. तिने ताटं वाढली आणि हॉलमध्ये घेऊन आली.तोवर सासूबाईंनी आणि संकेतने हात धुवून घेतले आणि जेवायला बसले. संकेत ह्याचं विचारात होता की आई आता परत काही विचारणार आहे की नाही. दोघांचही जेवण झालं. सुरुचीने ताटं उचलली आणि किचन मध्ये घेऊन गेली. हात धुवून ती ही जेवायला बसली. संकेत आणि त्याची आई हॉलमध्येचं बसले होते. सुरूचीच जेवण झालं. तिने लागलीच भांडी घासून घेतली. भांडी घासून झाल्यावर ती थेट बेडरूममध्ये जाऊन बसली.

काही वेळाने संकत त्याच्या आईला बोलला,

" आई..! मी झोपायला जातो आता." आणि सोफ्यावरून उठला.

" हो बाळा..! मी पण झोपते आता. ही सिरीयल अजून ५ मिनिटे आहे. तेवढी बघून झालं की झोपते. तू जा..! सकाळी कामावर जायचंय ना..!"

" हो आई..! " एवढ बोलून तो बेडरूममध्ये गेला.

सुरुची बेडरूममध्येच होती. तिने संकेत कडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर ' सुटलो..!' असा भाव होता. सुरुची मात्र उदास होती. 

" सुरुची...! काय विचार करतेयस..?"

" काही नाही." सुरुची पटकन बोलली.

" गिफ्ट आवडलं नाही का..?"

"अरे देवा..! गिफ्ट तर उघडून पहिलंच नाही मी." सुरुची आनंदात बोलली.

" हं..! मला वाटलं तुला गिफ्ट आवडलं नाही म्हणून अशी नाराज होऊन बसली आहेस."

" नाही ओ..!" सुरुची गिफ्ट घेऊन आली आणि संकेतच्या समोर बेडवर बसली. 

" चल..! लवकर गिफ्ट उघड..!"

" काय आहे ह्यात..?" 

" आता तूच उघडून बघ..!"

" नको..! राहूदे असच.! काहीही असलं तरी तुम्ही दिलं आहे तर ते छानच असणार..!"

" मग काय उघडून बघणार नाहीस..?"

" राहूदे ना..! "

" नाही.. उघड आत्ताच."

सुरुचीने उगाच रुसल्यासारखं करून गिफ्टचा कागद खोलला. आत एक लाल रंगाचा बॉक्स होता. तिने तो हात घेऊन हळूच थोडा उघडला आणि परत बंद केला. ती ओरडली,

" ह्यात सोन्याचं काही आहे !"

तसं संकेतने तिच्या होटांवर त्याचा उजवा हात ठेवला आणि  होकारार्थी मान हलवली. सुरुचीने परत बॉक्स उघडला. त्यात सोन्याचे सुंदर असे कानातले होते. सुरुची खूष झाली. संकेतने तिला विचारलं,

" आवडले..?"

सुरुचीने मान हलवली. 

" बोल ना..!" संकेत बोलला.

" उं.. उं..." संकेतचा हात अजून सुरुचीच्या होटांवरच होता. त्याला ते आठवलं. तसा त्याने त्याचा हात बाजूला केला. 

" खूप छान आहेत ओ..! थॅंक्यु..!" एवढं बोलून सुरुचीने संकेतच्या जवळ जाऊन त्याच्या गालावर तिचे होट टेकले. तसं संकेतने तिला मिठीत घेतल. दोघे ही एकमेकांच्या बाहुपाशात जाऊन बेडवर आडवे झाले.