Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग पंधरावा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग पंधरावा )

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर संकेतने सुरुचीचा नंबर डायल करून पाहिला. पण अजूनही सुरूचीचा नंबर ऑफ येत होता. संकेतने ऑफिसला जायची तयारी केली. तो तयार होऊन हॉलमध्ये आला. त्याची ऑफिसला निघायची वेळ झाली तरी त्याची आई अजून किचनमध्येच होती. त्याने हळूच वाकून पाहिलं ,तर आई त्याच्या डब्बाच जेवण बनवण्यासाठीची गडबड चालली होती. आज ऑफिसला जायला उशीरच होणार आहे हे मनाशी ठरवून संकेत हॉलमध्ये बसून होता. काहीवेळाने त्याची आई त्याचा डब्बा भरून हॉलमध्ये घेऊन आली. 

" जरा उशीरच झाला ना...?" संकेतची आई संकेतला बोलली.

" हं..! ठीक आहे. पण तू कशाला डब्ब्यासाठी बनवायचंस..! मी कॅन्टीन मध्ये जेवलो असतो...!" संकेत असंच बोलून गेला.

" कशाला कॅन्टीनमधलं खातोयस..! मी उद्यापासून वेळेवर बनवून देईन." 

" ठीक आहे..! मी निघतो. " अस बोलून संकेत सोफ्यावरून उठला आणि ऑफिसला जायला निघाला. तस त्याच्या आईला आठवलं की आपण संकेतला चहा दिलाच नाही.

" अरे..! चहा ठेवला होता तुझ्यासाठी..! तेवढा पिऊन जा..!"

"नको ग आई..! खूप उशीर होईल..! "

संकेतने दरवाजा उघडला आणि शूज घालून तो निघून गेला. अचानकची दमछाक झाल्यामुळे त्याची आई थकल्यासारखी जाणवत होती. संकेत बाहेर गेल्याबरोबर ती सोफ्यावर बसली आणि थकवा घालवू लागली. आज बरेच दिवसांनी त्यांना सकाळी लवकर उठून कामं करावी लागली होती. कळत नकळत का होईना त्यांना त्यांच्या सुनेची आठवण झाली असणारच.

संकेत ऑफिसमध्ये पोहोचला. आज तो जवळपास अर्धा तास उशिरा आला होता. त्याला आत आलेलं पाहताच मनोज त्याला बोलला,

" काय साहेब..! आज चक्क तुम्ही उशिरा आलात..! " आणि तो हसला.

" हो..! आज थोडा उशीर झाला."

" सुरुचीचा कॉल आला होता का..?" पल्लवीने महत्वाचा प्रश्न विचारला.

संकेतने ह्या प्रश्नाला फक्त नकारार्थी मान हलवून प्रतिसाद दिला आणि तो त्याच्या टेबलसमोरील चेअरवर जाऊन बसला. पल्लवी त्याच्या टेबलसमोर येऊन उभी राहिली आणि बोलली,

" तू कॉल करून बघ..!"

" मी कॉल केला हॊता. पण तिचा मोबाईल तिने अजूनही बंद ठेवला आहे..!"

" संकेत..! सुरुची असं घर सोडून गेली आहे म्हणजे तिच्या मनावर खूप आघात झाले आहेत. आता तिला ते अशक्य झाले म्हणून तिने असा निर्णय घेतला आहे. तू लवकरात लवकर तिला जाऊन भेट.! "

" हो..! तिचा आज कॉल नाही आला किंवा आज माझा तिच्या बरोबर कोणताही संपर्क झाला नाही तर मी उद्याच तिच्या दादाकडे जायला निघणार आहे. मग तिथे जाऊनच तिला समजावून घरी आणेन..!"

" ठीक आहे..! " असं बोलून ती तिच्या जागेवर जाऊन बसली.

संकेतने पुन्हा सुरुचीचा नंबर डायल करून पाहिला, पण तो अजूनही बंदच होता. काय करावं..! आपण तिच्या दादाच्या नंबरवरचं कॉल करावा का..? नको..! आजच्या दिवस वाट पाहू..! असा विचार मनात करून संकेत कामाला लागला.

दुपार झाली. ऑफिसचा लंच टाईम झाला. संकेतने त्याच जेवण हुरकल आणि इतक्यात त्याच्या मोबाईलवर सुरूचीचा मिस कॉल आला. संकेत त्या मिस कॉलने खूप खुश झाला. त्याच्या चेहऱ्यावर हस्य पसरलं. त्याने क्षणाचाही विलंब न करता सुरुचीच्या नंबर वर कॉल केला. समोरून सुरुचीने कॉल उचलला.

" हॅलो..! सुरुची...!"

" ...." समोरून काही प्रतिसाद न्हवता.

" सुरुची..! ऐकतेयस ना..?"

"....."

"सुरुची..! तू मला न सांगता अशी का निघून गेलीस. तुला वाटलं नाही की एक वेळ माझ्याबरोबर बोलावं..?"

" मी तुम्हाला तेंव्हा मिस कॉल दिला होता."

" मिस कॉल..? कॉल करायचास ना ..! मला वाटलं तो मिस कॉल चुकून आला असेल."

" मग आता ही मी मिस कॉलचं दिला होता. तरी कॉल केलात..!"

" हं..! आता मला शब्दात अडकवणार..? सॉरी. "

" सॉरी का..? "

" माझ्याकडून खूप काही चुकलं आहे. मला एकदा माफ कर..!"

" पण तुम्ही काहीच केलेलं नाही. मग तुम्ही का माफी मागताय..? "

" मग तू घरातून का निघून गेलीस..?"

" तुम्हाला सुख मिळावं म्हणून. असं ही आता तुमच्या आई आता खूप खुश असतील."

" तू तिच्याबद्दल नको बोलूस. मी आपल्यात तिचा विचार नाही करत. मी उद्या तिकडे येतोय.! आपण सविस्तर बोलू..!"

" आता काय बोलायचंय..?"

" काय म्हणजे..? आपण आता बोलायचं नाही असं ठरवलं आहेस का..? मला काय वाटत असेल हे तू समजू शकत नाहीस..?"

" तुमचा विचार करून तर आता मिस कॉल दिला आणि बोलतेय तुमच्या बरोबर."

" तर मग आता दादाकडे गेली आहेस, तिथे चार दिवस रहा..! मग घरी परत ये..! "

" हं..! पण मी नाही आली तर..?"

" असं नको बोलूस..! तुझ्याशिवाय मी कसा जगू.." संकेत भावुक झाला.

" तुम्ही ऑफिसला आहात. तुमचा लंच टाईम संपला असेल. ठेवा फोन..!" सुरुचीने मुद्दाम संकेतला आठवण करून दिली.

" हो.! ते तर आहेच..! पण मी ऑफिसमधून सुटल्या बरोबर कॉल करेन..!" 

" हं..! "

" चल ठेवतो आता..!" संकेत असं बोलल्याबरोबर सुरुचीने कॉल कट केला.

संकेत ही त्याच्या जागेवर जाऊन बसला. पल्लवी आणि मनोजने त्याच थोडं बोलणं ऐकल होत. त्यांना समजलं होत की सुरुची आणि त्याच बोलणं चालू आहे. म्हणून ते ही त्याला लंच रूम मध्ये सोडून एकटा सोडून बाहेर आले होते. 

संध्याकाळी ऑफिसमधून तिघे ही एकत्र बाहेर पडले. बाहेर येताच पल्लवीने संकेतला प्रश्न केला,

" मग..! काय बोलली सुरुची..? तू कधी जतोयस तिला आणायला..?"

" अजून काही ठरलं नाही. आता तिला कॉल करणार आहे. मीच तिला बोललो आहे की आता चार दिवस तिथे रहा..! ती अचानक निघाली तर तिच्या दादाला बरं नाही वाटणार.!"

" ते ही बरोबर आहेच म्हणा. "

" चल..! बाय.! बाय मनोज..!"

" बाय..!"

" बाय..!"

असं बोलून तिघेही आपापल्या दिशेला निघून गेले. 

इकडे सुरूचीचा दादा थोडा चिंतेत होता. सुरूचीच अस अचानक त्याच्याकडे राहायला येणं, पल्लवीने त्याच्या मोबाईलवर केलेला कॉल हे सगळं असं दर्शवत होत की सुरूचीच्या सासरी नक्कीच काहीतरी झालं आहे. पण सुरुचीला ह्याबद्दल कसं विचारावं. तरी ही त्याने मनाशी काही ठरवून सुरुचीला ह्याबद्दल विचारण्यासाठी आवाज दिला,

" कोमल.."

" हां दादा..!"

" इकडे ये..!"

" आले..!" असं बोलत सुरुची तिच्या दादाजवळ आली. " काय रे दादा..!"

" ये ग. बस इथे..! " सुरुचीच्या दादाने तिला त्याच्या बाजूला बसवलं.

सुरुची त्याच्या बाजूला बसली. 

" काय चाललंय मग सासरी..? "

प्रश्न तसा साधा होता पण सुरुचीसाठी थोडा अवघड होता. तरी ही तिने सहज म्हणून उत्तर दिलं.

" सगळं ठीक..! "

" सासूबाई कशा आहेत..? आणि संकेत..?"

" दोघेही ठीक आहेत.." 

" आणि तू...?" 

दादाच्या ह्या प्रश्नाने सुरुची गडबडली.

" मी काय..? मी ही ठीकच आहे.अस का विचारतोयस..?"

"समोरची व्यक्ती काही बोलली नाही तरी तिच्या वागण्यातून काही गोष्टी पुढच्याला समजतात. मी तर तुझा भाऊ आहे. माझ्यापासून नको लपवून ठेऊस..! "

दादाच्या अशा बोलण्याने सुरुची शांत झाली. तिने कितीही लपवलं तरी तिच्या अशा अचानक येण्याने तिच्या दादाला थोडाफार संशय येणं साहजिकच होत. सुरुचीचे डोळे पाणावले होते. दादा परत बोलला,

" बरं..! तुला सांगावस वाटत नसेल तर नको सांगूस,पण जेंव्हा तुला माझी मदत लागेल तेव्हा लगेच मला सांगा. मी आधी तुला बोललेलं लक्षात आहे ना..?" दादाने तिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्या शब्दांची आठवण करून दिली. सुरुची काहीच बोलत नाही हे पाहून तिचा दादा उठला आणि बाहेर जाऊ लागला. तेंव्हा सुरुची उठली आणि तिने तिच्या दादाला हाक मारली,

" दादा..!" 

दादा मागे वळला आणि तशी सुरुचीने त्याला मिठी मारली. इतका वेळ तिने लपवलेल्या तिच्या अश्रूंना वाट करून दिली. सुरुची रडू लागली तसं तिच्या दादाने तिच्या डोक्यावर हात हात ठेवला. एका हाताने तिला कवेत घेऊन बोलला,

" मी आहे तुझ्या सोबत. आता रडू नकोस..!" 

असं समजावत त्याने सुरुचीला मिठीतुन लांब केलं आणि खाली बसवलं. 

" तू जो निर्णय घेशील त्यात मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या लग्नाची जबाबदारी घेतली होती. काही चूक झाली असेल तर ती माझीच असणार..! मी तुझ्या सासरच्यांना नीट ओळखलं नाही."

" असं नाही दादा..! तुझी काही चूक नाही. दोष माझ्यात आहे. तू स्वतःला दोष लावून नको घेऊस.!" सुसरूची दादाच बोलणं ऐकून बोलली.

" असं का बोलतेयस..? तुझ्यात काय दोष आहे..?"

सुरुची आता परत रडायला लागली. तिच्या दादाने तिचे डोळे पुसले आणि तिला परत विचारलं,

" कोमल.! काय झालं आहे ..? "

" दादा...!" सुरुची एवढ बोलून थोड्यावेळाने परत बोलली, " मी आई नाही होऊ शकतं.!" 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now