Jan 19, 2022
नारीवादी

एकटी 'ती', अनं सावरली ( भाग अठरावा )

Read Later
एकटी 'ती', अनं सावरली ( भाग अठरावा )


" वहिनी..! मग मी आता काय करू..?"

" सद्या तुम्ही ठाम रहा..! तुम्ही त्यांच्या बरोबर जाऊ नका..!"

" आता मी कोणताच ठाम निर्णय घेऊ शकत नाही आहे. एक बाजू पहिली तर मला त्या घरात परत पाऊल ठेवावंस वाटतं नाही आणि ह्यांना असं पाहिलं तर त्यांच्या बरोबर जावं असं वाटतं."

" पण तुला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल आणि तो ही संकेतपासून वेळग राहण्याचा..!" आता सुरूचीचा दादा सुद्धा स्पष्ट बोलला.

" हो दादा..! पण पुढे काय ह्याचा विचार मी केला नाही आहे.! मला त्यावेळेस सगळं असह्य झालं आणि मी तिथून निघाले."

" ते ठीक केलंस. पण तुला वाटतं का ती परिस्थिती तू अशी निघून आल्यामुळे बदलणार आहे.? तू तिथे परत गेलीस तर परत तेच घडणार आहे..!"

" मग काय करू दादा..?"

" तू काही वेळ तरी इथेच रहा..! पण संकेतला एवढच पटवून दे की तू त्या वातावरणात नाही राहू शकत..!"

सुरुचीला अजून ही सुचत न्हवत की संकेतबरोबर काय बोलावं.! इकडे संकेत मात्र सुरुचीबरोबर कधी बोलायला भेटेल म्हणून तिची बाहेर वाट बघत होता. 

" जा.! संकेत बरोबर बोलून घे..! एकदाच काय ते बोलून टाक..! मन मोकळं होईल तुझं..!" दादा सुरुचीला बोलला.

तसं सुरुची किचन मधून बाहेर आली. दादा ही तिच्या मागून बाहेर आला. संकेत हॉलमध्ये बसला होता. सुरुची बोलायला घाबरत आहे हे पाहून दादा सुरीचीला बोलला,

" तुम्ही दोघे आत बेडरूममध्ये जाऊन बसा..! इथे मुक्ता खेळत बसेल आणि संकेतला त्रास देईल..!"

" नाही..! ठीक आहे. मी बसतो इथेच..!"

" अरे आत जाऊन बस..! तेवढ तुम्हाला बोलायला भेटेल.!" 

सुरुचीच्या दादाचा हा असा आग्रह पाहून संकेतला ही आश्चर्य वाटलं. आपण कुठे हिला इथेच ठेऊन जाणार आहे.! की थोडावेळ भेटला आहे तर एकांतात बोलून घाव..! संकेतच्या मनात असं चालू असताना सुरुची त्याला बोलली,

" या..!" आणि ती बेडरूमकडे जाऊ लागली.

संकेतही थोडा संकोचून तिच्या मागून आत गेला. सुरुची बेडरूममध्ये आली. संकेतही आत येताच तिने दार बंद केलं. संकेत सुरुचीकडे पाहत होता. 

" बसा..!" सुरुचीने संकेतला बसायला खुर्ची दिली.

" हो..! पण तू ही बस ..! "

" नाही. मी ठीक आहे इथे..!"

"जेवण छान झालं होतं ..!"

" हं..!" ह्यापुढे सुरुची काहीच बोलली नाही. तिने साडीचा पदर हातात घेतला होता. ती पदराच्या टोकाला दोन हाताने पकडून वेळोटे मारत उभी होती. तीच लक्ष मात्र इकडे तिकडे होतं.

" काय झालंय सुरुची..?" संकेतने तीच असं वागणं बघून प्रश्न केला.

" काही नाही ..!"

" नाही कसं..! तुझ्या चेहऱ्यावर सगळं समजतंय..! ये. इथे बस..!" असं बोलत संकेतने सुरूचीचा हात पकडला आणि तिला बेडवर बसण्यास सांगितलं.

सुरुची बेडवर बसली.

" मला माहित आहे की ती का इथे आली आहेस..?" 

" का..?"

" आईच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं आहे. मी ही मान्य करतो आई तसं बोलली. मी तिच्या बाजूने तुझी माफी मागतो..!"

" तुम्ही माफी नका मागू..!"

" मग काय करू..? तू अशी न सांगता निघून आलीस. मला तर खूप भीती वाटली होती..!"

" भीती वाटायचं काय कारण त्यात..?"

" मग..! तू अशी न सांगता निघून कुठे गेलीस ह्याचा विचारकरून भीती वाटली..!"

" हं..! मग नका माझा एवढा विचार करू..!"

" असं काय बोलतेयस..? नवरा आहे मी तुझा..!"

सुरुची शांत होती.

" तुला इथे राहायचं आहे का..?"

" हं.."

" बरं..! मग तसं सांग ना..! रहा अजून काही दिवस..!"

"काही दिवस नाही..!" सुरुची धीर करून बोलली.

" मग..? " 

" तुम्ही समजून घ्याना..!" सुरुची रडवेली होऊन बोलली.

" मी समजून घेतोय ग..! तुला वाटतयं तितके दिवस रहा इथे..! बस..?"

" तसं नाही..!" आणि शेवटी सुरुची धीर करून बोलली, " मला तुमच्याबरोबर नाही यायचंय तिकडे..?"

संकेतच्या मनात चरर झालं. अंगातून एक शहारा गेला. 

" नाही यायचं म्हणजे..? आता नाही यायचं ना..?" संकेतला त्याच्या मनात आलेल्या शंकेची खात्री करून घ्यावीशी वाटली.

" फक्त आता नाही..! कायमच..!"

" ए..! नाही हां..! अशी मस्करी नाही करायची." संकेतला खरं काय ते जाणवलं होत, पण तो न दाखवल्यासारखं करत बोलला.

" मस्करी नाही. मी खरं बोलतेय..!" सुरुचीच्या अश्रूंचा बांध फुटला, " मला नाही याचं तिथे..! जिथे मला मी आई होऊ शकत नाही म्हणून सारख हिणवल जात. काही चूक झाली की येऊन जाऊन परत तिथेच बोट ठेवलं जातं. मला नाही राहायचं अशा घरात..!" सुरुची धडाधड बोलत गेली आणि हुंदके देऊन रडू लागली.

" ए सुरू..! असं नको बोलूस ना..! मला माहित आहे आईचा स्वभाव कसा आहे. ती फटकळ आहे. ती पटकन बोलून जाते. मी त्यावरून तिला ओरडतो की नाही..! "

" हो..! पण तुम्हाला काहीच माहीत नाही. तुम्ही कामावर गेलात की मला ते घर खायला उठत. काय करावं सुचत नाही. सासूबाईंनी आवाज दिला की माझ्या काळजात धस होतं.! आता कशावरुन काय बोलतील देव जाणे..!"

संकेत सुरूचीच हे बोलणं ऐकून शांत झाला. हे एवढ घडतंय ह्याची आपल्याला कल्पनाही नसावी.आपल्याला वाटलं होतं की आपल्या दुसऱ्या लग्नाच्या विषय आईने काढला म्हणून ही रागावली असेल. पण हिला तर आई त्रास देत होती. पण ही मला का बोलली नाही. ? कदाचित सहन करता येईल तिने तेवढा केला. आता काय बोलायचं..! 

" मला माफ कर..! पण आता तू चल माझ्या सोबत..! आपण वेगळे राहू..! पण माझ्या सोबत चल..!" संकेत हतबल होऊन बोलला. तशी सुरुची लगेच बोलली,

" नाही नाही..! तुम्हाला तुमच्या आईपासून वेगळी करणारी मी कोण..? तुम्ही रहा तुमच्या आई सोबत..!" 

" अस नको बोलूस ग..! माझ्या आई एवढंच तुझं ही महत्व आहे माझ्या आयुष्यात..!"

" पण तुमच्या आईंच्या आयुष्यातील सुनेच स्थान मला नाही मिळवता येणार..! त्यामुळे तुम्ही माझा विचार आता सोडा..! नव्याने संसार थाटा..!" सुरुचीच्या मनात जे होत ते सगळं बाहेर येत होतं. तिला अजून ही खुप काही बोलायचं होतं. पण संकेतच मन दुखावलं जाऊ नये फक्त ह्यामुळे ती त्याला आधीही काही बोलली न्हवती आणि आता ही बोलत नव्हती. तीच फक्त हेच ठरलं होतं की संकेत सोबत जायचं नाही.

संकेत आणि सुरुची बराच वेळ शांत होते. सुरूचीच्या दादाला आणि वहिनीला आत ह्या दोघांचं काय बोलणं चालू आहे हे समजत नसल्याने ते दोघेही चिंतेत होते. कारण संकेतचा स्वभाव त्यांना दिसायला असा शांतच होता. पण त्याचा मूळ स्वभाव ही तसाच असेल तर बरं. नाहीतर रागाच्या भरात त्याच्याकडून काही विपरीत घडुदे नको. 

शेवटी मनाशी काही ठरवून काही वेळाने संकेत बोलला,

" तू तुझं सगळं आधीपासूनच ठरवलं आहेस तर आता मी काय कुणीही तुला समजावलं तरी तुला ते पटणार नाही. किंवा तू पटवून घेणार नाहीस..!"

सुरुची संकेतच्या नजरेला नजर मिळवत न्हवती. संकेत तिच्याकडेचं पाहत होता. न राहवून संकेत उठला आणि सुरुचीच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याने तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतले. सुरुची अजूनही त्याच्या नजरेला नजर मिळवत न्हवती. संकेतने नाईलाजाने सुरुचीचे हात त्याच्या हातातुन सोडले आणि उजव्या हात तिच्या गालावर हळुवार फिरवत बोलला,

" चल..! निघतो मी..!" त्याचे डोळे पाणावले होते. सुरूचीचा नवरा म्हणून त्याने तिच्यावर घरी येण्यासाठी थोडी तरी  जबरदस्त करणं जग मान्य झालं असतं. पण असतात काहींचे स्वभाव. त्यांना एखद्यावर असं आपले विचार लादनं,  आपल्या माणसांवर सुद्धा अधिकार गाजवण जमत नाही. संकेत ही त्यातलाच एक. 

संकेत वळला. त्याने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बाहेर पडला. सुरुचीने आता त्याच्याकडे पाहिलं. संकेतने सोफ्यावर ठेवलेली त्याची बॅग उचलली. सुरुची बेडरूमच्या दरवाजाच्या थोडी बाहेर आली. तिथून मुख्य दरवाजा पूर्ण दिसत होता. संकेतने सुरुचीच्या दादाला निरोप देणं ही टाळलं. तो तडक घराबाहेर पडला. सुरुची लगबगीने मुख्य दरवाजापाशी गेली. संकेतच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या देहाकडे पाहून तिला परत भरून आलं. हळू हळू संकेत नजरेआड झाला. 

ह्यांनी एकदाही मागे वळून नाही पाहिलं. आपण हे सर्व बोललो, आपण हे का केलं हे ते समजून घेतली ना..? आपण हे स्वतःसाठीच नाही तर त्यांच्या भवितव्यासाठी करतोय हे त्यांना पटेल ना..? खरचं..! एका हेकेखोर नातलगाला आपल्यापासून दूर करण्यासाठी आपण एका जिवलग व्यक्तीला असं दूर करणं योग्य आहे का..? की फक्त त्या जिवलगावर विश्वास ठेवून, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या सोबत राहणं योग्य ठरलं असतं..? असे अनेक विचार सुरुचीच्या मनात येत होते. 

पण कधी..? तो जिवलग असा आपल्या सोबतच नात जपण्यासाठीची गयावया करून, माफी मागून, नंतर हतबल होऊन निघून गेल्यावर ? आता मागून विचारलं करून काही उपयोग नाही. जे दुखावले गेले ते दुखावले.

सुरुची दरवाजाजवळ उभी राहून अश्रू ढाळत होती. सुरूचीचा दादा तिच्या जवळ आला. त्याने सुरुचीच्या खांद्यावर हात ठेवला. सुरुची दादाकडे कलती झाली. सुरूचीचा दादा सुरुचीला बोलला,

" तू जे केलंस ते तुला योग्य वाटलं पाहिजे. तूच त्याच्यावर चुकीचा विचार करत राहिलिस तर तुला त्रास होईल. मग तू इतरांना कशी समजावणार की तू बरोबर होतीस..!"

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now