कथेचे नाव - तिने काळालाही हरवले
विषय - काळ आला होता पण....
फेरी - राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
काळ आला होता तर
अमृता एक अतिशय गुणी आणि प्रेमळ मुलगी. शाळेतील अनेक स्पर्धा व परीक्षेत तिने नेत्रदीपक यश मिळवले होते. तिचे मध्यमवर्गीय खाऊन पिऊन सुखी कुटुंब. आई गृहिणी तर तिचे बाबा पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते. तिला एका छोटा भाऊ होता "ओजस" नावाचा. सहावीत शिकत होता. प्रचंड अवखळ आणि अभ्यास सोबत तो मस्ती ही तितकीच करायचा. अमृताचे शालेय शिक्षण संपले आणि महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले.
अमृता आणि तिच्या मैत्रीणीनीं मिळून एकाच महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, त्यामुळे तिच्या आनंदात भर पडली होती. भलेही त्यांच्या शाखा वेगवेगळ्या असल्या तरी ते एकाच महाविद्यालयात होते म्हणून आता अमृताला एकटं वाटणार नव्हते.
दिवसामागून दिवस जात होते आणि एक दिवस महाविद्यालयात सगळ्यांसाठी स्पर्धेची सूचना जाहीर करण्यात आली. शेजारच्या शहरात वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती आणि स्पर्धा संपल्यानंतर एक दिवस ते ज्या शहरात जाणार होते तिथेच थोडे जवळ एक निसर्गरम्य ठिकाण होते तिथे एक दिवसाकरता फिरायला नेणार होते.
अमृताच्या मैत्रीणीनी तिला खूप आग्रह केला कारण त्यांनी पण भाग घेतला होता आणि तिने पण यावे सोबत असे त्यांना वाटत होते. तिची ईच्छा नव्हती खरेतर तिला मनातून एक हुरहूर जाणवत होती. अमृताच्या मैत्रीणीनी तिच्या आई वडिलांना
सांगितले तेव्हा त्यांनी तिला आग्रह केला मग इच्छा नसतानाही तिला जावे लागले.
शेवटी तो दिवस जवळ आला. सकाळीच अमृता कॉलेज ला न जाता तिच्या मैत्रिणीच्या घरी जाणार होती. आईवडिलांच्या पाया पडून ती निघाली. का माहित तीच्या मनात एक अनामिक हुरहुर, भिती वाटत होती. तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तीच्या वडिलांनी तिला तीच्या मैत्रिणीच्या घरी सोडले. तीच्या मैत्रिणी तिच्या वाटच पाहत होत्या.
अमृताला पाहून त्यांना खूप आनंद झाला.
"शेवटी तु आलीच तर" स्नेहा म्हणाली.
"तुमचा एवढा आग्रह घरापर्यंत जाईल वाटलं नव्हतं मग काय यावच लागलं मला" अमृता म्हणाली.
"अच्छा! तुला यायचंच नव्हते तर जाऊदे आपण ही नको जायला. आपली मैत्रीण आता एवढी छोटी पण इच्छा पूर्ण नाही" स्मिता म्हणाली.
"अगं असं काही नाही मी येणारच होते" अमृता म्हणाली.
"चल तसं असतं तर काका काकूंशी आम्हाला बोलावं लागलं नसतं" ऋतुजा म्हणाली.
"अरे बाबा आली ना मी आता किती त्रास देता" अमृता म्हणाली.
"आम्ही त्रास देतो तुला " तिघी एकसाथ डोळे मोठ्ठे करत तिच्याकडे पाहत म्हणाल्या.
तसे तिने त्यांच्यापुढे हात जोडले आणि त्या तिघी तिच्या अशा कृतीला पाहून खळखळून हसू लागल्या. तेवढ्यात त्यांची बस आली. चौघीजणी बसमध्ये चढल्या आणि एकमेकांना दिसु शकतील अशाप्रकारे बसल्या. बस इच्छित स्थळी जाऊ लागली. बाकी सर्वजण आपापल्या गप्पांमध्ये दंग होते तर या आपापल्या मस्तीत. काही तासात जिथे वक्तृत्व स्पर्धा होणार होती त्या शहरात पोहचले.
ती जागा त्या शहराच्या मध्यभागीच होती. एका प्रशस्त सभागृहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. काही वेळाने स्पर्धेच्या मान्यवरांनी येऊन दीपप्रज्वलन, भाषण इ. होऊन प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात भाग घ्यायला त्या शहरातील अनेक मुले - मुली तर अमृताच्या कॉलेजमधून तिच्या मैत्रिणी बरोबर बाकी मुले - मुली होत्या. एका मागोमाग एक नावे येत गेली तसे स्वतःचे वक्तृत्व स्पर्धेसाठी लिहिलेल्या विषयावर बोलत गेले. अमृताचा त्यानंतर नंबर आला तिने केलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या विषयावर ती बोलली आणि तिने घेतलेल्या विषयावर तिचे तिथल्या पाहुण्यांनी तिचे कौतुक केले. मग परीक्षकांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला त्यात ऋतुजा चा तिसरा तर अमृता चा दुसरा व त्याच शहरातील एका मुलाचा पहिला क्रमांक आला. त्या दोघींच्या शिक्षकांनी आणि बाकींनी त्या दोघींचे अभिनंदन केले.
मग तिथे असलेल्या सर्वांनी हसत खेळत जेवणाचा आस्वाद घेतला.
काही तासांनी सगळे मिळून जवळच असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी ठरल्याप्रमाणे फिरायला निघाले, त्यांच्यासोबत त्या शहरातील मुलेही सोबत होती. त्या शहरातील मुलांसोबत आता बाकीचे ही हसत, गंमतीत सहभागी झाले होते.
स्मिता त्या तिघांनी म्हणाली, चला की आपण पुढे जाऊन त्यांच्या सोबत गप्पा मारू व ओळखी पण होतील.
हो चला जाऊया आपण स्नेहा म्हणाली.
"मी नाही येत तुम्हीच जा" अमृता म्हणाली.
"तुझे परत सुरू झाले अमृता अग चल ना तु पण इथे आपण मजा मस्ती करायला आलोय ना की शांत बसायला" स्मिता म्हणाली.
"बरं ठीक आहे चल तु काही ऐकणार नाहीस" अमृता म्हणाली.
अमृता एका मुलीच्या शेजारी बसली तर ऋतुजा तिच्या समोर तर स्नेहा आणि स्मिता मागच्या सीटवर बसल्या. सगळ्या बसमध्ये मस्तीचा , हसण्याचा आवाज भरून गेला होता. अचानक एक जोरदार आवाज झाला आणि सगळ्यांनी दचकून समोर पाहिले तर एक भरधाव वेगाचा ट्रक त्यांच्या बस समोरून येत होता. बसच्या ड्रायव्हरने बसचे स्टेअरिंग फिरवून गाडी वळवण्याचा प्रयत्न केला पण तोवर ट्रकची त्या जोरात धडक बसलीच. मस्ती, हसण्याचा आवाज किंकाळ्यानी भरून गेला. अमृताला काही कळलेच नाही तिला लोकांचा आवाज, मदतीसाठी हाका आणि ॲम्ब्युलन्सचा आवाज तिला ऐकू आला. तिच्या समोर सगळे दृश्ये धूसर होत गेली आणि ती बेशुद्ध पडली.
त्या अपघातात तिच्या मैत्रिणी, काही विद्यार्थी किरकोळ तर ड्रायव्हर सकट गंभीर जख्मी झाले होते. अमृता बरोबर त्या सर्वांना तिने ॲडमिट केले होते.
काही वेळाने तिने डोळे उघडले व तिने पाहिले तर ती दवाखान्यात होती आजूबाजूला तिच्या डॉक्टर, नर्स, पेशंट होते. तिच्या समोर एक नर्स उभी होती जी तिची सलाईन भरत होती. अमृताने उठायचा प्रयत्न केला तर नर्सने तिला उठू नकोस असे सांगितले. अमृताने आपले हात हलवायचा प्रयत्न केला तरी तुला काही हालचाल जाणवली नाही . नर्सला कळाले की ती हात हालवायचा प्रयत्न करत आहे मग तिनेच तिला सांगितले की "झालेल्या अपघातात तिचे हात तुटले होते आणि रक्तस्त्राव थांबविण्यासाठी तिचे हात कापावे लागले नाहीतर पुढे जाऊन तिचा एकएक अवयव निकामी झाला असता."
अमृताला हे ऐकून प्रचंड धक्का बसला. तिने तिचे हात गमावले आता तिने पाहिलेले स्वप्ने पूर्ण होणार नाही यामुळे ती प्रचंड निराश झाली तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. तेवढ्यात तिचे आईवडील आले. त्यांना प्राध्यापकांनी फोन करून सगळे सांगितल. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून दोघांना खूप वाईट वाटले होते. ओजसला त्यांनी सोबत आणले नव्हते
"अमृता कशी आहेस बाळा? तिच्या आईने विचारले."
"आई मी ठीक आहे "अमृता मनातील दुःख लपवत हसून म्हणाली.
"बाळा दु:ख लपवू नकोस आम्हाला सगळं काही माहिती आहे" तिचे बाबा म्हणाले.
"नाही बाबा मी ठीक आहे हात माझे नाही तरी काही नाही मी मी मनाने खचले नाही" अमृता म्हणाली.
तेवढ्यात डॉक्टर आले आणि तिला तपासुन म्हणाले
"अमृता तुझ्या जखमा भरून निघतील सहा दिवसांत"
"डॉक्टर पण हिचे हात.... हिला "कृत्रिम हात" बसवता येतील का?" तिचे बाबा म्हणाले.
"आधी तिच्या जखमा भरून जाऊ द्या आणि हे तज्ञांशी बोलावे लागेल आणि यांचा खर्च ही तुम्हाला परवडला पाहिजे" डॉक्टर म्हणाले.
"माझ्या मुलीच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी,मी काहीही करायला तय्यार आहे"
"नक्कीच! करुयात " असे म्हणून डॉक्टर दुसऱ्या रुग्णांना तपासायला निघून गेले.
सहा आठवडे तरी तिच्या जख्मा भरायला लागतील असे डॉक्टरांनी सांगितले. पण तिच्या आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीमुळे तिच्या जख्मा पाच आठवड्यांत भरून निघाल्या. डॉक्टरांना तिचे खूप कौतुक वाटले आणि त्यांना विश्वास वाटत होता की तिला कृत्रिम हात बसवता येतील...
तिच्या जख्मा भरून निघाल्या तरी.... थोड्या वेदना तिला जाणवत होत्याचं पण तिला सवय झाली होती. तज्ञांशी बोलून झाल्यानंतर व तिचे सगळे रिपोर्ट काढून चेक केल्यानंतर तिला कृत्रिम हात बसवता येईल असे सांगितले. तिच्या वडिलांना हे ऐकून खूप आनंद झाला यात तिच्या कॉलेजने आणि एका सामाजिक संस्थेने तिचा खर्च उचलायचा ठरवला. तसेच ज्याने अपघात केला त्या ट्रक ड्रायव्हर ला पोलिसांनी पकडले त्यानेही माफी मागून थोडा खर्च द्यायचं ठरवलं. आपल्याकरता एवढे सगळे करत आहेत हे पाहून अमृताला भरून आले. तिच्या ऑपरेशनची तारीख ठरली.
ते ऑपरेशन जवळजवळ सहा तास चालले शेवटी ते ऑपरेशन यशस्वी झाले. तिचे कृत्रिम हात तिच्या रोजच्या जीवनात वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एका संस्थेत प्रवेश घेतला गेला.
हळूहळू तिला सगळ अवघड गेले पण तिला दिलेल्या हाताच्या व्यायामाने ती बोटांची हालचाल करू लागली मग ब्रश करणे, स्वतःचे आवरणे या गोष्टी जमू लागल्या पण तिला लिहिणे, जड वस्तू उचलणे अजून जमत नव्हते. अमृताला वाईट वाटू लागले. मग तिला शिकवणाऱ्या त्या ताईंनी तिला बाकीचे विद्यार्थी दाखवले जे प्रयत्न करत होते पण हार मानत नव्हते. ते बघून तिला उत्साह आला. तिने मग प्रयत्न करायला सुरुवात केली आणि तिची प्रगती झपाट्याने झाली ते बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. तिचे लवकरच प्रशिक्षण संपले. तिने तिथून जाण्यापूर्वी सगळ्यांना प्रेम व प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले.
ती घरी आल्यावर तिच्या स्वागतासाठी शेजारी जमले होते. तिचे जोरात स्वागत केले गेले. काही दिवसांनी ती सायकल सुद्धा चालवायला लागली. एक दिवस तिने तिच्या बाबांना तिने अपंग लोकांसाठी असलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा दर्शविली. तिच्या बाबांनी तिला आधी कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मगच भाग घ्यायला सांगितले. तिला ही कॉलेज मधून राहिलेला अभ्यास पूर्ण करायला परवानगी दिली.तिनेही नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. तिची मेहनत पाहून तिच्या बाबांनी पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधला आणि त्यांनी अमृताबद्दल सगळे सांगितले.
अमृता बद्दल ऐकून तिने ज्या प्रकारे इच्छाशक्तीच्या बळावर या परिस्थितीवर मात केली ते पाहून त्यांना तिच्याबद्दल आदर वाटला. त्यांनी तिला प्रशिक्षण देण्याचे मान्य केले. दोन वर्षांनी ऑलिम्पिकच्या स्पर्धा होणार होत्या. दोन वर्षांचा कालावधी होता अमृतासाठी त्यात अभ्यासाबरोबरच तिला स्पर्धेसाठी तय्यारी करायची होती. तिने अभ्यासाबरोबरच त्यात ही उत्साहाने तय्यारी केली. तिचे परीक्षक आणि घरचे तिच्या या मेहनतीवर आनंदी होते. तिच्या मैत्रिणींनी पण तिला यात मदत केली.
यामुळेच तिने महाविद्यालयीन परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले ते पाहून सगळे आनंदी झाले. आता अमृताने पूर्ण लक्ष ऑलिम्पिक स्पर्धेवर केंद्रीत केले. स्पर्धेचे दिवस जवळ येत होते. तिला हाय जम्प या स्पर्धेकरता निवडले होते. तिची पूर्ण तय्यारी झाली होती. अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेसाठी ते सर्व निघाले तिच्या सोबत परीक्षकांसोबत बाकीचे पण तिचे सहकारी होते जे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणार होते. आई बाबा, ओजस आणि तिच्या मैत्रिणी तिला आनंदाने सोडायाला विमानतळावर आले होते. त्या विमानाने अमेरिकाकडे झेप घेतली आणि अमृताने एका नव्या ध्येयाकडे. मेन ऑलिम्पिक स्पर्धा संपोस्तोवर ते सर्वजण अमेरिका मध्ये फिरत ही होते आणि नंतर तेवढाच सरावही करत होते. शेवटी त्या स्पर्धा संपली आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या.
तिच्या सहकाऱ्यांपैकी काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी ठरले. शेवटी अमृताच्या स्पर्धेची वेळ आली. तिचे नाव पुकारले गेले. तिने डोळे मिटले, तिचा आतापर्यंतचा खडतर प्रवास तिच्या आयुष्याचा डोळ्यासमोर आला तसेच तिला ज्यांनी प्रोत्साहन दिले, विश्वास ठेवला तसेच तिचे आईवडील,मैत्रीणी आठवल्या. मग तिने खोल श्वास घेतला आणि आत्मविश्वासाने ती मैदानावर आली. तिचे आईवडील, तिचा लहान भाऊ व तिच्या मैत्रिणी, सगळे शेजारी तिला टिव्हीवर पाहत होते. तिच्या आईवडिलांना तिला असं पाहून टिव्हीवर खूप आनंद झाला होता.
अमृताने एकदा आकाशाकडे पाहिले आणि मग समोर. ती धावती निघाली आणि तिने आपले शरीर हवेत त्या बारवरून नेत शरीराला झटका देत अधांतरी नेत उंच उडी मारली आणि तिचा त्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला.तिने या स्पर्धेत चांदीचे पदक पटकावले. तशी घोषणा तिथल्या परीक्षकांनी केली. ते ऐकून टिव्हीवर पाहत असलेल्या तिच्या आईवडिलांना, मैत्रीणीना खूप आनंद झाला. सगळे शेजारी जमून त्यांच्या आईवडिलांचे अभिनंदन करत होते.
तिकडे सगळ्या देशभरात जल्लोष सुरू होता.सोशल मिडीयावर तिच्या नावाबरोबरच अभिनंदन करणारा मेसेज व्हायरल झाला होता. आज अमृताची ओळख फक्त तिच्या शहरापुरती न राहता पूर्ण देशभरात झाली होती. तिचे डोळे भरुन आले होते. तिला चांदीचे पदक तिच्या गळ्यात सन्मानाने घातले गेले आणि त्याचबरोबर राष्ट्रगीत सुरू झाले भारत देशाचे, तिच्या देशाचे. ते ऐकताना तिच्या डोळ्यांतून अश्रू आणि चेहऱ्यावर अभिमान दिसून येत होता. तिला तसे पाहणाऱ्या काहींच्या डोळ्यात अश्रू तर काहींच्या चेहऱ्यावर कौतुक दिसतं होते.
तिच्या परीक्षकांनी व तिच्या सहकाऱ्यांनी तिचे कौतुक केले. पॅराऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर ते सर्वजण भारतात जायला निघाले. भारतात येताच अनेक न्यूज वाले त्यांना घेरून होते. अमृताला यांची सवय नव्हती त्यामुळे तिने मोजकीच उत्तरे दिली. विमानतळावर तिचे आईवडील आले होते. समोर आईबाबांना पाहून तिला भरून आले. तिने धावत जाऊन त्यांना आनंदाने मिठी मारली. मग आपल्या कृत्रिम हाताद्वारे ती त्या दोघांच्या पाया पडली. त्यांना ही तिला पाहून खूप आनंद झाला व तिच्या विषयी असलेला अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. मग ती गाडीने स्वतः च्या घरी जायला निघाली तेव्हा तिच्या स्वागताला घराजवळ संपूर्ण शहर आले होते. त्या सर्व प्रकाराने ती भारावून गेली.काही दिवसांनी पंतप्रधान कार्यालयातून तिला फोन आला आणि पंतप्रधान तिची भेट घेणार आहेत असे सांगितले. तिला तर यावर विश्वासच बसला नाही. तिच्या परीक्षकांनी पण तिला हेच भेटून सांगितले तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मग तिच्या बाकीच्या सहकाऱ्यांसोबत व परीक्षकांसोबत ती दिल्लीला निघाले. दिल्लीला पोहचल्यावर त्या सगळ्यांना सुरक्षा ताफ्यासह पंतप्रधान कार्यालयात नेले.ठरलेल्या वेळेनुसार ते आले.त्यांनी अमृतासह बाकी सर्वांचे कौतुक केले व त्यांची ओळख ही करून घेतली, गप्पा मारल्या व त्यांच्यासोबत जेवण ही केले.
अमृताला तर विश्वासच नव्हता असे आपण पंतप्रधान ना भेटू समोर ज्यांना ती टिव्हीत पाहत होती. तिच्या आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा क्षण होता.मग काही तासांनी त्या सर्वांचे परत कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी त्यांचा निरोप घेतला. हे सर्व ही तिथून बाहेर पडले मग संपूर्ण दिल्ली शहर पाहिले.
तिथून आल्यावर तर ती आता फक्त त्या शहरातच नाही सर्व राज्यांत ओळखली जाऊ लागली. तिला कोणी न कोणी भेटायला येतच असे. एक दिवस तिच्या भावाने तिला स्वतःची कथा का तु लिहीत विचारले? ज्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल.
ओजस जे बोलला ते तिलाही पटले. तिने स्वतःची कथा लिहायला मग सुरूवात केली. काही महिन्यांनी ती पूर्ण झाली मग तिच्या वडिलांनी ती एका प्रकाशकाकडे नेली. तिच्या बद्दल त्यांना माहिती होती त्यांनी आनंदाने प्रकाशन करायचे ठरवले. तिचे पुस्तक इतकं लोकप्रिय झाले की ते अनेक भाषेत भाषांतर झाले. तिला जेव्हा प्रकाशकांनी पहिला चेक दिला तेव्हा त्यातली अर्धी रक्कम तिने तिला जिथे शिकवले त्या अपंग संस्थेला तर अर्धी रक्कम गरीब पण गुणवंत मदत करणाऱ्या संस्थेला दिली.
अशी ही रणरागिणी जिने काळावर मात करत देशाची लाडकी मुलगी बनली होती. ज्यांच्यावर तिच्यासारखीच संकट आली त्यांच्याकरता ती आशेची देवी बनली होती
समाप्त.
हृषीकेश चांदेकर
जिल्हा - पुणे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा