Jun 14, 2021
नारीवादी

तिने अग्नीला केलं जवळ!

Read Later
तिने अग्नीला केलं जवळ!

तिने अग्नीला जवळ केलं

राधाक्काला दोन मुलं होती, वीणा व विनय. राधाक्काचे यजमान बीएसएनएलमधे होते पण विनय लहान असतानाच त्यांना देवाज्ञा झाली. 

राधाक्काच मग मुलांची आईवडील दोन्ही झाली. स्वतःच्या हौसीमौजी मारुन फक्त लेकरांसाठी काबाडकष्ट करत राहिली. वीणा वयात येताच राधाक्काने तिचं लग्न लावून दिलं. लग्नात ऐपतीप्रमाणे जावयाचा,त्याच्या आईवडिलांचा मानपान केला. जावयाला अंगठी,पोशाख तसंच लेकीला झुमके व हार घातला. 

वीणाच्या सासरी तिचा नवरा,सासू,दिर,नणंद होते. वीणालाही अशा माणसांनी भरलेल्या कुटुंबाची आवड होती पण चार दिवसच तिचे तिथे लाड झाले. लगीनघरातली पाहुणी आपापल्या घरी गेली आणि वीणाला हळूहळू सासूचे,नणंदेचे खरे रुप कळू लागले. सासूने तिला कामवालीच बनवलं. घरातली सगळी कामं ती वीणाकडून करुन घेऊ लागली व स्वतः लेकीसोबत आराम करु लागली. 

वीणा माहेरी कामं करायची पण आईच्या हाताखाली मोजकी अशी. इथे ती किती स्वप्नं उराशी धरून आली होती. माहेर फार लांब असल्याने आईची सतत भेट होणार नव्हती.

 तिने सासूत आईला पहायचं ठरवलं होतं पण सासू तिला मायेने जवळ करायचं सोडाच दोन कौतुकाचे शब्दही तिच्याबद्दल बोलत नसे. वीणाच्या हातून एकदा दूधाचा टोप उपडी झाला. सासू तिला खूप बडबडली. तुझ्या आईने तुला काहीच शिकवलं नाही का बोलली. आईचं नाव काढताच वीणानेही तोंड उघडलं. ती म्हणाली,"चुकून झालं मामी. मी सगळं साफ करते पण माझ्या आईला काही बोलू नका." तरी सासू तिला बडबडतच राहिली. सासूचे असे विखारी बोल हळूहळू नित्याचे होऊ लागले.

दिवसेंदिवस वीणा बुजरी होऊ लागली. तिच्यातला आत्मविश्वास जाऊ लागला. नवऱ्याला काही सांगायची टाप नव्हती तिची कारण वीणाचा नवरा संजय दुकानातून आल्याआल्या वीणाची सासू त्याच्याजवळ..वीणाने आज गेस चालूच ठेवला,भाजी खारट बनवली,आमटीत तिखट घातलच नाही..अशा अनेक तक्रारी करायची. 

संजय कसंबसं दोन घास पोटात ढकलायचा व आपल्या खोलीत जायचा. वीणाला वाटायचं आता संजय तिला जवळ घेईल पण मातोश्रींनी केलेल्या तक्रारींमुळे त्याच्या डोक्यात संताप भिनलेला असायचा त्यात वीणा तिची बाजू मांडू लागली की त्याचं डोकं अजूनच सटकायचं. तो कधी वीणाच्या कानाखाली ठेवून द्यायचा तर कधी तिला लाथाबुक्क्याने मारायचा. 

विवश होऊन वीणा रडू लागली की तिच्या सासूला व नणंदेला आसुरी आनंद मिळायचा. दोघी दाराला कान लावून बसायच्या व एकमेकींना टाळी द्यायच्या. 

राधाक्काने एकदा दुकानात जावयाला फोन लावला व म्हणाली,"अधिक महिना आहे तेव्हा तुमी दोघं या इकडे."   संजयने घरी आल्यावर आईला ही बातमी दिली. त्याची आई म्हणाली,"सोन्याचा गोफ घालत असतील तरच येतो म्हणून सांग. अधिकमहिना आहे. जावयाला विष्णुस्वरुप मानून त्याचा मानपान करतात. शास्त्रच आहे ते.

संजय वीणाला दुकानात घेऊन गेला व तिथे त्याने तिला फोन लावून दिला.

"आई"

"अगं वीणे,आता आठव आली होय तुला माझी. सासरी काय गेलीस तिकडचीच झालीस. बाकी सुखात हायस नव्हं."

"हो आई मी मजेत हाय." वीणा गळ्यातला आवंढा घोटत बोलली. राधाक्काला वीणाशी किती बोलू न किती नाही असं झालं होतं. पण संजय वीणाच्या समोर उभा होता व तिला गोफाबदद्ल विचारायला सांगत होता नव्हे दटावत होता. 

वीणाने आईला नवऱ्याची गोफाची मागणी सांगितली.

"पोरी,सोन्याचं भाव गगनाला भिडलेत. मले ठाऊक हाय धोंडा मास जवळ येतोया,जावयाचा पाहुणचार करायले पायजे पन ते तुज्या भावाची कालेजाची फीव द्यायची हाय. बघ जावयबापूंना सांग समजावून.  पोशाख करते,चांदीचा दिवा,अनारसे देते पर सोन्याचं काय व्हायचं नाय लेकी माझ्याकडून. सासूबाईचं म्हणणं ऐकून संजय वीणावर जाम चिडला,"काय मत मारलेली ते तुझ्यासंग लगीन केलं. लगीन झाल्यापासना पनवती लागलीया पाठी. धंद्यात नुसकान होतंय. घरी तुझ्या कारनान अशांती झालिया. चार दिस सासरचा पाहुणचार भेटल म्हनलं तर कसलं काय तुझी आई कारणं सांगून रायली."

वीणा संजयला समजवू पहात होती पण तो समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. घरी येताच वीणाची सासूही तिला बडबडू लागली,"कसले दळभद्री पावणे मिळाले म्हणायचं. सणासुदीला जावयाचं कवतिक करतील,तेच्या अंगार सोनं घालतील म्हनलं तर अगुदरच रडाया लागलेत." 

वीणाला वाटलं, नकोच हा असला जन्म. मरमर मरायचं. कोणएक मायेने बोलत नाही. नवरा तो तसला. सासूचं ऐकून रोज बदडतो. एवढा लग्नात त्याचा मानपान केला तरी अजून आहेच त्याचं तुणतुणं.

राधाक्कालाही इकडे लेकीचा फोन आल्यापासून स्वस्थ बसवत नव्हतं. नुसता वीणाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येऊ लागला. अन्न गोड लागेना. ती गल्लीतल्या सोनाराकडे गेली. त्याने तिला गोफ दाखवला.  एक गोफ व चांदीचा दिवा,चांदीच ताट तिने पसंद केलं. सोनाराला पाच हजार दिले व उरलेले हफ्त्यावर देईन म्हणाली. सोनाराचा राधाक्कावर विश्वास होता. त्याने मखमलच्या पेटीत गोफ ठेवला,दुसऱ्या पेटीत दिवा,ताट ठेवलं व दोन्ही पेट्या तिच्या सुपुर्त केल्या.

राधाक्काने जावयाला फोन केला व तुमच्या मागणीची व्यवस्था केलीय तेंव्हा वीणाला घेऊन या असं कळवलं. लेक व जावई येणार म्हणून राधाक्काने घर साफसूफ केलं. मुलाकडून किराणा आणून घेतला. चार दिवस आधी तांदूळ भिजत घालून जाळीदार अनारसे बनवले.

 पुरणपोळ्या,कटाची आमटी,वरणभात,पापड,कुरडया असा झकास बेत बनवला. लेक आली. आईला तिने गच्च मिठी मारली. वीणाची ढासळलेली तब्येत पाहून राधाक्काच्या मनात धस्स झालं. तशातच तिने पाटांभोवती रांगोळी काढली व लेकीला,जावयाला ओवाळलं त्याला चांदीच्या ताटात मधोमध चांदीचा दिवा व सभोवार अनारसे अशी भेट दिली मग दोघांना पुरणपोळीचं जेवण वाढलं. लेकीला साडीचोळी दिली. 

वीणा नजरेनेच आईला म्हणत होती," आई, का गं एवढा खर्च केलास? कशापायी? यांना सतत तू देतच रहाणार का नि कितीबी दिलं तरी यांची तोंडं बंद नाय व्हायची." 

वीणाला माहेरी रहायचं होतं पण संजय ऐकेना. निघालं पाहिजे म्हणू लागला. वीणाने शक्कल लढवली. पाठल्यादारला गोल धोंडा होता. पावसानं त्यावर शेवाळ धरलेलं. वीणाने त्यावर मुद्दाम पाय ठेवला. पाय निसटला गेला व मुरगळला.

 आता संजयकडे इलाज नव्हता. तो एकटाच निघाला. वीणाला हायसं वाटलं. राधाक्काने वीणाला न्हाऊमाखू घातलं. कितीतरी दिवसांनी वीणा आईच्या गळ्यात पडून रड रड रडली. तिला संजय करत असलेली मारहाण,सासूने घातलेल्या शिव्या,नणंदेचे टोमणे..तिने सगळंसगळं राधाक्काला सांगितलं. रात्रीच्या अंधारात राधाक्का कौलांकडे नजर लावून वीणाची करुणकहाणी ऐकत होती व डोळ्यांतून आसवं गाळत होती.

सकाळी संजयचा फोन आला. त्याने वीणाच्या तब्येतीची चौकशी केली. वीणाने मुद्दामच पाय लई सुजलाय म्हणून सांगितलं. राधाक्काने वीणाचे केस धुतले. तिची वेणीफणी केली. तिच्या केसांत गजरा माळला. सासरहून आली तेव्हा बावलेली वीणा आईच्या मायेने टवटवीत दिसू लागली.

दहा बारा दिवस झाले,संजय वीणाला घरी ये म्हणून फोनवर ओरडायचा पण वीणाला त्या जंजाळात जायचंच नव्हतं. तिला  नवरा,सासू,नणंद या सगळ्या नात्यांचा उबग आला होता शिवाय वीणा हे जाणून होती की ती घरी गेली की संजय त्याची दुसरी एखादी मागणी तिच्यासमोर ठेवणार. 

वीणाला ती तिघं भुकेल्या लांडग्याप्रमाणे वाटू लागली. वीणाने त्यांचा चांगलाच धसका घेतला. राधाक्काला कळतच नव्हतं..पोरीला सासरी पाठवायची तरी भिती नाही पाठवायची तरी लोकांच्या नजरा,त्यांचे प्रश्न. 

शेवटी राधाक्का स्वतः वीणाला तिच्या सासरी घेऊन गेली. जाताना जोडीला चार जाणती माणसं घेऊन गेली. राधाक्काने वीणाच्या सासूला वीणावर करत असलेल्या सासुरवासाचा जाब विचारला. 

दारात एवढी माणसं पाहून सासूने रडण्याचं सोंग घेतलं. वीणा आमच्यावर खोटं बालंट आणतेय असं म्हणून मोठमोठ्याने रडू लागली. वीणाच्या नणंदेनेही तिच्या सुरात सूर मिळवला. न्याय करायला आलेली मंडळीही बिचारी भांबावली तरी त्या दोघींना व संजयला पुरेशी समज देऊन राधाक्का व ती माणसं निघून गेली. 

चारआठ दिवस बरे गेले पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. वीणाचा छळ पहिल्यासारखाच सुरु झाला. दिवाळी जवळ येताच वीणाच्या सासूने लेकाला सासूकडे मोटरसायकल माग म्हणून सांगितले. वीणा संतापली. आधीच्या गोफाचे हफ्ते तिची आई फेडत होती. ते फिटायच्या आधी यांची पुढची मागणी सुरु झाली. 

त्यात वीणाला कोरड्या उलट्याही होऊ लागल्या. एके दिवशी तिची सासू व नणंद नातलगांकडे गेल्या होत्या. वीणा एकटीच होती घरी. तिने स्वतःवर रॉकेल ओतून घेतलं व काडी पेटवली. आगीच्या ज्वाळांनी तिला घेरलं. ती हसत होती. ती हसत होती कारण आत्ता तिला सासू छळणार नव्हती,नवरा मारणार नव्हता,भाजतानाही ती खूष होती कारण आता तिच्या आईला परत जावयाची नवी मागणी पुर्ण करण्यासाठी ऋण काढावं लागणार नव्हतं.

(सत्यकथा)

-----सौ.गीता गजानन गरुड.