Dec 08, 2021
General

तिने दु:खाला जिंकलं

Read Later
तिने दु:खाला जिंकलं

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

तिने दु:खाला जिंकलं!

त्या दोघी सासूसुना..सुनेला,अलकाला त्या घरात येऊन तब्बल सहा वर्षे झाली होती. पहिलं चाळीतलं सासूच्या कारकिर्दीतलं घर विकून ती नुकतीच पालघरला बिल्डींगमधे रहायला आली होती. 

अलकाला थायरॉइडमुळे पहिल्या बाळंतपणात खूप अडचणी आल्या होत्या. तिला दोन बाटल्या रक्त चढवावं लागलं. सी-सेक्शन झालं. अलकाचं पहिलं बाळंतपण रितीप्रमाणे माहेरी झालं होतं. मुलगा झाला,कौशल नाव ठेवलं. अलकाचे व बाळाचे तिच्या माहेरी खूप लाड होत होते कारण ती माहेरी थोरली लेक होती. तिच्यामागे दोन बहिणी..म्हणजे कौशलला दोन मावश्या होत्या. त्या कौशलचे खूप खूप लाड करायच्या. 

अलका लेकाला घेऊन सासरी निघाली तेव्हा तिच्या दोन्ही बहिणी खूप रडल्या. किती वर्षांनी कौशलच्या रुपाने त्यांच्या घरात छोटं बाळ खेळलं होतं. अलकाने बहिणींची कशीबशी समजूत काढली.

 इकडे सासरी सासू निमुताई नातवाच्या स्वागताला सज्ज होती. चारेक महिने सासूने अलकाची खूप सेवा केली. अलकाला न्हाऊ घालण्यासाठी,मालिश करण्यासाठी बाई ठेवली होती व कौशलला मात्र निमुताई स्वतः न्हाऊ घालायची.

 निमुताईच्या लग्नानंतर पाचेक वर्षांत तिच्या पदरी दोन पोरं टाकून निमुताईचे यजमान अनंताच्या यात्रेला निघून गेले होते तेव्हापासून पेंशनच्या जीवावर व बारीकसारीक खानावळींची कामे करुन निमुताईने तिची दोन्ही मुलं वाढवली होती. लेकीचं लग्न करुन दिलं होतं. लेकाचंही लग्न करुन दिलं नि आता हा नातू तिच्या अंगाखांद्यावर खेळत होता. गोरीपान,सडसडीत निमुताई ऐन तारुण्यात विधवा झाल्याने स्वभावाने थोडी खाष्ट झाली होती.

कौशल हळूहळू मोठा होऊ लागला. निमुताई अधनामधना गावी जाऊन रहायची. कौशल तीन वर्षाचा झाला नि अलका परत गरोदर राहिली. यावेळी मात्र ती माहेरी गेली नाही आणि दुसऱ्या बाळंतपणाचा तिला फारसा त्रासही जाणवला नाही पण पिंड बरंच मोठं होतं. सी-सेक्शन करावच लागलं.

 निमुताईच्या हाती नर्सने गोरीपान बाहुलीसारखी दिसणारी त्यांची नात दिली. निमुताई आता अधिकच व्यस्त झाल्या. नातवाचंही करत होत्या. नातीलाही संभाळत होत्या. मुलीचं नाव काव्या ठेवलं. दोघं बहीणभावंड अगदी नक्षत्रासारखी दिसत. काव्या एका वर्षाची झाली आणि मग कौशलच तिला जास्त तो सांभाळू लागला. दोघं बहीणभावंड टेरेसमधे भातुकली खेळायची. कधी काठ्या घेऊन तलवारबाजी तर कधी डबे घेउन ढोलकी. 

काव्या थोडी मोठी झाली. निमुताई दिवसेंदिवस अधिकच कडवट होत होती. दोघींमधे क्षुल्लक कारणांवरुन भांडणं होऊ लागली. अलकाला सासूचं कुजकट बोलणं सहन होईना. कौशलच्या शाळेला सुट्टी पडली की अलका दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी जाऊ लागली. ती परत आली की सातेक दिवस बरे जायचे नंतर परत अलका व निमुताईंची भांडणं सुरु व्हायची. कोण चूक कोण बरोबर ते कळायला मार्ग नव्हता. मुलं मात्र टेरेसवर अंथरलेल्या चटईवर खेळण्यात मग्न असायची. शाळेत जायची. 

अशातच अलकाच्या नवऱ्याला ताप येऊ लागला. पहिलं त्याने अंगावर काढलं पण नंतर त्याला ताप अंगात असताना रेल्वेतून प्रवास करणं जमेना. शेवटी म्युन्सिपालटीच्या इस्पितळात तो एडमिट झाला. अलकाचा सगळा वेळ इस्पितळात नवऱ्यासोबत बसण्यात,त्याची सेवा करण्यात जाऊ लागला. तापाचं निदान होत नव्हतं. 

आई घरात नसल्याने कौशलचे हाल होत होते. निमुताई नातीचं करण्यात दमून जायच्या.  कौशलचा अभ्यास,त्याचं दप्तर..साऱ्याचे हाल होत होते. 

एकदाचा अलकाचा नवरा बरा झाला. त्याला डिस्चार्ज मिळाला पण इकडे घरी कौशलचं पोट जास्त दुखू लागलं. त्याला विकनेस आला होता. कौशल त्याचं दुखणं अंगावर काढत होता. आपले वडील आजारी आहेत आपण आईबाबांना त्रास द्यायचा नाही एवढंच त्याला कळत होतं. 

एकेदिवशी सासूसुनेची अशीच जोरदार खडाजंगी झाली. आजुबाजूच्यांनी नेहमीचंच,चालायचंच म्हणून दुर्लक्ष केलं तेवढ्यात जोराने रडण्याचा आवाज आला..ते नुसतं रडणं नव्हतं. तो आकांत होता. कौशल झोपल्या जागीच गेला होता. त्याला तसंच गुंडाळून डॉक्टरकडे नेण्यात आलं पण डॉक्टरांनी दारातूनच त्यांना मागे पाठवलं.

 बिल्डींगमधले एकेकजण कौशलच्या घरी जाऊ लागले. नुकताच आजारातून उठलेला कौशलचा बाबा एका बाजूला बसलेला. कौशलचं शव आईच्या मांडीवर होतं. बाजूला त्याची आजी,निमुताई जीवाच्या आकांताने रडत होती पण कौशलची आई,अलका..ती रडत नव्हती.

 ती निमुताईला सांगत होती,"तुम्ही गप्प रहा. आवाज करु नका. झोपलाय तो. तिथे जमलेल्या शेजाऱ्यांच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं." कितीजणींनी तिला समजावलं पण ती ढिम्म. कौशलची ट्युशनटिचरही भेटायला आली तिला अलका सांगू लागली,"बघा ना टिचर हा कधीचा झोपलाय. याला दोन पट्ट्या मारा." 

कोणाला काहीच कळत नव्हतं. सगळ्यांचे मेंदू जणू बधिर झाले होते.  तो क्षण,ती घटना.. नकोनकोशी,अत्यंत ह्रदयद्रावक अशी होती. सारखासारखा हसरा,लुकलुकत्या डोळ्यांचा,'माझे पप्पा लवकर बरे होणार' म्हणणारा कौशल नजरेसमोर येत होता. 

शेवटी दुपारी दोनच्या मानाने अलकाची आई व बहिणी आल्या. अलकाच्या आईने अलकाला अक्षरशः मारलं व भानावर आणलं. सत्यस्थिती लक्षात येताच अलका जीवाच्या आकांताने रडू लागली. कौशलला घेऊन गेले तेव्हा काव्याही जोरजोरात तिच्या दादाला साद घालून रडत होती. 

त्यानंतर महिनाभरतरी अलका झोपूनच असायची. कोण भेटायला गेलं की कौशलची आठवण काढून रडरड रडायची. 

राखीपौर्णिमेचा दिवस उजाडला तेव्हा काव्याने निमुताईला विचारलं,"आजी ,मी कोणाला बांधू राखी?" पुन्हा एकदा जखमेवरची खपली निघून रक्त भळाभळा वाहू लागावं तसं निमुताई काव्याला कुशीत घेऊन ढसाढसा रडली. वर्षभर प्रत्येक सणाला हे असंच होत राहिलं.

 बिल्डींगमधल्या रहिवाशांनाही दहीहंडीला कान्हाचा वेश घेऊन पहिल्या थरावर चढणारा कौशल आठवायचा. चमच्यात लिंबू घेऊन पळत सुटणारा कौशलसायकलच्या मागच्या सीटवर काव्याला घेऊन मोटरसायकलच्या दिमाखात सायकल चालवणारा कौशल..वाण्याकडून दुधाची पिशवी,पेप्सी,सुट्टे पैसे घेऊन जाणारा कौशल..सत्यनारायणाच्या पुजेवळी तीर्थ देण्यासाठी मांडी घालून बसलेला कौशल..लग्नाच्या वरातीत बेभान होऊन नाचणारा कौशल..त्याची ती लोभसवाणी रुपं आठवली की तेथील रहिवाशांचे डोळे अजुनही पाण्याने भरुन येतात.

कौशलच्या मावशीने मात्र कौशलच्या आईला,अलकाला माणसात आणण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले. कौशलच्या आईचा फेशन डिझायनिंगचा कोर्स झाला होता. कौशलच्या मावशीने तिला आपल्या बुटीकमधे भागीदार बनवलं. अलका नकोहोय करताकरता नित्यनेमाने कामाला जाऊ लागली. तिने आपलं दु:ख त्या छंदात जणू गाडून टाकलं अन् दोनेक वर्षात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभी राहिली. तिने दु:खाला जिंकलं.
अर्थात काहीजणी अलकाला अशा नव्या रुपात पाहून तिच्यामागे कुजबुजही करतात पण अलका किंवा निमुताई अशांना महत्त्व देत नाहीत. 

 आता निमुताई व अलकात पुर्वीसारखी क्षुल्लक कारणांवरून भांडणं होत नाहीत. दोघींनीही खूप सोसलय. दोघी एकमेकींच्या साथीने उभ्या आहेत. 
कौशल तर त्यांच्या ह्रदयात आहेच आठवणींच्या रुपात.

------सौ.गीता गजानन गरुड.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now