ती आणि मी.

Normal conversation between Husband and Wife.

ती: हॅलो, कसे आहात?


तो: मी मजेत. बोल काय बोलतेस?


ती: तुमच्यासाठी एक खास बातमी आहे.


तो: एवढया लवकर? आत्ताच लग्न झालं न आपलं?


ती: नसता आगाऊपणा करू नका. ईरावर नवी स्पर्धा आहे, “गोष्ट छोटी डोंगराएवढी”.


तो: माहीत आहे. मागच्या दोन विषयांच्या वेळी लिहिण्याचा प्रयत्न केलाय.


ती:वाचलं मी. बरं लिहिता!


तो: पण कुठे प्रतिक्रिया दिसली नाही.


ती: मनात ठेवली. तुमच्यासारखीच. ते जाऊ दे. मला सांगा, या आठवड्याचा 'चौकट' विषय दिला आहे. चौकट मोडणे म्हणजे नेमकं काय अपेक्षित असावं?


तो: ठराविक साच्यातून बाहेर पडणे.


ती: तुम्हीं या वेळीपण भाग घ्याल न?


तो: बघू. आता खूप काम वाढलंय. लिहायला वेळ मिळत नाही.


ती: कामातून वेळ काढण्याला चौकट मोडणे बोलता येऊ शकतं?


तो: हम्म..(जाळ्यात अडकलेला नवरा)


ती: कामाच्या व्यापात स्वतःची काळजी घ्या. नुसतं काम काम करू नका.


तो: तेवढी चौकट मोडायला शिकलोय.


ती: नशीब माझं. बरं मला सांगा, मला चौकट मोडायची असेल तर काय करावं लागेल?


तो: नेमकी कोणती चौकट मोडायची आहे?


ती: काहीतरी वेगळं करावसं वाटतंय.


तो: वेगळं म्हणजे? 


ती: पुढे मागे घरी रहावं लागलं तर स्वतःच असं काहीतरी असावं असं वाटतंय.


तो: स्वतःची माणसं असली तर नाही चालणार?


ती: उगीच पीजे मारू नका. माझ्या अस्तित्वाचं काय?


तो: गृहिणी असणं म्हणजे कमीपणा नव्हें. तुझं अस्तित्व तू नोकरी केलीस तरी आणि नाही केलीस तरी माझ्या आयुष्यात असणारच आहे. ठळकपणा जराही कमी होणार नाही.


ती: पण समाजाच्या नजरेत मी आळशीच बनेन त्याच काय?


तो: देवांमध्येही तुलना करणाऱ्या समाजाचं काय घेऊस बसतेस? तू काहीही केलंस किंवा नाही केलंस तरी नाव ठेवणारा नाव ठेवणारच. आपण लक्ष नाही द्यायचं.


ती: पण गरज पडली तर माझा स्वतःचा उत्पन्नाचा काही तरी सोर्स असावा न? 


तो: नवऱ्याने दिलेले पैसे वाचवून साठवण करून ठेवणाऱ्या गृहिणीच्या उत्पनाची एखाद दिवशी टॅली केली तरी ती नवऱ्याच्या त्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्तच होईल. (पलीकडून भयाण शांतता.)


ती: त्याच साठवलेल्या पैशांनी लॉकडाऊन लागल्यावर कित्येक कुटुंबांना तारलं आहे हे लक्षात असू द्या.


तो: मी तेच म्हणतोय की तुझं अस्तित्व मी कधीच नाकारू शकत नाही. गृहिणी म्हणजे मॅनेजमेंटचं चालतं-बोलतं ग्रंथालय. मुळात घरात शांत बसणे हे काही तुझ्या गुणधर्मात नाहीच.


ती: आता बोअर करू नका ओ. मला वेगळं काही तरी करायचं. नोकरीच्या चक्रव्यूहात अडकून पडायचं नाहीये. कुटुंबाला आणि मला स्वतःला असा दोघांनाही वेळ देता यायला हवा.


तो: शेअर मार्केट शिकायचं आहे न? लग्नाआधी राहून गेलं असेल तर आता नव्याने प्रयत्न करू शकतेस.


ती:पण सगळ्या कामांचा ताळमेळ बसवणं अवघड आहे.


तो: ताळमेळ बसवायचं म्हणजेच चौकटीबाहेर पडणं. (बदला घेतल्याचा आनंद!)


ती: पण मी एकटी कुठवर पुरु?


तो: एकटी? मी पण आहे सोबत. जेवढी जमेल तेवढी मदत नक्कीच करेन.


ती: तुम्हीं मला मदत कराल?


तो: (हसून)का नाही? तुझी वेगळी ओळख बनवण्यासाठी मलाही चौकट मोडावीच लागेल. 


ती: त्याने काय होईल?


तो: तुला भरारी घ्यायला वेळ मिळेल. तुझं तुला हवं तसं अस्तित्व बनवता येईल.


ती: आणि मी तुमच्या पुढे गेली म्हणजे?


तो: मला फरक पडणार नाही. तुझी कुवत होती आणि तू मिळवलं. 


ती: कमीपणा?


तो: वाटणारच नाही. उलट आपल्यामुळे कोणाचं भलं होत असेल तर समाधानच वाटेल. तू जास्त भाव खाल्लास तर बायको बदलेन. त्यात काय एवढं?


ती: घरात नवीन झाडू आणून ठेवलीय सांगून ठेवतेय; जर असं काही करायचा विचार जरी केलात तर.


तो: तू राहशील न माझ्यासोबत? मग अशी वेळ येणारच नाही.


ती: किमान सात जन्म तरी सुटका नाही तुमची. समाजासाठी काय करता येईल?


तो: मनात आलं तर खूप काही करता येतं. बरेच मार्ग आहेत.


ती: एक मध्यमवर्गीय स्त्री काय करू शकते?


तो: आता रक्षाबंधन येतंय. गतिमंद, दिव्यांग व्यक्ती या काळात राख्या बनवतात, विकतात त्यांच्याकडून घ्याव्यात. पुढे गणपती बाप्पा येतील; श्रींची मुर्ती पर्यावरणपुरक असावी. नातेवाईकांसाठी भेटवस्तू घेताना गतिमंद, दिव्यांग व्यक्ती किंवा अबला स्रियांनीं बनवलेल्या वस्तू विकत घ्याव्या. कोणी अपंग व्यक्ती धडपड करत काही विकत असल्यास त्यांच्याकडून कधीतरी गरज नसली तरी काही विकत घ्यायला हरकत नाही. अजून एक खूप मोठी गोष्ट एक स्त्री करू शकते.


ती: काय?


तो: आपल्या मुलांमध्ये माणुसकी भिनवायला हवी. त्यांनी मोठं झाल्यावर इतरांकडे माणूस म्हणून पाहिलं तरी ती खूप मोठी समाजसेवा होईल.


ती: एकंदरीत चौकटी बाहेरचा विचार केला म्हणजे बऱ्याच चौकटी मोडता येतील तर.


तो: सगळ्याच चौकटी मोडायच्या नसतात काही फक्त ओलांडल्या तरी चालतात.


ती: किती कोड्यात बोलता. कोणती चौकट फक्त ओलांडायची?


तो: जड झालेल्या नात्यांची. कारण नाती तोडली तर मनं दुखावतात. आपण फक्त ती बंधन हळुवार सोडून निघून जावं. कधी कोणतं नातं कामी येईल, काय सांगावं?


ती: आता फार विषय फिरवू नका. सांगा, तुम्हीं लिहाल न? 


तो: हो. काहीतरी वेगळं लिहायचा प्रयत्न करतो.


ती: का? लघुकथाच लिहायची आहे न? तुम्हीं काय लिहिणार आहात?


तो: विषय चौकट मोडण्याचा आहे. आपण सुरुवात करायला काय हरकत आहे. आपला आत्ताचा संवाद लिहू?


ती: नंबर नाही आला म्हणजे?


तो: स्पर्धेसाठी कोण लिहतंय? आपलं, वाचकांचं समाधान महत्वाचं!


ती: माझं नाव लिहाल कथेत?


तो: बरं मृण्मयी.


ती:माझ्याबद्दल काय वाटतं?


तो: तुझ्या प्रेमाच्या चौकटीत रहावं वाटतं.


ती: तेवढी चौकट  मोडणार नाही न?


तो: मला काही चौकटीत बंदिस्त रहायला आवडतं बरं!


ती: इश्य! तुमचं आपलं काहीतरीच!

©® मयुरेश तांबे