Oct 22, 2020
Poem

ती आणि तिची चूल

Read Later
ती आणि तिची चूल

भातुकलीसोबत जुळतं
 तिचं चुलीशी दाट नातं
अगदी दहीसाखरेसारखं
इतकं घट्ट की ठरवुनही
फारकत घेता नाही येत

तिने
अन्नपुर्णेचं व्रत अंगिकारलं
रोज उठणारा भुकेचा डोह
शमविण्यासाठी बडविते
भाकरींवर भाकरी
टोपात रटरटतो रस्सा

घरादारात पसरतो सुगंध
तिच्या हातालाच चव
कोंड्याचे मांडे करणारी ती
चुलीतल्या ज्वाळांसारखीच
धगधगते तिच्यातही आग
बंडखोरीची, उडण्याची

उडते ती जरुर उडते न्
सांजेला वेध तिला घरट्याचे
हातपाय धुवून पुन्हा
चुलीकडे जाते

चूल म्हणते आलीस बाय
बरं वाटलं तुला बघून
तिच्या नि चुलीच्या अंतरातली 
आग मग एकरुप होते
जिच्यावर भाकर टम्म फुगते

--सौ.गीता गजानन गरुड.