शतदा प्रेम करावे - 33

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 33


समीरा आणि स्वानंदीच्या हट्टामुळे अवनीने आज पिझ्झा आणि फ्राईजचा घाट घातला होता. त्या दोघी पण होत्याच म्हणा मदतीला; त्यामुळे किचनमध्ये सगळीकडे पसाराच पसारा झालेला दिसून येत होता.

"आई, पण तू का नाही मागवला बाहेरून पिझ्झा? आता बघ किती पसारा झालाय किचनमध्ये."

"होऊ दे पसारा, आपण आवरून घेऊ सगळं खाऊन झाल्यावर."

"इकडे बघ बटाटे सालताना त्याची सालं कुठे कुठे उडवतेय स्वानंदी."

"सानू, बाळ तसं नाही करायचं. थांब मी करून दाखवते तुला मग कर तू तसेच."
असे म्हणून अवनीने तिच्याकडून बटाटे सालायच घेतलं आणि तिला दाखवू लागली.

"आई मला नाही जमते हे!"
स्वानंदी इवलस तोंड करून बोलू लागली.

"बरं मग तू ही सगळे बटाट्याची सालं एका पिशवीत भरून ठेव म्हणजे तो कचरा एका ठिकाणी गोळा करून ठेवता येईल."

अवनीने सांगितलेले काम दोघीही मुली अगदी आवडीने करत होत्या. पण समीरा आता मोठी झालेली होती; त्यामुळे तिला आता बरचं समजायला लागले होते.

"आई, पप्पा पैसे ठेवून गेलेत ना तुझ्याकडे."

"हो दिलेत, पण का ग समू! अशी का विचारतेय."

"अग म्हणजे आपल्याला काही पाहिजे असेल तर घेता येईल ना!"

"हो, घेता येईल ना! तुला काही पाहिजे होते का?"

"नाही ग, मला वाटले मी पिझ्झा मागवायचा बोलले आणि तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तू घरात करूया असे म्हणालीस की काय."

"नाही, तसे काहीच नाहीये. आपल्याकडे पैसे आहेत म्हणजे ते असेच कुठेही लगेच खर्च करून टाकायचे का? नाही ना! म्हणून मग जे घरात बनवता येईल ते करायचं घरात. जर नसेलच जमत तर ठीक आहे, कधीतरी बाहेरून घ्यायला हरकत नाही. आता मागच्या आठवड्यातच आपण बाहेरून जेवण करून आलो होतो; त्यामुळे सारखं सारखं बाहेरचं खाणं बरं नाही समू."

अवनी समीराला तिच्या परीने समजावून सांगत होती, पण समीरा काही  ऐकायला तयार नव्हती. ती अवनीच्या प्रत्येक बोलण्याला खोडून काढायला बघत होती. तिची ही काहीच चूक नाहीये म्हणा, कारण हे वयच असे असते मुलींचे. समीरा आता तेरा वर्षांची होणार होती, ह्या वयात मुलींच्या वागण्या बोलण्यात जरा बदल होत असतो. तो आपण समजून घेतला पाहिजे. त्यांना सारखं ओरडुन चालत नाही, त्यांच्या कलेने घेतलं की प्रत्येक गोष्टी सहज आणि सोप्या होतात. आई वडिलांनी त्यांच्याशी मैत्रीचे नाते ठेवावे, जेणेकरून कुठलीही गोष्ट ते आपल्या सोबत अगदी सहज मोकळेणाने बोलू शकतील.

"आई, मी ह्या बटाट्याचे काप करून घेऊ का?"
समीरा अवनीला विचारत होती, आता तिलाही इंटरेस्ट आला होता ह्या सगळ्या कामात. थोडावेळा पूर्वी हा पसारा नको म्हणून पार्सल मागव म्हणणारी समीरा आता अवनीला हे मी करते ते मी करते असे म्हणत होती. पार्सल तर सगळेच मागवतात पण जो स्वतः च्या हाताने करून खाऊ घालतो त्याला जास्त चव असते.. हे कळायला त्यांना अजून वेळ होता.

"बटाट्याचे काप करून झाले त्याला मॅरीनेट पण करून झाले आता ते कढईमध्ये तळून काढावे लागतील, समू तू हो बरं बाजूला.. नाहीतर गरम तेलाचे थेंब उडतील हातावर."
अवनी दोघींना बाजूला करून फ्राईज बनवत होती.

एका बाजूला फ्राईज आणि दुसऱ्या बाजूला पोळीचा पिझ्झा.. अशी दोन्ही पदार्थांची तयारी चालली होती. पोळीला आधी पिझ्झा सॉस लावला मग त्यावर कांदा, शिमला मिरची, स्वीट कॉर्न आणि मग पनीरचे तुकडे असे सगळे घातले. वरतून भरपूर चीझ किसून घातले आणि तव्यावर झाकण लावून ठेवून दिले. अवनी तिला जमेल तसे बनवत होती, पण दोघी मुली अगदी स्वखुशीने त्यात तिला मदत करत होत्या. निरखून बघत होत्या सगळं, आपली आई काय काय आणि कसे बनवत आहे ते.

अवनी आहेच म्हणा सुगरण, मुलींनी किंवा दिपकने काही बनवायला सांगितले आणि तिला ते जमले नाही असे कधी झालेच नाही. अन्नपूर्णा आहे ती, तिच्या हातून कधीच बिघडत नाही आणि कमी सुद्धा पडत नाही. पोटभर खाऊन पुरून उरते सगळ्यांना. त्यामुळे दिपक आणि मुली खुश असायचे अवनीवर, अवनीला आनंद व्हायचा की तिच्या हातून बनवलेले पदार्थ सगळे आवडीने खातात.

"चला, समू.. सानू.. पाणी घ्या प्यायला टेबलवर."

अवनीने आवाज देताच दोघी पण उठून पळाल्या. भूक तर लागलेली होती, त्यात आईने पिझ्झा आणि फ्राईज बनवले होते; त्यामुळे जरा सुद्धा थांबणे अशक्य होते.
अवनी ने दोघींना पिझ्झा कट करून प्लेटमध्ये दिला बाजूला फ्राईज पण ठेवले. सोबतीला टोमॅटो सॉस आणि पिझ्झा वर टाकून खातात ते मसाले पण घेतले.

"आई.. थांब. आपण आधी फोटो काढून घेऊ आणि पप्पांना पाठवू."
समीराने अवनीचा फोन आणला आणि त्यात बरेच फोटो घेतले वेगळ्या वेगळ्या अँगलने. आता तिला स्वतः ला धीर धरवत नव्हता.

"आई हा घे तुझा फोन.. " असे म्हणून समीराने पिझ्झाची एक स्लाईस उचलली.

"आई एक नंबर झालाय पिझ्झा, आपण बाहेरून मागवतो त्यापेक्षा बेस्ट."
समीराने तिच्या पिझ्झाचे भरभरून कौतुक केले.

"आई, फ्राईज पण टेस्टी झाल्या आहेत. मला अजून पाहिजे."
असे म्हणून छोटी स्वानंदी टोमॅटो सॉस मध्ये बुडवून फ्राईज खाऊ लागली. तिच्या तोंडाला सगळीकडे सॉस लागला होता. तिच्याकडे बघून समीरा हसायला लागली.

अवनीने त्या दोघींचे पण बरेचसे फोटो काढून घेतले पिझ्झा खाताना आणि काही सेल्फी घेतल्या.

"आई बघ ना दिदीला, माझ्याकडे बघून हसतेय केव्हाच."

"समू.. तू खा बरं तुझ तुझं. हसायचं नाही खाताना, नाहीतर मग ठसका लागतो."

पिझ्झा आणि फ्राईज खाऊन पोट टम्म भरले. खुश झाल्या समीरा स्वानंदी घरचा पिझ्झा खाऊन.

"आई पप्पा आल्यावर पण बनव असा पिझ्झा."
छोटी स्वानंदी अवनीला सांगत होती.

"हो, पुन्हा बनवेन मी तुमचे पप्पा आले की."

"आई मला उद्या देशील का पिझ्झा टिफीन मध्ये."

"टिफीन मध्ये कसे देऊ, थंडगार पिझ्झा चांगला नाही लागणार सानू. पाहिजे तर शॉर्ट ब्रेकच्या टिफीन मध्ये फ्राईज बनवून देईन पुन्हा."

"ओके चालेल, पण जास्त दे आणि सोबत टोमॅटो सॉस पण दे."

"हो, देते."

अवनीने पिझ्झा आणि फ्राईज तर मस्त बनवल्या पण किचनमध्ये झालेला पसारा आता दिसला. सगळीकडे भाज्यांची साले पडली होती. सिंक मध्ये बरीच भांडी जमा झालेली होती. आता हा पसारा आवरायला निदान अर्धा तास तरी लागणार होता तिला. पोरी तोपर्यंत टिव्ही पाहत बसल्या होत्या.

किचनमध्ये सगळे आवरून झाले, उद्यासाठी भेंडीची भाजी पण चिरून ठेवली आणि टिव्ही बघता बघता लसूण पण सोलून ठेवला.

"चला पोरींनो उठा आता, झोपायला जा बरं तिकडे. आज सारखा उशीर व्हायचा नाहीतर."
असे म्हणताच दोघी मुली उठून झोपायला गेल्या, छोटी स्वानंदी तर अर्ध्या झोपेतच होती म्हणा.

मुली झोपायला गेल्यावर अवनीने फोन घेतला, तिने बनवलेल्या पिझ्झा आणि फ्राईजचे फोटो दिपकला पाठवले. त्याला फोटो पाठवले तेव्हाच तिने सागरला ही पाठवून दिले.

सागर - "अरे वाह, काय मस्त दिसताय सगळे पिझ्झा खाताना."
तिकडून लगेच सागरचा रिप्लाय आला.

अवनी - "हम्मंम, पिझ्झा मी बनवला आहे."

सागर - "अरे वाह, तुला तर सगळचं येत. यायला पाहिजे तुझ्या हातचं खायला."

अवनी - "मला सगळं येत चांगल बनवायला, आणि मुलांना खाऊ पण घालता येत घरातलं बनवून. पण तुला नाही बोलवू शकत मी घरी."

सागर - "तुला चांगल बनवता पण येत मला.. हा हा हा."
असे म्हणून सागर हसू लागला.

अवनी - "तू गप रे, काहीही बोलतो."

सागर - "मग काय तर.. मी काय लगेच येणार होतो का तुमच्याकडे."

पण काही का असेना अवनी घाबरली होती, सागर यायचं म्हणाला तेव्हा. कारण त्याला कसं काय बरं बोलवणार होती अवनी घरी.. हा विचार लगेच डोक्यात आला तिच्या, पण सागर मजाक करत होता हे तिच्या लवकर लक्षात नाही आले.

अवनी - "तसे नाही रे, पण तरी मी नाही बोलवू शकत तुला .. सॉरी."

सागर - "आय नो डियर, तू नको टेंशन घेऊ. मी मुद्दाम बोलत होतो."

अवनी - "बरं.. ठीक आहे. तुझं कधी कधी काही कळतच नाही मला."

सागर - "बरं ते जाऊ दे, आज मस्त पिझ्झा पार्टी केली तुम्ही. मुली खुश असतील मग."

अवनी - "हो तर, त्यांनाच भाजी पोळी खाऊन कंटाळा आला होता म्हणून बाहेरचं खायचं होतं, पण मीच म्हंटल घरीच बनवू पिझ्झा."

सागर - "हे मात्र चांगल केलंस, सारखं बाहेरच खाणं बरं नाही."

अवनी - "हो ना! हल्ली ते प्रमाण वाढलंय आमचं."

सागर - "बाकी काय म्हणता, आवरलं सगळं."

अवनी - "हो, सगळं आवरून झालं आणि आता झोपायला चालले मी."

सागर - "अरे असं काय करतेस, आपल्याला गप्पा नाही का मारायच्या."

अवनी - "अजिबात नाही, आज तुझ्यामुळे खूप काही काही झाले. पुन्हा उद्या उठायला उशीर झाला तर काय करू."

सागर - "बरं थोडा वेळ तरी थांब."

अवनी - "थोडावेळ थांबून काय बोलणार आपण."

सागर - "बोलू काहीतरी."

अवनी - "नको, त्यापेक्षा उद्या बोलू आपण सकाळी."

सागर - "ए असं ग काय करते अवनी."

अवनी - "चल बाय गुड नाईट."

सागर - "अवनी यार, धीस इज नॉट फेअर."

अवनी - "नको सागर, तुझ्याशी बोलता बोलता खूप उशीर होतो आणि मग माझी झोप नाही झाली की मग कसा गोंधळ होतो ते पाहिलस ना!"

सागर - "हम्म्म, बरं ठीक आहे. पण उद्या सकाळी नक्की लवकर उठ म्हणजे उशीर नाही होणार."

अवनी - "हो मग, उठायला पाहिजे मला."

सागर - "बरं चल बाय, गुड नाईट डियर."

अवनी - "गुड नाईट."

सागर सोबत आणखी थोडा वेळ बोलता आलं असतं पण नको, उगाच कशाला बोलत बसायचं. आणि बोलता बोलता वेळेचं भान राहत नाही मग उशीर होतो झोपायला सुद्धा. त्यापेक्षा लवकर झोपून घेऊ. असे म्हणून अवनी झोपायला गेली.

थोडा वेळाने परत उठून बाहेर आली, दरवाजा नीट बंद केला की नाही ते बघू लागली. किचनमध्ये गॅस बंद केलाय ना ते पुन्हा चेक केलं. सगळं तपासून झाल्यावर पुन्हा झोपायला गेली, पण तिला झोप काही लागत नव्हती.

"हा सागर ना, याच्यामुळे मला ही घाण सवय लागली. रात्री उशिरा झोपायची."
असे म्हणून तिने गच्च डोळे मिटून घेतले आणि झोपायचा प्रयत्न करू लागली.

🎭 Series Post

View all