शतदा प्रेम करावे - 25

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 25


अवनी आज दिवसभर सागरशी झालेलं बोलणं मनात तेच तेच पुन्हा रिपीट करत होती. तिला खूप छान वाटले त्याच्याशी बोलून. किती दिवस झाले त्यांच्यात मैत्री होऊन, पण त्याने कधीच असा फोन केला नव्हता. पण आज मात्र आवर्जून त्याने फोन केला, फक्त आणि फक्त अवनीसाठी.. तिचा बिघडलेला मुड ठीक करण्यासाठी.

आज सकापासूनच मॅडमचा मुड भलताच खुश दिसत होता. प्रत्येक काम ती अगदी गाणं गुणगुणत करत होती. तीच एक मात्र होत, जे गाणं ती सकाळी सकाळी ऐकते.. तेच गाणं दिवसभर गुणगुणत असते. मग कुठेलेही कामं करताना त्यात अगदी मन लावून कामं करणारं. सगळी कामं झाल्यावर तिने सकाळी डब्यासोबत स्वतः साठी करून ठेवलेली भाजी पोळी नाश्ता म्हणून खाऊन घेतली. त्यानंतर बाकीची राहिलेले काम पूर्ण केले.

दुपारचे साडे बारा तर असेच कामं करता करता वाजून गेले, आणखी एक तासाने समीरा आणि स्वानंदी घरी येतील शाळेतून. आल्या आल्या भूक लागली म्हणून ओरडतील. जेवण तयार करायला पाहिजे आता. असे म्हणून अवनी स्वयंपाक घरात गेली. भरभर हात चालवत तिने तिघींसाठी मस्त पास्ता बनवला. खरंतर तिला पिझ्झा, पास्ता, मॅगी..  असेल प्रकार आवडतं नाही, पण दोघी मुलींना आवडतात म्हणून खास त्यांच्यासाठी आज अवनीने पास्ता बनवला होता. शाळेचा पहिला दिवस कसा गेला असेल काय माहिती, पण घरी आल्यावर नक्कीच सांगितल त्या. 

दुपारी दीड वाजता व्हॅनचा हॉर्नचा आवाज आला आणि अवनी गॅलरीत जाऊन उभी राहिली. मुलींच्या शाळेचा वेळ माहिती असते; त्यामुळे अवनी खाली न जाता गॅलरीतून बघत असते मुली आल्या की नाही ते. दोघींना व्हॅनवाले काका सोसायटीच्या आत सोडतात. त्यामुळे खाली नाही गेलं तरी चालते आणि मुलींना पण माहिती आहे, आई गॅलरी मधून खाली बघत असते त्यांना; त्यामुळे येतात त्या नीट घरी.

दरवाजाची बेल त्यांनी वाजवण्याआधीच अवणीने दरवाजा उघडला, आल्या आल्या दोघींनी बॅग एका कोपऱ्यात ठेवली आणि बोलू लागल्या.

"आई, आज शाळेचा पहिला दिवस होता म्हणून आम्हांला आज फक्त इंट्रोडक्षन द्यायला सांगितलं. त्यानंतर मग थोडा फार अभ्यास आणि मग आम्ही ग्राऊंडवर खेळायला गेलो."
समीराने आल्याबरोबर अवनीला सर्व सांगायला सुरुवात केली.

"आई आम्हांला तर मागच्या वर्षीची उजळणी करायला सांगितली. टेबल्स करायला सांगितले आणि पोयम पण म्हटली आम्ही सगळ्यांनी."
छोटी स्वानंदी तर शाळेत काय काय झालं ते सगळं सांगत होती.

"बरं मी काय म्हणते, आता पहिले तुमच्या स्कूल बॅग नीट ठेवा आणि हात पाय धुवून या जेवायला."

"काय बनवल आई जेवायला? मला सकाळची भाजी पोळी नकोय पुन्हा जेवायला."
समराने तर भाजी पोळी डायरेक्ट नको म्हणून सांगून टाकले.

"आज मी तुमच्या आवडीचे बनवले आहे, चला लवकर या बरं तुम्ही हात पाय धुवून."

असे म्हणताच छोटी स्वानंदी पटकन हात पाय धुवून टेबलवर येऊन बसली.

"काय बनवलं आई?"

अवनीने तिघिंसाठी प्लेट मध्ये पास्ता वाढून आणला आणि त्यावर मस्त सॉस घालून दिला.

"वाव आई, मला खूप दिवसांपासून पास्ता खायचा होता."

"मला पण आई, मला खूप आवडतो पास्ता."

दोघी पण मुलींना पास्ता खूप आवडतो, त्यामुळे अवनीने तो मुद्दाम आज बनवला होता. दोघींना पण पास्ता खूप आवडला.

"कसा झालाय पास्ता समु?"

"खूप मस्त आई, बघ मी दाखवलेली रेसिपी तसाच केलास ना तू!"

"हो मॅडम, तुम्ही जी रेसिपी दाखवली अगदी तसाच बनवला आहे पास्ता."

तिघी पण टिव्ही पाहत पाहत जेवत होत्या. सगळा पास्ता संपल्यावरच समीरा आणि स्वानंदी दोघी उठल्या.

"आई, आज मॅडमने आम्हांला होम वर्क पण दिलाय."

"अरे वाह, पहिल्याच दिवशी होम वर्क दिला."

दुपारी थोडंसं आराम करावं म्हंटले की पोरी मध्येच काहीतरी कामं काढून डिस्टर्ब करत असतात. त्या स्वतः कधी झोपत नाही आणि अवनीला सुद्धा झोपू देत नाही.

अवनीच सगळं आवरून झाल्यावर तिने हातात फोन घेतला, त्यावेळी पाहिले की सगरचे खूप मेसेज आणि त्याने छान छान स्टिकर्स पाठवलेले होते.

अवनी - "सागर, आज ऑफिसमध्ये काही काम नाही वाटतं."

सागर - "अजिबात नाही."

अवनी - "तू काय फोन हातात घेऊनच बसलेला असतो का? जेव्हा बघावं तेव्हा लगेच रिप्लाय येतो तुझा."

सागर - "मग काय, मेसेज टोन वाजली की समजून जात मला लगेच की तूच असणार."

अवनी - "अरे वाह, हे भारिये. म्हणजे कामात कमी आणि फोनकडे जास्त लक्ष असतं तुझं."

सागर - "तसं नाही रे, माझं काम तसही फोनवरच होत अर्ध; त्यामुळे फोनवर पण लक्ष ठेवूनच असतो मी."

अवनी - "अच्छा, मग ठीक आहे."

सागर - "बाकी काय, मुली आल्या का घरी नीट."

अवनी - "हो, आल्या त्या आणि जेवण पण झालं आमचं."

सागर - "काय बनवलं आज."

अवनी - "पास्ता.. खूप आवडतो त्यांना; म्हणून आज तेच बनवलं मग."

सागर : "मुलींना देत नको जाऊ जास्त ते मैद्याचे पदार्थ.. मॅगी, पास्ता आणि ते नुडल्स. असल काही खायचं नाही जास्त."

अवनी - "नेहमी नाही करत रे मी, क्वचित कधीतरी करून देते. महिन्यातून एक दोनदा ठीक आहे."

सागर - "ठीक आहे, बाकी काय."

अवनी - "काही नाही, तू बोल."

सागर - "माझं काय, मी आपला बिचारा दिवसभर कामातच असतो."

अवनी - "अरे अरे, चहा कॉफी काही घेतल की नाही."

सागर - "नाही, आता घ्यावी म्हणतोय कॉफी."

अवनी - "मी पण आता कॉफीच बनवणार आहे."

सागर - "तू दुधाची बनवून पिणार, पण मी ब्लॅक कॉफी घेतो."

अवनी - "हम्म्म.. मी दुधाची बनवते कॉफी. काळी कॉफी नाही आवडत बाबा मला, कडू कडू लागते खूप."

सागर - "तुम्ही गोड माणसं, कडू कसं आवडणार तुम्हांला."

अवनी - "गोड तर आम्ही आहोतच.. त्यात काही शंका नाही."

सागर - "बरं मला एक कॉल येतोय, नंतर बोलू आपण."

अवनी - "ओके बाय, रात्री बोलू."

सागर - "ओके बाय डियर."


फोन चार्जिंगला लावून अवनी पुन्हा आपल्या कामाला लागली. मुलींना तयार करून चित्रकलेच्या क्लासला पाठवले. आता पुन्हा काय बनवाव जेवायला.. समस्त महिलांना पडलेला रोजचाच प्रश्न. पण एका आईला हे काम तितके अवघड वाटतं नाही. कारण आपली मुलं ज्या भाज्या खात नाही त्यांना त्या बरोबर खाऊ घालतात.

समीरा आणि स्वानंदीला फ्लॉवरची भाजी अजिबात नाही, पण सकाळची भाजी शिल्लक होती. म्हणून अवनीने सकाळची भाजी संपवण्यासाठी एक आयडिया केली.

गव्हाच्या पिठात ओवा मीठ आणि तेल घालून चांगले मळून घेतले. आता त्याच्या चपात्या करून घेतल्या. मुली क्लास वरून आल्या की त्यांना फ्रँकी बनवून द्यायची, ही फ्रँकी खूप आवडते त्यांना.. त्यातच जी आवडत नाही ती भाजी भरून फ्रँकी करून दिली की अगदी चटकमटक करून खातात मुली.
"वाह, काय भारी आयडिया आहे. शाब्बास अवनी हुशार आहेस की तू."
स्वतः लाच शाबासकी देत अवनीने तयारी केली. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, काकडी कापून ठेवली. चीझ किसून ठेवले. सगळी तयारी करून ठेवली. आता बस मुली वेळेवर आल्या पाहिजे म्हणजे गरमागरम फ्रँकी खाऊन घेतली पटकन.

पाच ते सात वाजेपर्यंत चित्रकलेचा क्लास सुरू असतो. पण आज साडे सात वाजत आले तरी मुली आल्या कशा नाहीत घरी? असे म्हणून अवनी उठून दरवाजा खोलायला गेली तेव्हढ्यात मुली घरी आल्या.

"किती वेळ केला आज, वाट बघतेय मी घरी इथे."

अवनीने दोघींना बोलायला सुरुवात केली, रागवता तर येत नव्हते कधी तिला पण विचारलं तर पाहिजेच. पप्पा घरी नाहीत त्यामुळे तिला लक्ष तर ठेवायला पाहिजेच ना!

"आई, आग मॅडमने आज आम्हांला गेम खेळायला दिला होता; म्हणून उशीर झाला जरासा."

"अरे पण सांगायचं तरी ना! मी आता येणारच होते तुम्हांला घ्यायला."

"आई, आम्ही काय लहान आहोत का आता? आणि क्लास आपल्याच बिल्डिंग मध्ये तर आहे. मग इतकं का घाबरते तू."

"तसं काही नाहीये समू, पण आपले पप्पा घरी नाहीये मग आपल्याला नीट राहायला पाहिजे ना! तुम्हांला काही झाले म्हणजे? मी काय करणार."

"काही नाही होत ग आई.. तू उगाच घाबरत असते."
समीरा इतकी बिनधास्त बोलत होती की अवनीला तीच कौतुक करावं की तिला ओरडाव हेच कळत नव्हतं.

मुली किती लवकर मोठ्या होतात नाही का? आईला तर नेहमी असं वाटतं असते की आपल्या मुली अजून लहान आहेत त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवायला पाहिजे. आजकाल जमाना खूप खराब आहे, पण मुलींना घाबरायच सोडून तितकं स्ट्राँग बनवायला पाहिजे.
असा विचार करून अवनीने दोघींना कराटे क्लास लावायचा ठरवले.

🎭 Series Post

View all