शतदा प्रेम करावे - 18

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 18


ऑफिसच्या कामानिमित्त दिपकला बाहेर परदेशात जावे लागेल असे सांगितल्याने अवनी थोडी नाराज झाली होती. पण तिलाही कळत होते की महत्वाचे कामं आहे त्यामुळे दिपकला जावे लागेल, यावर तिला गर्व ही होता की दिपकला ऑफिसने महत्वाची जबाबदारी सोपवली होती. पण तरी सुद्धा अवनीला खूप एकटं वाटणार म्हणून ती उदास होती.

"दिपक, तुम्ही खरंच जाणार आहात का?"

"हम्मम्म्मम.."

"हम्मम काय असतं दिपक."

"आता काय करू मी, तूच सांग."

"काही नका करू."
अवनी उगाच तोंड फुगवून बसली होती. त्यामुळे दिपकने तिला आणखी जवळ घेत समजावून सांगितले.

"आता माझं प्रोफेशनच तसं आहे, तर त्याला मी तरी काय करणार."

"दिपक, आय मिस यु."
अवनी आणखीनच त्याच्या जवळ जात कुशीत शिरून बोलत होती.

"आय मिस यु टु जान, तुझ्यासाठीच तर चाललंय हे सगळं."

"पण मला तु कायम माझ्यासोबत पाहिजे, सवय झालीये मला आता रोज संध्याकाळी तू घरी येशील आणि मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं काहीतरी बनवेल."

"बरं मग मी अस करतो की, माझ्या ऐवजी दुसरं कोणाला पाठवता येईल का? किंवा ही जबाबदारी कोणी घेऊ शकेल का? असे असेल तर बघतो मी."

"नाही नको, तुझं काम तू नीट कर. उगाच माझ्यामुळे काहीपण भलतासलता नको डिसीजन घेऊ."


"बरं, जर मीच गेलो तर शक्यतो लवकर यायचं बघेन, बघतो काही होतंय का ते.. आणि करतो काहीतरी मी."

"दिपक, मी बोलले ना तुला. मी राहीन इथे व्यवस्थित, तू तुझी काळजी घे फक्त."

"बघ हं, तुझ्या भरवशावरच जातोय मी इतके दिवस. इथे तू सगळं सांभाळून घेतेस, मुलींना व्यवस्थित बघतेस.. म्हणून मी निवांत राहतो कुठेही तुझ्यावर घर सोडून."

"मी सगळं सांभाळून घेते, आणि नेहमी घेत राहीन.. पण मला सांभाळून घेणार ही पाहिजे ना कोणी."

"मी आहेच ना मग, तुला कधीही काहीही वाटलं तर लगेच फोन किंवा मेसेज करत जा मला."

"हो, ते तर मी करणारच आहे."

"हा हा हा, मग झालं तर."

"चल आता खूप उशीर झालाय, झोप यायला लागली मला."

"अवनी थांब ना अजून थोडा वेळ, तुला माहितीये का? ह्या अब्रॉड ट्रिप नंतर माझं प्रमोशन देखील होण्याचे चान्सेस आहेत."

"अरे काय सांगतोस काय दिपक, मी तर खूप खुश आहे तुझ्यासाठी."

"मी पण, ह्या प्रोजेक्ट वर खूप मेहनत घेतलीये मी; त्यामुळे प्रमोशन तर मिळणारच."

"नक्की मिळणार, आय अँम प्रावूड ऑफ यु दिपक. तू खूप छान काम करशील.. इथली अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन इकडंच."

"थॅंक्यू सो मच जान."

"आणि तु ज्या कामासाठी बाहेर जाणार आहेस ते काम ही तू खूप छान करशील, मला खात्री आहे प्रमोशन नक्की तुलाच मिळणार."

"हो, माझं काम तर नक्कीच खूप छान होईल."

"बेस्ट ऑफ लक दिपक.. बरं आता तरी चल झोपायला."
अवनी जांभई देत बोलत होती. खरं तर आता अकरा वाजत आले होते, झोपायला तर जायलाच पाहिजे. पण दिपक काही उठायचं नाव घेत नव्हता.

"थांब ना अवू, लगेच कुठे चालली झोपायला. अभी तो रात जवान हुई हैं."

"दिपक, काहीही तुझं आपलं."
अवनी आजही अगदी तशीच लाजत होती जशी आधी लाजायची.

"आज फिर तुमपे प्यार आया हैं.. आज फिर तुमपे प्यार आया हैं."
दिपकच गाणं सुरू झालं, इतका रोमँटिक मूड झाला होता त्याचा की अवनीला सोडतच नव्हता तो.
त्याने अवनीला त्याच्या दोन्ही हातांवर उचलून घेत गाणं गात होता आणि अवनी अजूनही त्याच्या छातीवर डोकं खुपसून होती.

"दिपक, काय चाललंय तुझं. पोरीं झोपल्या आहेत, उठतील त्या तुझ्या अशा गाण्याने."

"नाही उठणार त्या, झोपल्या आहेत पक्क्या."
दिपकचे ऐकून अवनी आणखीनच लाजायला लागली.

नवऱ्याचं आपल्यावर असणार इतकं प्रेम कोणाला नाही आवडणार. लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर सुद्धा नवरा बायको मध्ये असणार हेच तर प्रेम असते जे एकमेकांना बांधून ठेवते. 
दोघांनी आजची ही रात्र एकमेकांवर प्रेम करत घालवली.

सकाळी उठायला जरा उशीरच झाला, घाईघाईने अवनी सगळं आवरत होती. दिपकचा डबा आणि मग सगळ्यांचा नाश्ता, ह्यासगळ्यात खूप वेळ जात होता. घाईगडबडीत तिच्याकडून चमचे खाली पडले, तो आवाज ऐकून दिपक त्याच आवरता आवरता बाहेर आला. तिची किचनमध्ये उडालेली धांदल त्याला दिसत होती.

"अवनी, झालंय का तुझं."

"हो, हे काय नाश्ताच देतेय."

"अरे हळू जरा, इतकी घाई नको करू. हवं तर आज नाही जात मी ऑफिसला."
दिपक सकाळी सकाळी तिला चिडवत बोलत होता.

"काही नको, माझं झालंय सगळं. डबा पण भरून ठेवला आहे आणि नाश्ता पण रेडी आहे."

"हे काय, नवरा चांगलं म्हणतोय की बायकोला वेळ देतो, पण बायकोच तयार होत नाही इथे लवकर."

"दिपक, तू पुन्हा सुरू झाला का."

"मग काय, प्रेम अजूनही कमी नाही झाले."

"पुरे आता, नाश्ता करून घ्या मग चहा आणते मी."

इतक्यात समीरा स्वानंदी पण तयार होऊन बाहेर आल्या.

"आई, उपमा.. "
समीराने तोंड वाकड केलं उपमा बघून.

"ए.. अस नाही तोंड वाकडं करायचं. खाऊन घ्यायचं चुपचाप."

"पण आई.. मला नाही ना आवडत उपमा, तुला माहितीये ना!"

"आजच्या दिवस खाऊन घे समू, उद्या तुझ्या आवडीचा नाश्ता बनवेन मी."

समीराने कस बस तोंड वाकडं तिकडं करत दोन चार घास खाल्ले आणि बस झाले म्हणून उठून गेली. पण छोटी स्वानंदी टेबलवर बसून पप्पांसोबत नाश्ता करत होती.

"अवनी, चहा दे लवकर."

"हो आलेच घेऊन."

चहा नाश्ता झाल्यावर दिपक त्याच्या ऑफिसला गेला. पोरींच्या क्लासचा पण टाईम झालेला होता.

"आई, आज सुट्टी घेऊ का मी क्लासला?"

"आता सुट्टी कशाला हवीये तुला, उद्यापासून शाळा सुरू होतेय; त्यामुळे तसही क्लासला जायला होणार नाही आता. आज शेवटचाच दिवस असेल तुमचा."

"अरे हो, मग आज जायलाच पाहिजे."

"हो, तुझ्या मॅडमला पण सांगून ये की उद्यापासून क्लासला यायला जमणार नाहीये."

"हो सांगून येते, आई फी दिलीये का मॅडमची आपण."

"हो, फी भरली होती आपण आधीच. त्यामुळे त्या काही बोलणार नाहीत तुम्हांला."

"पण आई, मला आवडायचा हा ड्रॉईंग क्लास. खूप छान शिकवतात ह्या मॅडम."

"बरं मग क्लास बंद न करता आपण तुमचा टाईम वेगळा ठेवुया का?"

"हो चालेल, हा क्लास संध्याकाळचा ठेवला तरी चालेल मला."

"पण मग शाळेचा अभ्यास कधी करणार तुम्ही."

"आई आम्ही करू बरोबर आमचा शाळेचा अभ्यास, पण हा क्लास पूर्ण करायचा आहे मला."

"बरं ठीक आहे, मी सांगते तस तुमच्या मॅडमला."

"आजच ये मग आई आम्हांला घ्यायला क्लासमध्ये, म्हणजे तुमचं बोलून होईल."

"हो बाबा, आजच येईन. आता पळा बरं क्लासला तुम्ही दोघी, नाहीतर उशीर होईल."

"हो आई, बाय बाय."

सगळे आपापल्या कामाला लागले आणि अवनी पण घरात आवरु लागली. आज उशीर झाला होता तिला उठायला; त्यामुळे घरातला पसारा आवरायचा बाकी होता. त्यानंतर झाडून पुसून घ्यायचं होत.. झाडांना पाणी द्यायचे होते आणि नंतर देवपूजा पण बाकी होती.

इतकी सगळी कामं, तरी अवनी एकट्याने सगळं घर आवरायची. न दमता न थकता सगळं अगदी आवडीने करायची. त्यात आणि मुलांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवून त्यांना खुश करणे, नवऱ्याला खुश ठेवणे.. हे काम बघायला गेलं तर तितकंसं सोप्प नाहीये पण नात्यांची वीण आणखी घट्ट करायची असेल तर फारसं अवघड ही नाहीये.

अवनीला हे सगळं खूप छान जमायचं, गावी राहणारे सासू सासरे.. त्यांना दोन दिवसातून एकदा तरी आठवणीने फोन करून त्यांची विचारपूस करणे. त्यांना काय हवं नको त्या वस्तू इकडून पाठवून देणे, त्यांची गोळ्या औषधं त्यांचे आजार.. हे सगळं नीट लक्षात ठेवून काळजीने सगळं करणे. अवनी एक चांगली पत्नी आणि आई तर होतीच पण एक उत्तम सून आणि गृहिणी देखील होती.


🎭 Series Post

View all