शतदा प्रेम करावे - 17

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 17



"असं कोणी करत का? महत्वाचं बोलायचं आहे असं सांगून फसवतात का कोणी?"

अवनी तीच तिचंच बोलत होती स्वतःशी, किचनमध्ये कामं करता करता हसत होती बोलत होती. मागून हळूच दिपकने तिला कमरेत हात घालून पकडले, तशी ती खूप दचकली.

"काय हे दिपक, कित्ती घाबरले मी माहितीये का तुम्हांला."

"अरे आपल्या घरात मीच येईन ना अस, आणि ते ही तुझ्या इतक्या जवळ."
दिपक तिला बोलत होता, पण अवनी चांगलीच दचकली होती.

"आणि हे काय ग, स्वतःशीच बोलत होतीस का? जरा मला पण सांग म्हणजे मी ही हसतो तुझ्यासोबत."

"काही नाहो ओ, ते असच हसत होते मी."

"असंच कस हसतात बरं. काहीतरी झालेच असणार ना!"

"महत्वाचे बोलायचे आहे असं सांगून कोणी कस फसवू शकतं बरं, सांगा आता मला. आणि जे बोलायचं होत ते स्वतःच विसरून जातात काय बोलायचं होत ते."
हे सांगताना पण अवनी हसत होती.

पण दिपकला तर बिलकुल हसू नाही आले, तो मात्र चेहऱ्यावर प्रश्न पडल्या सारखा उभा होता.

"तुला कोण काही बोललं का असं?"

आता मात्र अवनीची चांगलीच धांदल उडाली, तिला काय बोलावे हेच कळत नव्हते. इतका वेळ हसणारी अवनी, पण आता तिची बोबडी वळाली होती.

"ते खालच्या फ्लोअर वरची किमया, मला म्हणे तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे महत्वाचं. आणि नंतर फोन करून विचारलं तर म्हणे विसरले मी, नंतर बोलू आपण."

दिपकच्या प्रश्नाला सारवासारव करून अवनीने काहीतरी बोलून वेळ मारून नेली, नाहीतर आज काही खरं नव्हतं तिचं.

"बरं तुम्ही फ्रेश होऊन आवरून घ्या, मी चहा करते मस्त आपल्या दोघांसाठी."

"हो आलोच मी."
असे म्हणत डब्बा टेबलावर ठेवून दिपक आत निघून गेला.

"काय करतेस अवनी, एक दिवस अशीच गोत्यात येशील."
असे म्हणून अवनीने कपाळावर हात मारून घेतला.

"मला एक मित्र आहे आणि त्याच्याशी मी नेहमी बोलत असते.. अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ. दिपकला आवडेल का पण असं. पण आमच्यात अस काहीच बोलणं होत नाही गैरसमज होईल असे. पण तरी सुद्धा तो ओरडला तर मला, किंवा पुन्हा कधी बोलूच दिले नाही त्याने मला सागर सोबत तर.. "
अवनीच्या मनात असे बरेच भलतेसलते विचार घोळत होते. गॅसवरचा चहा चांगला उकळून आटून गेला होता, तरी त्याकडे तीच लक्ष नव्हतं.

"अवनी, चहा आणतेस ना!"
बाहेरून दिपकचा आवाज आला तस अवनीच लक्ष जळलेल्या पातेल्याकडे गेले. तिने पटकन दुसऱ्या पातेल्यात चहा ठेवला आणि दिपकला नेऊन दिला.

"बरं मी काय म्हणतोय अवनी, मला ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे काही दिवसांसाठी."

"अरे, अस अचानक कसं काय बरं."

"अरे तो नवीन प्रोजेक्ट सुरू केलाय त्यासाठीच जावं लागणार आहे."

"कुठे जाणार? किती दिवसांसाठी? आणि कधी जाणार आहेस?"

"किती प्रश विचारतेस ग लगेच, अजून मलाच तशी माहिती मिळाली नाहीये. आजच सांगितलंय मला तस.. मला कळलं की पहिले तुलाच सांगणार आहे मी."

"बरं, पण जास्त दिवसांसाठी नका जाऊ."

"आता ते मी कसं ठरवणार बरं, आमच्या कामावर डिपेंड राहील ना ते."

"हम्मम, ते ही आहेच म्हणा."

"माझा पासपोर्ट काढून ठेवायला पाहिजे वरती, उद्या घेऊन जायचा आहे मला तो."

"हो, कपाटात ठेवला आहे फाईलमध्ये. देते मी काढून थोडा वेळाने."

"अजून माझे कपडे पण बघून ठेव, कोणते इस्त्रीला द्यायचे आहेत ते आताच देऊन टाक. म्हणजे वेळेवर घाईगडबड नको व्हायला."

"हो, मी करते सगळं नीट."

"तू आहेस म्हणून तर मी निवांत बसलोय."

"दिपक, तुम्ही असे बाहेर गेले की भीती वाटते मला एकटीला घरी."

"आता समीरा आणि स्वानंदी, ह्या दोघी बॉडीगार्ड असतांना कसली भीती वाटते ग तुला."

"काहीही बोलता दिपक तुम्ही."

"अरे पण घाबरण्या सारखं काय त्यात, मस्त खाऊन पिऊन निवांत झोपायचं. हा फक्त दरवाजा नीट लावून घ्यायचा. तशी भीती नाहीये म्हणा आपल्या सोसायटीमध्ये, पण तरी सुद्धा आपणच आपली काळजी घ्यायची."

"ती घेईनच हो मी."

"मग काय अजून."

"तुम्ही नसले की झोप लागत नाही मला."

"हे काय नवीनच आता."

"नवीन काय त्यात, खरंच झोप लागत नाही मला पक्की."

"वेडाबाई, लवकरच येईन मी काम झाले की. मग तर झालं."

"हम्मम्म." अस म्हणून दिपकने तिला जवळ घेतले.

त्यादोघांना अस बघून छोटी स्वानंदी पण आली त्यांच्यामध्ये, ती आली म्हणून समीरा सुद्धा गेली त्यांच्यात.

"आम्हांला पण लाड करा पप्पा, फक्त आईनेच नका करू लाड."
छोटी स्वानंदी दिपकच्या मांडीवर बसत बोलली.

"बदमाश.."
दिपकने तिला सुद्धा मांडीवर घेत त्यादोघींचा लाड केला.

"पप्पा तुम्ही कुठे जाणार आहात."
समीराने दिपकला विचारले. 

"इंडोनेशिया.. पण कधी जाणार आहे ते अजून ठरलं नाही. ते ही कळेलच उद्या किंवा परवा."

"पप्पा माझ्यासाठी खूप सारे चॉकलेट घेऊन या तिकडून येतांना."
छोटी स्वानंदी हात पसरवून सांगत होती.

"हो, खूप सारे चॉकलेट घेऊन येईन मी तुमच्या सगळ्यांसाठी."

"पप्पा मला आर्ट आणि क्राफ्टच सामान घेऊन या तिकडून आणि वेगवेगळे स्टोन सुद्धा."

"तिकडून दगडं कसे आणू मी."

"अहो पप्पा आम्हांला आता स्टोन पेंटींग शिकवणार आहे क्लासमध्ये."

"आपण इथूनच आणून घेऊ समू दुकानातून.. पप्पा तिकडे कुठे दगडं शोधत बसतील."
अवनी तिला समजावत बोलत होती.

"बरं मग माझ्यासाठी दुसरं काहीतरी आणा, जे हॅन्डमेड असेल अस काहीतरी."

"ओके, ठरलं तुमच्या दोघींचं काय काय पाहिजे ते. पण तुमच्या आईसाठी काय आणायचं, ते तर तिने सांगितलंच नाही अजून मला."

"मला काही नको दिपक, फक्त तुम्ही तुमचं काम लवकर आवरून या परत."

"ते तर मी येईनच ग, पण सांग ना तुझ्यासाठी काय आणू."

"पप्पा आईसाठी पर्स घेऊन या छानशी, ज्यात तिचा फोन बसेल अशी."

"हम्मम हे बेस्ट आहे. हेच शोधून आणतो."

"बरं चला जेवायचं नाही का आज तुम्हांला, भूक नाही लागली तुम्हांला कोणाला अजून."
अवनी उठून किचनमध्ये जात बोलली.

"हो आई भूक लागलीये, लवकर जेवायला दे."

"काय बनवलं आज."
दिपकने विचारताच अवनीने टेबलवरती वाफाळता कुकर ठेवला.

"वरणफळं.. आवडतात ना तुम्हांला."

"वाव आई, मला पण आवडतात."
असे म्हणत समीरा सगळ्यांसाठी पाणी आणून ठेवत होती. तीच रोजच काम होत हे, जेवायला बसले की पाणी घ्यायचं सगळ्यांना. अशी छोटी मोठी कामं अवनी सांगायची पोरींना, आणि त्यासुद्धा आवडीने करायच्या त्यांच्या आईला मदत.

"गरमागरम वाफाळते वरणफळं.. त्यावर साजूक तुपाची धार. आहाहा, अवनी तू रोज अस बनवलंस माझ्या आवडीचं तर मी आणखी जाड होत जाणार. आणि ते ही फक्त तुझ्यामुळे.. मग म्हणू नकोस वजन किती वाढलंय तुमचं, जरा कमी करा."

"काही नाही वाढत."
असे म्हणून अवनी सगळ्यांना बाऊल मध्ये वाढत होती.

जेवणाच्या टेबलवर बसून सगळे एकमेकांशी छान गप्पा मारत जेवत होते. समीरा स्वानंदी दोघी पण आईला मदत करत होत्या. छोटी स्वानंदी तर नुसतं मध्ये मध्ये लुडबुड करायची, पण तिची ही लुडबुड आवडायची अवनीला.

पोटभर जेवण झाल्यावर सगळे थोडावेळ टिव्ही पाहायला बाहेर आले.

"पप्पा मला टॉम अँड जेरी बघायचं आहे, लावा ना ते."
छोटी स्वानंदी हट्ट करू लागली, तसे अवनीने दोघींना झोपायला आतल्या खोलीत जा म्हणून सांगितले.

"असू दे ग, बघू दे थोडा वेळ मग जातील त्या झोपायला. हो ना सानु बाळ."
दिपकने तिला लावून दिलं टॉम अँड जेरी.

"सकाळी उठायला होत नाही मग अस टिव्ही पाहत बसले की. सानु फक्त पाच मिनिटं हं."

"हो आई."

बरोबर पाच मिनिटांनी समीरा आणि स्वानंदी झोपायला गेल्या आत बेडरूममध्ये. त्यानंतर अवनी दिपकजवळ जाऊन बसली, त्यानेही तिला जवळ घेत टिव्हीचे चॅनेल बदलले.


किती छान छोटंसं कुटुंब, एकमेकांची काळजी घेणारं, काय हवं नको ते बघणार, एकमेकांना सांभाळून घेणारं, आवडीनिवडी जपणारं.. ह्यालाच तर सुखी जीवन म्हणतात.

🎭 Series Post

View all