शतदा प्रेम करावे - 15

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 15


गरम गरम चहाचा एक घोट घेत अवनीने सागरला मेसेज केला आणि नेहमीप्रमाणे तिकडून क्षणाचाही विलंब न करता सागरचा रिप्लाय येऊन आदळला.

अवनी - "सुप्रभात सागर."

सागर -  "दो बोल प्यार के
            क्या कमाल दिखाते हैं,
            लगते हैं दिल पर
            और चेहेरे खील जाते हैं.."

अवनी - "वाह वाह.. आज सकाळी सकाळी भारीच शायराना मुड दिसतोय साहेबांचा."

सागर - "हो मग, तुझा मेसेज पाहिला आणि जीवात जीव आला माझ्या.

अवनी - "हे भगवान."

सागर - "तु आलीस का घरी?"

अवनी - "हो, कालच रात्री आले."

सागर - "मग मला का नाही सांगितले कालच?"

अवनी - "अरे काल घर आवरण्यात वेळ गेला आणि मग दमून झोपले लगेच, तसेही आज करणारच होते मी तुला मेसेज."

सागर - "हो का, काल खूप उशीर झाला म्हणजे दमली असणार तू गाडीत बसून बसून."
सागर पुन्हा तिला चिडवत बोलू लागला.

अवनी - "हो मग, खूप दमले मी. इतक्या लांबचा प्रवास झाला आणि घरी आल्याबरोबर हातात झाडू घ्यावा लागला."

सागर - "इतक्या रात्री झाडूने कोणाला मारायचा विचार होता."

अवनी - "झाले तुझे पांचट विनोद सुरू. आठवडाभर घर बंद होते त्यामुळे सगळीकडे धूळ धूळ साचली होती. तीच साफसफाई करत होते काल आल्याबरोबर."

सागर - "अरे मग आज साफसफाई करायची होतीस ना, उगीच रात्रीची दमत बसलीस. ते ही प्रवासात दमून आल्यावर."

अवनी - "अरे पोरींना झोपवलं मग बाकीची धूळ झटकून आम्ही झोपलो. तोपर्यंत बराच उशीर झालेला होता."

सागर - "त्या कामा ऐवजी मला एखादा मेसेज केला असतास तर छान गप्पा मारत बसलो असतो की आपण."

अवनी - "हम्मम, दिपक जागा होता त्यावेळी आणि त्याला उगाच आपल्याबद्दल काही गैरसमज नको व्हायला म्हणून मी शक्यतो आपलं बोलणं टाळते तो घरी असला की."

सागर - "हम्मम्म, हे ही बरोबरच आहे म्हणा. पण खरंच मला खुप आठवण येत होती तुझी. हे आठ दिवस जसे काही आठ वर्षा समान वाटत होते मला."

अवनी - "अरे बापरे! हो का. पण मी तर खुप मज्जा केली बाबा तिकडे आणि सगळे पाहुणे होते रे जवळ; त्यामूळे नाही बोलता आले मला तुझ्याशी. सारखे कोणी ना कोणी सोबत असायचेच; म्हणून मग मीच टाळत होते फोन हातात घ्यायला." 

सागर - "अग हो हो, माहितीये मला.. मी समजू शकतो. पण कसली गोड दिसत होती तु लग्नात, खूप सुंदर."

अवनी - "तु बघितलेस सगळे फोटो माझे."

सागर - "हो मग, प्रत्येक फोटो निरखुन पाहिलाय मी. लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात एकदम भारी दिसत होतीस तु. नवरी पेक्षाही सुंदर तू दिसत असशील, हे मी खात्रीने सांगू शकतो."

अवनी - "जी बोहोत बोहोत शुक्रिया आपका."

सागर - "पण खर सांगू अवनी, तु नव्हतीस तर मला बिलकुल करमत नव्हते.. सवय झालीये मला आता तुझी. म्हणजे तुझ्या मेसेजची."

अवनी - "गप रे, काहीही काय बोलतो तू."

सागर - "खर तेच सांगतोय मी, तुला कधी आठवण नाही आली का ग माझी? इतक्या दिवसांत एकदाही नाही."

अवनी - "आली ना, पण काय करणार.. कामाचा रगाडाच एव्हढा होता की वेळच मिळायचा नाही मला निवांत फोन घेऊन बसायला."

सागर - "पण माझा वेळ मात्र इथे जात नव्हता, काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते मला."

अवनी - "हो का.. मग सापडले का आता ते."

सागर - "काय?"

अवनी - "तुझे जे हरवले होते ते!"

सागर - "हो तर, सापडले ना. मी खुप जपून ठेवलेय ते  आता माझ्या मनात."

अवनी - "अरे वा! भारीच बोलायला येत की तुला."

सागर - "येत म्हणजे? भारीच आहे मी."

अवनी - "वजनाने का?"

सागर - "हा हा हा, जोक चांगला होता हं."

अवनी - "ए काय रे, निदान खोटं खोटं तरी हसायचं ना!"

सागर-  "बरं अवनी ऐक ना, मी आज दुपारी फ्रीच आहे. मग तेव्हा आपण निवांत गप्पा मारू, आता अगदी थोडसच काम आहे ते लवकरच आटोपून घेतो. तोपर्यंत तु सुद्धा तुझी राहिलेली कामं आणि जेवण करून घे."

अवनी - "बरं.. मी आवरून घेते आणि मुली पण येतीलच आता. आल्या आल्या भुक लागली म्हणतात."

सागर - "अरे वा.. बरं तू लवकरच आवरून बस, मी पण माझ काम करून घेतो पटकन."

अवनी - "असे काय बोलायचे आहे तुला?"

सागर - "आहे एक महत्त्वाचे, मी बोलतो ना दुपारी."

अवनी - "ओके चल बाय."

सागर - "बाय डियर."

अवनीला काही कळत नव्हते की सागरला काय बोलायचे असेल महत्त्वाचे. असेल त्याचे काहीतरी म्हणून, ती जास्त विचार न करता लगेच कामाला लागली.

मुली क्लास मधून घरी आल्या तोपर्यंत त्यांच्यासाठी अवनीने मस्त पास्ता बनवून ठेवला होता. समीराला खूप आवडतो पास्ता, आणि विशेष म्हणजे तिने जी रेसिपी शिकवली होती अगदी तसाच बनवला होता अवनीने. पोरींच्या आवडीचं काही बनवलं की त्या पण खुश असतात.

"थोड्याच दिवसांनी आता शाळा सुरू होतील, त्यामुळे पोरींचे दप्तर स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे. वह्या पुस्तकांना कव्हर घालायचे बाकी आहेत. बापरे! कित्ती कामं पडली आहेत मला."
असे म्हणून अवनी हातासरशी चटचट एक एक काम पूर्ण करत होती. वह्यांचा पसारा काढून ठेवला होता, आता एक एक करून त्याला कव्हर लावणे म्हणजे अवनीचे लहानपणापासूनचे आवडीचे काम. नव्या कोऱ्या वही पुस्तकांचा सुवास तिला खूप आवडायचा.

तिच्या बरोबर समीरा आणि स्वानंदी सुद्धा येऊन बसली. त्यादोघींना पण तिने कामाला लावून दिले. तिघी जणी मायलेकी मिळून त्यांचे शाळेचे कपाट आवरत होत्या, दप्तर लावत होत्या. हे काम पूर्ण झालं की मग त्यादोघींना पुस्तकाचे पहिले पानं वाचायला सांगितले. त्यांना अस अभ्यासात अडकवून ठेवलं की मग बाकीची कामं पण पटापटा होतात अवनीची. नाहीतर प्रत्येक कामात त्यांची लुडबुड असायचीच.

ह्या सगळ्या कामात अवनीला खूप उशीर लागला. जवळजवळ संध्याकाळ होत आलेली. दिवे लागणीची वेळ झाली तेव्हा तिला आठवले की सागरला आज काहीतरी महत्वाचे बोलायचे होते तिच्यासोबत. पण ती आपल्याच कामात इतकी गढून गेली होती, की तिला विसर पडला होता; त्यामुळे सागरला मेसेज करायचे राहूनच गेले होते.

जर आता सागरला मेसेज केला तर.. ह्या विचारातच पाच दहा मिनिटं घालवली तिने. आता जर त्याला मेसेज केला तर सागर सोबत बोलायला निदान तासभर तरी जाईल. पण दिपक येण्याची वेळ ही जवळ आली होती. खूप विचार केला, शेवटी हो नाही म्हणता म्हणता नाहीच केला तिने मेसेज त्याला. उद्या सकाळी बोलू म्हणून तिने फोन चार्जिंगला लावून ठेवून दिला आणि तिची तिची कामं करू लागली. पण डोक्यात अजूनही तेच विचार घोळत होते, काय बोलायचं असेल सागरला महत्वाचं.

पोरींना नेहमीप्रमाणे देवासमोर दिवा अगरबत्ती लावायला सांगितली आणि तीने किचनमध्ये स्वयंपाक करायला घेतला. पोरींना आज फोडणीचा वरण भात खायचा होता, त्यामुळे पहिले कुकर लावला आणि दिपकच्या आवडीची मेथीची भाजी निवडायला घेतली.

बायका पण ना, त्यांच्या आवडीचं कधी काही बनवतच नाही. कायम मुलांना काय आवडत, तिच्या नवऱ्याला काय आवडत.. ह्याचाच विचार करतात. पण त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडी मात्र साफ विसरून जातात. आजही अवनीला स्वतःला काय आवडते हे लवकर सांगता येणार नाही, कारण आपली वेगळी आवड अशी काही ठेवतच नाही आपण.

किचनमध्ये बायकांचा हात असा सरसर चालतो, त्यांना सांगावं लागत नाही हे काम पाहिले करायचे की ते काम. त्यांना टाईम मॅनेजमेंट बरोबर कळते आणि त्या वेळेवर स्वयंपाक करून आपल्या मुलांना जेवायला घालतात. गृहिणी असली म्हणून तिला काही येत नाही अस मुळीच नाहीये. उलट तिच्यापेक्षा जास्त काम कोणीच करत नाही अस मला तरी वाटतं. एक गृहिणी असणे म्हणजे खूप जबाबदारीचे काम आहे.

🎭 Series Post

View all