शतदा प्रेम करावे - 14

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण

शतदा प्रेम करावे भाग - 14


जड पावलांनी आई बाबांचा निरोप घेऊन अवनी आणि दिपक गावातून घरी जायला निघाले. इतके दिवस सगळ्यांसोबत हसून खेळून, मिळून मिसळून राहिल्याने आपल्याला त्या माणसांची सवय होऊन जाते आणि मग अस मधूनच सोडून जातांना खूप जड जाते. कस आहे एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय खूप लवकर लागते, पण तीच सवय मोडायची म्हटलं की खूप जीवावर ही येते. 

गाडीत दिपक आणि अवनी खूप शांत शांत होते, समीरा आणि स्वानंदीची मात्र मस्ती सुरू होती. त्या कधी शांत बसूच शकत नव्हत्या, सारखं एकमेकांना त्रास देणे, वेणी ओढणे, मारणे, खोड्या काढणे चालूच होते.

"लग्न किती छान झाले ना दिपक!"

"हम्मम, मुलगी पण चांगली मिळाली. गावामध्ये राहून शेती करून सुद्धा चांगली शिकलेली मुलगी मिळाली हे महत्वाचं."

"भाऊजी शेती करतात म्हणजे कमी शिकलेले आहेत अस अजिबात नाही हं.. ते पण तर शिकलेले आहेत, चांगले डबल ग्रॅज्युएट आहेत म्हटलं. मग मुलगी तर चांगली मिळणारच होती ना!"

"तस नाही ग, म्हणजे हल्लीच्या मुलींना शेतीवाला नवरा पाहिजे पण शेतकरी नको. घरचं सगळं चांगलं पाहिजे, दूध दुभती जनावरे पाहिजे, पण धार काढायला नको."

"आता नाही तस राहील आधीसारखं, आधी तर विचारतही नव्हते मुलीला की मुलगा पसंत आहे की नाही. पण आता किमान त्यांच्या पसंतीने तरी लग्न लावून देतात."

"हम्मम, माहितीये मला तुला काय म्हणायचं आहे ते."

"म्हणजे, काय म्हणायचं आहे मला आणि तुम्हांला ते कसं काय समजलं."

"तुला नव्हतं विचारलं ना तुझ्या पप्पांनी आपलं लग्न जमतांना, मुलगा पसंत आहे की नाही ते."

"हो ना, लगेच लग्न लावून दिलं माझं."
अवनीने असे म्हणताच दिपक खळखळून हसू लागला.

"अग पण काय वाईट झाले का तुझे, उलट इतकं प्रेम करणारा नवरा मिळालाय तुला."

"हम्मम, झालं का तुमचं स्वतःच कौतुक करून."

"का? आता का चिडलीस."

"दिपक तुम्ही नीट गाडी चालवा बरं चुपचाप."

"बरं मॅडम, जैसा आप कहे."
असे म्हणत दिपकने रेडिओ एफएम सुरू केला आणि जुन्या गाण्यांचे चॅनल लावले.

दोघांनाही जुनी गाणी ऐकायला खूप आवडायचे, त्यात लता मंगेशकर, मंगेश पाडगावकर असे गायक असले तर आहाहा.. प्रवास सुखाचा होतो.

मध्येच समीरा आणि स्वानंदीच सुरू होत,"आई मला भूक लागलीये."

"बस थोडा वेळ बेटा, आपण थांबूया पुढे कुठेतरी एखादं चांगलं हॉटेल बघून."
दिपकने असे म्हणताच अवनी रस्त्याने बाहेर बघू लागली, एखादं चांगलं हॉटेल कुठे दिसतंय का ते.

"पप्पा आम्हांला पिझ्झा आणि बर्गर खायचा आहे." समीराने तिच्या आवडीचं सांगितलं. मग लगेच छोटी स्वानंदी सुद्धा बोलली.

"पप्पा मला फ्रेंच फ्राईज खायचे आहे."

"दोघींना यातलं काही एक मिळणार नाहीये, चुपचाप खाली बसा बरं. हे अस सीटवर उड्या मारतात का कोणी? स्वानंदी छोटी आहे, पण समीरा तू मोठी आहेस ना! मग तुला समजायला हवं ना.

"पण आई.."
समीरा लगेच तोंड पाडून खाली मान घालून बसली.

"समू, तुला पिझ्झा खायचा ना! आणि सानुला काय खायचं म्हटली तू?"

"फ्रेंच फ्राईज पप्पा."
छोटी स्वानंदी लगेच बोलली.

"हा, मग आपण तेच खायला जाऊया. तुम्ही दोघी बघा बरं कुठे दिसतेय का ते हॉटेल."
दिपकने असे म्हणतात दोघी पोरीं एकदम खुश होऊन बाहेर काचेतून बघू लागल्या.

"दिपक काय हे, हल्ली खूप लाड चाललेत ह्या दोघींचे."

"असू दे ना अवु, आणि तस पण मलाही भाजी पोळी नको होती. मला पण काहीतरी चटपटीत खावस वाटतं होत."

"अरे वा, हे बरंय तुझं. नेहमी पोरींना पाठीशी घालत असतो."

"मग काय, आई इतकी चिडणारी असेल तर पप्पांनी पाठीशी घालायलाच हवं ना!"

"मी चिडकी आहे का?"

"हो मग.." असे बोलून दिपकने तिला अजून चिडवले.

"गप्प बसा तुम्ही सगळे, काही पिझ्झा बर्गर मिळणार नाही आता तुम्हांला."

"अरे पोरींवर का चिडतेस अवनी तू, लहान आहेत अजून त्या. त्यांना खेळू दे, मस्ती करू दे.. काय पाहिजे ते करू दे. पण तू अजिबात चिडायच नाही त्यांच्यावर."

"हो बाबा, आई हल्ली खूप चिडत असते आणि सारखी त्या मोबाईल मध्ये बघून हसत असते."

स्वानंदी असे म्हणतात अवनीच्या हृदयाची धडधड वाढायला लागली, ह्या पोरीं पण ना काहीही सांगतात.

"बरं चला आज मला पण पिझ्झा खायचा आहे, आपण सगळे मॅक्डोनल्ड मध्ये जाऊया."
अवनीने लगेच तीच बोलणं फिरवत पोरींचे मन वळवले. म्हणजे पुन्हा तिला काही बोलायला नको.

सगळे हॉटेलमध्ये थांबले, स्वानंदी समीराने त्यांच्या आवडीचे पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज मागवले आणि अवनी दिपकने सुद्धा तेच खाल्ले.

हसत हसत गप्पा गोष्टी करत, गाणी म्हणत अवनी आणि दिपक रात्री उशीराने घरी आले. गेल्या आठ दिवसांपासून घर बंद होते; त्यामुळे खुप धूळ झालेली होती घरात. गेल्या गेल्या अवनीने हातात झाडू घेतला आणि सगळे घर स्वच्छ झाडून पुसून घेतले, तेव्हा कुठे तीला बरे वाटले. भुक तशी नव्हतीच म्हणा, कारण येताना बाहेरुनच खाऊन आले होते.

इतक्या लांबच्या प्रवासाने सगळेच दमलेले होते, समीरा आणि स्वानंदी तर पिझ्झा बर्गर खाऊन गाडीतच झोपी गेल्या होत्या. दिपक फ्रेश होऊन आला तोपर्यंत अवनीने तिचे आवरून घेतले. बॅगा सगळ्या एका कोपऱ्यात ठेवून दिल्या, उद्या आवरून ठेवाव्या म्हणून तसेच ठेवले ते काम.

"अवनी, काय करतेस? ये जरा वेळ बाहेर बसू."

"अरे दमला नाहीस का तू? मला तर झोप यायला लागलीये खूप."

"बरं ठीक आहे, झोप तू. मी जरा वेळ टिव्ही बघतोय."

"दिपक, चल ना झोपायला जाऊया. आता इतक्या रात्रीच कोणी टिव्ही बघत असतात का?"

"का? टिव्ही बघायचा काही टाईम असतो का?"

"तस नाही रे, म्हणजे गाडी चालवून दमला नाही का तू; म्हणून म्हटलं आता आराम कर."

"दमलो तर मी पण आहे, पण ये ना जरा वेळ बसूया असच."

"दिपक, काही बोलायचं आहे का?"

"काही नाही रे, असंच जरा. ह्यावेळी आईचा निरोप घेतांना जरा विचित्र वाटले."

"म्हणजे नेमकं काय?"

"म्हणजे मला अस वाटतं होत की तीच काहीतरी दुखतंय, काहीतरी त्रास होतोय तिला."

"तस काही असतं तर मला बोलल्या असत्या त्या, किंवा मग मला स्वतःला जाणवलं असत ना लगेच."

"हम्मम, फोन करून कळवतो घरी आपण पोहोचलो ते."

थोडा वेळ असंच दिपकने अवनीला मिठीत घेतले, त्याला खूप अस्वस्थ वाटतं होते. अवनीने ही त्याला जवळ घेत समजावून सांगितले. तेव्हा कुठे त्याला बरं वाटले.

दिपकच पण बरोबरच आहे म्हणा, काळजी तर वाटणारच आई वडिलांची. घरापासून इकडे लांब राहतो आम्ही शहरात आणि ते तिकडे गावी; त्यामुळे त्यांनाही वाटतं मुलांनी इकडे यावं भेटायला.. पण दिपकच्या नोकरीमुळे आम्हांला इकडे राहावं लागतंय. नोकरी सोडून पण नाही जाता येणार ना अस. त्यांना इकडे बोलावलं तर ते ही येत नाही इकडे, इथे फ्लॅट मध्ये सगळ्यांची दारं बंद असतात त्यामुळे त्यांना करमत नाही.. मोठा प्रश्न होता हा. 


गाडी चालवून दमायला झाले होते दिपकला आणि अवनी सुद्धा कामं करून थकली होती; त्यामुळे अंथरुणाला पाठ टेकताच लगेच झोप लागली त्यादोघांना.


         दुसऱ्या दिवशी जरा उशीराने जाग आली. पुन्हा तेच रुटीन सुरु, सकाळी नाश्ता करून जो तो आपआपल्या कामाला लागला. दिपक सुद्धा ऑफिसला आज उशीराने गेला, मुली त्यांच्या चित्रकलेच्या क्लासला गेल्या.

काल कोपऱ्यात ठेवलेल्या बॅगा आज आवरायच्या होत्या, चांगले कपडे पुन्हा नीट घडी करून कपाटात ठेवून दिले. धुवायचे कपडे बाजूला ठेवले आणि बाकीचे अवनीच्या साड्या वैगेरे त्या ड्राय क्लिनला बाहेर द्यायच्या म्हणून वेगळ्या ठेवल्या. बॅग आवरायलाच जवळपास अवनीला एक तास लागून गेला.

बाकीचे घरातले सगळे आवरून झाले, आता आरामात चहाचा घोट घेत गॅलरीत जाऊन झोक्यात बसली अवनी. फोन हातात घेताच तिला सागरची आठवण झाली आणि सागरला मेसेज केला. कारण तिनेच सागरला सांगून ठेवले होते की मी मेसेज केल्याशिवाय तु मेसेज करायचा नाहीस. सागर वाट बघत असेल आता आपल्या मेसेजची, म्हणून तिने स्वतःच मेसेज केला त्याला.

🎭 Series Post

View all