शतदा प्रेम करावे - 13

दोन अनोळखी मनांच्या नात्यातील हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 13


अवनीचे देखणे रूप पाहून सगळ्यांनी तिला काजळाची तिट लावली. ती दिसतच होती इतकी सुंदर, की बघणाऱ्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. त्यामुळे दिपक कायम तिच्या मागे तिच्या सावली सारखा फिरत होता. ती जिथे जाईल तिथे तिथे तिच्या मागे जात होता. त्याच्यामुळे अवनी पण वैतागली होती. पण तिला हे खूप आवडतं होते, लग्नाला इतके वर्ष होऊन सुद्धा नवरा आपल्या बायकोच्या पाठीमागे फिरतोय हे कोणाला नाही आवडणार!
नवीन नवरा नवरी लांबच, ह्यांचाच रोमांस सुरू होता. दिपकने ही त्याच्या मोबाईल मध्ये दोघांचे जोडीने बरेचसे फोटो काढून ते सुंदर क्षण कैद कॅमेरामध्ये केले.
त्या दोघांना असे बघून बाकीचे सगळे त्यांना चिडवायला लागले. अवनीचे मात्र लाजून लाजून गाल आणखीनच गुलाबी झाले.

"दिपक काय करताय तुम्ही, सगळे बघताय ना आपल्याला असे."

"अरे! त्यात काय मग इतकं. बायको आहेस तू माझी हक्काची.. गर्लफ्रेंड नाही."

दिपकच्या अशा बोलण्यामुळे अवनीला अजूनच हसू येत होतं. आणखी थोडा वेळ हे दोघे असेच एकमेकांना बघत राहिले, तर पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतील की काय? अशी शंका येऊ लागली सगळ्यांना. त्यामुळे अवनीने तिथून काढता पाय घेतला आणि तिच्या पोरींना शोधू लागली.

छोट्या स्वानंदीला तर खूप भूक लागलेली होती; त्यामुळे आजोबा तिला जेवणाचं ताट आणून भरवत होते. पण समीरा कुठे दिसत नव्हती. त्यामुळे अवनी जरा बेचैन झाली. सगळीकडे नजर फिरवली पण कुठेच दिसेना ही पोरगी, अवनीची चिडचिड व्हायला लागली. तिने लगेच दिपकला सांगितले समीराला शोधायला.

दिपक पण शोधू लागला, पण इतक्या गर्दीत ती कुठेच दिसेना. आता मात्र अवनीला भीती वाटू लागली. पण आजोबांनी तिला जेवणाच्या हॉलमध्ये पाहिल्याचे सांगितले तेव्हा दिपक लगेच तिकडे गेला, आणि बघतो तर काय! समीरा आईस्क्रीम वाल्या लाईनीत उभी होती. तिला तशीच तिथून ओढून आणली आणि अवनीकडे नेऊन सोडलं.

"समीरा, तुला किती वेळेस सांगितलं मी. अस एकट्याने कुठेही जायचं नाही मला न सांगता."

"आई अग इथेच तर होते मी हॉलमध्ये, आणि मला बोअर झालंय आता ह्या ड्रेस मध्ये."

"बरं ठीक आहे, आपण जाऊ थोडयावेळाने रुममध्ये चेंज करायला."

"आई आत्ताच चल."

समीरा खरंतर खूप वैतागली होती. गर्मीचे दिवस आणि त्यात हेवी कपडे, गरम ही खूप होत होते. ती हट्ट करू लागली म्हणून शेवटी अवनीला तिला घेऊनच जावे लागले. तिच्या आवडीचे साधे कॉटनचे कपडे घातल्यावर पुन्हा हॉलमध्ये येऊन बसवले.

"आता इथून जाऊ नकोस कुठेही, काही पाहिजे असेल तर मला किंवा पप्पांना सांगायचं."
अवनीने तिला बजावून सांगितले आणि ती गेली पुन्हा तिच्या कामाला.

"पप्पा, मला आईस्क्रीम खायची होती ना! तुम्ही मला मध्येच ओढून आणलं इकडे. आता मला कोण आणून देईन आईस्क्रीम."

"देतो बाई, देतो मी आणून. पण तुम्ही इथून कुठेही जाऊ नका, नाहीतर तुमची आई मला कच्चं खाऊन टाकेन."
हे म्हटल्या बरोबर समीरा आणि स्वानंदी खळखळून हसायला लागल्या.

अवनी मात्र पुन्हा स्टेजवर गेली, कारण तिच्याजवळ नवरीला घालायचे दागिने दिले होते. सोन्याचे दागिने जवळ आहेत म्हटल्यावर खूप सांभाळून राहावे लागणार होते तिला. काकू सासूबाईंनी पूर्ण विश्वासाने तिच्यावर ही मोलाची जबाबदारी टाकली होती. त्यामुळे अवनी जरा सुद्धा लक्ष इकडंच तिकडे करत नव्हती.

थोड्याच वेळात सप्तपदी झाली, कन्यादान ही झाले. नवरीला सगळे दागिने अवनीने स्वतः घालून दिले. त्या दागिन्यांच्या जबाबदारीतून सुटल्यावर अवनीने सुटकेचा निश्वास सोडला. आता हॉलमध्ये बिनधास्त कुठेही फिरायला मोकळे.

सगळे विधी बघत असतांना अवनीला मात्र तिच्याच लग्नातले आठवत होते सगळे. तिचे आई वडील काही कारणास्तव येऊ शकले नव्हते लग्नाला, म्हणून तिने आधीच फोनवर बोलून घेतले होते त्यांच्याशी. वयोमानानुसार आता ते ही थकले होते, त्यामुळे तिनेही जास्त आग्रह नव्हता धरला त्यांच्याजवळ लग्नाला येण्याचा.


लग्नाचे सगळे विधी आटोपले आणि सगळे जेवायला बसले. नवरा नवरीला घास भरवण्याचा कार्यक्रम झाला, इकडे दिपकने ही अवनीला सगळ्यांच्या नकळत गुलाबजाम भरवले.

"आता हे काय नवीन, मला का घास भरवताय तुम्ही?"

"अरे, कितीवेळा तेच तेच सांगू तुला. बायको आहेस तू माझी."

अवनीला सगळ्यांसमोर मात्र ओशाळल्या सारखे वाटत होते.

"लग्न झाले आहे आपले आणि नवरा बायको आहोत आपण एकमेकांचे, पण म्हणून अस सगळ्यांसमोर एकमेकांना घास भरवतात का? आता नवीन नाही आहोत आपण."
अवनीने दिपकला दम देत जाब विचारले. आता मात्र त्याची काही खैर नाही.

"अवू चिडू नकोस ना तू, मी किती प्रेमाने करतोय हे सगळं तुझ्यासाठी."

"चिडू नाहीतर काय करू मी, तुम्ही दुपारपासून माझ्या मागे मागे करताय. पोरींनी पण त्रास दिला मला, जरा म्हणून शांत बसत नाही तुम्ही कोणीच."

"हे बरंय तुझं, तिकडे घरी असल्यावर म्हणत असते की मी वेळ देत नाही तुला आणि इकडे आल्यावर सतत तुझ्या मागे तुला वेळ देतोय तर म्हणते की त्रास देतोय मी तुला."

दिपक मुद्दाम तिला चिडवत बोलू लागला, म्हणजे ह्यापुढे ती काही बोलूच शकणार नाही. त्याने मुद्दामच तोंड तिकडे फिरवून बसला.

अवनीला वाटले आपण जरा जास्तच बोललो की काय; म्हणून तिने सुद्धा ताटातला एक गुलाबजाम घेत दिपक समोर धरला आणि त्याला तिच्या तपकिरी डोळ्यांनीच सॉरी म्हटले.
तेव्हा कुठे दिपक शांत झाला आणि दोघांनी छान जेवण केलं.

सगळं आटोपल्यावर नवरा नवरी घरी आले. लग्न अगदी छान पद्धतीने पार पडले होते, दुसऱ्या दिवशी घरातल्या घरात सत्यानारायण पुजा केली. तसेच सगळे पाहुणे पण जरा कमी झाले, घरात आता फक्त मोजकेच जवळचे पाहुणे राहिले होते. त्यामुळे अवनीच्या कामाचा ताण जरा कमी झाला होता.

       मुलींच्या सुट्ट्या देखिल आता संपत आल्या होत्या आणि पुढच्या आठवड्यापासूनच शाळा सुरु होणार होत्या; त्यामुळे अवनी आणि दिपक सुद्धा दुसऱ्या दिवशी निघायच म्हणत होते. हे ऐकताच सासूबाई बोलल्या "आणिक चार दिवस राहून जावा की, मग काय परत लवकर यायचा नाही तुम्ही."
तेव्हा अवनीच्या आधी दिपकनेच त्यांना समजावून सांगितले की कामाचा व्याप वाढलाय आणि मुलींच्या शाळा देखिल सुरु होणार आहे; त्यामुळे आज नाहीतर उद्या निघावेच लागेल आम्हांला.

        "गावी सगळ्यांसोबत हे आठ दिवस किती छान आनंदात गेले. सगळ्या पाहुण्यांची भेट झाली, मजा मस्ती झाली आणि फिरुन पण झाले. आता आपाआपल्या कामाला तर लागलेच पाहिजे ना आई!"
असे जेव्हा दिपक त्याच्या आईला समजावून सांगत होता तेव्हा नकळत त्यांचे डोळे पाणावत होते आणि अवनीचे ही.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आवरून नाश्ता करून बॅगा बाहेर गाडीत ठेवल्या.
निघतांना अवनीसाठी आजोबांनी पिशवीभर ताज्या भाज्या रानातून खुडून आणल्या होत्या. अवनीला नेहमी गावाकडून निघातांना दुसरे काहीच नको होते, फक्त ताज्या ताज्या भाज्या पाहिजे असायच्या. कारण आपल्या रानातल्या भाज्यांची चवच न्यारी. नेहमी निघतांना सासूबाई किंवा सासरे आठवणीने तिला काय काय बांधून द्यायचे, मग लसूण, भाज्या असो किंवा डाळी असो रानातले.


निघायच्या आधी अवनी पुन्हा सगळ्यांच्या वाकून पाया पडली आणि सासूबाईंना पुन्हा येतो लवकरच असे म्हणून गाडीत जाऊन बसली. 

समीरा आणि स्वानंदी सुद्धा गाडीत बसायला जाणार तितक्यात त्यांच्या आजोबांनी खिशातून दोन मोठ्या कॅडबरी काढल्या आणि खाऊची भलीमोठी पिशवी हातात दिली. प्रवासात लागतं पोरींना खायला म्हणून त्यांनी खाऊ आणून दिला.

दोघी मुली तर खुप खुश झाल्या आणि लगेचच आज्जी आजोबांना टाटा करून गाडीत जाऊन बसल्या. आता पुढच्या वेळी तुम्ही यायचं आमच्या घरी.. असे म्हणून बजावून सांगितले. तसे सगळेच खळखळून हसले आणि दिपकने गाडी सुरु केली!

🎭 Series Post

View all