शतदा प्रेम करावे - 12

दोन अनोळखी मनांच्या नात्यातली हळुवार गुंफण


शतदा प्रेम करावे भाग - 12


         आज पहिली अशी वेळ होती, की अवनी कडून मेसेज आला नाही; म्हणून सागर तिच्यावर चिडत नव्हता. तसा खूप समजदार होता तो, पण कधी कधी लहान मुला पेक्षाही जास्त हट्ट करायचा आणि रुसून बसायचा. आजची सगळी रात्र आत्तापर्यंतच्या मैत्रीच्या प्रवासाचा फ्लॅश बॅक पहाण्यात घालवली त्याने. सुरुवातीला वाटणारा अनोळखी चेहरा आज अगदी जिवाभावाचा जवळचा वाटू लागला होता.

              तिकडे अवनी भोवती आणि तिच्या चिमुकल्या पोरींभोवती घरातील प्रत्येकजण पिंगा घालत होता. त्या इटुकल्या पिटुकल्या पोरींची शाळेतील इंग्रजी गाणी म्हणजे फारच कौतुकाचा विषय झाला होता. सुरुवातीला पोरींनाही मजा वाटायची, पण काही वेळातच सारखी सारखी गाणी म्हणून मग त्यादेखील वैतागून गेल्या आणि अवनीच्या सोबत राहू लागल्या. प्रत्येक कामात तिच्या मागे मागे तिच्या साडीचा पदर धरून फिरायच्या. मग रडारड सुरु व्हायची, त्यांचा चेहरा जरा जरी रडवेला झाला तरी घरातील प्रत्येकजण त्यांना खुश करायचा प्रयत्न करायचा आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत त्या दोघी पोरीं चॉकलेट, पॉपकॉर्न आणि किराणा मालाच्या दुकानात डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या प्रत्येक पाकिटावर डल्ला मारत होत्या. ते ही अवनीच्या परस्पर. अवनी पण जाणीवपूर्वक कधीकधी कानाडोळा करायची तर कधी कधी नजरेनच धाक भरायची. तिची नजर म्हणजे अशी धारदार होती, की दिपकला सुद्धा कधी कधी घाबरायला व्हायचे.
      
         दिवसभर मग घरातील लग्नाची काम, शॉपिंग यामध्ये वेळ निघून जाऊ लागला. आता पाहुणे मंडळी सुद्धा बरीच आली होती, आणि संपूर्ण लग्न घर गजबजून गेल होत. आता महिला मंडळ जमा झालं आणि फोटो सेशन झालं नाही असं कसं होईल बरं!

अवनी प्रत्येक दिवसाला अनेक फोटो काढायची आणि तिच्या स्टेट्सला ठेवत होती. कधी मस्तपैकी मोकळे केस, कधी अंबाडा, तर कधी वेगवेगळ्या डिझाईनची वेणी, कधी फक्त नेलपेंटने बरबटलेले नखं, तर कधी वेगळंच ट्राय केलेलं मेकअप.

अवनी प्रत्येक फोटोमध्ये आधीच्या फोटो पेक्षा अधिक सुंदर दिसत होती. तिचे बोलके डोळे, गुलाब पाकळी सारखे नाजूक ओठ आणि सगळ्यात सुंदर म्हणजे चेहऱ्यावरचा तो तीळ तिच्या सौंदर्यात अधिकच भर टाकत होता. वेगवेगळ्या साड्या, ड्रेस मधील तिचा प्रत्येक फोटो सागर निरखून पहात बसायचा. आवडला एखादा फोटो तर त्याला लाईक करायचा आणि एक छान अशी कमेंट फेसबुकवर करायचा. पण अवनीला कमेंट पहाणं आणि त्याला रिप्लाय करणं जमत नसायचं, कामं वाढली होती. शेवटी लगीन घाई यालाच तर म्हणतात. म्हणजे अगदी नवरा नवरी बोहल्यावर उभे राहिले तरी काही ना काही काम राहिलेलं असतंच, अनावधानाने का होईना.


दोन दिवस झाले, रोज सकाळी गुड मॉर्निंगच्या मेसेजने सुरुवात व्हायची ते रात्री गुड नाईटने संपायची, पण आता दोन दिवस झाले तरी अवनीचा एकही मेसेज आला नव्हता. आता मात्र सागर थोडा बेचैन होऊ लागला.

माणसाच्या शरीराला जशी एखाद्या गोष्टीची सवय लागते तशीच मनाला सुद्धा लागते. एकवेळ शरीराला लागलेली सवय लवकर बदलता येते पण मनाची.. खूप त्रास होतो अशा सवयी बदलायला. सागरला आता प्रत्येक तास दिवसा प्रमाणे वाटत होता. मनापासून खात्री होती की अवनी फक्त कामात असल्यामुळे बोलू शकत नाही, एकदा का लग्न पार पडलं की परत पहिल्या सारखं बोलता येईल, पण तोपर्यंत धीर धरवत नव्हता. कारण अवनीची सवय झाली होती आता सागरला.

कस आहे मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडले गेले पाहिजे. कारण गरज संपली जाते, पण आपल्याला लागलेली त्याची सवयी कधीच सुटत नाही!

          व्यसन कोणतंही असो, वाईटच. मग ते दारूचं असो, मैत्रीच असो किंवा प्रेमाचं.. वेळेवर ती गोष्ट मिळाली नाही तर माणूस अस्वस्थ होतो. सागरला आता फक्त अवनी केव्हा या सगळ्यातून फ्री होणार आणि आपल्याशी आधीसारखं मनमोकळं बोलणार याचीच काळजी लागली होती. तेवढ्यात अवनीने स्टेटसला एक क्लोज अपफोटो टाकला होता. तिच्या बहिणीने तिच्या नकळत काढला होता. केसांचा अंबाडा घातलेला, त्याभोवती मोगर्याच्या फुलांचा गजरा, नेहमी प्रमाणे डोळ्यात हलकीशी काजळाची लकेर, कपाळावर साडीला मॅचिंग अशी छोटीशी टिकली, डोळ्यात तेच अल्लड भाव आणि मनसोक्त हसताना मोत्याप्रमाणे भासणारे तिचे दात.. कोणतंही मेकअप नव्हतं केलेलं पण काय सुंदर दिसत होती अवनी! 

काही व्यक्ती जन्मजातच सुंदर असतात. म्हणजे त्या रडत असल्या तरी खूप आकर्षक वाटतात. अवनी कशीही असली म्हणजे बिना मेकअप असो किंवा मेकअप करून असो, ती कमालीची लोभसवाणी दिसायची. कित्येकतास आज सागर अवनीचा तोच फोटो पहात बसला होता.

इकडे सागरला एक एक दिवस प्रचंड मोठा वाटत होता. तर तिकडे अवनीला कामासाठी दिवस पुरत नव्हता. आज अवनीने छानशी डिझायर साडी घातली होती, साखरपुडा होता ना.. लाईट पिंक कलर आणि त्यावर बारीक नक्षीकाम असलेली खड्यांची आरास अशी तिची साडी होती. ओठांवर त्याच रंगाची लाली, तश्याच बांगड्या, खड्यांची नाजूक टिकली, डोळ्यात भरलेले कोरीव काजळ आणि नवीन पद्धतीच्या हेयर स्टाईलने बांधलेली केशरचना. खुप सुंदर दिसत होती, जणु अप्सराच अवतरलीये या भुतलावर असा काहीसा तिचा लुक होता. त्यात आणि वेगवेगळ्या पोझ मधले फोटो काढून ती स्टेटसला आणि फेसबुकला अपलोड करत होती, ते बघूनच सागर मनोमन खुश होत होता.

       दुसऱ्या दिवशी सकाळी हळदीचा कार्यक्रम होता. तेव्हा मस्त पिवळ्या रंगाची साडी घालून हळदीने माखलेले तिचे गोरे गोरे गाल.. काय सुंदर दिसत होती अवनी. अगदी नवी नवरी सुद्धा तिच्यापुढे फिकी दिसेल इतकी छान दिसत होती. सागर तर तिचे फोटो बघण्यातच गुंग असायचा. तिच्या मुली देखिल तिच्यासोबतच असायच्या, त्यांची सुद्धा छानशी तयारी करून द्यायची अवनी. तिघी पण मायलेकी दिसतच नव्हत्या, अवनी जस काही त्या दोघींची मोठी बहिणच आहे असे दिसायचे.

साखरपुडा झाला आणि हळदीचा कार्यक्रम पण झाला, ह्या दोन दिवसांत अवनीने एकही मेसेज केला नव्हता. ती किती व्यस्त असेल ह्या सगळ्या कामात ते फोटोवरून कळतंच होते. थकवा जाणवत असेल तिला, पण त्याची लकेर सुद्धा तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती, दिसत होते ते फक्त तिचे गोड हसू.

          लग्नाच्या दिवशी अवनीने खुप छान नऊवारी साडी घातली होती. मराठमोळ्या पद्धतीने घातलेली प्युअर सिल्कची.. हिरवीगार साडी त्याला लाल काठ असलेली नऊवार. कपाळावर चंद्रकोर, लाल लिपस्टिक लावून लालचुटूक झालेले तिचे ओठ, तिच्या गहिऱ्या तपकिरी डोळ्यांत बुडून जावे इतके काजळ खोलवर भरलेले,  नाकात मोत्यांची नथ, कानात डुलणारे झुबे, गळ्यात ठुशी, सोन्याचा चंद्रहार आणि जाड गंठण,  हातात हिरव्यागार बांगड्या आणि कडे, दंडाला बांधलेले बाजूबंद, कमरेला कमरपट्टा आणि केसांचा नीट घातलेला आंबाडा त्यावर मोगऱ्याचा माळलेला गजरा. पायात भरदार जोडवी आणि मासोळ्या. घुंगरांचे पैजण घातल्यामुळे सगळे अवनी आली म्हणून लगेच ओळखायचे.
       
सगळी तयारी करून जेव्हा अवनी दिपक समोर येऊन  उभी राहिली, तेव्हा तो आ वासून तिच्याकडे बघतच राहिला आणि बाजूलाच बसलेल्या तिच्या छोट्या परीने पप्पा,"आई किती सुंदर दिसतेय ना" असे म्हटले तेव्हा कुठे तो भानावर आला.

संपूर्ण लग्नात दिपक फक्त अवनीच्या मागे मागे करत होता. त्याला त्याचाच खूप अभिमान वाटतं होता की अवनी इतकी सुंदर आपली बायको आहे. संपूर्ण हॉलमध्ये दोघे असे दिसत होते की त्यांचे नवीनच लग्न झालेले असावे.

अवनी मात्र सगळीकडेच लक्ष ठेवून होती. नवरा नवरीला काय हवं नको बघणे, त्यांच्यासाठी आलेले गिफ्ट्स व्यवस्थित ठेवणे.. ही सगळी कामं ती करून घेत होती.


लग्न खूप छान पार पडले आणि मग नंतर नवरा नवरीचे फोटो शुट झाले, त्यासोबतच बाकिच्यांचे पण फोटो झाले. अवनीने सुद्धा मनसोक्त फोटो काढून घेतले, दिपक सोबत अवनी, तर कधी मुलींसोबत. कधी एकटीचे वेगवेगळ्या पोझ देऊन, कधी तोंडाचा चंबू करून म्हणजेच पाउट करून.. असे बरेच फोटो काढले. अवनीचे फोटो काढून झाले की लगेच ती फेसबुकला टाकायची. तिने नाही टाकले तरी बाकिच्या तिच्या नणंद होत्याच तिला टॅग करणाऱ्या; त्यामुळे सागर अवनीचे ते प्रत्येक फोटो बघत होता आणि त्याच्या तोंडातून फक्त वाह वाह वाह.. इतकेच निघत होते.

भाळी शोभे तिच्या चंद्रकोर
नाकात नथ अन  गळ्यात सर
जशी नार तु ग नखऱ्याची
दिसे अप्सरेहुन सुंदर!


              

🎭 Series Post

View all