शाश्वत. . अशाश्वत !

mysterious feeling about the creation n aim of life, self realisation.


शाश्वत ...अशाश्वत . . . !

लेखिका - ©® स्वाती बालूरकर, सखी

एकट्या जीवाला व्याकुळ करणारी सायंकाळ. . . जीवघेणी!

\" त्याने \" मला घडवलं तेव्हां कदाचित नक्की काहीतरी असेल का त्याच्याही मनात, भिरभिरतं काही!
थरारून टाकणारं काही, उसळत्या समुद्रासारखं घोंघावलं असेल का त्याच्या भोवती. . . . कदाचित!

या सगळ्या विचारांना नसते मर्यादा, कसलीच. असतं फक्त एक क्षितिज... तेही त्यानेच निर्मिलेलं?

त्या विश्व निर्मात्याने मुक्त केलेला वारा जेंव्हा प्रेमाने मला आलींगन देतो . . . कुरवाळतो. . . त्यावेळी तो दाता स्वतः असतो संभ्रमित, स्वतः निर्मिलेल्या कलाकृतीला मूर्त बनवून दुरावा दिल्याबद्दल!

तो :... . तसा माझा जन्मदाताच आहे . ।नाही तो अपरूप, विरूप, अरूप,सगुण, निर्गुण कसाही असला तरीही मला दिसतो, कधी हसताना, खिदळताना, आक्रंदताना. . .. तर कधी ढसाढसा रडताना!
त्यावेळी मला दिसतात, कोठेतरी आसमंतात त्याचे डोळे, त्याला नसलेले.

मी दिग्मुढ होते. त्याच्या शोधात पळत राहते एकटीच. . . त्याचे डोळे लुप्त होतात अचानक. . . ! त्याला जिवाच्या आकांताने मारलेली हाक कुठेतरी हवेतच विरून जाते.
वारा. . .हवा. . . वायु . . . अनिल. . . पवन, किती नावं त्या दूताची! तो दूत प्रवेशतो. . . माझ्या मुक्त, कुरळ्या कुंतलात. . . मग तो केसांना कधी विलग करतो तर कधी त्यांना अस्ताव्यस्त करतो तर कधी त्यात स्वतःला गुरफटुन घेतो.... . . भुरभुरत्या केसांनी तो मला बेभान करतो ... पण. . . ?

असंच करता करता त्याच्या या जगात मायाजाळात, पृथ्वीलोकात भी पूर्णतः गुंतले तेव्हां \"तो\" माझा पिता, वास्तवात नसणारा, . . थोडा . . थोडा अंतर्धान पावत गेला. तो कालांतराने फक्त निसर्ग बनला, अगदी माझ्यासाठीही!

मग मला होणारे सारे भास क्षीण होत गेले.
या जगातला गदारोळ ,तीव्र ध्वनि, गोंधळ, आवेग, सगळेच ध्वनी. . . माझ्या रंध्रारंधातून आत प्रवेशले. . . . खोलवर . . . अगदी रक्ताच्या थेंबाथेंबात , शरीराच्या पेशी न पेशीत भिनले, जणु एक जखम करून गेले!

या सगळ्या गर्दीत, मानसपसार्‍यात कुणीही माझं नव्हतं ,कुणीच नाही. . .तरीही सगळे माझेच होते. . इथले सगे संबंधी!
पण मला मोठं शल्य होतं. . . त्याच्या दुराव्याचं , ज्याने मला घडवून इथे पाठवलं होतं या पंचमहाभूताच्या सान्निध्यात!

\"तो\" जगात नाही असे समजणा-यांना तो कधीच दिसला नाही कारण तो, प्रत्येकात एकरूप झाल होता, कणाकणांत सामावला होता. चराचरात त्याचा आत्मा वास करीत होता पण. . . नाहीच दिसला इतरांना. . . तशी मी असामान्यच इतरांपेक्षा वेगळी . . .कारण मी त्याला पाहिलं ,या जगातही. . . उघड्या डोळ्यांनी!

तो तसा पारदर्शकच, त्याच्या या वात्सल्यासाठी आसुसलेली मी, आवेगाने कैकदा त्याच्यामागे धावले. . . बेभान, बदहोश... सैरभैर !

तो सृजनशील, शांत, संयमी .... थोडासा ओथंबलेला पन मी झाले नाही सफल कधीच त्याला स्पर्श करण्यात . मृगजळाप्रमाणे तो नेहमीच पुढे होता, अन मी धावत होते त्याच्या पाठी. . . मी धावत होते. . धावत होते. . मी थकले, तरीही तो निर्विकारच! मी हरले त्याच्यापुढे याची निर्मिती असूनही! परत वळले माझ्या म्हणवल्या जाणाऱ्या जगा कडे, त्याच नेहमीच्या माणसांच्या गर्दीकडे .....निशब्द, निर्विकार, गळून गेलेली!
तेव्हाच प्रकटला, तो गार गार वारा, त्याचा दूत. माझ्याभोवती पिंगा घालू लागला. त्याने मला पूर्णपणे वेढलं , मला वस्त्रागत त्याच्यातच लपेटलं. . . एक अनामिक धुंदी मेंदूवर राज्य करू लागली अन् मला जाणवलं, त्या धुंदीत एक वात्सल्य होतं, अप्रत्यक्षसा निसर्गाचा स्पर्श होता ज्यासाठी मी त्याच्यामागे धावले होते!

आताशा तो मला दिसेनासा झाला.
काळ जात राहीला.
माझ्यातही घडले विलक्षण बदल, जसा निसर्गनियमच आहे.
मीही विसरले त्याल अन गुंतले माझ्या म्हणवल्या जाणाऱ्या या जगात.
निसर्गाचे सगळे प्रमुख हक्क त्याच्याकडे असतील तर...,त्या अद्भुत शिल्पकाराच्या हातातच असेल या विश्वाची निर्मिती, ठेवण,जडण घडण, सगळ्ळं सगळं. . . तर त्याच हातात असतील ना भेटीगाठी, योगायोग, ऋणानुबंध, अन लगीनगाठ पण!

करंच सगळं त्याच्या हातात असेल तर मग नक्कीच त्याने बनविला असेल एक "तो " माझ्यासाठी . . . माझा जीवनसाथी!
तर तो भेट घडवेल अन त्याच्याकडे मला सोपवून तो निर्माता निश्चिंत होईल ना!

मी आताशा दर्पणात . . . आरशातल्या प्रतिबिंबात खूप रमते, स्वतःला पाहते, हरखून जाते , भान हरपून जाते. . . कधी कधी अगतिक होते अन् आतातर स्वताच्या प्रतिमेवर मन जडल्यापासून हरवून गेलेय कुठेतरी !

एकदा एका निराळ्याच दर्पणात मला माझं प्रतिबिंब दिसलं. . . काहीसं भरकटलेलं, त्याच्या सारखीच मी ही निस्तब्ध झाले, निरखून पाहिलं. . .
मी दिसले सौंदर्याची मुर्ती, सुंदर, मोहक रती जणु उष्टी हळद लावून निखरल्यावर नववधू दिसते तशी, अगदी तश्शी! निसर्गाची देणच मी. . . त्या दात्याची.
यातच मग मला जडली एक सवय. . . त्या निराळ्या दर्पणात पाहण्याची. पण प्रतिमाही खोटं बोलते. . .बर्‍याचदा, भास, आभास. . . काही काही?


मी क्षणाक्षणाला रंग बदलत राहिले. माझा चेहराही हट्टी बालकागत अनेक भावांची वस्त्रे बदलत राहीला. . . जुनी भाव वस्त्रे काढून फोकीत राहिला. . . पुन्हा नवी भाव वस्त्रे , भाव चेहर्‍यांवर परिधान करीत राहीला.
त्यातल्या खूपशा प्रतिबिंबांनी मला फसवलं , चकवलं. . . धोका ही दिला !

मी रडले . . अजाण बालकागत . . .काहीही न कळून रडल्यासारखी. तो निराळी दर्पणं काहीही
दुसरं तिसरं नव्हतं , ती होती साधनं, विश्वाला दृष्य बनविण्याची, तीही त्याने दिलेली, त्या निसर्ग प्रमुख शक्तीने दिलेली? सगळ्यांचे नेत्र आणि त्यात पाहणं. . . पण. . . नाहीच!

एकदा त्या नेत्रदर्पणात दिसलं मला प्रतिबिंब. . . तसं यापूर्वी दिसलं नव्हतं, तस्सं प्रतिबिंब पुन्हा दिसलंच नाही. . . कुठेही! मी भावविवश झाले. त्याने निर्मिलेला विरह, मला लागला जाणवायला अन ओघळले गालांवरून कोमट, खारट मोती, खाली पडून फुटुन गेले, मातीत मिळाले.

मी पुन्हा धावत सुटले, बेभान, व्याकुळ , सैरावैरा... मात्र यावेळी त्यांच्यासाठी नाही, ज्याने मला बनवलं. . . . !

आता धाव होती त्या मनोहारी नेत्रदर्पण धार्‍याकडे. . . सख्या तुझ्याकडेच . . . थकले, थकले रे ! थकून दिर्घश्वास टाकतच विसावले एका आम्रछायेत. . . अन . . . समोरच दिसलं माझं मनोवेधक प्रतिबिंब. . . त्याच मिश्कील नेत्रदर्पणात!
मी आनंदले, वेडी झाले .. वाटलं कवटाळावं,त्या प्रतिमेला , तुला, त्या खोडसाळ वार्‍याला, त्या प्रेमळ जन्मदात्याला... या अानंदाला . जो मिळेल त्याला हेच सांगावं, सांगत सुटावं. . . की माझी धाव , माझा शोध संपलय . . . ती अनामिक हुरहुरही संपलीय , कायमची!

पुन्हा सुटला तो रानभैरी सुसाट वारा, माझ्या कानाशी कुजबुजला "हाच तो, तुझा तो, ज्याला त्या अदभुत प्रभूने तुझ्यासाठी पाठवलाय, भूतलावर ."
माझं मन ही मला तेच सांगत होतं , रुंजी घालत होतं.
एका एका श्वासात, उच्छ्वासात स्पंदनातल्या स्तब्ध घड्यातही तोच विचार होता.
मी पुढे सरसावले, थकलेल्या जिवाचा शीण तुझ्या गोड स्मिताने अर्धा विरला, मी हक्काने डोकं टेकलं तुझ्या मांडीवर ... काहीही न बोलता ! निश्चिंततेने डोळे मिटले, डोळे मिटल्यावरही मला दिसलास तू , तृप्तीने माझ्याकडे पहाताना , मंद हसताना अन् तुझी लांब लांब बो़टं सरसरत माझ्या कुंतलात शिरली. . . हक्काने अन् मला स्थिर करत राहिली.
मला आज त्या वार्‍याची किंवा निर्मात्याची नव्हतीच गरज , कारण मला तू भेटला होतास , . . . माझा सर्वस्व !

कसल्याशा भासाने मी झट्टदिशी उठले अगदी विजेचा धक्का लागावा तशी. . . तुझ्यजवळून!

मी एकटक पहात राहीले विशाल हृदयी आकाशाकडे, शोधत राहीले त्याला, त्याच्या रुपरेषेला, पारदर्शक प्रेमाला . . . पण तो लुप्त झाला होता. . . तरीही मी हाक दिली त्याला, जुन्या परिचयाने कदाचित . . अन् पुसटसा दिसला तो मला . . . तो दिसला ढगाआडून हसताना, समाधानी मुद्रेने, विरून जाताना आसमंतात!

मी मनाराच कोटी कोटी आभार मानले त्याचे . . . तू मला मिळाल्याबद्दल!
आता मला नव्हती आवश्यकता कसल्याच . बेगडी प्रेमाची , आपुलकीची किंवा कोरडया सहानुभुतीची ! मला तू मिळालास बस्स. . . तुझं येणं... . आणि माझी धाव थांबली. . . जणु प्रेम प्रवासातला मुक्कामाचा टप्पा आलाय. . . . आयुष्य सफल झालं कारण तू मिळालास!

ज्या साध्यासाठी मी या जगात आले त्याची सुरुवात झालीय . . . तू भेटलास . . . जगण्याचा अर्थ कळालाय !

मी तुझ्याकडे पाहिलं. . . तुझ्या डोळ्यात . . . खोलवर अन बावरले, तुझ्याशी डोळे भिडवून. . . लाजून आरक्त झाले अन मला पटली साक्ष, पूर्ण नारी झाल्याची! आता मात्र लाजून हसत मी पकडला तुझा दंड आणि हक्काने तुझ्या खांदयावर डोकं टेकवलं !!!

समाप्त

(मनोगत- अगदी याच तारखेला  ३० वर्षांपूर्वी मनाने कुठल्यातरी वेगळ्याच विचाराने भारलेली असताना मी एकाहाती हे ललित लिहिलं होतं , माझ्या कॉलेजच्या रजिस्टरमधे! गेल्या महिन्यात असंच आवरताना सापडलं आणि वाटलं की वयाच्या अठराव्या वर्षी लिहिलेलं हे गूढ गर्भित ललित  प्रकाशित  व्हायलाच हवं! म्हणून हा खटाटोप! अगदी काहीच बदल न करता जसंच्या तसं प्रकाशित करीत आहे. वाचून नक्की प्रतिक्रिया द्यावी)


©® स्वाती बालूरकर, सखी

२०.१२ .२०२२