Feb 24, 2024
ऐतिहासिक

शापित प्रतिभावंत

Read Later
शापित प्रतिभावंत

साधारण दहा वर्षांपूर्वी आचार्य अत्रे यांचे शापित प्रतिभावंत नावाचे  एक पुस्तक माझ्या वाचनात आले होते. त्यात त्यांनी साहित्यिक आणि कलावंत असलेल्या ऑस्कर वाईल्ड याची शोकांतिका मांडली आहे. “प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे ईश्वरी देणे ज्याला जन्मापासून लाभले होते,पण यशाच्या उन्मादपणामुळे अन अनैसर्गिक स्वैराचारामुळे ज्याने आपली लोकप्रियता आणि जीवन ऐन तारुण्यात धुळीला मिळविले अशा एका साहित्यिकाची आणि कलावंताची ही भयानक शोककथा आहे.“,असे अत्रेंनी या कथेचा सारांश लिहिताना नमूद केले आहे. या पुस्तकात ऑस्कर वाइल्ड बद्दल अत्रेंनी केलेल्या गौपास्फोटामुळे हे पुस्तक बरेच वर्ष वादात होत. हे पुस्तक फार सुंदर आहेच, पण मला भावल ते या पुस्तकाच शीर्षक. मी जेव्हाही या शीर्षकाचा विचार केला तेव्हा तेव्हा माझ्या नजरे समोर एकच व्यक्ती उभी राहिली… ती म्हणजे कर्ण 

वाचनाची आवड तर मला होतीच; पण पुस्तकांच्या आणि कादंबऱ्यांच्या मला प्रेमात पाडणारी मी वाचलेली पहिली कादंबरी म्हणजे शिवाजी सावंत यांची मृत्युंजय आणि त्यातून भेटलेला कर्ण मला एखाद्या नायकासारखाच वाटला. शिवाजी सावंत यांनी केलेले कर्णाचे वर्णन कोणालाही त्याच्या प्रेमात पाडेल. अर्थातच त्या अल्लड वयातलं ते माझ First Crush होत. कादंबरीतील कर्णाच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंतचे सर्व प्रसंग लेखकाने असे रंगविले आहेत कि आपण प्रत्यक्ष त्या कथेचा भाग असल्याचा भास होतो. कर्णाबद्दल मला असलेल्या ओढीमुळे नंतर राधेय, महाभारत, कर्ण पर्व, युगांत, Karna’s Wife :The Out Casts Queen अशी कितीतरी पुस्तक, कादंबऱ्या आणि कर्णावरचे लेख माझ्या वाचनात आले. कुठे कर्ण ‘Unsung Hero’ असा त्याचा उल्लेख आहे, तर कुठे अहंकाराने ग्रासलेला खलनायकाच्या भूमिकेत तो आहे. काही ठिकाणी कर्णाचे अस्तित्व नीटस रेखाटल हि गेलेल नाही .

 मला  कर्ण नेहमी प्रतिभावान असूनही जन्मापासूनच शापित असल्यासारखा वाटला. क्षत्रिय, कौंतेय, सूर्यपुत्र असूनही नेहमी त्याला सूतपुत्र म्हणून हिणवले  गेले. कर्तृत्ववान, पराक्रमी असूनही वारंवार त्याच्या वीरत्वावर प्रश्न उठविले गेले. शूरवीर, दानशूर कर्ण नेहमी स्वतःच्या खऱ्या ओळखीपासून वंचितच राहिला. त्याच्यातली खरी प्रतिभा ओळखली ती केवळ दुर्योधनाने. त्याने कर्णाला त्याच्या मित्राचा दर्जा दिला. दुर्योधनाचा यात स्वार्थ होताच. कर्णाच्या मनात अर्जुनाबद्दल असलेला द्वेष त्याने आधीच हेरून ठेवला होता आणि या द्वेषाचा उपयोग आपल्याला भविष्यात कधी ना कधी तरी होईल हे दुर्योधनाला पक्क ठाऊक होत. अर्जुना एवढाच कर्तृत्ववान असूनही गुरूंकडून अर्जुनाला मिळणारे झुकते माप, वारंवार पांडवांकडून सूतपुत्र म्हणून होणारा अपमान यामुळे कर्ण नेहमी पांडवांच्या विरोधातच होता. पांडवांबद्दल कर्णाच्या मनात असलेल्या रागाला पुढे जाऊन दुर्योधनाने खत पाणी घालायचे काम उत्तम रीतीने केले. कर्णालाही  दुर्योधनाचे विचार नेक नाहीत हे ठाऊक होते पण मित्र प्रेम आणि दुर्योधनाच्या उपकाराच्या ओज्याखाली तो होता. त्याने नेहमी दुर्योधनाला मदतच केली. कारण त्याच्या दृष्टी ने दुर्योधनानेच त्याला त्याच खर स्थान मिळवून दिले होते . महाभारताच्या युद्धाच्या पूर्वीही कर्णाने दुर्योधनाला वेळोवेळी सावध केले होते, परंतु दुर्योधनाने त्याचे काही ऐकले नाही. दुर्योधन चुकीचा आहे हे त्याला माहीत असूनही त्याने दुर्योधनाची साथ कधीच सोडली नाही. मित्र प्रेम काय असत हे कर्णाकडून शिकण्या सारख आहे. म्हणूनच मैत्री बद्दल सांगताना असं म्हणतात कि, “जीवनात दोनच मित्र कमवा, एक श्री कृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.”  कुंतीच्या एका चुकी मुळे कर्णाचा जन्म त्याच्या साठी शापित ठरला. इंद्राने त्याची कवच कुंडल आपल्या मुलासाठी म्हणजेच अर्जुनासाठी दान मागून कधीच त्याच्या कढून हस्तगत केली होतीच. “तुला ऐन युध्याच्या वेळ ब्रम्हास्त्र स्फुरणार नाही” असा शाप त्याला परशुरामाकढून मिळाला होता. याची कमी कि काय म्हणून महेंद्र पर्वतावरच्या एका ब्राह्मणकढून “भूमी युद्धात तुझ्या रथाचे चक्र रुतून बसेल” असा शाप हि त्याच्या पदरात पडला होता.

जर कर्णाने तो अर्जुनाहून किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यात पूर्ण आयुष्य झोकून दिले नसते तर आज इतिहास कदाचित वेगळा असता. सूतपुत्र म्हणवून घेण्यात अपमानास्पद असे काही नाही हे जर त्याला वेळीच उमगले असते तर त्याचे सामर्थ्य कमी झाले नसते. कर्णाला युद्धात कूटनीतीने मारून अर्जुनानेच कर्णाचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे. कर्णाचा मृत्यू गरजेचा होता कारण असंघाशी संघ म्हणजे प्राणाशी गाठ. कर्णाने स्वतःच स्वतःच्या विनाशाला आमंत्रण दिले होते.  शूरवीर, दानवीर, महापराक्रमी, कृतज्ञता हे गुण तर कर्णात होतेच पण द्वेष, चढाओढ, अहंकार या मानवी स्वभावाचे दोषही त्याच्यात होते. जर हे दोष त्याच्यात नसते तर त्याला दैवतवच प्राप्त झाले असते. कर्णाचा अहंकार एवढा मोठा झाला होता कि एका स्त्री चे वस्त्रहरण हि त्याने रोखले नाही. जर त्याने मनात आणलं असत तर तो सभेत असलेल्या प्रत्येकाला पुरुन उरला असता. पण केवळ द्रौपदीने त्याच्यापुढे मदत मागायला हात पसरले नाही म्हणून तो ते कुकर्म फक्त बघत उभा राहिला. कर्ण चुकला… वारंवार चुकला, या चुका करताना त्यालाही त्याची जाणीव होती, पण “मेरा वचन हि है मेरा शासन” या बाहुबली चित्रपटाच्या Famous Dialogue प्रमाणे तोही आपली कर्तव्य आणि वचनपूर्ती करत राहिला. हे त्याच्या द्रुष्टीने योग्य आणि न्यायाचाच  होते.

कर्णाचा विचार केल्यावर मला त्याच संपूर्ण आयुष्य ‘You See Black And White When I Have Millions Of Grey Shades’ असच सांगत असल्याचा भास होतो. अर्थातच कर्ण श्रेष्ठ होता कि अर्जुन यात मला पडायच नाही. पण माझ्यासाठी आजही मी वाचलेला कर्ण महाभारतातल्या इतर पात्रांपेक्षा मला खरा आणि जवळचा वाटतो.

मृत्युंजय मध्ये आपल्या शेवटच्या प्रवासाकडे निघालेल्या कर्णाचे मनोगत लिहिताना लेखकाने  लिहिलेल्या मला आवडलेल्या ओळी,

नाही !!नाही!! मी सूतपुत्र नाही. राधेय नाही. एकशे ऐकावा कौरव नाही. 
कौंतेय नाही. पहिला पांडव तर नाहीच नाही. मी  सूर्यपुत्र नाही!!
मी आहे एक प्रचंड शून्य!! प्रचंड शून्य !!
ज्याला नसतात बंधू-बंधन , नसते माता-ममता, नसते आवश्यकता कुठल्याही कुळाची , कसल्याही वारस्याची. ज्याला नसतात मान अवमान, आत्मसन्मान, कसले फसलेले भाव. 
कर्ण!! कर्ण !! एक प्रचंड शून्य, जन्म नसलेला मृत्यू नसलेला.
राधा -कुंती, वृषाली -पांचाली, शीण, अर्जुन, घोडा -सूर्य सर्वाना सामावून घेणारा , सर्वपार गेलेला , कशातच नसलेला एक शून्य, प्रचंड शून्य.

 

                                                                                                                               डॉ. अश्विनी अल्पेश नाईक

 

                                                                                                                     Dr Ashwini Naik – विचार गाथा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Ashwini Alpesh Naik

Physiotherapist

हॅलो.. मी पूर्वाश्रमीची डॉ. अश्विनी अनिल पांचाळ आणि आता डॉ. अश्विनी अल्पेश नाईक. मी फिजिओथेरपिस्ट आहे. गेले सहा वर्ष प्रॅक्टिस करते आहे. मला वाचनाची, लिखाणाची,प्रवासाची आवड आहे. मला आसपासच्या गोष्टी, निसर्ग, माणसं, यांचे निरीक्षण करायला फार आवडते.कदाचित ही आवड मला माझ्या प्रोफेशनमुळे निर्माण झाली असावी. निरीक्षणातून आपण बरेच काही शिकतो असे मला वाटते. माझी हीच आवड बरेचदा माझ्या लिखाणातून झळकते.

//