शापित कुंकू?? एक लघुकथा

It's About Parvatibai Peshve
गेली काही वर्ष संक्रांत आली कि बर्‍याच हळदीकुंकवाच्या पोस्ट येतात. सध्याच्या बायका या विषयावर बोलतात , काही जणी *स्त्रियांचे हळदीकुंकू* करतात..पण हे सगळे वाचताना मनात एका स्त्रीचा विचार आला जिने साधारणतः तीनशे चारशे वर्षांपूर्वी या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले.. तेही कर्मठ सनातनी घरात राहून.. माझ्या आवडत्या ऐतिहासिक व्यक्तीरेखेपैकी एक *पार्वतीबाई सदाशिव भाऊ पेशवे* पानिपत चित्रपट ज्यांनी पाहिला आहे त्यांना त्यांचे नाव माहित असावे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी..पार्वतीबाई ह्या सदाशिवरावांच्या पत्नी..सदाशिवराव थोरल्या बाजीरावांचे पुतणे, चिमाजीअप्पांचे सुपुत्र . लहानपणीच आईवडिलांचे निधन झाल्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी त्यांचे संगोपन केले.. त्यांच्या स्वभावामुळे नानासाहेबांना ते अतिशय प्रिय होते. जे गोपिकाबाई आणि रघुनाथराव दोघांनाही खटकत होते. सदाशिवरावांच्या पराक्रमी वृत्तीमुळे नानासाहेबांनी त्यांच्यावर पानिपताची मोहिम सोपवली.. आणि त्यातून सुरू झाले एक वेगळेच पर्व.. संक्रांतीच्या सुमारास सुरू झालेल्या पानिपतवर झालेल्या झुंजात विश्वासराव जे भावी पेशवे होणार होते ते मरण पावले आणि *सदाशिवराव* नाहिसे झाले.. जाताना पार्वतीबाईंचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.. रणभूमीवर फक्त त्यांचाच ना मृतदेह कोणाला दिसला ना त्यांना कोणी परत पाहिले.. त्यामुळेच पार्वतीबाईंनी सौभाग्याचे अलंकार काढून ठेवायला नकार दिला..आणि शेवटपर्यंत त्यांनी ते तसेच ठेवले..आजच्या स्त्रीला जर एवढा त्रास होत असेल तर त्यांनी काय भोगले असेल याची कल्पनाच आपण करू शकत नाही..माझा एक छोटासा प्रयत्न त्यांची मानसिक अवस्था टिपण्याचा..प्रस्तावना खूपच मोठी झाल्याबद्दल क्षमस्व...





          सुस्नात झालेल्या पार्वतीबाई आपल्या दालनात आल्या..आधी देवघरात जाऊन तिथे दर्शन घेतले. कुलोपाध्यायांनी पूजा व्यवस्थित केली आहे हे पाहून त्यांना बरे वाटले..तिथेच बाजूला संक्रांतीचे सुगड मांडून ठेवले होते..सगळी तयारी दिसत होती..पण त्यांची खास दासी मात्र दिसत नव्हती. हळूहळू त्यांच्या लक्षात आले कि आज कोणतीच दासी त्यांच्या दालनात नाही..
"उपाध्याय, तुम्ही रखमाला पाहिले का?"
" नाही बाईसाहेब. आज आलो तेव्हा एक चिमुरडी फक्त दिसली.आज संक्रांत आहे त्यामुळे सगळीकडेच पूजेची गडबड आहे. त्यामुळे मी हि जास्त चौकशी केली नाही. तुमची संक्रांत पूजेची सगळी तयारी केली आहे. आज्ञा असेल तर निघू मी.. अजून पूजा बाकी आहेत. "
" हो निघा, संध्याकाळी तिलशर्करा घ्यायला या आठवणीने.."
" हो बाईसाहेब. "
"बाईसाहेब आत येऊ?" एक लहान दहा बारा वर्षांची मुलगी पार्वतीबाईंना विचारत होती..
" ये ना.. पण तू आहेस कोण आणि इथे काय करते आहेस?" 
" मी मैना.. आईने मला आज पाठवलय इथे. तिला आज यायला उशीर होईल.."
" हो का.. बरे असू दे.. तेवढीच मला सोबत.. चल मी पूजा करून घेते."
    पार्वतीबाई मैनाला घेऊन देवघरात गेल्या.. 
"तू इथेच बस. मी ओवसा करून येते ."
" अच्छा.. हा ववसा काय.. तरीच आई बाला बोलत होती.. आज उशीरा जाते म्हणजे तिथे ववसायला नको. " बोलून मैनाने जीभ चावली..
"अच्छा , म्हणून आज रखमाच काय बाकी कोणीच दासी आल्या नाहीत.. हा शापित ओवसा, शापित कुंकू नको म्हणून..." पार्वतीबाई स्वतःशीच बोलत होत्या.." आज सगळ्या सरदारांच्या , नातेवाईकांच्या लेकीसुना मोठ्या महालात जमल्या असतील.. तिथे मोठ्या जाऊबाईंच्या नजरेखाली संक्रांतीची वाणे लुटत असतील.. पेशवीणबाईंच्या हातून तिलशर्करा घेण्यासाठी झुंबड करतील.. आणि आम्ही या एकांतवासात.. जिथे दासींना सुद्धा आमच्या हातून हळदीकुंकू घेणे हा अपमान वाटतो.."
    लहानग्या मैनाला काहीच कळत नव्हते..
" बरे तू आमच्याकडून हा लाडू तरी घेणार ना.."
" नाय बा , आईने इथे काहिही खायला नको सांगितले आहे.."
   आपण निपुत्रिक असल्याची जखम परत नव्याने अनुभवायला मिळाली पार्वतीबाईंना..
" जा तू, आई येईल तेव्हा येईल.." पार्वतीबाई रूद्ध कंठाने म्हणाल्या..
" जी बाईसाहेब.. तुम्ही आईला सांगणार नसाल तर मी दोन लाडू घेऊ..?"
 तिचा निरागसपणा पाहून पार्वतीबाईंना हसू आले..
"जेवढे हवे आहेत तेवढे घे हो.. आणि मी अजिबात आईला सांगणार नाही."
" तुम्ही किती चांगल्या आहात. मी नेहमी इथे आले तर चालेल?"
" नक्की ये हो.. मी वाट बघते.."
ती चिमुरडी लाडू घेऊन पळाली.. आणि पार्वतीबाईंना रडू फुटले.. काही काळानंतर पहारेकरी आला, "बाईसाहेब , मोठ्या बाईसाहेबांनी तुम्हाला मुदपाकखान्यात बोलावले आहे."
'हो आता बोलावणारच.. संक्रांत साजरी करून झाली असेल ना'
" त्यांना सांग आम्हाला जरा बरे वाटत नाही. आम्ही फक्त दुध घेऊन झोपणार आहोत.. संध्याकाळी दर्शनाला येते म्हणाव.."
" जी बाईसाहेब.."

'हा संक्रांतीचा सण असाच त्रास देत राहणार , आमची स्वारी असताना जे आमच्या पुढेपुढे करत होते. ते आज आम्हाला सामोरे यायलाही घाबरत आहेत.. पण येईल, इकडची स्वारी नक्की परत येईल.. आणि आम्ही सुद्धा परत त्याच अभिमानाने सगळ्यांना वाण देऊ.."





कथा कशी वाटली ते सांगायला विसरू नका...
सारिका कंदलगांवकर
 दादर मुंबई