शापित अप्सरा भाग 10

संकटे आणखी गडद होत जाताना इरा कशी वाचेल?
शापित अप्सरा भाग 10


मागील भागात आपण पाहिले इरावती पमा आत्याबद्दल सतत चौकशी करत असते. रखमा आणि शालिनी तिला माडीवर जाऊ देत नाहीत. परंतु लवकरच इराला ही संधी मिळते. आता पुढे काय होईल? चला पाहूया.एकेक पायरी चढताना इराचे हृदय जोरजोरात धडकत होते. एकदा तिला वाटले मागे फिरावे पण पमा आत्या तिच्याकडे आशेने बघत असलेली दिसली.


इरा वर आली. तिने बाहेरून लावलेली कडी उघडली. आतून एक कृश झालेला हात बाहेर आला. हातावर ठिकठिकाणी काळे डाग पडलेले होते. इराने तांब्या दिला आणि परत फिरली.


"अग थांब,तांब्या परत ने. नाहीतर त्यांना कळेल ना! " हळू आवाजात तिने आतून सांगितले.


इरावती तांब्या घेईपर्यंत थांबली आणि पटकन खाली निघून आली.घर्रsssssss घर्र ssssss घर्र sssss मोबाईल व्हायब्रेशनच्या आवाजाने इरावतीची विचारांची साखळी तुटली आणि भूतकाळातील इरावती पुन्हा वर्तमानात आली.


एका अनोळखी नंबरवरून फोन येत होता. इरावती राघव बरोबर झालेल्या मुलाखतीने प्रचंड अस्वस्थ होती. तिला आता कोणाशीही बोलायची इच्छा नव्हती. फोन वाजून कट झाला आणि लगेच परत त्याच नंबरवरून पुन्हा फोन आला. आता मात्र इरावतीने नाईलाजाने फोन उचलला.


"प्राध्यापक इरावती इनामदार बोलताय ना?" पलीकडून विचारले.


"हो! आपण कोण बोलताय?" इरावती जरा सावध झाली.


"मॅडम मी मुंबई क्राईम ब्रांचमधून कॉन्स्टेबल शिंदे. तुम्हाला इथे पोलीस स्टेशनला यावे लागेल." पलीकडून थंड उत्तर आले.


"काय? आता? रात्रीचे बारा वाजले आहेत." इराचा आवाज नकळत वाढला.


"मॅडम ऐकून घ्या. आता लगेच नाही. उद्या सकाळी तुम्हाला इथे यावे लागेल." शिंदेने उत्तर दिले.


"पण मी काय केलेय असे?" इरावती चिडली.


"ते उद्या आल्यावर कळेल."फोन कट झाला.


इरावती प्रचंड चिडली होती. राघव,तो क्लब आणि आता हा फोन. तिने सरळ स्वतःला झोपेच्या स्वाधीन केले.दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये उशिरा येण्याचे कळवून इरावती पोलीस स्टेशनला जायला निघाली. मुंबई क्राईम ब्रांच ऑफिसला पोहोचताच तिने आपल्याला आलेल्या फोनबाबत सांगितले. इरावती बाहेर अस्वस्थपणे बसून होती.आसपास असलेले पोलिसी वातावरण पाहून तिला इथून कधी एकदा बाहेर पडतोय असे झाले होते. तेवढ्यात कॉनस्टेबल शिंदे बाहेर आला.


"इरावती मॅडम,तुम्हाला बोलावले आहे." इरावती उठली आणि आत गेली.


समोर अगदी पंचविशीच्या आसपास असलेली एक इन्स्पेक्टर होती.


"इरावती इनामदार?" समोरून हुकुमी आवाजात प्रश्न आला.


"हो,कशासाठी बोलावले होते?" इरावतीने विचारले.


"एवढी घाई कसली आहे? मला सांगा काल संध्याकाळी तुम्ही कुठे होता?" तिने परत एकदा विचारले.


तोपर्यंत इरावतीने तिची नेमप्लेट पाहिली होती.


"इन्स्पेक्टर सारिका जाधव, मी काल एका वैयक्तिक कामासाठी बाहेर गेले होते. तुम्हाला सांगितले पाहिजे असे बंधन आहे का?" इरा आत्मविश्वासाने उत्तर देत म्हणाली.


" नाही, बंधन नसते. पण काय आहे ना जेव्हा तुमचे नाव एखाद्या मृत व्यक्तीच्या हातावर लिहिलेले सापडते तेव्हा तुम्ही पोलिसांना सांगणे बंधनकारक होते." सारिका नजर रोखून म्हणाली."हे बघा इन्स्पेक्टर मी एक प्राध्यापक आणि लेखक आहे. मी कोणाचा खून कशाला करेल?" इरावती आता चिडली होती.तेवढ्यात सारिकाने तिच्यासमोर चार पाच फोटो टाकले."प्राध्यापक इरावती,हे फोटो नीट बघा. ह्यातील मुलीच्या हातावर पेनाने तुमचे नाव लिहिले आहे." सारिका थंड आवाजात म्हणाली."अहो पण ह्या मुलीला मी ओळखतसुद्धा नाही. तिला मी कशाला मारेल?"इरा आता जरा घाबरली होती.


"तुम्ही मारले असे मी म्हणाले नाही. फक्त तुम्ही सावध रहा. कारण ही मुलगी एक इतिहास संशोधक आहे. तिच्या नोट्समध्ये तुमचा अनेकदा उल्लेख आहे." सारिका परत एकदा इराला समजावत बोलली.


"ठीक आहे. आता मी निघू का?" इरावतीने विचारले."हो,परंतु गरज लागेल तेव्हा तुम्हाला यावे लागेल. जाताना फोन नंबर देऊन जा." सारिकाने तिला जायला सांगितले.इरावती बाहेर जाताच सारिकाने तिच्या खास माणसाला इरावर नजर ठेवायला सांगितले.


"श्रेयस,आपल्याला दोन दिवसांनी साजगाव महाल गावात जायचे आहे." तिने श्रेयसला मॅसेज केला.वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यासाठी सारिका बाहेर पडली. हे सगळे खून का होत आहेत हेच तिला शोधायचे होते. प्राध्यापक इनामदार साजगावला जायची तयारी करा. आपल्याला दोन दोन दिवसांनी निघायचे आहे. राघवचा मॅसेज आला.इरावती प्रचंड चिडली होती. एकतर ही कोण कुठली मुलगी आणि तिचा खून होण्याशी आपला काय संबंध? हेच तिला समजत नव्हते.


विचारांच्या तंद्रीत इरावती चालत असताना अचानक तिला मागे कोणाची तरी चाहूल लागली.


"किती पळशील,माझा शाप तुला सोडणार नाही." तोच थंडगार काळीज कापणारा आवाज इराच्या कानात घुमला आणि इरावती झरकन मागे वळली.


मागे कोणीच नव्हते. इराला अस्वस्थ वाटू लागले. आपल्याभोवती सगळे काही फिरत असल्याचा भास झाला आणि इरावती खाली कोसळली.
श्रेयस साजगावला जायची तयारी करू लागला. त्याने ते लावण्यवतीचे चित्र समोरच लावलेले होते. आपल्याला सुट्टीवर जायचे हे डेविलला कळवायला हवे. त्याने फोन काढला आणि इरावतीचा नंबर डायल केला.पलीकडून एका म्हाताऱ्या बाईने फोन उचलला.


"अहो,ह्या बाई इथे पार्कमध्ये बेशुद्ध पडल्या आहेत. तुम्ही येता का त्यांना न्यायला?" ती स्त्री घाबरली होती."आजी,मला पत्ता सांगा. मी लगेच आलो. मी येईपर्यंत तिथे थांबा प्लीज."श्रेयसने भरभर पत्ता लिहून घेतला आणि कार घेऊन तो निघाला.


अर्ध्या तासात तो दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. इरावती जरा सावरली होती. श्रेयस येताना बघून ती जरा गोंधळली."अग,मीच बोलावले. तुझा मुलगा आहे का?"आजी तिला म्हणाली. इरा उत्तर देणार तेवढ्यात श्रेयस पोहोचला."आजी,तुमचे खूप आभार. आता मी यांना घरी घेऊन जाईल."त्याने आजीला जायला सांगितले.


आजी गेल्यावर तो इराला म्हणाला,"मॅडम चला. तुम्हाला घरी सोडतो."


" नो थँकस, मी जाईल माझी." इरा उठली आणि पुन्हा तिचा तोल गेला. श्रेयसने तिला बळेच गाडीत बसवले.श्रेयस गाडी चालवत असताना इरावती शांत पडून होती. तिने डोळे मिटुन घेतले होते. श्रेयस शांत लयीत गाडी चालवत होता. अचानक त्याला गाडीच्या मागे ठराविक अंतरावर एक गाडी चालत होती. श्रेयस थांबला की ती गाडी थांबत होती. आपला पाठलाग होत असल्याचे त्याला लक्षात आले.तरीही तसे न दाखवता तो गाडी चालवत होता. इरावतीच्या बंगल्याच्या जवळ श्रेयसची गाडी थांबली. त्याने चौकीदाराला हॉर्न दिला. तेवढ्यात मागे थांबलेल्या गाडीतून दोनजण उतरले आणि ते गाडीकडे येऊ लागले. श्रेयस सावध झाला.इरावती अर्धवट झोपेत होती. तेवढ्यात त्यातील एका तरुणाने रिव्हॉल्व्हर काढले आणि गाडीच्या दिशेने झेप घेतली. श्रेयस सावध होता. त्याने दरवाजा उघडून बाहेर त्या तरुणाच्या अंगावर झेप घेतली आणि त्याबरोबर हवेत गोळीबार झाला.दोनही चौकीदार धावत आले. तोवर त्याने श्रेयसच्या डोक्यात रिव्हॉल्व्हरचा खालचा भाग मारला. श्रेयसची पकड थोडी ढीली पडताच तो पळू लागला. त्याच्या साथीदाराने गाडी सुरू केली होती.तेवढ्यात श्रेयसने बाजूला पडलेला विटेचा तुकडा उचलला आणि पूर्ण ताकद लावून त्या तरुणाकडे भिरकावला. त्याबरोबर तो भेलकांडून खाली पडला आणि त्याला चौकीदार पकडण्यात यशस्वी झाला. त्याचा साथीदार मात्र पळून गेला.इरावती गाडीत बसून होती. घडलेला प्रकार इतका वेगाने घडला की तिला काहीच सुचत नव्हते. थोडा वेळ गेल्यावर आपल्यावर हल्ला झाल्याचे तिच्या लक्षात आले. श्रेयसच्या डोक्यातून रक्त वाहत होते. इरावती आता भानावर आली होती.


"वॉचमन,देशमुखांना आत घेऊन चला. त्यांना गेस्ट बेडरूममध्ये न्या. मी डॉक्टर बोलावते." इरावती भराभर सूचना देत होती."मॅडम,फार लागले नाहीय. जाईन मी डॉक्टरकडे."श्रेयस डोके दाबत बोलला.


"देशमुख आत जा."तिच्या आवाजात करारीपणा होता.श्रेयस गुपचूप चालू लागला. इराने डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना तात्काळ यायला सांगितले. दुसरीकडे तिने पोलिसांना फोन लावला. झालेली घटना थोडक्यात सांगून इरावती आत गेली.
"प्रसिद्ध लेखिका आणि इतिहास संशोधक इरावती इनामदार यांच्यावर हल्ला. पोलिस यंत्रणा काय करतेय?" न्यूज चॅनलच्या हेडलाईन्स सगळीकडे वाजू लागल्या आणि त्याक्षणी कमिशनर पाठकांचा सारिकाला फोन आला."व्हॉट इज धिस इन्स्पेक्टर? एका प्राध्यापक आणि लेखकावर असे दिवसा उजेडी हल्ले होत आहेत. तात्काळ इरावती इनामदार यांची भेट घ्या." पाठकांनी फोन ठेवला.इकडे इरावतीने चिडून फोन बंद करून ठेवला. घटना इतक्या वेगाने घडली होती की तिला काहीच कळत नव्हते. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांना घेऊन इरावती श्रेयसकडे गेली. डॉक्टरांनी जखम स्वच्छ करून ड्रेसिंग केले.


"बरेच रक्त गेले आहे. तर पुढील आठ तास तरी आराम करा." डॉक्टरांनी सूचना दिली आणि ते बाहेर पडले.इरावर कोणी हल्ला केला असेल? हल्ला इरावर केला की श्रेयसवर? साजगावला जायचे आता काय होणार?


वाचत रहा.


शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all