शापित अप्सरा भाग 5

एक गूढ काळोखे रहस्य उजेडात येईल का?
शापित अप्सरा भाग 5


मागील भागात आपण पाहिले की श्रेयस एक अप्रतिम असे चित्र पाहतो.तर तिकडे आश्लेषाला भास व्हायची सुरुवात झाली होती.सौदामिनी कार्यक्रम तयारीत व्यस्त होती.तिकडे अमेरिकेत धैर्यशील भूतकाळ उलगडत होता.आता पाहूया पुढे.


इरावती सकाळी उठून तयार झाली."नयना,आज संध्याकाळी तिकडे जायचे आहे."तिच्या चेहऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता.

नयना फक्त हसली.तिने कॉफी आणून दिली.इरावती विद्यापीठात जायला निघणार तेवढ्यात तिला अचानक विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे विद्यापीठ परिसर बंद केला असल्याचा मॅसेज आला.आता दिवसभर रिकामा वेळ होता.इरावती जरा सैलावली.


"ताई,आज निवांत आहात तर ब्युटीशिअन बोलावू का घरी?"नयनाने हळूच विचारले.

इरावतीने मंद हसून होकार दिला. नयनाने नेहमीच्या पार्लरला फोन केला.


"ताई,आता निवांत बसा. मस्त बेत करते जेवायला.काय करू सांगा?"नयनाने विचारले.

"बेसन भाकरी आणि कांद्याची चटणी."इराने हसून उत्तर दिले.


"ताई,आजही तुम्ही विसरल्या नाहीत."नयना आवंढा गिळून म्हणाली.


"नयना, रखमामावशी एकमेव होती जिने मला लहान समजून जीव लावला. तुझ्याकडे तुझ्या आईच्या हातची चव आहे आणि चेहराही."असे म्हणून इरावती अचानक गप्प झाली.


"बर,तुम्ही बसा आत. मी कामे अवरते. तोपर्यंत त्या मुली येतीलच."नयना तिला सांगून आत गेली.


दुपारी पार्लर मधल्या मुली आल्या. इरावतीने नयनाला हाक मारली."जे माझ्यासाठी असेल तेच सगळे नयनासाठी." इरावती त्या मुलींकडे बघत म्हणाली.

"ताई,मला कशाला?"नयना संकोचली.


"कशाला म्हणजे? आपल्याला जायचे आहे आज संध्याकाळी."इरावती तिला म्हणाली.


त्यानंतर मस्त कोमट पाण्यात पाय बुडवून इराने डोळे बंद केले. धावपळीतून थकलेले शरीर शांत होऊ लागले. केसांना छान धुवून एकीने केशरचना करायला घेतली.


"मॅडम,थोडी रेट्रो स्टाईल करू का?"मुलीने विचारले.


"पारंपरिक आंबडा आणि वेणी असे काहीतरी कर. रेट्रो वगैरे नको."इरावती हसून म्हणाली.


नखाला हलक्या शेडची नेलपॉलिश,मोती रंगाची कांजीवरम,त्यावर मोत्याचे दागिने, वर आंबडा आणि खाली रुळणारी वेणी, आंबड्यावर गजरे,ओठांना साडीच्या काठाची लिपस्टिक आणि हातात एक सुंदर हँडबॅग. इरावतीचा अतिशय सुंदर लूक पूर्ण झाला. नयनासुद्धा छान तयार झाली.


"महादेव,गाडी काढ.आधी गणपती दर्शनाला जाऊ."इरावतीने आवाज दिला.

महादेव आत आला. तो नयनाकडे पहातच राहिला.इरावती हळूच खाकरली. महादेव पटकन बाहेर निघून गेला. नयना मात्र चिडली होती. इरावती हळूच हसली. दोघी गाडीत बसल्या.


"महादेव, गाणी लाव."इरावती म्हणाली.

महादेव हसला आणि त्याने मराठी गाणी लावली.

"एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी खुलला ग." पहिलेच गाणे लागले आणि महादेव ते गुणगुणू लागला.

"चांगली देवाची गाणी लाव. असली कसली गाणी लावली रे."नयना रागावली.

"म्हाताऱ्या लोकांची गाणी नाय लागत ह्या वेळेला."महादेव हसून म्हणाला.

"म्हातारी कोणाला म्हणाला रे."नयना ओरडली.


"ताई,मी नाव घेतल का कोणाच? उगा आपल काहीही बोलायचे."महादेव म्हणाला.

इरावती गालात हसत होती. थोड्यावेळात गाडी मंदिराबाहेर थांबली. महादेव गाडी पार्क करायला गेला आणि ह्या दोघी दर्शनाला निघाल्या. लोक इराकडे वळून पहात होते. आज इरा कमाल दिसत होती. गणपती बाप्पाचे दर्शन घेताना मन अगदी प्रसन्न झाले.


दर्शन घेऊन दोघी निघाल्या. इरावती आता जरा अस्वस्थ होती. तिला सौदामिनी नजरेसमोर नको असायची. आज नाईलाज असल्याने तिला जावे लागत होते. कार्यक्रम स्थळावर पोहोचताच ती जरा अस्वस्थ झाली. बाहेरच सूर्यभान आणि सौदामिनी यांचा भव्य फोटो होता.


देखणे, रुबाबदार वडील बघून इरा क्षणभर थबकली परंतु शेजारील सौदामिनीचा फोटो बघताच तिच्या डोळ्यात कठोर भाव आला. इरावती आत येताना सगळे पहात होती.


सगळी व्यवस्था अगदी चोख केलेली होती. निशिगंध आणि गुलाब यांची सजावट,येणाऱ्या प्रत्येकाला अत्तर,भारतीय बैठक आणि समोर सूर्यभान इनामदारांचे अनेक फोटो. दरवाजात पोहोचताच अत्तर लावणारी मुलगी इराच्या जवळ आली. सूर्यभान इनामदार वापरत तेच अत्तर होते.


"थांब,नको लावूस. काही सुगांधदेखील नकोसे वाटतात."इरावती चेहरा हसरा ठेवून म्हणाली.

"सुगंध आठवणी घेऊन येतात. त्यातील चांगले ते वेचावे."शेजारी उभी सौदामिनी म्हणाली.

इरा काही बोलणार एवढ्यात सौदामिनीला तिच्या मैत्रिणीने हाक मारली. प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कांचनमाला लांबूनच सौदामिनीला हाक मारत होती.


इरावती निघणार एवढ्यात कांचन पटकन म्हणाली,"दामिनी,तू अगदी अशी दिसायचीस तारुण्यात."


सौदामिनी बळेच हसली.


"मी इनामदार आहे. कुठे रंग लावून गाणारी नाही." इरावती उत्तर देऊन आत निघून गेली.


समोर व्यासपीठावर सूर्यभान आणि सौदामिनी यांचा एक फोटो लावलेला होता. मधोमध नटराजाची प्रतिमा होती. त्याशेजारी सरस्वतीची मूर्ती आणि मग नंतर पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था एका कोपऱ्यात होती.


गाणारा मध्ये बसून गाणार होता. सौदामिनी मंचावर आली. मोतिया रंगाची साडी,कपाळावर बारीक काळी टिकली,गळ्यात मोत्याचे दागिने आणि प्रसन्न हास्य.

तिला पाहून आजही कोणीही दोन क्षण थांबणारच.

"पप्पांना हिचा मोह झाला यात नवल नाही. मात्र त्या मोहात ते अडकले हा मात्र गुन्हा होता." इरावती स्वतः शी म्हणाली.


नयना आणि इरावती शेजारी बसल्या होत्या. निवेदकाने घोषणा केली आणि सौदामिनीकडे माईक दिला.


"मला तुम्ही सगळे ओळखता ते एक नटी,एक गायिका आणि स्पष्ट सांगायचे तर सूर्यभान इनामदार यांनी ठेवलेली बाई. आजही ह्या शब्दाने माझे आख्खे आयुष्य नासवले. तरीही मी सूर्यभानला विसरले नाही आणि विसरणार नाही. आज त्याला जाऊन पंचवीस वर्षे झाली तरी तो जिवंत आहे. माझ्या जगण्याात,माझ्या गाण्यात,माझ्या असण्यात." सौदामिनी थांबली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. इरावती मात्र तशीच निश्चल बसून होती.


सौदामिनी खाली बसली.तिने तंबोरा हाती घेतला. सभोवती एक नजर टाकली आणि डोळे मिटले.दुसऱ्या क्षणी एक दिव्य सुर आसमंतात भरून उरला.


मे आम के बगियन मे गाऊ
कोकीळ बनके तुझे बुलावू
आन मिलो कान्हा...


त्यानंतर घेतलेली तान आणि पुन्हा पुढे उचलली गेलेली पुढची ओळ. संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन ऐकत होते.

"पप्पा हिच्या आयुष्यात नसते तर ही बाई मला सरस्वती समान भासली असती. किंबहुना इतर लोकांनीसुद्धा तिला तो आदर दिला असता." इरावतीच्या डोक्यात नकळत विचार डोकावून गेला.


जवळपास दोन तास सौदामिनी गात होती. भैरवीची तान घेऊन सौदामिनी थांबली आणि संपूर्ण सभागृह उभे राहून टाळ्या वाजवत होते. त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली आणि कार्यक्रम संपला.


इरावती आणि नयना लगेच बाहेर जाऊ लागल्या. इतक्यात एक आजी पटकन पुढे आल्या.

"इरावती,तुझ्यात आणि सौदामिनीत किती साम्य आहे."इरावती नाराज झाली.

"दिसण्यात नाही हो! दोघींच्या नशिबात प्रचंड साम्य आहे. तू आजही एकटी आहेस आणि तिला तिचा प्रियकर असून एकटे जगावे लागले."
आजी असे म्हणून पटकन निघून गेली.


आजीने इरावतीच्या मनातला तो कोपरा पुन्हा उघडला. मनाच्या अंधारात दडपून टाकलेले ते नाव,' पद्मनाभ देशमुख ' इरावती शांत झालेली पाहून नयनाने तिचा हात दाबला.


दोघी घराबाहेर पडत होत्या. रात्रीचे दहा वाजले होते. थंडगार वारे वाहत होते.


"माझा शाप कधीच फुका जाणार नाही. मी कैदेत असले तरी." इराच्या कानात कोणीतरी कुजबुजले.


तो थंड आवाज ऐकून इरावती जागीच थबकली. आजूबाजूला कोणीच नव्हते. आपल्याला भास झाला असे समजून इरावती गाडीकडे निघाली.


दारात सौदामिनी तिच्याकडे पहात उभी होती. इराने एकदाही मागे वळून पाहिले नाही. सौदामिनी तशीच स्तब्ध तिच्याकडे पहात उभी होती. इरावती निघून गेल्यावर ती हताश होऊन आत गेली.


तिने धैर्यशीलला फोन लावला.


"दादा,आशू कशी आहे? तिला काही झाले नाहीय ना? मला खूप काळजी वाटतेय. तू सगळे सांगून टाक तिला."इरावती बोलत सुटली.

पलीकडून तिचे सगळे ऐकल्यावर धैर्यशील बोलू लागला,"इरा,मी आता रेणुकाला इनामदार कुटुंब,आपले गाव,तिथले सगळे काही फोटोमधून दाखवत आहे. पण अजूनही ते सगळे सांगायचा धीर होत नाही." धैर्यशील हताश स्वरात उद्गारला.


"दादा,तुला काहीही करून भारतात यावेच लागेल." इरावती त्याला पुन्हा बजावत होती.


त्याने होकार देऊन फोन ठेवला.

"धैर्य,नक्की काय आहे असे जे सांगायला तू घाबरत आहेस? ह्या फोटोत तर मला काहीच वावगे दिसत नाहीय."रेणुका म्हणाली.


"वरवर बघता सगळे छान दिसते रेणुका. तो भव्य वाडा,ती भरलेली सुखी वाटणारी कुटुंबे. परंतु तिथे काही भयानक अनुभव आहेत. त्यांची कारणे आजही कोणालाच उलगडली नाहीत. आज मी तुला ते सगळे सांगणार आहे."धैर्यशील थांबला.

"धैर्य,तू जे सांगशील ते सगळे ऐकायची माझी तयारी आहे."रेणुका त्याला धीर देत म्हणाली.


काय अनुभव असतील ज्यामुळे धैर्य देश सोडून गेला.इरा अजून एकटी आहे.ह्या सगळ्यामागे नक्की काय असेल?


वाचत रहा.


शापित अप्सरा.


©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all