शापित अप्सरा भाग 45

एक चक्रव्यूह विणला जातोय. सुगंधा त्यातून वाचेल का?

शापित अप्सरा भाग 45


मागील भागात आपण पाहिले कि सुभानराव भूतकाळात घडलेल्या घटनांचा माग काढणे सुरू करतात. सुगंधा आणि केशर ग्रंथ सुरक्षित करायचे ठरवतात. तिकडे ज्या चेटकीणीला सुभारावांनी पकडले होते ती सुडाच्या भावनेने इनामदार वाड्याकडे कूच करते. आता पाहूया पुढे.


कमळा स्वतः चे काम स्वतः करून वैतागली होती. वाड्यातील कोणतीच दासी गुणवंता बाईंच्या भीतीने तिचे काम करत नव्हती. तिला अशा कामांची सवय नव्हती. ती वैतागून देव दर्शनाच्या नावावर गावात फिरायला निघाली होती. अचानक तिला एक बाई येऊन धडकली.


"ये डोळ फुटलं का काय तुझ?" कमळा ओरडली.

"डोळ हाय पण नशीब फुटलं बाई." ती बाई रडायला लागली.

कमळा तिला बाजूला घेऊन गेली.

"रडू नग,तुला काय खायला दिऊ का? कुठून आलीस तू?"

"मला घरदार न्हाय. नवरा सवत घिऊन आला आन मला हाकलून दिलं."

"अस्स माझ्याकड काम करशील का?"

"काम? तुमच्याकड? तुमी लई चांगल्या दिसता."

"म्या इनामदार वाड्याची सून हाय. म्हंजी त्ये मानत न्हाय पर म्या हाय."

हे ऐकताच त्या बाईचे गहिरे काळे डोळे चमकले आणि तिने मानेने होकार दिला.

"चल मंग तिकड देवळात जाऊन यिवू."
कमळा म्हणाली.

"म्या पारुशी हाय लई दिस. म्या हित थांबते तुमची वाट बघत."


कमळा आत निघून गेली आणि त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरले.


केशरने खूप विचार करून ग्रंथ कुठे सुरक्षित ठेवायचा आणि पुढील पिढ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे याचा मार्ग शोधला. तोच मार्ग सुगंधाला सांगण्यासाठी केशर लगबगीने बाहेर पडली. ती लगबगीने जात असताना अचानक एक दासी इकडे तिकडे बघत गुपचूप सगुणाबाईंच्या दालनात शिरलेली केशरने पाहिले. केशरला त्यात काही वाटले नाही. ती सरळ सुगंधाकडे गेली.


"सुगंधा,मला मार्ग सापडला आहे. योगिनी विद्येच्या मदतीने आपण सुरक्षाचक्र तयार करू आणि त्यात हा ग्रंथ सुरक्षित करू."


"हो,पण कुठे? ह्या महालात शक्य नाही."


"इथे नाही. ह्या गावाच्या उत्तरेला जंगलात एक ठिकाण आहे. मला तयारी करायला वेळ दे. तोपर्यंत तू एकसारखी दिसणारी चित्रे काढ त्यात काही संकेत द्यायचे आहेत."


असे म्हणून केशरने ते संकेत तिला कागदावर लिहून दिले.


सुभानराव परत आले. सुगंधा जागी असलेली बघून त्यांना वाईट वाटले.

"सुगंधा,असा उशीर अनेकदा होईल. तुम्ही जाग्या राहू नका."
त्यांनी तलवार काढून ठेवत सुचवले.

"मुद्दाम अशी जागी नाही राहिले. केशर बरोबर बोलत होते. पंधरा दिवसांनी ती जाणार आहे इथून."

सुगंधाने उत्तर दिले.


"काय? केशरला सांगा कलेची साधना करत त्या आयुष्यभर इथे राहू शकतात."

"नाही मान्य तिला. असो,चला जेवून घेताय ना?"
सुगंधा म्हणाली.


तिने दासीला जेवण वाढायचा आदेश दिला. दोघेही आनंदाने गप्पा मारत जेवले.

"सुगंधा,एक विडा मिळेल?"


"तुम्हाला जेवण झाल्यावर विडा लागतो ठाऊक आहे मला."

तिने दासीला विडा आणायची खूण केली.

"वा! अप्रतिम. आज वेगळीच चव लागत आहे."

सुभानराव हसले.


"चला,काहीतरीच तुमचे." सुगंधा जायला वळली.


त्यांनी तिला जवळ ओढले आणि बहुपाशी घेतले. थोड्याच वेळात सुभानराव बाजूला झाले. त्यांना आजवर कधीही हा अनुभव आला नव्हता.

अतृप्त सुगंधा आपल्याबद्दल काय विचार करत असेल?


त्यांना काही सुचत नव्हते. तेव्हड्यात सुगंधाची नाजूक बोटे त्यांच्या केसातून फिरू लागली. तिचा दिव्य स्वर त्यांच्या मनातील विचार संपवू लागला आणि त्यांना शांत झोप लागली. तरीही आज घडलेला प्रकार नक्कीच सामान्य नाही याची सुगंधाला जाणीव झाली.



सुगंधाने आता याचा शोध घ्यायचे ठरवले. सध्या सुभानरावांशी काहीच न बोलता शांत राहायचे ठरवून ती झोपी गेली. इकडे विडा बनवताना दासीने तिचे काम अचूक केले होते. तसा निरोप सगुणाबाईंना पोहोचताच त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हसू पसरले.


"सुगंधा,तुझा अभिमान असलेले सौंदर्य आता असेच अधुरे आणि अतृप्त राहील."
त्यांनी समई विझवली आणि शांतपणे डोळे मिटले.


"सुगंधा,जागी आहेस ना बाळ?"

कानाजवळ आलेला हा आवाज ऐकताच सुगंधा ताडकन उठून उभी राहिली.


तिने ओळखले आसपास काहीतरी अतृप्त आहे. पण शेजारी सुभानराव असताना योगिनी शक्ती वापरणे शक्य नव्हते. सकाळपर्यंत वाट पाहायची ठरवून सुगंधा शांतपणे चित्र काढत राहिली. त्यानंतर पहाटे कधीतरी थकून तिला झोप लागली.



पहाटे देवीच्या देवळात होणारा मंत्र जागर ऐकू येऊ लागला आणि सुगंधा जागी झाली. तिने चित्रांचे सगळे साहित्य वेगाने लपवून ठेवले.


गुप्त संदेश देणारी चित्रे कोणालाही दिसून चालणार नाही याची तिला पूर्ण जाणीव होती.


सुभानराव अजूनही झोपेत होते. सुगंधा अंघोळ करून शुद्ध झाली आणि तिने ध्यान लावले. मन शांत झाल्यावर प्रश्नांची उत्तरे स्पष्ट दिसतात. काल रात्री विडा खाल्ला तेव्हा त्याची चव वेगळी असल्याचे सुभानराव म्हणाले होते.


सुगंधा ध्यानातून बाहेर आली आणि तिने देवपुजेची तयारी सुरू केली. योगिनींच्या देवीची मूर्ती तिने देव्हाऱ्यात ठेवली आणि पुजा सुरू केली.


इकडे कमळा तिला दासी मिळाली म्हणून आनंदी होती. तिने पाहिले की सगळे काम चोख होत होते.


"जरा देवघर साफ कर आणि पुजेला फुल आण." कमळा म्हणाली.

"मालकीण बाय म्या देवाचं काय करणार नाय. माझ्या नशिबाच वाटुळ झाल हाय."
तिने रडायला सुरुवात केली.


"बर,नग करू. दुसरी मस काम हाये." कमळा म्हणाली.


"मालकीण बाय, तुमासनी वाड्यात करमत नाय ना?"

"व्हय,आसल बांधलेल मला नाय आवडत पर म्या हित कायतरी ठरवून आले हाय."

" अस्स,पर मग आशी देवपूजा करून ते मिळल व्हय?"

"नाय मिळणार पर मनाला आधार मिळतो." कमळा म्हणाली.


"बर जशी तुमची मर्जी. तुमाला काय सांगावं वाटल तर म्या हाय."

बाहेर जाताना ती म्हणाली.

"सुभानराव पायजे मला. कायबी करून." कमळा देवघरात शिरताना म्हणाली.



सुभानराव सकाळी जागे झाले. काल रात्रीच्या आठवणी त्यांना बैचेन करत होत्या. आजवर जे कधीच झाले नव्हते ते घडले कसे? त्यांना काही केल्या कोडे उलगडत नव्हते. काल अपूर्ण राहिलेला प्रणय आणि सुगंधाला त्याबाबत काय वाटले असेल याचा विचार त्यांचा पिच्छा सोडत नव्हता.


नक्कीच ह्या महालात काहीतरी रहस्य आहे. त्यांनी आता ते शोधायचा निश्चय केला होता. सुगंधा देवपूजा करून आली. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होते.


"राव,नका विचार करू एवढा. मन जुळलीत आपली. शरीरे जुळतीलच थोडा वेळ लागला तरी हरकत नाही."

तिने प्रसाद हातावर ठेवला.


प्रसन्न मनाने सुभानराव कचेरीत जायला बाहेर पडले.


ते जाताच सुगंधाने दासीला केशरला बोलवून आणायला सांगितले. केशर येताच तिने काल काढायला घेतलेली चित्रे दाखवली.


"सुगंधा,ह्या प्रत्येक नर्तकीच्या मुद्रेत मिळून ग्रंथाचे नाव असेल आणि त्याखालील प्रत्येक वाक्यात त्याचा पत्ता. अशी सात चित्रे तू काढ. त्यातील पाच इथे महालात लपव आणि दोन चित्रे तुझ्या विश्वास असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तींकडे दे."

केशर सगळी योजना समजावून सांगत होती.


"पण केशर,त्यापेक्षा आपण हा ग्रंथ नष्ट केला तर. माणसाचा अमर व्हायचा हव्यास कायमचा संपेल."

"नाही सुगंधा. ह्या ग्रंथात फक्त अमरत्व नाहीय. त्यात योगिनी आणि मातृ कुळाची अनेक रहस्य आहेत."

"तू मला ग्रंथ लपवायची जागा सांगणार होतीस ना?"

"हो,पण तुला ते मी लिहून देईल. इथे भिंतीला देखील कान आहेत."

केशर बोलत असताना एक दासी खाण्याचे घेऊन आली. तिला कुठेतरी पाहिल्याचे केशर आठवत होती तेवढ्यात सुगंधाने तिला बाहेर पाठवले आणि रात्री झालेला प्रकार सांगितला.


"सुगंधा,आज ते काहीही खातील त्यावर लक्ष ठेव.मग आपल्याला नक्की प्रकार लक्षात येईल."

"ध्यान लावून शोधू का?" सुगंधा म्हणाली.


"नको,इथे विद्या वापरणे धोक्याचे आहे. तू रात्री लक्ष ठेव. चित्रे लवकर पूर्ण कर."

केशर निघून गेली आणि सुगंधाने चित्रे रंगवायला घेतली.



सगुणाबाईंनी त्या दासीला बोलावले.

"कालचे काम झाले का?" तिने विचारले.

"व्हय,म्या तुमी सांगितलं तस केलं."

सगुणाबाई तिला इनाम देत म्हणाल्या,"हे काम न चुकता व्हायला हवे."

दासी मान डोलावून निघून गेली.


इकडे चेटकीण पुढची योजना आखत होती. आधी कमळाला वश करावे लागणार होते. तिच्या मदतीने सुभानराव संपवायचे बेत चेटकीण आखत होती.


परंतु दुसरीकडे केशरला योगिनी शक्ती जाणीव करून देत होत्या. काळ्या शक्ती आसपास पोहोचल्या आहेत याच्या जाणिवेने केशर सावध झाली. आज रात्री ध्यान लावून शोध घ्यायचे तिने ठरवले.


सुभानराव परत आले. सुगंधाने आज बाहेर जेवायला यावे असा आग्रह त्यांनी धरला.


"नको राव,ऐका माझे. थोरल्या बाई आणि तुमच्या आईसाहेब आम्हाला नाही स्वीकारणार."

"सुगंधा जोवर तू येत नाहीस आम्ही जेवणार नाही."


अखेर सुगंधा बाहेर यायला तयार झाली. गृहकलह होऊ नये यासाठी तिने मनात देवीची प्रार्थना केली आणि ती सुभानरावांच्या सोबत बाहेर पडली.


केशर आणि सुगंधा काळ्या शक्तीला शोधतील का?


सुभानराव महालातील कारस्थाने कशी ओळखतील?

चेटकीण पुढे काय करेल?

सुगंधाला कोणाचे भास होत असतील?

वाचत रहा.

शापित अप्सरा.

©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all