शापित अप्सरा भाग 3

एक प्राचीन रहस्य आणि काही प्रेमी जीव यांचा संघर्ष आता सुरू होईल.
शापित अप्सरा भाग 3


मागील भागात आपण पाहिले की इरावतीच्या मित्रांनासुद्धा तोच भास झाला जो तिला झाला होता. आनंदी क्षण उपभोगून इरावती घरी आली. त्याच आनंदात रक्षामंत्र जपायचे राहून गेले आणि त्याच भयानक स्वप्नाने तिला पुन्हा एकदा हदरवले. ह्या स्वप्नांचा इरा आणि तिच्या भूतकाळ कसा जोडलेला असेल? आश्लेषा ह्यात भरडली जाईल का? पाहूया पुढे.



इरावती अंघोळ करून बाहेर आली. अजूनही तिचे अंग थरथरत होते. तिने रक्षामंत्र जपायला घेतला आणि ती शांत होत गेली. त्यानंतर इरावती तशीच बसून होती.


तिने घड्याळ पाहिले अमेरिकेत आता रात्र असेल. तरीही तिने मोबाईल घेतला. डॉक्टर धैर्यशील नुकताच हॉस्पिटलमधून घरी आला होता. त्याने बाथ घेतला आणि बाहेर आला. मोबाईल व्हायब्रेट झालेला पाहून त्याने मोबाईल उचलला इरावती? काय झाले असेल?


"दादा कसा आहेस?" इराला भरून आले होते पण तिने आवाजावर कसाबसा ताबा ठेवला होता.


"इरा,अग माझ्याजवळ रडायला काही हरकत नाही."धैर्यशील असे म्हणाला आणि इरावती जोरात रडू लागली.

तिचा रडण्याचा भर ओसरला आणि मग तिने शांत होऊन बोलायला सुरुवात केली.


"दादा, काल कित्येक वर्षांनी मला पुन्हा तेच स्वप्न पडले." पलीकडे धैर्यशील स्तब्ध उभा होता.

"दादा,ऐकतोस ना? मी रक्षामंत्र जपला नाही आणि त्यामुळे काल पुन्हा.." इराने आवंढा गिळला.


"इरा तुला काय सांगायचे आहे?" धैर्यशील सत्य जाणूनही त्याचा स्वीकार करू इच्छित नव्हता.


"दादा, आशुचा विसावा वाढदिवस येतोय. माझ्याही बाबतीत ते सगळे तिथूनच सुरू झाले."इराने तिला कठीण वाटत असलेले वाक्य एकदम सांगून टाकले.


"इरा,मला विचार करायला थोडा वेळ दे."धैर्यशील कसेबसे एवढेच बोलू शकला.


"दादा,जे काही ठरवशील ते लवकर ठरव." इराने एवढे बोलून फोन ठेवला.


इराने फोन ठेवला आणि इकडे धैर्यशीलचे हृदय प्रचंड वेगाने धडधडत होते. कपाळ संपूर्ण घामाने भिजले होते.

"धैर्य,आवर लवकर पार्टीला जायला उशीर होईल." करुणा आत आली.

तिने धैर्यशीलची अवस्था पाहिली आणि पटकन धावत जाऊन गोळी आणली. त्याला पाणी आणि टॅबलेट देऊन खाली बसवले.


"रिलॅक्स डियर! काय झाले धैर्य? एवढा का घाबरला आहेस?" करुणा एकामागून एक प्रश्न विचारत होती.


धैर्यशील थोड्या वेळाने शांत झाला.त्याने करुणाला सांगितले आज त्याला यायला जमणार नाही. करुणा पार्टीला निघून गेली.आश्लेषा आणि अभिजित अजून घरी आले नव्हते. दोन्ही सावत्र भावंडे असूनही त्यांच्यात खूप छान बाँड आहे. करुणाला भारतातील काहीच ठाऊक नाही. आपली पत्नी इथे आल्यावर तीन वर्षांनी गेली त्यानंतर त्याची वर्गमैत्रीण असलेल्या करुणाशी त्याने इथेच लग्न केले. आजवर करुणा कधीही भारतात गेलेली नव्हती. तिला आणि मुलांना काहीच माहीत नव्हते. त्यांना धैर्यशीलने कसलीच कल्पना दिलेली नव्हती.



पंचवीस वर्षांपूर्वी जे इराने भोगले ते आता आश्लेषा....धैर्यशील कल्पना करूनही प्रचंड घाबरला होता.


त्याच्या हातात फक्त काही महिने होते. परंतु तो जे सांगेल त्याच्यावर आश्लेषा,अभिजित आणि करुणा विश्वास ठेवतील का?


पूर्णपणे विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात जगणारे आणि जगाच्या एका टोकाला मोठे झालेले हे दोघे आणि दुसरीकडे एक असे अकल्पित ज्याची सावली त्याने अनुभवली होती. इराचे आयुष्य बदलून टाकणारी ती गोष्ट आता पुन्हा फिरून त्याच्यासमोर उभी राहिली होती. आधी करुणाला विश्वासात घेऊन हे सगळे सांगावे लागणार होते.



इरा अंघोळ करून तयार झाली. देवपूजा करून तिने विद्यापिठात जायची तयारी केली. नयना टेबलवर नाष्टा लावून तिला बोलवायला आली.


"ताई,चला खाऊन घ्या." नयना हे सांगताना थोडी घुटमळत असलेली इराने पाहिले.


"नयना, काल पुन्हा एकदा तोच भयंकर चेहरा मी पाहिला. संपूर्ण जाळून ओघळलेली त्वचा आणि खोबनीतून दिसणारे डोळे."इराच्या अंगावर अजूनही शहारे येत होते.


"ताई,नको त्या आठवणी. काल रक्षामंत्र जपायचा राहून गेला आणि हे सगळे घडले." नयना तिला धीर देत म्हणाली.


"नयना,माझा अजूनही ह्या सगळ्यावर पूर्ण विश्वास बसत नाही. पण दुसरीकडे जे अनुभवायला येते ते नाकारता येत नाही."इरा अस्वस्थ झाली.


तेवढ्यात मोबाईल वाजला.

"नयना,प्लीज तेवढा फोन दे." इराने सुस्कारा सोडून म्हटले.

फोनवर डॉक्टर वैद्य होते.

"हॅलो इरावती,आता मी काय सांगतो ते नीट ऐक." त्यांनी पलीकडून बोलायला सुरुवात केली.

इराने फक्त हुंकार भरला.

"तुला सौदामिनीच्या कार्यक्रमाला जावेच लागेल. तशी वरिष्ठ पातळीवरून सूचना आहे." वैद्य हळूवार आवाजात म्हणाले.

"डोन्ट वरी डॉक्टर,व्यावसायिक नियम मी पाळेन. येईल मी वेळेत." इराने फोन ठेवला आणि आवरायला गेली.


इरावती गाडीत बसली आणि कार्यालयात जाताना तिने काल बनवलेली संदर्भ ग्रंथांची यादी पुन्हा एकदा चेक केली. सर्वात आधी सदाकडून हे ग्रंथ मागवायचे ठरवून इरावती शांतपणे वाचन करू लागली.


गाडी विद्यापीठ आवारात पोहोचली. इरावती गाडीतून उतरली आणि समोर श्रेयस उभा होता. त्याला पाहून तिच्या कपाळावर सूक्ष्म अठी उलटली.

"गूड मॉर्निंग मॅडम!" त्याने हसुन अभिवादन केले.

इरावती हलकेच स्मित देऊन आत आली. तीच्यापाठोपाठ श्रेयस आत आला.

"बोल श्रेयस,सगळी कागदपत्रांची कामे झाली का?" इरावती सहज म्हणाली.

"हो,झाली. आता अभ्यास सुरू करायला हवा."श्रेयस हसून म्हणाला.


त्याने तिच्यापुढे काही टिपणे ठेवली. इरावतीने त्याला बसायची खूण केली आणि त्याची टिपणे वाचू लागली.


"श्रेयस मी सगळे वाचून तुला पुढचे सांगते तोवर लायब्ररीत जाऊन ही पुस्तके आण." इराने संदर्भग्रंथ यादी त्याच्याकडे सरकावली.

श्रेयस बाहेर पडला आणि इराने त्याची टिपणे वाचायला घेतली.


धैर्यशील औषधे घेऊन बराच वेळ झोपला होता. रात्री उशिरा करुणा परत आली. धैर्यशील फोटो अल्बम बघत होता. करुणा मागे उभी राहिल्याचे त्याला समजले नाही.

आई,बाबा,इरावती, हिमंतराव आणि तो स्वतः असा बालपणीचा फोटो होता. त्याने फोटोवरून हात फिरवत पान पालटले.मागच्या पानावर जवळपास शंभर वर्षातील फॅमिली फोटो होते.


"मेमरिज,किती छान वाटते ना जुना काळ बघायला." करुणा त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली.


"हो,हे फोटो बघ अगदी सुरुवातीच्या काळात असलेल्या कॅमेऱ्यानी काढले आहेत. अमेरिकेत येताना मी भारतातून हे सगळे अल्बम आठवणीने घेऊन आलो. आमच्या मागच्या पाच पिढ्यांचे अल्बम आहेत." धैर्यशील बोलत होता.


"धैर्य,आपण उद्या बोलूया का? मी खूप दमले आहे." त्याने होकारार्थी मान हलवली.


करुणा झोपायला गेली. धैर्यशील फोटो बघत होता. त्या पाच पिढ्यात कुठेही मुलगी नव्हती.आज ही बाब त्याला प्रकर्षाने जाणवत होती. तसेच मुलग्यातील एकाचा वंश चालत असे आणि एकाचा बुडत असे. त्याच्या मनात हिंमतचा विचार आला आणि तो स्तब्ध झाला. त्याने अल्बम मिटला आणि झोपेची तयारी करू लागला.



इरावतीने सांगितलेले ग्रंथ घेऊन श्रेयस परत आला.त्याने सगळे ग्रंथ एका बाजूला ठेवले. इराने त्याला बसायची खूण केली.


"श्रेयस,मी सगळे वाचले. खूप सखोल अभ्यास केला आहेस. परंतु काही गोष्टी नाही पटल्या."इरा थांबली.


"कोणत्या? काही चुकले आहे का?" श्रेयस म्हणाला.


"तू असे म्हणत आहेस की मातृ कुलांचा नाश करताना पाशवी उपाय केले गेले. त्यांचा प्रतिकार करायला मातांनी काळ्या शक्तींचा आश्रय घेतला.शापवाणी सत्य करायची साधना त्या करत असत. तुला यात तथ्य वाटते?" इरा त्याच्याकडे रोखून बघत होती.


"ज्ञान,विज्ञान,कृषी,युद्ध सगळे ज्ञान असलेल्या स्त्रियांना जेव्हा केवळ ताकद आणि लिंग यांच्या जोरावर दाबायचा प्रयत्न झाला तेव्हा त्यांनी शक्य ते सगळे मार्ग आजमावले. मग तो अगदी देहविक्रय करण्याचा असो किंवा काळ्या जादूचा."श्रेयस स्पष्टीकरण देत होता.


इरावती शांतपणे त्याचे म्हणणे ऐकत होती. एक संशोधक म्हणून तिला हे मान्य करता येत नसले तरी त्यातील सत्याची आच तिचे तारुण्य जाळूनही अजून कायम होती.



इरा अस्वस्थ झाली. परंतु चेहऱ्यावर तसे दाखवू न देता तिने श्रेयसला काही आणखी संदर्भ लिहून दिले आणि त्याचा अभ्यास करायला सांगितला.


श्रेयस गेल्यावर मात्र इराने एक दीर्घ श्वास घेतला आणि आणलेले संदर्भ वाचायला घेतले. सहजपुर गावाचा संदर्भ नेमक्या कोणत्या भौगोलिक ठिकाणी येतोय ह्याचा शोध तिने सुरू केला.


संदर्भ पाहून तिने लॅपटॉपवर डिटेल्स भरायला घेतले. सहजपुर नक्की होते कुठे याचा शोध घेतल्यावर पुढचे संदर्भ लागायला सोपे जाणार होते.


सहजपुर नावाशी इराचा काय संबंध असेल? धैर्यशील आश्लेषाला सगळे सांगू शकेल का? काय असेल ते भयानक रहस्य?


वाचत रहा.
शापित अप्सरा.

©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all