शापित अप्सरा भाग 33

समांतर चालणारी अनेक रहस्यं लवकरच उलगडतील.

शापित अप्सरा भाग 33


मागील भागात आपण पाहिले सुभानराव आणि सुगंधा दोघेही एकमेकांना आवडू लागले आहेत. ही गोष्ट सगुणाला मान्य नाही. तर सुगंधा ही साधारण नसून तिच्यात काही असाधारण शक्ती आहेत. खंडोजी तिच्याकडे इनामदारांचा निरोप घेऊन येतो आता पाहूया पुढे.श्रेयस थोडेसे थांबला. त्याबरोबर आश्लेषा म्हणाली,"आय सॉ द बिस्ट मायसेल्फ. त्यामुळे मी यावर विश्वास ठेवू शकते."


"पण जर योगिनी इतक्या शक्तिशाली असतील तर त्यांना कोणालाही घाबरून लपून राहायची गरज काय?" अभिजीत त्याची शंका मांडत होता.


"ह्या शक्ती फक्त संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाऊ शकत होत्या. झोपेत,पूजा करताना ह्या शक्ती वापरता येत नसत." शकुंतलाने अशा अनेक मर्यादा स्पष्ट केल्या."देशमुख, सुगंधाने काय उत्तर दिले सुभानरावला." इरावती मध्येच म्हणाली.


श्रेयस पुढे सांगायला लागला खंडोजी त्या रात्री सुगंधाच्या फडावर थांबला. उद्या सकाळी उत्तर घेऊन निघायचे त्याने ठरवले.सुगंधा आत आली. तिने हळूच खलिता उघडला आणि शांतपणे वाचायला सुरुवात केली.


"प्रिय....... नाव माहीत नसल्याने जागा रिकामी सोडतो. पण माझ्यासाठी तू कस्तुरी आहेस. जी कोणा सामान्य माणसाला प्राप्त होऊ शकणार नाही. तुझा तो स्वर्गीय गंध सतत माझ्या अवतीभवती आहे. तू माझी होऊन राहावी अशी माझी इच्छा आहे."


खाली सुभानराव इनामदार ह्या नावाची मोहोर आणि सही खाली होती. सुगंधाने शांतपणे कागद घेतला आणि उत्तर लिहायला सुरुवात केली.सकाळी खंडोजीला उत्तर तयार असल्याचा निरोप मिळाला. त्याने निरोपाचा खलिता घेतला आणि घोड्याला टाच मारली. इकडे सुभानराव बैचेन होता. देहाच्या जखमा भरल्या असल्या तरी मन मात्र सैरभैर होते.


आजवर सुंदर असणाऱ्या अनेक स्त्रिया आल्या आणि गेल्या पण सुभानराव कधीही एकदा भोगलेल्या स्त्रीला परत शरण गेला नाही. आज मात्र मनाला असणारी बैचेनी वेगळी होती. सूर्य मावळतीला चालला होता. महालाच्या वर सुभानराव उदास उभे होते. त्यांनी लांबूनच खंडोजीचा घोडा ओळखला.
खंडोजी येताना गुणवंताबाईंनी देखील लांबूनच पाहिले होते. त्या सावध होत्या. खंडोजी घोडा बांधून मागे वळला आणि समोर साक्षात थोरल्या मालकीण उभ्या होत्या. खंडोजी अदबीने समोर उभा राहिला.


"खंडोजी,आमच्याबरोबर चला." गुणवंताबाई पुढे आणि खंडोजी मागे चालू लागला.


गुप्त दालनात येताच गुणवंताबाई थांबल्या.


"खंडोजी खलिता द्या." त्यांनी हुकूम सोडला.

"न्हाय, मालकीणबाई, फकस्त मालकांना खलिता देणार." खंडोजीने उत्तर दिले.


त्याबरोबर इशारा झाला आणि खंडोजीच्या मानेवर तलवारी रोखल्या गेल्या. गुणवंताबाई स्वतः पुढे आल्या. त्यांनी खलिता काढून घेतला आणि खलिता उघडला.


एक क्षण त्या थांबल्या. खलिता कोरा होता.


"खंडोजीची झडती घ्या." हुकूम सुटला.


त्याच्याजवळ दुसरा कोणताच खलिता नव्हता. खंडोजीला खलिता परत करून आनंदाने गुणवंतांबाई परत गेल्या.


श्रेयस सांगत असताना मध्येच सारीकाचा फोन वाजला. सारिका बाजूला गेली. तोपर्यंत श्रेयस विश्रांतीसाठी थोडेसे थांबला."मला आता जावे लागेल. नाहीतर मृणमयी वाचणार नाही." सारिका परत आली.


"पण एवढ्या पावसात आणि अशा वातावरणात तू कशी जाणार?" इरावतीने चिंता व्यक्त केली.


"काळजी करू नका. मी स्वतः ला वाचवू शकते."


राघव अचानक म्हणाला,"तुमची हरकत नसेल तर मी येतो सोबत कारण असा अमानवी प्रकार पुन्हा घडला तर ?"


त्यावर कोणी काही बोलायच्या आत शालिनीताई म्हणाल्या,"सारिका ह्याला सोबत घेऊन जा."


मग तिला काहीच बोलता आले नाही आणि सारिका व राघव निघून गेले. श्रेयस पुढे सांगू लागला. खंडोजी बाहेर पडला आणि थेट सुभानरावांना भेटायला गेला. सुभानराव त्याची वाटच बघत होते."खंडोजी एवढा उशीर ? तुला ती सापडली ना ?" सुभानराव अधीर झाले होते."मालक,थोरल्या मालकीणबाई नजर ठीवून हाये. तुमी जरा सबुरीन घ्या." इकडे तिकडे बघत खंडोजीने खलिता काढून त्यांच्या हातात दिला.


सुभानराव आनंदाने पटकन खलिता खोलून वाचायला लागले. खलिता संपूर्ण कोरा होता.


" खंडोजी काय हे? ह्या कोऱ्या खलित्याचा अर्थ काय ?" सुभानराव रागाने ओरडले.


"थांबा मालक, बत्ताशा म्हणाल व्हत की तुझ्या पाठ चोळून देतो. खलिता वाचतानी मालकांना पाठ दाखिव." असे म्हणून खंडोजीने अंगरखा उतरवला आणि पाठमोरा उभा राहिला."इनामदार साहेब, हा खलिता तुमच्या हातात थेट गेला नाही तर मग काही विपरीत घडू शकत. तेव्हा खलिता वाचताना समईच्या वातीच्या वर वितभर अंतरावर फक्त वातीची थोडी ऊब लागेल असा धरा. वाचल्यावर खंडोजीला पाठ धुवायला सांगा." तिची हुशारी बघून सुभानराव थक्क झाले."खंडोजी, आता पहिली अंघोळ करा आणि आराम करा काही दिवस." खंडोजी निघून गेला.सुभानराव देवघरात आले. त्यांनी बरोबर योग्य अंतरावर खलिता धरला आणि मग त्यावर अक्षरे उलटली."तुम्हाला आस लागली आहे ती माझ्या सुगंधी देहाची. असे अनेक देह तुम्ही भोगले असतील. ही सुगंधा असे हुंगुन चुरगळून टाकून द्यायचे फुल नाही. तुमचे खरेच प्रेम असेल तर सुगंधाला तोच दर्जा मिळेल जो एका इनामदारांच्या पत्नीला मिळायला हवा. अन्यथा कस्तुरी दूर गेली असे समजून मला विसरून जा."वाचून झाले आणि अचानक खलिता पेटला. तो पेटता कागद त्यांनी खाली फेकला. त्या आगीबरोबर सुगंधा कायमची आपली व्हावी ह्या विचारांची आग सुभानरावांच्या मनात पेटली होती. तिचा वणवा विझवणे आता कोणालाही शक्य नव्हते."वॉव, इट्स मॅजिक लाईक हॅरी पॉटर." अभिजीत जोरात ओरडला."डफर, इट्स सायन्स. शी युज केमिकल्स." आश्लेषा हसली." हो,योगिनी रसायन,भौतिक,वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात पारंगत होत्याच. पण जादू नाही असेही नव्हते." शकुंतला हसून म्हणाली."शकुंतलाबाई, पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणून काम करताना मला अनेक स्त्रियांच्या अशा मूर्ती आढळल्या,अनेक ठिकाणी त्या भोवती काही चिन्हे कोरलेली असतात. ती कोणत्याही प्राचीन भारतीय भाषेतील नाहीत." इरावतीने विचारले."हो,अनेक योगिनी त्यांची विद्या जर पुढच्या वारसाला देता येणे शक्य नसेल तर ती शिलालेखात कोरून ठेवत. त्याची भाषा वेगळी आहे. जी केवळ आम्ही खऱ्या वारसदार योगिनी वाचू शकतो." शकुंतलाने उत्तर दिले.


"मग इतकी शक्तिशाली असूनही सुगंधा त्या महालात अशी कैद कशी झाली?" सौदामिनीला आता ही कथा आवडू लागली होती.


"त्याचे उत्तर पुढे असेलच." श्रेयस हसून म्हणाला.


सुभानराव तिचे उत्तर ऐकून आता मात्र तिच्यासाठी वेडे झाले. त्यांनी काहीही करून सुगंधाला मिळवायचे ठरवले. पण त्यासाठी आधी शरीर तंदुरुस्त व्हायला हवे होते. इकडे गुणवंताबाई निर्धास्त झाल्या होत्या. परंतु सगुणाबाई अस्वस्थ होत्या. त्यांना सुभानराव नक्कीच पुन्हा त्या अज्ञात स्त्रीला शोधणार ह्याची पूर्ण खात्री होती.
इमानदार आपल्याला धुडकावून निघून गेले ही गोष्ट कमळा विसरली नव्हती. आपल्या सौंदर्याचा अपमान करून जाणारा सुभानराव आणि त्याचा अहंकार कसा ठेचायचा याचाच ती सतत विचार करत होती. त्यासाठी इनामदारांच्या जवळ जायची गरज होती. साजगावच्या इनामदार घराण्यातील कच्चा दुवा शोधून तिथे शिरणे शक्य होते.लवकरच कमळाला तो दुवा सापडला. अंतोजीराव इनामदार. सुभानरावांचे धाकटे बंधू. सुभानराव इतके पराक्रमी नसले तरी तेवढेच देखणे आणि सौंदर्याची आस असलेले. कमळाला मार्ग सापडला होता. तिने साजगावच्या आसपास आपला मुक्काम हलवला.कमळा दिसायला सुंदर तर होतीच पण तेवढीच महत्वाकांक्षी आणि क्रूर होती. हळूहळू तिच्या सौंदर्याची ख्याती पसरू लागली आणि आजूबाजूचे वतनदार,देशमुख असे तिच्या भोवती फिरू लागले.पहाटेचे जवळपास तीन वाजत आले होते.


"श्रेयस आता थोडा आराम करा सगळे. तसाही पाऊस थांबत नाहीय. तर आपण उद्या सकाळी पुढील घटना ऐकू." सगळे आपापल्या खोलीत जायला निघाले.


धैर्यशील खोलीत आल्यावर त्याने मोबाईल पाहिला. करूणा गावाकडे यायला निघाली होती. वाटेत तिची गाडी बंद पडली होती. तिला कोणतीच मदत मिळत नव्हती. जवळपास तीस पस्तीस मिसकॉल झाले होते. लोकेशन इथून दहा किलोमीटर दाखवत होते. धैर्यशील आवरून बाहेर पडला. तेवढ्यात अभी पाणी पिऊन वर येत होता."डॅड,इतक्या रात्री कुठे चाललास?" त्याने हळू आवाजात विचारले. त्यावर त्याने करुणाचे मॅसेज दाखवले.


" थांब,मी येतो सोबत. एकटा नको जाऊस." अभी सोबत निघाला.त्याने आश्लेषाला तसा मॅसेज करून ठेवला आणि दोघे गाडी घेऊन बाहेर पडले.


"इन्स्पेक्टर, मृणमयी जर फोन करू शकते तर तिच्या बाबांची मदत का नाही घेत?" राघवने विचारले.


" राघव,हा प्रश्न मला सतत छळत आहे. नक्कीच काहीतरी पाणी मुरत आहे. सायबर सेलने टाकलेले लोकेशन बघ." राघवने लोकेशन बघितले आणि तो चिंताक्रांत झाला.


"राघव काय झाले? लोकेशन चुकलेय का?" सारिकाने विचारले."नाही,पण अघोरी टेकडीवर मृणमयी का जाईल?" राघव पटकन बोलून गेला.


ते आता तिथे गेल्यावरच कळेल. सारिकाने गाडीचा वेग वाढवला.कमळा कोणते पाऊल उचलेल? अघोरी टेकडीपर्यंत राघव आणि सारिका पोहोचतील का ? सुगंधा आणि सुभानरावांची प्रेमकथा काय वळण घेईल?


वाचत रहा.


शापित अप्सरा.


©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all