शापित अप्सरा भाग 30

रहस्याचा गुंता वाढत चालला आहे आणि संकट जवळ येतेय.

शापित अप्सरा भाग 30


मागील भागात आपण पाहिले की शकुंतला अवसरिकर सम्राटला गुंगारा देत नाहीशी होते. मंदिराचे गुरुजी शुद्धीवर येईपर्यंत हॉस्पिटलला थांबायचे सारिका ठरवते. इरावती मंदिरात जायला तयार होत असते. आता पाहूया पुढे.मृणमयीने फोन केला म्हणजे ती जिवंत आणि सुरक्षित असल्याचे नक्की झाले. तरीही तिचे वडील आमदार असताना ती घरी न जाता पोलिसांना फोन का करत आहे? ह्या प्रश्नाने सारिकाला काहीतरी वेगळे शिजत असल्याचा संशय येत होता. आमदार संपतरावबाबत आणखी माहिती खोदून काढायची गरज होती.सायबर क्राईम शाखेतून मृणमयीने फोन केलेल्या मोबाईलचे लोकेशन समजल्यास तिचा शोध घेणे सोपे होणार होते. शकुंतला सुखरूप पोहोचली पाहिजे म्हणजे ह्या अतर्क्य प्रकरणात आणखी काही खुलासे मिळतील. आजवर सारिका कधीच एवढी गोंधळली नव्हती. परंतु इथे प्रकार काहीतरी वेगळा असल्याची आता तिला खात्री पटली होती. सूर्य मावळतीला चालला होता. मरगळलेल्या मनाला थोडी तरतरी यावी म्हणून सारिकाने चहा मागवला. आता गुरुजी शुद्धीत यायची वाट बघावी लागणार होती."नयना,ती पैठणी नेसते आज." इरावती डाळिंबी रंगाची ती पैठणी हातात घेऊन म्हणाली.


"हो,त्यावर छान खोपा घालू आणि मोत्याचे दागिने काढते." इराला आनंदी बघून नयना उत्साहात म्हणाली."छान मोगऱ्याचा गजरा माळू का?" नयनाने विचारले.


इरावतीने होकार दिला. तेवढ्यात आशू धावत आत आली.


"आत्तू,मलाही छान तयार कर ना." "बर,तू आधी हे केस धुवून ये बर. मग छान केसांना धूप देऊन तुला आम्ही दोघी तयार करू." नयना तिला अंघोळीला पिटाळत म्हणाली.


"तुझ्याच रूमचे बाथरूम वापरू का आत्तू?" आशूने परवानगी विचारली.


"जा लवकर उशीर झाला तर आजी रागावेल." इरावतीने तिला आत ढकलले.


नयनाने इराच्या कपाळावर चंद्रकोर रेखली आणि तिची सगळी तयारी करून दिली."नयना,तुझ्यासाठी साडी,दागिने काढून ठेवलेत तयार हो.


"इरावती वेणीवर गजरा माळत म्हणाली. तेवढ्यात आतून सुंदर आवाजात बोल ऐकू यायला लागले.माडीवरती जात व्हते मी घाईन,सख्यान धरला हात बाई ग!


सोडा राया नका अशी आवळून धरू कवळी काया.
अंगावरती फुलला काटा,दूर सारा अत्तराचा फाया.
सोडा की आता हात राया,पडते तुमच्या पाया sssss


गालावरती खुणा उमटल्या, काय सांगू करामत तुमची बाई ग!धावत गेले तशीच वरती,शिरले खोलीत घाईन ssssss
पाऊल वाजता दुरून राजसा,काळजात गुलाब फुललंssssss
आत येऊन तुम्ही राजसा,कडी कशाला लावता.


पुसतील सख्या काय घडल,कस त्यांना सांगू बाई ग.


डाळींबी व्हटात भरला, रस इश्काचा तुमच्यासाठी.
अंगामंदी गोड शिरशिरी,हात तुमचा पडता पाठी.
फुलून आली सारी काया,घ्या आवळून थोडी मिठी


मानवरच्या डागाच मी,काय गुपित सांगू बाई ग!


झोकून देते मिठीत राजसा, विझवा दिव्यातील वाती.
फुलवा काया माझी सजना, रंगू दे इश्काच्या राती.
काळोखात फुलून यावी,तुमची माझी पिरती.


फुललेल्या उरामधल आज गुपित समजल बाई ग!


बेभान होऊन आशू गात होती आणि बाहेर इरावती स्तब्ध होऊन ऐकत होती. काळाचे चक्र उलट फिरले की थांबून राहिले तेच तिला समजत नव्हते. पमा आत्या ही लावणी अनेकदा गायची आणि त्यानंतर ती स्वतः ला बराच काळ भानावर आणू शकत नसे.


हे आठवताच इरावतीने आशूला जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. पाच मिनिटांनी आशू बाहेर आली.


"आत्तू काय झाले? एवढे घाबरून का हाक मारत होतीस?" काही घडलेच नाही अशा आविर्भावात उभी असलेली आश्लेषा पाहून इरावती शांत झाली."काही नाही. चल तुला छान तयार करते." इराने स्वतः ला सावरले.


"आत्तू,मंदिरात खूप छान वाटते. मला हे गाव खूप आवडले. डॅडनी इथे नेहमी यायला हवे."आशू बडबड करत होती.इरावतीने तिला छान तयार केले आणि नंतर मानेच्या मागे काजळाची तीट लावायला इरा मागे उभी राहिली आणि तिला आश्लेषाच्या मानेवर दोन काळे डाग दिसले. याचाच अर्थ घाई करावी लागणार होती. मनातील विचार मागे सारून इरावती तयार होऊन आशू आणि नयना दोघींना घेऊन बाहेर पडली.


खाली शालिनीताई,धैर्य, अभिजीत,श्रेयस आणि राघव वाटच पहात होते. अप्सरेसारखी सुंदर दिसणारी आश्लेषा पाहून धैर्यशीलचे डोळे भरून आले.


तेवढ्यात शालिनीताई ह्या दोघींची नजर उतरवत म्हणाल्या,"इनामदारांच्या लेकिंना आतातरी सुख लाभू दे." सगळे घराबाहेर पडले.मंदिराकडे जाताना इराला तिच्या बाबांची खूप आठवण येत होती. लहानगी इरा तिच्या आई बाबांसोबत मंदिरात जात असे. आज तिचे डोळे बाबांच्या आठवणीने भरून येत होते. मंदिर जवळ येऊ लागले आणि समोरच सौदामिनी आणि बाबांचा फोटो दिसला आणि इराचे मन वर्तमानात परत आले."आक्का,इकडे या. सर्व तयारी झाली आहे. आपल्याला आता गुप्त मार्गाने वर जाऊन कलशाचा अभिषेक करणार आहोत." पुजारी पुढे आले.


राघवला पाहताच त्यांना खूप आनंद झाला.

"साक्षात महादेव शास्त्रींच्या वारसाच्या उपस्थितीत आज हा सोहळा होत आहे." त्यांनी आनंदाने राघवला पुढे बोलावले.सगळेजण मंदिराच्या आत गेले. गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीजवळ जाताच तिथे एक दरवाजा उघडला गेला आणि त्या चिंचोळ्या मार्गाने सगळेजण वर जाऊ लागले. आता ह्या सगळ्याकडे इरावती एक लेखक आणि पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणून पहात होती. जवळपास हजार वर्षे जुने असलेले मंदिर इनामदार घराण्याच्या गेली तीन चारशे वर्षे ताब्यात होते."आत्तू,किती अंधार आहे इथे. मोबाईल टॉर्च लावू का?" अभी हळूच म्हणाला.


"नाही हा अभी,इथे प्रकाश करायला परवानगी नाही. आता आपण वर पोहोचू." धैर्यने उत्तर दिले.


तेवढ्यात पुजारी थांबले. शालिनीताईंनी एक पदक काढून दिले. पुजाऱ्यानी ते पदक कमळाच्या मधोमध लावले आणि झडप उघडली गेली. सगळेजण वर आले. सात थर असणारा कलश होता. सगळेजण शिडिने वर जाऊ लागले. राघव सर्वात खाली होता.वर जाताना त्याने एक चिन्ह पाहिले ते त्याच्या पायावर कोरलेले होते. जाताना क्रमाने वेगवेगळी चिन्हे होती. त्यातील प्रत्येक चिन्ह राघवच्या शरीरावर होते. फक्त सातव्या थरात असलेले चिन्ह त्याला दिसले नव्हते.त्याच तंद्रीत तो वर गेला. पुजारी अभिषेक करू लागताच राघवच्या तोंडून आपोआप मंत्र बाहेर पडू लागले. महादेव शास्त्रींचा वारसा अजूनही जिवंत होता.कळसावरून संपूर्ण गाव दिसत होते आणि गावाच्या दक्षिणेला असणारा भव्य महाल तिथूनही नजरेत भरत होता.


"लूक आशू,किती मोठा आणि ब्युटीफूल आहे महाल." अभिजीत म्हणाला.


"अभी,त्या महलाकडे जायचा विचारही करू नकोस. पूजा आटोपली आहे. सगळ्यांनी खाली उतारा." शालिनीताई करारी आवाजात म्हणाल्या.उत्सवाची अधिकृत सुरुवात झाल्याची घोषणा झाली आणि इनामदार कुटुंबीय घरी परतले. रात्रीचे दहा वाजून गेले होते. कुंदाने जेवण तयारच ठेवले होते. सगळेजण फ्रेश व्हायला गेले.सरकारी हॉस्पिलमध्ये त्या गढूळ वातावरणात सारिका बसून होती. प्रचंड भूक लागली होती आणि इथल्या कॅन्टीनमध्ये जेवायची अजिबात इच्छा नव्हती. तेवढ्यात दरवाजात श्रेयस येताना दिसला.
"शालिनीताई म्हणाल्या सारिकाला डबा घेऊन जा." त्याने डबा हातात देताच सारिकाचे डोळे आनंदाने चमकले.घरचे ताजे अन्न आणि पोटातली भूक यांचा छान संगम घडून आला.


"श्रेयस घर सोडल्यावर कितीतरी वर्षांनी असे जेवते आहे."

दोघेही जुन्या गप्पा मारत असताना शिर्के आणि माने सरळ तिथे येऊन पोहोचले.वृद्धत्व असूनही विलक्षण देखणी असणारी ही स्त्री म्हणजेच शकुंतला हे सारिकाने ओळखले.


"मॅडम,ह्या आजीला ठेवायच कुठे?" माने अंदाज घेत म्हणाला.


"हिला सुरक्षित जागी ठेवायला हवे." सारिका विचार करू लागली."इनामदार वाड्यात सोय होऊ शकेल." श्रेयसने सुचवले.त्याबरोबर सारिकाने मानेला तशा सूचना दिल्या.


शिर्केची पोलीस क्वार्टर मध्ये सोय केली आणि ती वळणार इतक्यात शकुंतला म्हणाली,"पुजारी शुद्धिव येस्तोवर म्या हितून हलणार न्हाय."


शेवटी नाईलाजाने श्रेयस घरी निघून गेला.इकडे सम्राट आणि त्याची माणसे शुद्धीवर आली. शकुंतला निसटली हे पाहून तो वेडापिसा झाला.


"थेरडी पळून गेली. चला लवकर." तो जोरात ओरडला.


तेवढ्यात सदा उठून बाहेर चालायला लागला.


" अय सद्याला धर." सम्राट जोरात ओरडला.


"म्या चाललो,ती वाट बघत हाय. मला जाऊ द्या." सदा मोठ्याने ओरडू लागला.


सम्राटला शकुंतलाचे शब्द आठवू लागले. तिला मुक्त करायला तुमच्यातील एकाचा बळी जाईल. आता मात्र त्याल घाम फुटला. तेवढ्यात मोबाईलवर मॅसेज आला.


चिखलगाव मध्ये ये. तिथे तुला मदत मिळेल. तो मॅसेज वाचला आणि सम्राट वेगाने चिखलगावकडे निघाला. सदाला त्यांनी दोरीने बांधून ठेवले होते.मंदिराच्या कळसावर असलेल्या चिन्हांचा काय अर्थ असेल? राघव ते शोधू शकेल? सुगंधा कशी मुक्त होईल? मृणमयी सापडेल का? सम्राटला कोण मदत करत आहे?वाचत रहा.


शापित अप्सरा.


©®प्रशांत कुंजीर.


🎭 Series Post

View all