शापित अप्सरा भाग 28

एकेक रहस्य उलगडायला सुरुवात

शापित अप्सरा भाग 28


मागील भागात आपण पाहिले एक अमानवी शक्ती सारिकाला एका गुप्त दरवाजाआड घेऊन जाते. राघव तिची सुटका करून बाहेर घेऊन येतो. आता पाहूया पुढे.आत घडलेला सगळा प्रकार सारिका आणि श्रेयस दोघांसाठी अविश्वसनीय होता. आपण सहिसलामत तिथून बाहेर आलो यावर त्यांचा जरा वेळ गेल्यावर विश्वास बसला. राघव शांतपणे उभा होता.


"राघव थँक्यू. आज तुम्ही नसतात तर कदाचित इन्स्पेक्टर सारिका कशी आणि कुठे संपली कोणालाही समजले नसते." सारिका त्याला म्हणाली.


"आपण माझ्या खोलीत जाऊन बोलूया." राघव शांतपणे खोलीकडे चालू लागला.


पाठोपाठ श्रेयस आणि सारिका चालत गेले. आत गेल्यावर राघवने दरवाजा लावला आणि एका भस्माने दरवाजाजवळ एक रेषा आखली.


" राघव हे सगळे काय आहे? आम्हा दोघांनाच फक्त हा आवाज कसा ऐकू आला?" श्रेयस खाली बसताच म्हणाला."श्रेयस खरेतर तुम्हा पुरातत्व शास्त्रज्ञ लोकांना याचे उत्तर अनेकदा मिळत असते. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. ठिकठिकाणी अनेक संदर्भ केवळ अविश्वसनीय वाटतात म्हणून तुम्ही सोडून देता." राघव मंद आवाजात बोलत होता.


टपोरी,बेफिकीर राघवचे हे रूप पाहून सारिका बघतच राहिली. "राघव,आतमध्ये घडलेला प्रकार नक्की काय होता?"सारिका आता बरीच सावरली होती."ह्या सगळ्याची पूर्ण उत्तरे मलाही माहित नाहीत. त्यासाठी माझ्या पूर्वजांनी सांभाळलेले जुने ग्रंथ अभ्यासावे लागतील. आता तुम्ही मी गळ्यात घातलेले सुरक्षाकवच काढू नका." राघव शांतपणे समजावत होता."सारिका,खूप रात्र झाली आहे. आता आपल्याला विश्रांती घ्यायला हवी." श्रेयस म्हणाला.दोघेही बाहेर जायला वळले आणि मानेचा फोन आला.


"बोला माने,काय झाले? एवढ्या रात्री फोन केला?" सारिका भराभर बोलत सुटली.


"मॅडम सम्राट आणि त्याचे साथीदार गायब झाले आहेत."माने तिकडून घाबरत म्हणाला.


"गूड , आता आपल्याला मृण्मयी सापडेल." सारिका हसून म्हणाली."मॅडम सम्राट पळून गेलाय आणि तुम्ही हसताय?" माने गोंधळात पडला." माने काळजी करू नका. त्याच्या गाडीवर ट्रॅकर लावला आहे. तो कुठे जाईल ते आपल्याला समजेल. तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला या." सारिका वेगाने सूत्रे हलवत होती.


"श्रेयस मी जातेय. पुढे काय घडते ते सांगत रहा." एवढे बोलून सारिका बाहेर पडली.सकाळी अभिजीत उठला तर त्याने पाहिले आश्लेषा कुठेही दिसत नाहीय. तो गडबडून उठला आणि इकडेतिकडे पाहू लागला. आश्लेषा खिडकीतून बाहेर बघत होती.


"हे आशू, व्हॉट आर यु डूईंग देअर?" अभीने आवाज दिला.तरीही ती मागे वळली नाही.


अभी तिच्याजवळ चालत गेला त्याने आश्लेषाला हाताला धरून आणले आणि खाली बसवले. तिच्या डोळ्यात कोणतेही भाव दिसत नव्हते. त्याने आशुला जोरजोरात हलवले.


"आशू! आशू वेक अप." अभी ओरडत होता.तरीही कोणतीच प्रतिक्रिया नव्हती शेवटी त्याने कडेला ठेवलेला पाण्याचा ग्लास तिच्या तोंडावर मारला आणि आशू भानावर आली."आशू काय झाले? तू खिडकीत का उभी होतीस?" अभिजीत तिला घाबरून विचारत होता." अभी शी इज कॉलिंग मी. दे बर्न हर." आशूच्या डोळ्यात पाणी होते."देअर इज नो वन आशू, लेट्स गो फॉर ब्रेकफास्ट." अभी तिला घेऊन खाली आला.आश्लेषा आणि अभिजीत दोघे खाली आले. तोवर इरावती आणि धैर्यशील फ्रेश होऊन कॉफी घेत होते. श्रेयस आवरून खाली आला."देशमुख इन्स्पेक्टर सारिका कुठे गेल्या?" इरावती कॉफीचा घोट घेत म्हणाली."सम्राट आणि त्याची माणसे पळून गेली आहेत. त्यासंदर्भात ती बाहेर गेली आहे." श्रेयस खाली बसत म्हणाला. तेवढ्यात शालिनीताई बाहेर आल्या."श्रेयस आपण पुढे वाचूया का? कारण त्याशिवाय आपल्याला उत्तरे मिळणार नाहीत." त्यांनी राघवला विचारले."ठीक आहे मी ती चोपडी घेऊन येतो." श्रेयस आत जाऊन चोपडी घेऊन आला.


आता सगळे सरसावून बसले होते. सुगंधा आणि सुभानराव यांचे पुढे काय झाले सगळ्यांना ऐकायचे होते. श्रेयसने चोपडी उघडली. त्यातील पुढचे पान उचलले.
नयनातून बरसे ठिणगी,नजर तिच्यावर थिजली.
कोण अनामिक तू सुंदरा,देहात तुझ्या ग बिजली.वास कस्तुरीचा तुझ्या देहाला,मनमोहक तू हरिणी.
तुडवीत जाशी कैक हृदये,कोण सखे ग तू मानिनी.


पायावरती काळीज तुझ्या ग,हरवून बसलो सजणी.
तुझ्या देहाचा भोग मिळावा,कशी करू सखे मन धरणी.माझ्या लेखणीतून प्रत्यक्ष तिच्या सहवासाची कल्पना कागदावर उमटत होती. तिचे नाजूक चालणे,कपाळावर रेखलेली चंद्रकोर, चापून नेसलेली पैठणी अन करारी तितकीच घायाळ करणारी नजर. लेखणी झरझर चालत होती. मला काहीही सुचत नव्हते. बेभान होऊन मी लिहीत होतो. अचानक बाहेर आरडाओरड झाली. छावणीवर हल्ला झाला होता.
मी तलवार सावरत बाहेर आलो. चारही बाजूंनी शत्रू सैन्य छावणी लुटत होते. सुभानराव बाहेर आले.


"मालक, हितन बाहिर पडा. कुमक कमी हाय." खंडोजी इशारा देत ओरडला.त्याबरोबर मी सगळ्यांना बाहेर पडण्याचा इशारा दिला. जितके बरोबर घेता येईल तेवढे सगळे बरोबर घेऊन आम्ही बाहेर पडलो. सूर्य मावळतीला जात होता. सगळीकडून घेरले जाऊन आम्ही संकटात सापडलो होतो.चारही बाजूंनी हल्ला होत होता. तलवारीचे वार अंगावर झेलत मी मार्ग काढत होतो. अचानक पाठीवर सपकन तलवारीचा वार झाला. त्याबरोबर जाणारा तोल सावरत आम्ही मागे वळून त्या सैनिकाचे धड शिरावेगळे झाले. तोपर्यंत माझ्यावर चारही बाजूंनी वार होऊ लागले. शुद्ध हरपायला लागली. तेवढ्यात खंडोजीने मला अलगद त्याच्या घोड्यावर घेतले आणि घोड्याला टाच मारली त्याचवेळी माझी शुद्ध हरपली.
भोवताली पसरलेला काळोख जाऊन दूरवर एक तीव्र किरण दिसत होता. आपण जिवंत असल्याची जाणीव मला होऊ लागली. अचानक एक सूक्ष्म गंध नाकात शिरला आणि माझ्या सगळ्या देहावर काटा उभा राहिला. मी मुश्किलीने डोळे उघडले. संपूर्ण देहावर एकही कापड नव्हते. सगळीकडे औषधी लेप लावून एक कापड अंगावर टाकले होते. आता मला वेदनांची जाणीव होऊ लागली.

मला एकही अवयव हलवता येत नव्हता.मी उठायचा प्रयत्न केला आणि एक अत्यंत मंजुळ आवाज कानावर आला."अहं,अजून जखमा ओल्या आहेत. अजिबात उठू नका." तिने जवळ येत सूचना दिली.त्यासरशी तो कस्तुरीचा गंध पुन्हा मनात दरवळला. परंतु अंगात त्राण नसल्याने पुन्हा माझे डोळे बंद झाले."मालक,उठा,आपून पोचलो सुकरुप." खंडोजीने मला हलवून जागे केले.


मी एका बैलगाडीत होतो.


"खंडोजी,आपण कुठे पोहोचलो?" मी एकामागून एक प्रश्न विचारत होतो."मालक तुमी पडून रावा. आधी आपून वाड्यात जाऊ." खंडोजी घाईने उत्तर देत होता.

आतून चार नोकरांनी बाहेर येऊन मला उचलून नेले.
"खंडोजी,ह्यांना किती लागलं आहे. लवकर वैद्यांना बोलाव." गुणवंताबाई आत येत म्हणाल्या.


"आई!" मी उठायचा प्रयत्न केला आणि अचानक मस्तकात कळ गेली." सुभानराव पडून रहा.


वैद्य येतीलच आता.

" माझी आई आणि बायको जवळ उभ्या होत्या. वैद्य जवळपास धावतच आले. त्यांनी नाडी तपासली,जखमा बघितल्या आणि ते बोलू लागले,"जखमा फार खोल आहेत.


इतक्या खोल जखमा बांधल्या कोणी?" वैद्यांनी प्रश्न विचारला.


"त्ये लई मोठं वैद्य हायेत." खंडोजी पटकन बोलून गेला.वैद्यांनी जखमेवर बांधलेले कापड सोडले आणि ते पटकन मागे सरकले.


"खंडोजी खर सांग जखमा कोणी बांधल्या?" वैद्यांचा आवाज वाढला.


" शास्त्री बुवा काय झाले? असे काय आहे जखम बांधण्यात?" गुणवंता बाई म्हणाल्या." आक्कासाहेब,अशा प्रकारची जखम बांधता येते ती काळी जादू करणाऱ्या स्त्रियांना. त्यांचे अनेक समूह देशात आहेत. खंडोजी बरोबर काही लेप दिले आहेत का?" वैद्यांनी परत विचारले.आता मात्र खंडोजीने खरे सांगितले."शास्त्री बुवा काही काळजी करायची गोष्ट आहे का?" सगुणाबाई म्हणाल्या.


"ताई,ह्या जखमा बऱ्या करणे मला तरी अशक्यच होते. हीच औषधे यांना वाचावतील. पण औषधे देणारी लांब राहील याची काळजी घ्या." असे म्हणून शास्त्री निघून गेले.मला मात्र माझ्या जीव वाचवणाऱ्या आणि हृदय चोरणाऱ्या त्या लावण्यवतीला काहीही करून भेटायचे होते.श्रेयसने ते पान खाली ठेवले आणि सगळेजण शांत झाले.


"हे असे ब्लॅक मॅजिक असेल का आजी?" आश्लेषा म्हणाली.


"काही गोष्टी अनुभवाने कळतात आणि पटतात." इरावती बोलून गेली.


तेवढ्यात शालिनीताई सगळ्यांना शांत करत म्हणाल्या,"आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचे आहे. आजच्या पूजेने उत्सव सुरू होणार आहे. सर्वांनी तयारी करा."


सगळेजण तयारी करायला गेले.इकडे सारिका सम्राटच्या पाठलागावर होतीच. लोकेशन एका ठिकाणी थांबले. सम्राटची गाडी तिथेच होती. समोर एक मंदिर होते. सम्राट मात्र कुठे दिसत नव्हता. गाडीत कोणीही नव्हते. माने,शिंदे आणि सारिका उतरून मंदिराकडे चालत गेले.


मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ रक्त सांडलेले होते. गन हातात घेऊन सारिका आत गेली. समोर दोनजण मरुन पडले होते आणि मुख्य पुजाऱ्यांना बांधलेले होते.
सम्राट कुठे गायब झाला असेल? मंदिरात काय झाले असेल? सुभानराव सुगंधाला सोडू शकेल का?


वाचत रहा.शापित अप्सरा.


©®प्रशांत कुंजीर.🎭 Series Post

View all