शापित अप्सरा भाग 26

कस्तुरीचा सुगंध घेऊन ती आलीय.

शापित अप्सरा भाग 26



मागील भागात आपण पाहिले इरावती गाठोडे उचलते आणि एक भयंकर प्रकार घडतो. हॉस्पिटलमध्ये सम्राट आणि त्याच्या माणसांना बघून राघव एक अंदाज बांधतो. मुले धैर्यशीलला अनेक प्रश्न विचारतात. शालिनीताई मुलांना सगळे सांगायचे असा निर्धार करून घरी जायला निघतात. आता पाहूया पुढे.




"आक्का,तुम्हाला सगळे माहीत आहे महालाबद्दल?" राघवने गाडीत बसताच प्रश्न विचारला.


"तुम्हाला जेवढे माहीत आहे तेवढेच मला माहित आहे. परंतु सगळे सत्य कुठे शोधायचे ते मला सासूबाई जाताना सांगून गेल्या. इनामदार घराण्यात प्रत्येक सुनेला हे रहस्य सासू सांगते." शालिनीताई शांतपणे बोलत होत्या.



"आजवर महालात असलेली शक्ती बंदिस्त होती. आता ती बाहेर आली आहे. तिच्या ताकदीचा आपल्याला अंदाज नाही." राघव जरा चिंतेत होता.


"हो,इतकी वर्षे कैद असलेली ही शक्ती काय आहे याचे आधी उत्तर मिळायला हवे." शालिनीताई अधिक निर्धाराने बोलल्या.



"पण इन्स्पेक्टर सारिकाला का बोलावले तुम्ही? बाहेरच्या व्यक्तीला हे सगळे का सांगायचे?" राघवने शंका सांगितली.



"राघव,आजवर कधीच महालाच्या आत कोणी शिरले नाही. जीवावर उदार होऊन हे सगळे आत शिरले याचा अर्थ प्रकरण काही वेगळे आहे." शालिनीताई त्यांचा विचार मांडत होत्या.




"हो,तसा संशय मलाही आहे." राघव दुजोरा देत म्हणाला.


गाडी वाड्याच्या बाहेर थांबली. राघव आणि शालिनी वेगाने आत धावले. पाठोपाठ सारिका आणि श्रेयस दोघेही पोहोचले.



"धैर्य इरा कुठे आहे? तिला काही झाले नाही ना?" शालिनीताई आत येताच म्हणाल्या.



"सुदैवाने अजून जिवंत आहे ती." धैर्य कडवट सुरात म्हणाला.



"धैर्य,ती कायम सुरक्षित रहावी अशीच माझी इच्छा आहे." शालिनीताई दुखावल्या स्वरात बोलल्या.



"तसे असते तर तुम्ही तो महाल पाडून टाकायला हवा होता. म्हणजे प्रश्नच मिटला असता." धैर्यशील रागाने बोलला.



"धैर्य अरे हे सगळे इतके सोपे असते तर एवढ्या सगळ्यांचा बळी गेलाच नसता." शालिनीताई म्हणाल्या.



"पण ते सगळ नक्की आहे तरी काय? आजवर तिथे एक वाईट शक्ती आहे असेच सांगत आला तुम्ही. पण ही वाईट शक्ती नक्की काय आहे? ह्यावेळी तरी उत्तरे देणार का?" धैर्यशील नजर रोखत म्हणाला.


"आजी हा सगळा काय प्रकार आहे? नक्की काय आहे त्या महालात?" आशू पुढे येऊन म्हणाली.



"आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. त्यासाठी आजीच्या खोलीतील गाठोडे आणावे लागेल."शालिनीताई म्हणाल्या.


"ते गाठोडे मला सापडले आहे." श्रेयस पुढे झाला.


"काय? कधी सापडले?" राघव ओरडला.



"ते नंतर बोलू राघव. श्रेयस ते गाठोडे घेऊन ये. इरावती शुद्धीवर आल्यावर मी तुम्हाला सगळे सांगते." शालिनीताई श्रेयसकडे वळून म्हणाल्या.



हॉस्पिटलमध्ये माने आणि शिंदे दोघे पहारा देत होते. चौघांपैकी कोणीच शुध्दीवर आले नव्हते.सगळी सामसूम होती. अचानक सम्राटच्या कानात आवाज आला.


"उठ,मी वाट बघतेय तुझी. बैठक कधी घ्यायची." तो अत्यंत मधाळ आवाज ऐकून सम्राट ताडकन उठून उभा राहिला आणि सरळ चालायला लागला.



भाजलेले पाय जमिनीवर घासून रक्तबंबाळ झाले तरी तो हसत होता. तो वॉर्डच्या दरवाजाजवळ आला.


"माने तिकडे बघ. पकड त्याला लवकर." शिंदेने आवाज दिला.



भाजलेला चेहरा,रक्ताने माखलेले पाय अशा अवतारात सम्राट चालत होता.


"आम्ही येतोय सुगंधा. तुमच आवडीच अत्तर आन चंद्रकळा घिऊन." सम्राट बरळत होता.


"सम्राट,कुठ चालला? कोण सुगंधा?" माने त्याला पकडत बोलला.


"ती बघा तिकडे उभी सुगंधा. सोडा मला जाऊ द्या." सम्राट ओरडू लागला.


तोपर्यंत डॉक्टर आणि त्यांचे परिचारक धावत आले. चार जणांनी सम्राटला पकडले. डॉक्टरांनी त्याला झोपेचे इंजेक्शन देऊन कसेबसे शांत केले.


"डॉक्टर ह्या दाराला बाहेरून कुलूप लावून घ्या." शिंदेने विनंती केली.


डॉक्टरांनी त्याला संमती दिली. घडलेला प्रकार त्यांनी इन्स्पेक्टर सारिकाला फोन करून कळवला.



"इट्स अनबिलिवेबल!" सारिका फोन ठेवताच ओरडली.


"काय झाले इन्स्पेक्टर?" राघवने विचारले.


"सम्राट उठून चालत निघाला होता. कोणीतरी सुगंधा त्याला बोलावत आहे असे ओरडत होता." सारिका म्हणाली.


"काय नाव म्हणाला तुम्ही? सुगंधा? मलाही गेले काही दिवस स्वप्नात एक बाई दिसते सुगंधा नावाची." आश्लेषा पटकन म्हणाली.


"काय? कधीपासून? आशू तुझा विसावा वाढदिवस कधी आहे?" राघव मोठ्याने ओरडला.


"आफ्टर फिफ्टीन डेज. पण त्याचा काय संबंध?" आशूने विचारले.



"आशू जरा थांब. सगळे मी सांगणार आहे." शालिनीताई म्हणाल्या.



इरावती खाली चालू असलेली चर्चा ऐकून जागी झाली. पटकन तोंडावर गार पाण्याचे हबके मारले आणि फ्रेश होऊन ती खाली उतरली.



"इरा कशी आहेस तू? काय झाले होते?"धैर्यशील तिला हाताला धरून खाली बसवत होता.


"मी ठीक आहे दादा. पण सुरक्षमंत्र जपूनही दोन वेळा असे झाले आहे." इरावती त्याला म्हणाली.



"याचाच अर्थ सुरक्षामंत्र एवढेच हत्यार पुरेसे नाही." राघव पटकन बोलला.


"हो,आपल्याला आधी कशाशी लढायचे आहे ते माहीत करून घेऊ." राघव शालिनीताईंकडे बघून बोलला.



"श्रेयस ते गाठोडे उघड त्यातच सगळी रहस्य लपलेली आहेत." शालिनीताई म्हणाल्या.



"मी ह्यातील पहिले पान वाचले आहे. एक खूप सुंदर कविता होती." श्रेयस अपराधी भावनेत बोलत होता.



"काही हरकत नाही. पुढचे वाच आपल्याला उत्तरे भेटतील." शालिनीताई म्हणाल्या.


श्रेयसने गाठोडे उघडले. पहिले पान बाजूला ठेवले. त्याला एक प्रेमकहाणी किंवा तसेच काही अपेक्षित होते. मोडी लिपीतील ती पाने वाचायला श्रेयसने सुरुवात केली.


"आम्ही इनामदार घराण्याची मोठी सूनबाई गुणवंताबाई इनामदार. उभ्या पंचक्रोशीत आमच्याईतकी खुबसुरत कोणी नाही. आमचे माहेर तितकेच मातब्बर जेवढे सासर. माहेरी हट्टाने भावांच्या सोबत मोडी लिहायला आणि वाचायला शिकले. तलवार चालवायला शिकले इतकेच नाही तर राजकारणाचे धडेही गिरवले.



इनामदार घराण्यात आम्ही सून म्हणून आलो आणि वैभवाची शिखरे गाठली गेली. चार चिरंजीव,तीन कन्या आणि पराक्रमी भ्रतार असे आकंठ सुखाने भरलेले आयुष्य आमच्या वाट्याला आले होते.



आमचे थोरले चिरंजीव सुभानराव म्हणजे मूर्तिमंत मदनाचा पुतळा. आमचे सौंदर्य आणि पित्याचा पराक्रम असा दुहेरी संगम असलेले सुभानराव. आमच्या ज्येष्ठ बंधूंची कन्या सगुणाबाई हिला आम्ही स्नुषा म्हणून पसंद केली.



पुढे आपल्याला सगळी सत्ता सांभाळायला रक्ताचा भागीदार हवा. मोठ्या घराण्यात अनेक काळी रहस्य असतात ती सांभाळायला विश्वासाचे कोणीतरी हवे.



सगुणाबाई आल्या आणि आम्हाला ही साजगावची जहागिरी मिळाली. दोन गोंडस नातवंडे झाली. असा सुखाचा संसार चालू होता. एक दिवस आम्ही वामकुक्षी घेत असताना सगुणाबाई आल्या.



"आक्का,शेवटी इनामदार घराण्याच्या पुरुषांना स्त्रीचे शरीर हवे. ते सुंदर असेल तर त्यांना भान रहात नाही हेच खरे." तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता.


"सूनबाई आपला वकूब विसरू नका. कोणासमोर आणि काय बोलताय तुम्ही?" रागाने माझे संपूर्ण अंग थरथरत होते.



जर माझ्या वारस सूनांपैकी कोणी ही चोपडी वाचत असेल तर ह्या गाठोड्यात मी लिहिलेले जसे आहे तसेच काही आणखी तीन माणसांनी लिहिलेले सुद्धा आहे.



सुभानराव,धोंडो शास्त्री आणि ती! ती कोण? पुढे सुभानराव याचे उत्तर देतीलच."


खाली फराटेदार मोडी लिपीतील सही आणि मोहोर होती. श्रेयस वाचायचे थांबला.





"इनामदार घराण्यातील पुरुषांनी सौंदर्य आणि त्याबाबत दाखवलेली आसक्ती ह्यामुळे आम्हा स्त्रियांना कायम शापित जीवन जगावे लागले आहे." शालिनीताई रागाने थरथरत होत्या.



"आक्का,पुढचे वाचू का?" श्रेयस मृदू आवाजात म्हणाला.


शालिनीताई मानेनेच हो म्हणाल्या.



"सरकार थांबा की आजची रात." आपली निमुळती बोटे आमच्या छातीवर घासत कमळा चाळा करत होती.


"एकदा चुरगळलेले फुल परत पहात नसतो आम्ही." मी टेचात बाहेर पडलो.



आजही माझे पुरुषी सौंदर्य जिंकले होते. चार पाच महिने मोहिमेवर घालवल्यावर असा श्रम परिहार हवाच. खंडोजी निघायची तयारी करा. आम्ही जरा जगदंबेचे दर्शन घेऊन येतो. मागे वळूनही न पाहता मी बाहेर पडलो.



मिशीला पीळ घालत बाजारातून जाताना अनेक कुलीन स्त्रियादेखील वळून बघत असत. मी डौलाने चालत मंदिराकडे निघालो. एखादा मस्तावाल वनराज चालत जाताना आपोआप सगळे बाजूला होतात तसेच आताही घडत होते आणि माझा अहंकार सुखावत होता.




देवीला चढवायचे ताट घेऊन खंडोजी मागे चालत होता. आपल्याच मस्तीत मी चालत असताना अचानक एक सुगंधी झुळूक आमच्या अंगावरून पुढे निघून गेली.



पाठमोरी असतानाही तिच्या चालीतला डौल लपत नव्हता. तिला गाठावे म्हणून आम्ही गती वाढवली. गाभाऱ्यात आम्ही आत आणि ती बाहेर असा प्रसंग आला. आमच्याकडे नजरही न टाकता आपला डोक्यावरचा पदर सांभाळत ती निघून गेली.



जाताना तोच कस्तुरी सुगंध मागे ठेवून. सोबत आमचे दिल मात्र घेऊन गेली त्याच कस्तुरी सुगंधात कैद करून."




पान संपले आणि श्रेयस थांबला.


"श्रेयस आता जरा थांबा. आपण सगळेच जरा विश्रांती घेऊन मग जेवण झाल्यावर वाचन करू." शालिनीताई असे सांगून उठल्या.


पाठोपाठ सगळेजण आपापल्या खोलीकडे निघाले. श्रेयसने नाईलाजाने तो कस्तुरी सुगंधाचा मोह आवरून चोपडी बंद केली.



कोण असेल ही सुगंधी अप्सरा? गुणवंता बाईंच्या सत्तेला,अभिमानाला ठेच पोहोचेल का? ह्याचा काय संबंध असेल इरावती आणि आश्लेषा बरोबर.


वाचत रहा.


शापित अप्सरा.


©®प्रशांत कुंजीर


🎭 Series Post

View all