शापित अप्सरा भाग 23
मागील भागात आपण पाहिले की खुनाचे सत्र थांबत नाहीय. धैर्यशील मुलांना घेऊन वाड्यात पोहोचला आहे. राघवदेखील त्याच्या बरोबर आहे. आता पाहूया पुढे.
"कुंदा,कुंदा लवकर बाहेर ये." शालिनीताई ओरडल्या.
त्याबरोबर कुंदा बाहेर धावत गेली. त्यांनी कुंदाकडे सगळे सामान सोपवले आणि त्या हातपाय धुवून आल्या. आत येताच समोर धैर्यशील दिसला. आपला पंचवीस वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला मुलगा समोर पाहून मनात अनेक भावना उचंबळून आल्या. वाटले धावत जाऊन त्याला मिठी मारावी. परंतु त्याची थंड नजर बघून शालिनीताई जागेवर थांबल्या.
"आजी,कशी आहेस तू?" आश्लेषा पटकन पुढे झाली.
अभिजीत मागेच उभा होता.
"अभी,तू नाही आजीला भेटणार?" शालिनीताई म्हणाल्या.
तसे दोघेही धावत जाऊन त्यांना बिलगले. आज कितीतरी वर्षांनी प्रेमाचा,मायेचा स्पर्श त्यांच्या देहाला झाला होता.
"पोरांनो,साडी बदलून आले. मस्त गरमगरम पोळ्या करून वाढते." शालिनीताई आत गेल्या.
"काही म्हण इरा पण तिच्या हातच्या पोळ्या जगात कुठे नाहीत." धैर्य हळूच डोळ्यांच्या कडेला आलेले पाणी परतवत बोलला.
तोपर्यंत कुंदा गरम पोळी घेऊन आली होती.
"दादा,गेल्या पंचवीस वर्षात किती बदल झाला नाही?" नयना म्हणाली.
"हो,पण काही गोष्टी तशाच आहेत. जसे आईच्या हातची पोळी." धैर्य हसून बोलत होता.
राघव आणि अमेय शांतपणे गप्पा ऐकत होते. तेवढ्यात इरा म्हणाली,"शास्त्री कुठे भेटले तुम्हाला?"
त्यावर सगळे एकदम गप्प झाले.
"आत्तू,वाटेत यांची गाडी खराब झाली होती." आशूने उत्तर दिले.
नंतर हास्यविनोद करत जेवण झाले आणि सगळे झोपायला गेले.
सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आणि आशू,अभी जागे झाले. आशुने खिडकी उघडली. समोर पसरलेली हिरवीगार शेते,झाडे,कौलारू घरे आणि दूर दिसणारा भव्य इनामदार महाल.
"अभी,आपण आज गावात फिरायला जायचे का?" आशूने विचारले.
"बट आशू,आपल्यासोबत कोणीतरी असायला हवे. अनोळखी ठिकाण आहे." अभीने उत्तर दिले.
"कम ऑन अभी,न्यूयॉर्कमध्ये पबला जायला नाही वाटत तुला भीती?" आशू चिडवू लागली.
"बर,जाऊ पण इथून कोणीतरी सोबत घेऊ गाईड म्हणून." अभीने सहमती दर्शवली.
"डॅड,आम्ही गावात फिरून येऊ का?" आशू चहा घेताना म्हणाली.
"नाही हा! आधी आक्काला विचारा." थालीपीठ घेऊन येणारी नयना पटकन बोलली.
"असे काय करते आत्तू,आम्हाला गाव बघायचे आहे." अभी नाराजीने म्हणाला.
नयना बोलणार इतक्यात धैर्यशीलने उत्तर दिले,"आधी खाऊन घ्या. मग कोणालातरी सोबत पाठवू."
इतक्यात इरावती आवरून खाली आली. राघव आणि श्रेयस दोघांचा पत्ता नव्हता. सगळेजण गप्पा मारत असताना बाहेरून गडी आला.
"आक्का कुठ हायेत?" त्याने घाबरून विचारले.
"काय झाले? कोण आलेय बाहेर?" इरावती उठून म्हणाली.
"त्ये माने हवालदार हाय." गडी हळूच म्हणाला.
"एवढेच ना? पाठव त्यांना आत." इरावती हसून बोलली.
थोड्याच वेळात माने आत आला. त्याला पाहताच धैर्य ओरडला,"उम्या तू? पोलिसात कधी गेलास?"
समोर इरावती आणि धैर्यशील दोघांना पाहताच माने अवघडून उभा राहिला. इरावती आणि तो एकाच वर्गात होते.
"उमेश तू उभा का? कुंदा जा चहा घेऊन ये." इरावती सहज आवाजात बोलत होती.
"नको,इथे असे बसायची सवय नाही." माने हळू आवाजात बोलला.
"अरे ते इतर वेळी. आता आम्ही मित्र म्हणून सांगतोय." धैर्यने त्याला हाताला धरून खाली बसवले.
तोपर्यंत शालिनीताई बाहेर आल्या. त्यांना बघताच माने उभा राहिला.
"अरे बस. आता काही मी आमदार नाही." शालिनीताई हसल्या.
"आक्का,खालच्या आळीतली पिंकी आणि पलीकडच्या गावातला एक पोरगा दोघांचा खून झाला आहे. सारिका मॅडमनी महाल उघडायची परवानगी मागणारा अर्ज दिला आहे." माने एका दमात बोलून गेला.
"काय? अशक्य आहे हे." राघव जोरात ओरडला.
"हे बघा माने तुमच्या मॅडमना मी एकदा समजावले आहे. काहीही झाले तरी परवानगी मिळणार नाही."शालिनीताई शांतपणे सांगत होत्या.
"आक्का,मीसुद्धा त्यांना समजावले परंतु तुम्ही परवानगी दिली नाही तर त्या कोर्टातून परवानगी आणतील." माने हताश स्वरात उद्गारला.
"ठीक आहे,त्यांना जर तेच करायचे असेल तर करू देत." शालिनीताई नाईलाजाने बोलल्या.
माने अर्ज देऊन निघुन गेला.
"आजी,असे काय आहे त्या महालात?" आशू उत्सुकतेने विचारत होती.
"आशू,काही रहस्ये इतिहासाच्या उदरात बंद असणे सर्वांच्या हिताचे असते." धैर्यशील मध्येच म्हणाला.
"बर ते जाऊ देत. आम्हाला सगळा गाव फिरून पाहायचा आहे." आशूने आजीकडे बघत विचारले.
"ठीक आहे. कुंदा येईल तुमच्याबरोबर." शालिनीताई म्हणाल्या.
"धैर्यशील,इरा आपल्याला देवळात जायचे आहे. आठ दिवसांनी कार्यक्रम आहे. नियोजन करण्यासाठी आपल्याला आमंत्रण आहे."शालिनीताई म्हणाल्या.
"मी त्या बाईचे तोंड बघू इच्छित नाही." इराने उत्तर दिले.
"धैर्य निदान तू तरी सोबत असावे." शालिनीताई त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होत्या.
त्याने होकारार्थी मान डोलावली.
"तुमची काही हरकत नसेल तर मला सोबत यायला आवडेल." राघव मध्येच म्हणाला.
"अरे,महादेव शास्त्रीनंतर तूच देवीचा पुजारी झाला असतास. तुझ्यासाठी मंदिर कायम उघडेआहे."शालिनीताईंनी परवानगी दिली.
इरावती तिच्या खोलीत आली. समोर पमा आत्याची डायरी होती. आता सगळे घराबाहेर पडणार होते. डायरी निवांत वाचणे शक्य होते. तिने डायरीचे पहिले पान पालटले.
"माझ्या आयुष्यातील अशा गोष्टी ज्या अगदी माझ्या आई बाबांना देखील माहीत नाहीत त्या इथे लिहीत आहे. कारण यातून मी वाचणार नाही. परंतु माझ्यानंतर येणाऱ्या पिढीतील इनामदार घराण्यातील मुली ह्या शक्तीशी लढून तिला आणि मला न्याय मिळवून देऊ शकतील.
आजच्या जगात असे काही असेल याच्यावर माझा गेली वीस वर्ष विश्वास नव्हता. परंतु विसाव्या वाढदिवशी आईने माझ्यासाठी हिऱ्याचा हार आणला.
तो माझ्या गळ्यात घालत असताना आई म्हणाली,"पमा,मानेवर हे काळे डाग कसले?"
आई असे म्हणताच मी पटकन छोटा आरसा मागे धरला. कालपर्यंत माझ्या मानेवर एकही डाग नव्हता.
"आई,अग अचानक उमटले आहेत. अलर्जी वगैरे असेल."
तो विषय वाढदिवसाच्या समारंभात विरून गेला. एखाद्या राजकन्येला लाजवेल असा वाढदिवस झाला. समारंभ आटोपून मी खोलीत आले.
आज मी खूप आनंदी होते. मन सुखाने अगदी तृप्त झाले होते.
"पमा,सुखाचा प्याला भरला आता शापाच्या विषाकरिता तयार रहा." तो भयंकर आवाज माझ्या कानात खुसपुसला.
मी झटकन मागे वळून पाहिले तिथे कोणीही नव्हते. मला भास झाला असेल असे समजून मी दागिने उतरवत आरशासमोर उभी होते.
अचानक आरशात माझ्याजागी दुसऱ्याच एका अप्रतिम सुंदर स्त्रीचा चेहरा दिसू लागला. मी तिच्याकडे मंत्रमुग्ध होऊन बघत राहिले.
अचानक तिच्या चेहऱ्यावरील कातडी जळून ओघळू लागली. जळालेल्या मांसाचा वास सगळ्या खोलीत पसरला.तिच्या गालावरची हाडे जळालेल्या त्वचेतून दिसत होती. ओठ ओघळले होते.
तरी खोबणीत असलेले तिचे डोळे रोखून ती म्हणाली,"इनामदार घराण्यातील मुली कायम शापित अप्सरा आहेत लक्षात ठेव."
हे भयंकर दृश्य बघताना माझ्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली. डायरीचे पान संपले आणि इरावतीचे अंग भीतीने थरथरत होते.
पुढचे पान उलगडणार एवढ्यात तिला खालून नयनाने हाक मारली. इरावतीने घाबरत ती डायरी बंद केली आणि खाली जायला निघाली.
सम्राटला मेलेली मुलगी मृण्मयी नाही ही बातमी समजली आणि तो संतापाने वेडापिसा झाला.
"हरामखोर,एक पोरगी संपवता येत नाही तुम्हाला."तो प्रचंड चिडला होता.
तेवढ्यात त्याचा एक माणूस पुढे झाला.
"भाई,पाठीमागून त्यासारख्या दिसत व्हत्या. आन हातावर गोंदण व्हत."
तसा सम्राट आणखी चिडला,"भाड्या,पण थोबाड बघायच्या आधीच तिथून पळून का आला?"
त्यावर सगळे गप्प बसले.
"आर बोल की? आता का दातखीळ बसली." सम्राट संतापाने ओरडला.
"भाई,तिला मारून थोबाड बघायला जात व्हतो. पर इनामदार महालात ती उभी व्हती. उभी पेटलेली आन आमाला म्हणली,"फूड आलास तर जित परत जाणार न्हाई." दुसऱ्या एकाने उत्तर दिले.
"मला शेंड्या लावता व्हय रे." सम्राटने त्याला कानाखाली वाजवली.
"नाय भाई,तिथं खरच ती हाय." गाल चोळत तो म्हणाला.
"अस,चला आजच बघू. त्या महालात घुसू. साला तो ग्रंथ तिथच कुठतरी आसल." सम्राट ओरडला.
"भाई,पण तिथ जाऊन इशाची परीक्षा कशाला घ्यायची?" एकजण घाबरला.
"अय, चड्डीत***का काय? राती न्हाय,आता दिवसा घुसू मागच्या बाजूने चला." सम्राट बाहेर पडताच त्याच्यामागे नाईलाजाने त्याचे चार खास पंटर बाहेर पडले.
माने कॉन्स्टेबल परत आले.
"मॅडम,त्यांनी परवानगी नाकारली." सारिकाला अपेक्षित उत्तर आले.
"ठीक आहे. आपण वर अर्ज करू आणि कोर्टातून ऑर्डर आणू."शिंदे म्हणाले.
"नाही,त्यात खूप वेळ जाईल. तोपर्यंत कितीतरी बळी जाऊ शकतात." सारिका चिंतेत होती.
"मग यावर उपाय काय?" माने म्हणाला.
"आपण रात्री महालात घुसू." सारिका दोघांकडे बघत म्हणाली.
"पण मॅडम,त्या महालात शिरणे चूक तर नाही ना?" शिंदे जरा घाबरला.
"नाही,आज रात्री मिशन इनामदार महाल." सारिका म्हणाली.
"मॅडम,तुमचा विचार पक्काच असेल तर रात्री नको. आपण दिवसा जाऊ."माने विनंती करत होता.
"ठीक आहे. चला मग मिशन इनामदार महाल." सारिका बाहेर पडलीसुद्धा.
सम्राट आणि सारिका महालात जाऊ शकतील का? पमा आत्याच्या डायरीतून इरावतीला काही मदत मिळेल का? इनामदार घराण्याला शाप कोणी दिला?"
वाचत रहा.
शापित अप्सरा.
©®प्रशांत कुंजीर.