शापित अप्सरा भाग 16

शापाचा भोवरा पुन्हा गरगर फिरणार का?
शापित अप्सरा भाग 16


मागील भागात आपण पाहिले की साजगावला जाताना गाडी एका ठिकाणी बंद पडली. तिथे एका अमानवी शक्तीने श्रेयसला मारायचा प्रयत्न केला. परंतु मल्हारी नावाच्या एका माणसाने त्याला वाचवले. आता पाहूया पुढे.


"मिस्टर देशमुख,तुम्ही ठीक आहात ना?" इरावती घाबरून श्रेयसला विचारत होती.

आपल्याबरोबर काय झाले हे श्रेयसला आता जाणवले होते. हा सगळा प्रकार इतका धक्कादायक आणि अविश्वसनीय होता की श्रेयस अजूनही सावरला नव्हता.

"देशमुख,तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का?" इरावती पुन्हा एकदा मोठ्याने ओरडली तेव्हा श्रेयसने होकारार्थी मान डोलावली.


सगळेजण तिथे असलेल्या शांत प्राचीन मंदिराच्या सभागृहात बसले. पक्या श्रेयस जवळ बसून होता. थोड्या वेळाने सगळे जरा सावरले.

"श्रेयस थोडे खाऊन घे. तुला बरे वाटेल." नयना त्याला म्हणाली.

सगळेजण जेवायला बसले. थालीपीठ,लोणी,कोरड्या चटण्या,पुलाव असा मस्त डबा नयनाने आणला होता. श्रेयसने मोठा घास खाल्ला आणि त्याला ठसका लागला.


"पद्मनाभ अरे कितीवेळा सांगितले जरा हळू खात जा." इरावती पाण्याचा ग्लास धरत पटकन बोलून गेली.


"काय म्हणालात? पद्मनाभ?" श्रेयस ठसका लागला असतानादेखील बोलला.


"देशमुख पाणी घ्या. पुढे काही बोलू नका." इराचा आवाज चढला.

शांत मंदिराच्या आवारात जेवण केल्यावर सगळेच जरा सावरले.


"पक्या,त्या बाबांनी हे दिलेय ते जरा गळ्यात बांध माझ्या." श्रेयसने पक्याला काळ्या धाग्यात बांधलेला टाक दिला.


"सायेब, आव खंडोबाचा टाक हाय ह्यो. ह्यान इडापिडा लांब राहते."पक्या त्याच्या गळ्यात टाक बांधू लागला.

थोडा वेळ आराम केल्यावर इरावती आणि श्रेयस दोघांचेही लक्ष त्या प्राचीन मंदिराकडे गेले.


जवळपास हजार वर्षे तरी जुने असणारे हे मंदिर होते. त्यातील काही ठिकाणी बहुतेक मुघल काळात तोडफोड झाली होती. मंदिराच्या बाहेर काही मुर्त्या आणि दगड इतस्त पडले होते. इरावती ह्या मंदिरात कधीच आली नव्हती. इथे फक्त धनगर समाजातील लोक देवीची पूजा करायला येत असत.


ह्या देवराई बाबत बऱ्याच गोष्टी पसरलेल्या असल्याने लोक इथे यायचे टाळत असत. श्रेयस आजूबाजूचा परिसर फिरून पहात असताना काही ठिकाणी त्याला मंत्र आणि चिन्हे कोरलेली दिसू लागली. त्याने लगेच फोन काढला आणि फोटो घेऊ लागला. उलट इरावती भराभर स्केच काढत होती. दोन वेगवेगळ्या पिढीतील पुरातत्व संशोधक आणि त्यांच्या पद्धती यातील फरक स्पष्ट दिसत होता.


जवळपास तीन चार तास होत आले होते. तेवढ्यात नयनाला लांबून महादेव येताना दिसला.



"चला,गाडी नीट झाली." महादेव येताच म्हणाला.


"महादेव खाली बस. नयना त्याला जेवायला दे." इरावतीने फर्मावले.


नयनाने डबा समोर ठेवला."अग डबा काय ठेवतेस समोर,त्याला वाढ जेवायला.


" इरावती म्हणाली."ताई,मला सगळ आवरायच आहे. तसेही डबा उघडण फार कठीण नाही."नयना नाक मुरडत म्हणाली.


"ताई, माझ हात काय मोडल नाय." महादेव उभ्याने डबा उघडत असताना डबा पायावर पडला.


नयना पटकन पळत आली. त्याच्या पायावर पडलेला डबा घेतला. प्लेटमध्ये सगळे वाढले आणि समोर ठेवले.


"एक काम धड करत नाही. लागल असत म्हणजे." नयना रागावली. महादेवने थोडे खाऊन घेतले आणि सगळे टेकडी उतरून खाली आले.


उन्हे उतरायला लागली होती. गाड्या सुरू झाल्या. गाव जवळ येऊ लागले तसे इराची अस्वस्थता वाढत होती. गाडीने एक सफाईदार वळण घेतले आणि गावाबाहेर असलेले इनामदार घराण्याच्या कुलदेवीचे मंदिर दिसू लागले. विलक्षण देखणे असलेले ते मंदिर सांजेच्या प्रकाशात आणखी सुंदर दिसत होते. मंदिराच्या आसपास वस्ती झालेली दिसत होती.


"नयना,आजूबाजूला किती घरे झाली आता. आपल्या लहानपणी इथे काहीच नव्हते." इरावती नयनाला म्हणाली.


"हो ना! रात्र झाल्यावर वेशीतून कोणी मंदिराच्या आजूबाजूला येत नसे. आता मात्र थोड्या दूर घरे झालेली दिसत आहेत." नयना म्हणाली.


"महादेव गाडी मंदिराकडे घे." इरावतीने सांगितले.


पूर्वी टेकडीच्या खाली गाड्या लावून पायी जावे लागायचे आता मात्र वरपर्यंत रस्ता झालेला दिसत होता. टेकडी रस्त्याच्या सुरुवातीला फलक होता. आदरणीय आमदार शालिनीताई इनामदार यांच्या निधीमधून. फलक वाचून इरावती हसली. आई जवळपास पंधरा वर्षे आमदार होती. नंतर मात्र तिने राजकारण सोडून दिले. अन्यथा आज नक्कीच ती मंत्री झाली असती. विचाराच्या झोक्यात इराचे मन हिंदोळे घेत होते तेवढ्यात गाडी थांबली.



इरावती खाली उतरली आणि तिला वाटले आता समोरून राघव शास्त्री चालत येतील. डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतील. आत्याचा जीव वाचवू न शकलेल्या महादेव शास्त्रीनी इरावतीचे आयुष्य वाचवले होते. अपुरे का होईना पण तिला जिवंत ठेवले होते. आजची इरावती इनामदार जिवंत होती कारण महादेव शास्त्री. इराचे डोळे त्यांच्या आठवणीने भरून आले. तिने नकळत कळसाकडे बघत हात जोडले.


"किती सुंदर मंदिर आहे. एक सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे इथे." श्रेयस पटकन बोलून गेला.


"श्रेयस,मी आणि इरावती इथेच खेळत लहानाच्या मोठ्या झालो." नयना म्हणाली.


"काय? तुम्ही खेळायचा?" श्रेयसने डोळे मोठे केले.


"देशमुख पुरे,चला आता मंदिरात." सगळेजण आत दर्शन घेऊन आले.


तेवढ्यात एका मुलीने श्रेयसला आवाज दिला,"ओ सायेब टाटू काडणार काय?"


श्रेयस हसून तिच्याजवळ गेला.

"तुला येतो का टॅटू काढता?" त्याने विचारले.


"मला न्हाय येत,माझा बा,माय आन आजी काढत्यात." मुलीने हसून सांगितले.

तेवढ्यात इरावती आल्याने श्रेयस तिकडून निघाला.


भव्य वेशीतून गाड्या आत शिरल्या. लांबुनच इनामदार वाडा दिसू लागला. एकेकाळी इरावती वाड्यात आली तेव्हा रत्नमालाबाई तिच्याशी एकही शब्द बोलल्या नव्हत्या. त्याच रत्नमालाबाई पमा आत्या गेल्यावर तिला कुशीत घेऊन ओक्साबोक्शी रडल्या होत्या. त्यांनी जीवाचा आटापिटा करून इराला वाचवले होते.


इरावती विचार करत असतानाच वाड्याच्या दरवाजाजवळ गाडी थांबली. गाडीतून बाहेर पडताच इरावती बघत होती. वाड्याचे बाह्यरूप अजूनही तसेच होते.


"कुंदा,ओवळणीचे ताट आण." शालिनीताई बाहेर आल्या.

पंचवीस वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्या इरावतीला परत आत घेताना शालिनीताईंचे डोळे भरून आले होते.


"इरा,कशी आहेस?" आईच्या आवाजाने इरा भानावर आली.


"ठीक?" इतके कोरडे उत्तर देऊन इरावती आत आली.


तेवढ्यात शालिनीताईंचे लक्ष श्रेयसकडे गेले. त्याला बघून त्या आनंदी झाल्या.


तेवढ्यात इरावतीचा आवाज आला,"नयना,सगळ्यांना खोल्या दाखव. फ्रेश व्हायला हवे प्रवास खूप झाला आहे."


नयना आत निघून गेली.

ही शापित अप्सरा इथून जिवंत गेली होती. आता पुन्हा तो शाप इराच्या जीवावर बेतू नये. नुसत्या विचाराने शालिनीताईंच्या अंगावर काटा आला.


तेवढ्यात पक्या ओरडला,"सायेब ते पोस्टर बघा."


श्रेयस मागे वळला. सौदामिनीच्या कार्यक्रमाचे पोस्टर होते. त्यावर असलेली सौदामिनी हुबेहूब इरावतीसारखी दिसत होती. श्रेयस पक्याला आत घेऊन गेला. शालिनीताई मात्र पोस्टर बघून नाराज झाल्या. आपल्या वाड्याच्या समोर आज लावलेले पोस्टर पाहून त्या चिडल्या. त्यांनी ताबडतोब पोस्टर तिथून काढायची व्यवस्था केली.



इरावती आत जाताना थबकली. माडीवर पमा आत्या तिच्याकडे बघून हसत असल्याचा भास झाला.


"जी अवस्था तिची झाली तीच तुझी होणार." तोच थंडगार आवाज इराच्या कानात कुजबुजला.


इरावती मागे वळणार तेवढ्यात तिला नयनाने हाक मारली आणि ती तिच्या खोलीकडे गेली. आत गेल्यावर इरावती थक्क झाली. पंचवीस वर्षांपूर्वी ती सोडून गेलेली खोली आजही इराच्या आवडीप्रमाणे सजवली होती. जणू काळ त्या खोलीत पुढे सरकलाच नव्हता.



शालिनीताई स्वयंपाकघरात गेल्या. आज कित्येक वर्षांनी त्या स्वतः स्वयंपाक बनवणार होत्या. धैर्यशील आणि इरावती बाहेर पडल्यावर त्यांनी स्वतः ला राजकारणात झोकून दिले. पण गेले दहा वर्षे तेही सोडून त्या फक्त इनामदार वाड्याची देखभाल करत होत्या. आज छान इरावतीच्या आवडीचा बेत करायचा होता. त्या असे ठरवत असताना नयना खाली आली.


"आक्का,मी काही मदत करू का स्वयंपाकात?" नयनाने विचारले.


"अगदी आईच्या वळणावर गेलीस. रखमा अशीच कायम कामाला तत्पर. तुझा ध्यास घेऊन गेली. जाताना म्हणाली आक्का,माझ्या नयनाला सांभाळा." शालिनीताई भरभरून बोलत होत्या.


गेले कित्येक वर्षे त्यांच्या आत साचून राहिलेली माया,प्रेम सगळे सगळे त्यांना उधळून द्यावेसे वाटत होते.



इरावती खोलीत उभी होती. पुन्हा एकदा त्या सगळ्या प्रकाराला सामोरे जावे लागले तरी चालेल पण आश्लेषा वाचायला हवी. तिला असे अपुरे जीवन जगू द्यायचे नाही. इराच्या चेहऱ्यावर निर्धार अधिकाधिक दृढ होत होता.


इरावती वाचवू शकेल का स्वतः ला आणि आश्लेषाला? खुनाच्या सत्रांचा ह्या सगळ्याशी काय संबंध असेल?


वाचत रहा.


शापित अप्सरा.


©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all