Jan 26, 2022
नारीवादी

शापित अग्निभोग

Read Later
शापित अग्निभोग
शापित अग्निभोग

त्या दोघींना ही ती माणसं शोधत होती... त्या दोघीही स्वतःचा जीव वाचविण्यासाठी लपून बसल्या होत्या.... नेमकं काय झालं होतं??

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही...

कुसुम आणि पुष्पा... दोघीही एकाच गावच्या ....एकाच गावातल्या पण वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या बायका....  अगदी साध्या आणि साधारण दिसणाऱ्या.. चारचौघींसारख्या.... ...सामान्य कुटुंबातल्या..

कुसुम तिचा नवरा आर्मी मध्ये होता...वर्षातून फक्त २ महिने सुट्टीवर यायचा...लग्नाला दोन वर्ष होऊन गेली होती.... सगळ कस आलबेल होतं... घरोघरी मातीच्या चुली तसं इथही सासू ची बोलणी तिचा त्रास होताच...पण त्या वेळी ते सगळं सामान्य समजलं जायचं .. उलट एखादीला सासूचा त्रास नसेल तर त्या सुनेला वांड ठरवलं जायचं....पण कुसुम आहे त्यात समाधान मानणारी आणि जगण्यावर प्रेम करणारी स्त्री होती... आपला नवरा देशासाठी लढतो...याचा तिला सार्थ अभिमान होता...दहा महिने त्याच्या सोबत जे दोन महिने घालविले त्या आठवणीत...आणि त्याच्या पत्रांची वाट पाहण्यात ... ती पत्र वाचण्यात जायचे...असेच आयुष्य जात होते.. सगळं कसं निवांत चालू होतं नेहमीसारखं...

दुसरीकडे पुष्पा ही एका शेतकऱ्याची बायको...दहा वर्षाचा संसार... पदरात दोन मुले ....... जेमतेम कमाई . .. पावसाच्या जीवावर होणारी शेती... त्यावर चालणारा संसार... काटकसरीने संसार करणारी.. शेतात नवऱ्या सोबत काम करणारी... घरात जातीने लक्ष घालणारी अशी पुष्पा जितकी खंबीर तितकीच मानी... शेतकरी नवऱ्याचा तिला ही अभिमान होता... कष्ट करून मातीतून सोनं पिकवणारा तिचा नवरा तिला देवासारखा च वाटायचा... तिच्या घरात ती सुखा समाधानात नांदत होती...

पण नियती ने या दोघींच्या नशिबात काय वेगळचं वाढून ठेवलं होतं ...कदाचित साधं सोप्पं आयुष्य वाट्याला आलेलं म्हणून की काय...त्यांचं पुढचं आयुष्य वेगळंच वळण घेऊन पुढे गेलं...अनिंत्या वळणासोबत त्यांनाही.....

त्या दिवशी कुसुम खूप आनंदी होती.. तिला तिच्या आयुष्यातलं सगळ्यात गोड गुपित कळलं होत... जे गुपित राहणार नव्हतं... ज्या गोष्टीची ती वाट पाहत होती ती तिला जाणवली..

होय....!! ती आई होणार होती......तिला घरात बागडायला येणाऱ्या त्या दोन इवल्या पावलांची चाहूल लागली होती... ती खूप आनंदी होती...तिला सर्वात आधी ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगायची होती... जो या बातमीसाठी आतुरतेने वाट पाहत होता...
कारण
दोन वर्ष झाली लग्नाला तरी गोड बातमी मिळेना म्हणून त्याचे आई वडील... सासू सासरे....पाहुणे...मित्र मंडळी... आस पासची सगळी त्या बद्दल चर्चा करायची..त्याला व तिला खोदून खोदून विचारायची...त्याला आता त्यांच्या प्रश्नांना तोंड द्यायला नको झाले होते...म्हणून त्यानेही तिला बोलून दाखवले होते.... तो म्हणाला होता...

."कुसुम ..आपल्याला ही आता तुझ्यासारखी एक गोंडस...कणखर खंबीर मुलगी हवी... मला माहित आहे आई तुला खूप बोलते... पण तू खरंच खूप समजूतदार आणि तेवढीच कणखर आहेस... तिला कधी उलट बोलत नाहीस पण चुकत ही नाहीस...सगळं करतेस... आणि ते ही चेहऱ्यावर हसू ठेवून.... तुझ्यासारखी मुलगी असावी असच वाटत बघ मला...! कुसुम!!"

पण ती मात्र त्या परिस्थिती मध्ये ही त्याला हेच बोलली...." अहो ... मला माहित आहे..तुम्हाला मुलगी हवी आहे... पण सासूबाई ना मुलगाच हवा आहे... नाहीतर सगळे खूप बोलतील...माझं काय नाही... आपल बाळं सुखरूप या जगात येऊ दे एवढंच.... त्याची चाहूल कधी लागते असं झालंय मला... अहो... तुम्ही याल ना तेव्हां..!! वचन द्या मला...!!"

आणि त्याने तिला वचन दिले होते...जेव्हा तू ही खबर कळवशील त्याच्या महिनाभरात मी हजर होईन...

तिने त्याला तार धाडली..."तुम्ही बाबा होणार"
हे फक्त तिला माहित होते फक्त तिलाच.... तिला आत्ता एक महिना झाला होता...

दुसरीकडे पुष्पा च ही सगळं ठीकच चाललं होतं ...

महिना निघून गेला....

एके दिवशी सकाळी ....अचानक पुष्पाच्या नवऱ्याला भोवळ आली आणि तो रानात पडला... ती लांब होती... थोड्या वेळाने जेव्हा तिला तो पडलेला दिसलं तशी ती धावत धावत त्याच्या जवळ गेली....त्याला उठवायचा प्रयत्न केला पण त्याला शुद्ध आली नाही... तिने आरडा ओरड केला...बाजूची माणसं आली....आणि त्याला डॉक्टर कडे नेलं...डॉक्टर कडे नेऊ पर्यंत उशीर झाला होता... डॉक्टर ने तो कधीच गेला हे सांगितलं... तसं सगळं संपलं.. पुष्पा चां आधारवड कोसळला....एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं....म्हातारे आई वडील... दोन मुले आणि बायको ला टाकून तो निघून गेला.....

तिकडे पुष्पा चां संसार ढासळला आणि इकडे...त्याचं दिवशी...

कुसुम च्या आनंदाला ही दृष्ट लागली...सुट्टीवर येणारा तिचा नवरा.... तिरंग्यात गुंडाळून आला..आणि तिच्या सुखाला सुरुंग लागला... त्या दिवशी त्या दोघींचं जग उध्वस्त झालं...

दोघांच्या सगळ्या विधी पूर्ण केल्या...सरणावर देह ठेवले... .कुसुम आणि पुष्पा ला ही (तेव्हाच्या) विधी नुसार शेवटचं सुहासिनी सारखं नटून अंत्यदर्शन घ्यायला सांगितले.... . ..त्यां दोघींनी डोळे भरून आपल्या जोडीदारांना बघितलं.... आणि त्या मागे झाल्या.... त्यांच्या पतीच्या चीतेला अग्नी द्यावयाच्या आधी त्यांना सांगण्यात आले की त्यांनाही त्यांच्या पती सोबत सती जावं लागेल....

ही गोष्ट त्या दोघींना माहित नव्हती असं नव्हतं.. माहित होती...पण भारतात सुधारणा होत होती... आस पास च्या गावात ही प्रथा बंद पडली होती .. पण त्यांच्या गावात कदाचित ...अजून झाली नव्हती ..म्हणूनच की काय ... त्या दोघींना ही सती जावंच लागणार होतं....पण त्या दोघी ना ही गोष्ट ऐकुन धक्काच बसला .....

त्या गावातल्या मुख्य नागरिकास विनंती करू लागल्या... गयावया करू लागल्या..

पुष्पा म्हणाली.. ...""मला जगायचं आहे हो...माझी दोन मुलं आहेत... माझे सासू सासरे त्यांना कोण बघणार... वय झालंय त्यांचं....आजूबाजूच्या गावातील बायका सती गेल्या नाहीत ...आपल्या गावात का हे असं??? मला जगायचं आहे.. माझ्या मुलांनी कुणाकडं बघावं....माझे पती निघून गेले... माझ्या संसाराची जबाबदारी मला घ्यायची आहे.... मला नका भाग पाडू सती जायला...माझ्या पतींची इच्छा होती मुलांना खूप शिकवायची... मला ती पूर्ण करू द्या...मला जगू द्या.... माझ्या पोरांना पोरक नका हो करू... पाया पडते मी तुमच्या....!!""

पुष्पा च बोलणं ऐकून कुसुम ला ही धीर आला... ती पण बोलू लागली....

"मला पण जगायचं आहे हो...माझे पती देशासाठी लढले आणि त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली..मी त्यांच्या बाळाची आई होणारे..मला त्याला या जगात आणायचं आहे.... .मला जगायचं आहे हो त्या बाळासाठी.... त्या मुक्या जीवाला जन्मा आधी का मारू...?? मला नाही जायचं सती... पदर पसरते ... मला नका सती घालवू... !!"

पण या सगळ्या बोलण्याचा त्यांच्यावर काही पण परिणाम झाला नाही ... त्या गयावया करत होत्या... पाय पडत होत्या... पण गावातले लोक त्यांचं काहीच ऐकुन घ्यायच्या मनस्थितीत नव्हते...

"जगाने जरी ही प्रथा बंद केली तरी आम्ही नाही करणार...!! आमच्या जातीत बसत नाही ते... आमचा धर्म त्याला मान्यता देत नाही!!.... तुमच्यासारख्या अशाच अनेक बायका गेल्यात की...या आधी सति... तुम्ही काय वेगळ्या नाही... तुम्हाला जावच लागेल... !! " असं बोलून त्यांनी त्यांच्या दोघींच्या नवऱ्यांच्यां चिता पेटवल्या.... आणि पुरेपूर पेट घेतल्यावर त्या दोघींना त्या चितेत ढकलू लागले.... त्या पूर्ण ताकदीने त्या सगळ्यांना विरोध करत होत्या...पण त्या दोघींची ताकद कमी पडली...

त्या दोघींना त्या आगीत लोटले गेले... तरी त्या तिथून तशाच उठून पळून गेल्या आणि त्या तिथंच झाडीत लपून बसल्या....

यासाठीच ती माणसं त्या दोघींना शोधत होती... आणि त्या स्वतःचा जीव वाचविण्यासाठी लपून बसल्या होत्या.... पण ....


शेवटी त्यांचं दुर्दैव..... त्या सापडल्याच.....आणि  या वेळी त्या निष्ठुर लोकांनी...त्या पळून जावू नयेत म्हणून.. त्यांचे हात पाय दोरीने बांधले आणि दोघींना त्या दोरीला धरून फरपटत आणून पुन्हा चितेवर टाकले आणि रॉकेल ओतलं....तसा भडका उडाला.... त्यांच्या त्या आर्त किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या....त्या किंकाळ्या नी दगडाला ही पाझर फुटले असते...पण ही धर्माच्या नावावर आंधळी आणि बहिरी झालेली जनावरे त्यांना ते दिसलं नाही की ऐकू आलं नाही.....त्या ओरडत होत्या...किंकळत होत्या....गयावया करत होत्या... रडत होत्या... पुष्पा तिच्या मुलांना हाका मारत होती.. वाचवा म्हणून... पण तिची मुले घरी होती.... कुसुम तिच्या आई वडिलांना सासू सासऱ्याना बोलवत होती... पण समाजापुढे त्यांचे काही चालले नाही... शेवटी दोघींचे आवाज बदलले.... त्या आगीने रौद्ररूप धारण केलं... तशा या दोघी क्रोधाने कडाडल्या.....

निर्दयी... निष्ठुर... पापी ... लोकांनो..!!!
.. तुमच्या मुळे आम्ही मरत आहोत... आम्हाला जगायचं होत...
आमच्या संसारासाठी ...
आमच्या मुलांसाठी....
आम्ही जगणार होतो...
आमच्या पतींच्या स्वप्नासाठी....
त्यांच्या घरातल्या माणसांसाठी.... .. कुसुम कडाडली.... माझ्या पोटातला अंकुर तुम्ही जाळला... आमचं बाळ तुम्ही मारलं...जन्माला येण्याआधी... माझ्या पतीची निशाणी होती ती शेवटची... या जगात आणायचं होत मला ..
त्या आमच्या बाळाला तुम्ही मारलं....तुम्ही.....पापी नालायक माणसांनो....

दोघींचे ते रौद्ररूप खूप भयानक होते... त्या गर्जत होता तशी ती आग जास्तच भडकत होती...त्यांचे अश्रू ही ठिणगी प्रमाणे उडत होते.... आणि त्या जोरात एकदम कींकळल्या.........

"""या गावातल्या मुलींना... तुमच्या पोरींना आम्ही दोघी सती... शाप देतो... तुमच्या मुली कधीच सुखी होणार नाहीत .. लग्न करून राजाच्या घरी जरी गेल्या...तरी त्यांना सुख लाभणार नाही....आम्हाला जशा वेदना दिल्या तुम्ही तशा तुमच्या पोरी जळत राहतील आयुष्यभर ..आणि त्यांच्या सोबत तुम्ही जळत राहाल..... तेव्हा तुम्हाला आमचं दुःख कळेल.... जिवंतपणी जळण काय असतं.... तुमच्या पोरींना कधीच सुख लागणार नाही ... शाप आहे आमचा या गावाला....शाप....???? तसा मोठा भडका उडाला....आणि त्यांनी जोरात किंकाळी फोडली...

"शाप देतो आम्ही.... शाप..."
आणि त्या गप्प झाल्या.....


त्यानंतर त्यांनी जसं सांगितलं गावात तसच झालं...
त्या गावातील एका ही मुलीला सुख लाभलं नाही... अनेक जणी आजन्म दुःखाच्या अग्नी मध्ये जळत राहिल्या.... आणि त्या सतीना जाळणारे त्यांचे आई वडील ही...

पण हा शाप ... पिढ्यानपिढ्या... पुढे चालू राहणार ही भीती होतीच.... म्हणून गावकऱ्यांनी... त्या ज्या ठिकाणी सती गेल्या...तिथं त्यांचं थडगं बांधलं.... दोघींना सुवासिनी च लेण वाहिलं आणि त्यांची माफी मागितली....आणि त्यांना सांगितलं... की


हे सुवासिनी नो.... तुम्हाला ज्या यातना झाल्या... त्या आम्हाला कळल्या..आम्ही तुम्हा दोघींची सगळे गावकरी माफी मागतो.... तुमच्यावर आम्ही अन्याय केला... .पण..तुम्ही ही पोरी आहात.... अशा... पुढच्या पिढीच्या पोरींना पण हा त्रास सहन करायला लागणार...आम्ही चुका केल्या त्यात त्यांची चूक नसणार... म्हणून तुम्ही शांत व्हा...
तुमचा मान आम्ही तुम्हाला देतो.... आम्ही तुमचा जीव परत आणू शकत नाही पण...इथून पुढं...या गावात...जी कोण मुलगी लग्नाच्या बोहल्यावर चढणार असेल ती सगळ्यात आधी तुमचा आशीर्वाद घ्यायला येईल... तुमची ओटी भरेल...तुम्ही त्या पोरींना आई म्हणून आशीर्वाद द्या...त्यांच्या संसाराला तुमच्या आशीर्वादाची साथ द्या..... तोच उ:शाप ठरेल..या गावच्या लेकिंसाठी..".

तेव्हापासून त्या गावात... कुणा मुलीचं लग्न ठरलं की ... ती चुडा भरली की त्या चुड्या च्याच हाताने त्या दोघींच्या थडग्यावर जाते... त्या दोघींची ओटी भरते...त्यांना बांगड्या अर्पण करते .. हळदी कुंकू वाहते आणि आशीर्वाद घेते ....

पण ....

त्या गावच्या मुलींना पूर्ण सुख लाभलं नाही... त्यांच्या जीवनातील लग्नानंतरचा काही काळ खूप खडतर असतोच...आणि परिणामी त्यांच्या आई वडिलांचा ही... पूर्वजांच्या कृपेने.....( ही कथा सत्य कथेवर आधारित आहे... थोडा बदल आहे ..कारण खूप जुनी कथा आहे .. मी फक्त ती मांडण्याचा प्रयत्न केलाय ... इथं मला कोणत्याही प्रकारे अंधश्रध्दे ला समर्थन करायचं नाही..या कथेचा गैरवापर कोणीही करू नये...आणि ही कथा कॉपी ही करू नये..)जगणे हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे .
. तो हिरावून घेणे... हे महापापच ...ज्याचं
कोणतं ही प्रायश्चित्त नाही....

                          
© आरती पाटील
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

आरती पाटील

Human Being

कानाला चांगलं वाटावं म्हणून गोड बोलत नाही वाचताना गोड वाटावं म्हणून लिहत नाही.. जितकं सकारात्मक लिहते तितकंच वास्तविक ही लिहते...वास्तवाची जाणीव ठेवलीच पाहिजे आणि बदल घडवायची ताकद ही...