शांता

Shanta

#शांता

घाटकोपर स्टेशनजवळ एका चाळीत तळमजल्यावर शांताची खोली होती. तिचा नवरा,लक्ष्मण  व्हीटीला प्रायवेटमध्ये कामाला होता. शांता पहाटे चार वाजता उठे. पुऱ्या दिवसात नेमकं त्यावेळेसच नळाला पाणी येई. तेही तोटी तोंडात घेऊन,आतड्याला पीळ पडेपर्यंत ओढावे लागे. तेंव्हा कुठे पाणी मिळे ती पटपट भांडी भरून ठेवत असे. शांताचं घर म्हणजे दोन लांबच्यालांब खोल्या होत्या. शांता घर अगदी पुसून चकाचक ठेवायची.

शांताला ओळीत सात मुलं झाली.चार मुलगे अन् तीन मुली.एकट्या नवऱ्याचा पगार काय पुरणार! शांता कुणाकडे पोळ्या लाटायला जायची तर कोण बाळंत झाली की तिची व बाळाची आंघोळ,मालिश करुन देई. फार आपुलकीने शांता मालिशचं काम करे त्यामुळे चाळीतल्या तसंच आजुबाजूच्या चाळीतल्या बायकांतही ती लय फेमस होती. बायकांना शांता म्हणजे आपल्या माहेरचं माणूस वाटायची.

शांताची मुलं मोठी होऊ लागली. मुली लग्नाला झाल्या तशी शांताने स्थळं बघायला सुरुवात केली. एकाच कुटुंबातल्या तीन सख्ख्या चुलत भावांशी तिन्ही मुलींची लग्न झाली. त्यांचं औरंगाबादला कपड्यांचं दुकान होतं.

शांताईचा मोठा मुलगा प्रायवेटमध्ये क्लर्क म्हणून नोकरीला लागला. दोन नंबर मुलगा त्याच्या भावोजींच्या ओळखीवर गुजरातमध्ये कामाला लागला. तिसरा मुलगा बँकेत कामाला लागला. त्याने पुढच्या पुढच्या परीक्षा दिल्या व त्याला प्रमोशन मिळत गेली. शांताईच्या भाषेत तो मोठा साहेब झाला. चार नंबर,लहान होता. मोठ्या मुलाने लग्नच करणार नाही म्हणून सांगितलं..शांताई समजवून थकली पण तो काही ऐकेना.

शांताने दोन नंबर मुलासाठी तिच्या नात्यातली,तिच्या गावातलीच मुलगी शोधली. मुलगी दिसायला छान होती. शांताईने कर्ज काढून दोन नंबर लेकाचं लग्न लावून दिलं. दोन नंबर लेक,विकास आपल्या बायकोला गुजरातला घेऊन गेला. थोड्या दिवसाने शांताई त्यांचा संसार पहायला गेली. विकास सकाळीच घराबाहेर पडायचा ,तो रात्री घरी यायचा. नवी नवरी,लता त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसायची. शांताईने विचारलं तर इथेच गेलैत,येतील थोड्या वेळात,असं काहीतरी उत्तर द्यायची. शांताने एका रात्री लेकाला चांगलंच धारेवर धरलं पण त्याने काही ताकास तुर लागू दिली नाही.
थोड्या दिवसांत शांता मुंबईला आली.

खरंतर विकासचे त्याच्या कंपनीतल्या मुलीशी संबंध होते. तो अचानक तिला घरी घेऊन आला व ती आता विकासच्या घरात राहू लागली. लता अगदीच साधीभोळी होती. तिला प्रतिकारही करता येईना. ती स्वतःच्याच घरात आश्रितासारखी राहू लागली.

लताचा भाऊ रक्षाबंधनाला तिच्याकडे गेला असता,त्याला या सर्व गोष्टींचा उलगडा झाला.तो आपल्या बहिणीला घरी घेऊन आला.

लताचे आईवडील,गावातली जाणती माणसं, शांताई व लक्ष्मणाकडे याचा जाब विचारायला आले. लताचा भाऊ त्यांना खूप बडबडला. या गोष्टीचा जबरदस्त धसका,शांताईच्या नवऱ्याने,लक्ष्मणने घेतला.तो गप्प गप्प
राहू लागला.एकदा नेहमीसारखाच ट्रेनमध्ये चढला व माटुंग्यादरम्यान ट्रेनमधून उडी मारुन त्याने आपली जीवनयात्रा संपवली.साऱ्या टेंशनमधून तो त्याच्या परीने मुक्त झाला. समाजात खाली मान घालून जगणं त्याला मान्य नव्हतं. त्याच्याच समाजबांधवांसमोर त्याची नाचक्की झाली होती. शांताईच्या सासूसासऱ्यांनीही तिच्याशी संबंध तोडले.

इकडे माहेरी लता सैरभैर झाली. तिला वेडाचे झटके येऊ लागले. कोणीही वाटेने येणारा जाणारा दिसला तर त्याच्याजवळ जाऊन माझा विकास मला न्यायला येणार आहे,असं सांगू लागली. एकदा शांता लतालाला बघायला गेली.शांतालाही ती माझा विकास मला घेऊन जायला येणार आहे असं सारखं सारखं हसत सांगत होती.ते पाहून शांताच्या काळजाचं पाणी झालं.शांताला खूप वाईट वाटलं पण तिच्या व्यभिचारी मुलापुढे ती हतबल होती.

लोकं येताजाताना कुजबुजू लागले.शांताच्या धाकट्या मुलालाही हे सर्व असह्य झालं,त्याने विष पिऊन शांताच्या संसारातून कायमची एक्झिट घेतली.शांता आपल्या दु:खाचा घडा सांभाळत आपले आयुष्य रेटू लागली.मोठ्या मुलाला कसलासा ताप आला.तो ताप डोक्यात जाऊन तोही देवाघरी गेला.

बँकेतल्या मुलाने ओळखीच्या मुलीबरोबर लग्न केले वन बीएचकेचा फ्लेट घेतला .त्याला दोन मुली झाल्या पण त्याला त्याच्या संसारात म्हातारी आई नको होती.

शांता तिच्या घाटकोपरच्या घरी एकटीच रहायची.आताशा वयोपरत्वे तिला बाहेरची कामं जमत नव्हती.म्हणून ती गारमेंटमध्ये कामाला जाई. तिथे एका जागेवर बसून शर्टपेंटचे दोरे कापण्याचं काम करी. महिन्याकाठी दिड,दोन हजाराची कमाई होई.

मुलींचं बर्यापैकी चाललेलं. जावई तिला म्हणायचे,"आम्हीही तुझी मुलंच आहोत. आमच्याकडे रहा."पण शांताईला ते मान्य नसे. ती तिच्या नवऱ्याच्या भाड्याच्या खोलीत रहायची.घरमालक भाडेही घेत नसायचा. तिला म्हणे,"म्हातारे,तू माझ्या आईसारखी आहेस. तुझ्याकडून कसलं भाडं घेऊ."

शांता आता त्या घरात एकटीच रहायची. पाणी आलं की चाळीतल्या बायका तिला भरुन देत.चाळकरी लोकं जातायेताना पिशवीतली फळं,खाऊ काढून शांताईला देत.तर कुणी काही गोडधोड बनवूदे ,पहिली वाटी शांताईसाठी हक्काने जाई.बायका म्हणत,"शांताई,आम्ही तुझ्या लेकी आहोत नं.मग आम्ही बनवलेलं खात जा." तरी शांताईने आपली खानावळ लावलेली. आताशा तिला एकवेळच जेवण जाई. खानावळीचे पैसे ती न चुकता द्यायची. पाऊस खूप पडला की तिच्या घरात कंबरभर पाणी साचायचं तरी मुलाने एकदाही,'आई,तु कशी आहेस', म्हणून विचारपूस केली नाही.

शांताई एकदा स्वतः चार दिवस मुलाकडे रहायला गेली,त्याने न बोलवता.सून नाश्ता बनवायची. तिच्यासमोर बसून खायची पण तिला वाटीभर देत नव्हती. फक्त दोन वेळचं जेवण तेवढं घालत होती. शांताईचा रिटायर झालेला मुलगा हे सर्व पाही,पण आपल्या बायकोला,आईलापण नाश्ता दे, असंसुद्धा सांगत नसे. नाती कामावरुन आल्या की शांताई त्यांना 'आलात का कामावरुन?' असं विचारायची तर त्या नाती तिला उद्धटपणे म्हणत,"मग काय आम्ही उंडगायला गेलो होतो का. "चार दिवस झाले तसे लेक म्हणाला,"चल आई तुला स्टेशनवर पोहोचवतो. "शांताई म्हणाली ,"एवढ्या पावसात मी तिथे एकटी कशी राहू?"तसा तो गप्प झाला. शेवटी शांताईला त्या माणूसघाण लोकांत रहावेना. ती आपल्या हक्काच्या घरी चाळीत येऊन राहू लागली.

चाळीतली माणसं म्हणाली,"शांताई तुझे एवढे लेक तुझ्या पाठीशी असताना तू कशाला काळजी करतेस?तुला काय हवं नको ते आम्हाला सांग नी सुखात रहा इथे."शांताईच्या मांडीवर चाळकऱ्यांची चिल्लीपिल्ली येऊन बसली.शांताईच्या चेहऱ्यावर आत्ता समाधान होते.तिने जपलेलं माणुसकीचं धन तिला उतारवयात कामी येत होतं.

------सौ.गीता गजानन गरुड.