शांता शेळके

Marathi Poetess Shanta Shelke


कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकीत
हात एक अदृश्य उलटतो
पाना मागून पाने अविरत
स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसत डोळे हसता हसता
उभी इथे मी पसरून बाहू
नववर्षा रे तुझ्या स्वागता
शांता शेळके.

दोन एक दिवसात जुने वर्ष संपून इंग्रजी नवे वर्ष सुरू होणार. सरत्या वर्षाने काय दिले आणि येणाऱ्या वर्षाचे संकल्प असा सगळा हिशेब सारेच जण मनात मांडत असणार.

पण खरंच काही गोष्टी गुढ अनाकलनीय आणि मानवी आवाक्याच्या बाहेरच्या असतात. त्यांचा कितीही शोध आणि बोध घ्यायचा प्रयत्न केला तरी हाती काहीच येत नाही.

वर्षा मागून वर्ष धावत असतात. त्याच्यासह आपणही पळत असतो. पण काळ-वेळ-पैशाचा ताळेबंद कधीच लागत नाही.

वरच्या कवितेत शांताबाईंनी मानवी मनाचे छान चित्रण केले आहे. आयुष्याची पाने भराभरा उलटत काळ पुढे सरकतो आहे, काही सुखद काही वेदनादायी आठवणींच्या ठेवी मनाच्या कुपीत आरक्षित होत आहेत. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी आपण सारे स्वतःच्या मनाला दिलासा देत पुढे जात राहतो हो ना?

आता थोडे शांता बाई विषयी

12 ऑक्टोबर 2021 ते 12 ऑक्टोबर 2022 हे बहुमुखी प्रतिभेचे संपन्न देणे लाभलेल्या ख्यातनाम कवयित्री लेखिका शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष.

असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे फुलाफुलात येथल्या उद्या हसेल गीत हे

असे आपल्या कवितेतून सांगणाऱ्या शांताबाई शेळके यांची ही एक फार सुंदर आठवण महाविद्यालयीन जीवनात प्राध्यापक श्री. म. माटे, के. ना. वाटवे आणि रा.श्री. जोग यांच्यासारखे गुरु, फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्या आणि रविकिरण मंडळातील कवींच्या कविता यांनी भारवलेल्या काळात शांताबाईंचा लेखन प्रवास सुरू झाला.

एम.ए. झाल्यावर शांताबाई मुंबईला येऊन वृत्तपत्र व्यवसायात शिरल्या. \"नवयुग\" साप्ताहिकात काम करू लागल्या. स्तंभलेखन, मुलाखती, इंग्रजी लेखनाचे अनुवाद, सभेचा वृत्तांत, गरजेनुसार किमान वाचनीय मजकूर ऐनवेळी तयार करणे, पुस्तक परीक्षणे असे नाना तर्हेचे लेखन करण्याची सवय या काळात शांताबाईंना लागली.

प्रतिभा, स्फूर्ती, मूड लागणे, लेखनाची बैठक जमणे याखेरीजही लिहिता येते हे जाणवले. प्रौढ, विदग्ध आणि संस्कृत प्रचूर भाषाशैलीचे खूप आकर्षण असलेल्या शांताबाईंच्या लेखनाचे संस्कृत वळण अत्र्यांनी पार बदलून टाकले.

\"नवयुग\" मध्ये काम करताना शांताबाईंनी लिहिलेल्या कविता आचार्य अत्रेंना दाखवल्यावर \"भिकार\" म्हणत अत्रे साहेबांनी फाडून टाकल्या. सोप्प लिहा म्हणाले.

नवयुग मधली नोकरी सोडल्यावर अर्थार्जनासाठी \"हंस\"च्या अंतरकरांनी दिलेला इंग्रजी चित्रपटांच्या कथांचा अनुवादाचा प्रस्ताव शांताबाईंनी स्वीकारला. त्यातून अनुवादाची एक नवी वाट त्यांना सापडली. पुढे त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. पुण्यातून मुंबईला गेल्यानंतर \"विहिरीतून समुद्रात जावे असा अनुभव मी घेतला\" असे शांताबाईंनी म्हटले आहे.

कवितेशी असलेले शांताबाईंचे नाते सर्वात जवळचे. रविकिरण मंडळाच्या प्रभावातून बाहेर पडल्यावर त्यांची कविता अधिक अंतर्मूख, चिंतनशील व प्रयोगशील होत गेली. चित्रपटात गाणी कशी लिहावीत याचा वस्तू पाठ त्यांना भालजी पेंढारकरांनी दिला.

भलजींच्या स्वराज्याचा शिलेदार साठी ची गाणी जमेना म्हणून शांताबाई आल्या तेव्हा भाजी त्यांना म्हणाले, "सिनेमाची गाणी अगदी सोपी हवीत आपण एकमेकांशी बोलत आहोत अशा भाषेत लिहा आपोआप सुचेल". त्यानंतर चित्रपटासाठी कितीतरी अविस्मरणीय गीते शांताबाईंनी लिहिली. हृदयनाथ मंगेशकरां सोबत त्यांची सर्वात गाजलेली आणि लोकप्रिय झाली ती कोळीगीते.
माझी या शब्दांवरी माझा ठसा माझा ठसा
हे शब्द माझे चेहरे आणि हे शब्द माझा आरसा

असं म्हणणार्या शांताबाई चा ठसा त्यांच्या सर्वच लेखन प्रकारावर उमटलेला आहे.

शब्द या विषयावर गप्पा मारायला शांताबाई शेळके यांना खूप आवडत असे. डोईवरचा पदर उजव्या हाताने सावरत, चष्म्याआडचे डोळे मोठे करत, त्या शब्दांच्या गमती सांगत. झक्कपैकी मांडी घालून बसत. स्वतःच्या रेखीव अक्षरातले टीपण बाजूला ठेवलेले. नादयुक्त स्वरात त्या सांगत "अगदी लहान असल्यापासूनच मला शब्दांच आकर्षण होतं. म्हणूनच मी साहित्याकडे वळले असावे. वेगळा शब्द कानावर पडला की, मी भारून जायची. लिमिट ची गोळी लहान मुलं चघळतात ना तसा तो शब्द मनात घोळवत राहायची. आता पहा \"चेटूक चांदणं\" म्हणजे पहाटेच्या वेळी पडणार शुक्राच चांदण. पक्षी त्याला फसतात. पहाट झाली समजून आकाशात उडतात. चांदणं चेटूकच करतो ही कल्पना किती छान आहे नाही."

पैठणी, चंद्रकळा यासारख्या कवितांमधून शांताबाई स्त्रीच्या नाजूक मनाचे अनेक पदरी पैलू वाचकांना उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतात.


\"जे वेड मजला लागले\", \"रूपास भाळलो मी\", \"आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे\" ही अफाट लोकप्रिय झालेली गाणी मुळात शांताबाईंची आहेत.

\"अवघाची संसार\", \"हा माझा मार्ग एकला\",\"कलंक शोभा\", अशा चार-पाच चित्रपटांचे गीतकार म्हणून डॉक्टर अवसऱ्यांचे नाव आहेत पण ती सर्व गाणी शांताबाईंची आहेत. त्यावेळी शांताबाई सेंसोर बोर्डावर होत्या, त्यामुळे सिनेमाची गाणी टोपण नावाने लिहा असं कोणीतरी त्यांना सुचवलं. त्यावेळी त्यांच्याबरोबर डॉक्टर वसंत अवसरे नावाचे उमदे डॉक्टर होते. ते शांताबाईंना आपली मुलगीच मनात. त्यांनीच सुचवले की, \"माझे नाव टाका\". त्या भावनिक क्षणी शांताबाईंनी त्या गाण्यांना त्यांचे नाव दिले.खरंतर टोपण नाव घ्यायला हवं होतं आणि विशेष म्हणजे त्या सर्व गाण्याना शासनाची पारितोषिक मिळाली. पण गीतकार म्हणून उल्लेख मात्र डॉक्टर वसंत अवसर यांचा झाला. "माझी उत्तम पारितोषिक पात्र चित्रपट गीत माझ्या ऐवजी डॉक्टर अवसऱ्यांच्या नावाने आली याची आता नव्याने खंत वाटते" असं म्हणून त्या हळहळल्या होत्या.

\"माझे लेखन कशासाठी?\" या आत्मपर लिखात शांताबाई म्हणतात, "जगण्यासाठी मी जी धडपड केली, तिच्या खालोखाल साहित्यासाठी मी धडपडत राहिले. आणि कित्येकदा तर साहित्यच मला जगण्यासाठी उपयुक्त ठरले. साहित्याइतके दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने मला कधी भारून टाकले नाही. बालपणापासून मी शब्दांच्या प्रेमात पडले. शब्दांनी नादवून गेले. शब्दांशी खेळत राहिले. नदीच्या मुखातून समुद्रात शिरावे तसे, मी लिपी ओळखू लागण्याच्या आधी ऐकलेल्या शब्दांच्या द्वारा अर्थाच्या साम्राज्यात प्रविष्ट झाले. शहरातूनच पण शहरांच्या पलीकडे जावे असे मला वाटते. शब्द हा मला जगाशी जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध कधीच संपू नये असे मला वाटते.

या माझ्या दीर्घ लेखन उद्योगाची फलश्रुती काय?, किती यश पदरात पडले?, शेवटी मी काय कमावले?, काय गमावले?, आणि यश म्हणजे तरी नेमके काय?, माझ्या दृष्टीने या प्रश्नांना फारसे महत्त्व नाही. महत्त्व आहे ते माझ्या छंदांचे, आनंद आहे, कृतर्थता आहे. ती त्याच्या अखंड साधनेत. सततच्या पाठपुराव्यात. हा पाठपुरावा कधीही संपू नये असे वाटते.

शांताबाई आयुष्यभर हा पाठपुरावा करत राहिल्या.

मला वाटते रे नवा जन्म घेवू
नवा विश्वास गुंफू नवे गीत गावू
अशी वाहते मी स्वरांच्या प्रवाही
मिळो तिर किंवा दरी खोल जावू
जुना गाव राहे कुठे दूर मागे
नव्या पावलांनी नवी वाट देवू
नवे चित्र साकारूनी ये समोरी
उभी स्वागता मी उभारून बाहू

शांता शेळके.


©® राखी भावसार भांडेकर

संदर्भ
प्राध्यापक मिलिंद जोशी यांचा 12 ऑक्टोबर 2021 चा लोकमत नागपूर येथून प्रकाशित लेख.
ख्यातनाम लेखक संवादक सुधीर गाडगीळ यांचा 15 जानेवारी 2022 चा लोकमत नागपूर येथून प्रकाशित लेख.