शमिका भाग चार

तिला लग्नच नव्हतं करायचं तर मग ती मला स्पष्टपणे बोलली का नाही? जर तिच्यामध्ये पळून जाण्यासाठी धाडस आहे तर मग आई-वडिलांशी बोलण्याचं धाडस का नाही ?

शमिकाच्या बाबांचा उतरलेला चेहरा पाहून शमिकाची आई आणि शमिका दोघीही चिंतीत झाल्या. शमिका सुद्धा मनातल्या मनात विचार करू लागली की , बाबांचे मित्र बरे असतील ना?
त्यांना काही झालं तर नसेल ना? असे अनेक नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये डोकावू लागली.


शामिकाच्या आईचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती , ती सुद्धा विचार करू लागली नक्की त्यांचे मित्र बरे असतील ना?.

शमिका बाबांसाठी पटकन पाणी आणायला निघून गेली.
शमिकाची आई त्यांच्या बाजूला जाऊन बसली.

ती अजूनही शमिकाच्या बाबांचा चेहरा पहातच होती.बाबा गहन विचारात होते. त्यांचा शर्ट पूर्ण घामाजलेला होता .चेहरा पूर्ण उतरला होता. शमिकाचे बाबा कुठेतरी एकटक पाहत होते .काहीतरी सखोल विचार करत होते. त्यांना बोलण्याची सुद्धा ताकद नव्हती. नक्कीच काहीतरी मोठं घडलं असावं असंच दोघींनाही वाटत होते. शमिकाने त्यांना पाणी दिले. शमिकालाही ऐकायचे होते दोघे काय बोलत आहेत ते, त्यासाठी ती आईबाबांच्या जवळ बसली.


कपाळावर आलेला घाम पुसतच बाबा शमिकाला आणि तिच्या आईला म्हणाले तुम्ही दोघी जेवलात का? शमिकाची आई म्हणाली हो आम्ही दोघीही जेवलो. तुम्ही दोन घास खाऊन घ्या.

"नको नको मला आता काहीच नको. मला काही खायची इच्छा नाही." शमिकाचे बाबा म्हणाले.

शमिकाच्या आईनेच विषय काढला . तुम्हाला बरं वाटत नाही का? किती घाम आला आहे कपाळावर ?तुम्ही जाऊन जरा फ्रेश होता का?


शमिकाचे बाबा म्हणाले "हो जातो थोड्यावेळाने . मला जरा पाच मिनिटं बसू दे सकाळपासून फक्त धावपळ होत होती."

शमिकाची आई हळू आवाजात म्हणाली
"नक्की तुम्ही कोठे गेला होता? आणि कोणाची तब्येत बरी नव्हती ?

बाबा तिला म्हणाले "सर्व सांगतो , बाबा बोलू लागले .बाबांचा आवाज फारच
कातर झाला होता .बाबा म्हणाले "अगं तुला माहित आहे तो माझा शाळेतला मित्र सदा?"

शमिकाची आई म्हणाली "हो आठवतोय ना,त्याचे काय?


बाबा म्हणाले " गेल्या महिन्यात त्याने मला फोन केला होता. किती वर्षानंतर त्याचा फोन आला होता.मी खूष झालो ;पण फोन केल्या केल्या तो खूप रडायला लागला . मी त्याला भेटायला गेलो. त्याला विचारले असता त्याने मला सांगितले " मित्रा इतके कष्ट करून ,मेहनत करून ,शेवटी आयुष्यात समाधानच नाही. त्याच्या अशा बोलण्यावर मी त्याला विचारले नक्की तुला काय झाले आहे? तुला काही प्रॉब्लेम आहे का तू असा का बोलतो आहेस?

तेव्हा सदा मला म्हणाला" गणेश माझ्या आयुष्यामध्ये उतार चढाव बघितले, शून्यातून विश्व निर्माण केले पण मला कधी असं वाटलं नव्हतं की माझी पोटची मुलगी मला असे दिवस दाखवेल . सर्व काही छान चालू असताना ती असं काही करेल वाटलं नव्हते". मी त्याला विचारले नक्की काय झाले? तेव्हा त्याने मला सांगितले

"माझ्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं"

तिने चिट्ठीत लिहिले होते."मी मनाने लग्न करते आहे..मला शोधण्याचा प्रयत्न करू नका

हे ऐकताच मलाही फारच आश्चर्य वाटलं कारण की ती असं कधी करेल असं वाटलं नव्हते . सदा पुढे बोलू लागला .  एकच प्रश्न मनात येतो की, तिला मी काय कमी केलं ? माझ्याकडून सर्व सुखसोई दिल्या, शिक्षण दिलं , स्वतःच्या पायावर मी तिला उभं केलं. मग तिने असं का करावं ? जन्मदात्याना असे दिवस दाखवायची तिला गरजच काय पडली? तिने जे पण केलं ते फार चुकीचं केलं. जेव्हापासून ती गेली आहे, मन खूप अस्वस्थ झालं आहे बेचैन वाटतं. एकही दिवस असा जात नाही की दुःख होत नाही. माझ्या बायकोने तिच्यासाठी स्वतःची नोकरी सोडली . तिच्याकडे सर्व परीने लक्ष दिलं. मग का तिने असं करावं? घरच्यांचा जराही विचार करू नये का? मुलगी जरी असली तरी; पण मी तिला कधी बंधनात ठेवलं नाही. इतकी मोकळीक देऊन मग आमचा विश्वासघात केला तिने?"


गणेश सतत माझ्या डोक्यात तेच विचार येत आहेत मला अगदी अंगा मधून प्राण निघून गेल्यासारखं झाला आहे . आता आयुष्यात राहिले तरी काय?

असं बोलून तो ढसाढसा रडला.
सगळं बोलणं ऐकून मी सुद्धा अचंबित झालो होतो . मलाही तो धक्काच होता. सदा खूप रडत होता. अगदी लहान मुलाप्रमाणे तो रडत होता. फार वाईट वाटत होते आणि सकाळीच सदाच्या बायकोचा मला फोन आला आणि त्यांनी मला दवाखान्यात बोलावले तिथे गेलो त्याच्या नंतर कळले की, त्याला मायनर अटेक आलेला आहे आणि मी पुरता गोंधळून गेलो .सतत हसमुख असणारा माझा मित्र सदा आज त्याच्यावरती, त्याच्या मुलीमुळे ही वेळ आली . खरंच फार वाईट वाटत आहे.

का करत असावी अशी मुले ?प्रेमापोटी ज्या आई-वडिलांनी त्यांना लहानापासून मोठं केलं त्यांचे प्रेम हे निष्फळ ठरतं ? का त्यांनी दिलेल्या प्रेमाची किंमत शून्य होते ? का पळून जाऊन लग्न करायची वेळ येते? कुठे कमी पडतात आई-वडील? हा प्रश्न मलाही सतावतो.


आई म्हणाली :"आता कसे आहेत सदा भाऊजी"


बाबा म्हणाले " डॉक्टर म्हणाले , आम्ही ट्रीटमेंट करू थोड्या दिवसात डिस्चार्ज देऊ .

शमिकाची आई म्हणाली
" बरं झालं ते सुखरूप आहेत"


शामिकाचे वडील म्हणाले "तुला माहित आहे का? आजही सदा मला पकडून किती रडला.मी सदाला ह्या अवस्थेत कधीच पाहिले नाही. नेहमीच हसतमुख असणाऱ्या सदाला आज ज्या अवस्थेत पाहिलं आणि माझेही हात पाय पार गळून गेले .

किती जीव होता त्याचा त्याच्या मुलीवर आणि तिने असे केले? .त्याला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ,ती असे पाऊल उचलेन. त्याला हे दुःख पचवता आले नाही. हा त्याच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. खरंतर मी सुद्धा हे ऐकून धास्तावलो.


शमिकाची आई म्हणाली "खरं आहे हो ,वाईट तर वाटणार . पोरांना लाडाकोडात आपण वाढवतो आणि एक दिवस हे असे लग्न करून निघून जातात, ते सुद्धा पळून निघून जातात. मलाही खूपच वाईट वाटलं ऐकून.


शमिकाचे बाबा म्हणाले
"मी सदाला सांगितलं ,आता जे झालं ते विसरून पुन्हा नव्याने सुरुवात कर. तुझी बायको ,तुम्ही एकमेकांना साथ देऊन रहा."

सदा म्हणाला
"खूप कठीण आहे हे सर्व आम्हा दोघांसाठी, तुला माहित आहे गणेश मी चांगला मुलगा बघून लग्न जमवलं होतं .तेव्हासुद्धा एका शब्दाने काहीही म्हणाली नाही. लग्नाची सगळी तयारी केली होती. पंधरा दिवसावर लग्न येऊन ठेपले होते, ज्या घरातून मुलीची मी पाठवणी करणार होतो, किती आम्ही स्वप्न पाहिली होती; पण अचानकपणे काही असे करेल वाटलंच नव्हते. इतकं सगळं होऊन आता विश्वासच उडाला.


माझी काय चुक झाली गणेश? वडील म्हणून मी माझी सर्व जबाबदारी पार पाडली? तिला चांगलं शिक्षण दिलं. तिला स्वतःच्या पायावर उभी केलं. तिच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण केल्या. तिला काय हवं नको ते पाहिलं. ती मुलगी म्हणून कधीच कोणतीही बंधनं लादली नाही. नेहमी तिला चांगले संस्कार दिले; मग कुठे माझं चुकलं?


बरं तिला लग्नच नव्हतं करायचं तर मग ती मला स्पष्टपणे बोलली का नाही? जर तिच्यामध्ये पळून जाण्यासाठी धाडस आहे तर मग आई-वडिलांशी बोलण्याचं धाडस का नाही ?का तिने असं करावं? तिला जराही वाटू नये की, मी हे पाऊल उचललं तर माझ्या आई-वडिलांचे काय होईल? एकदाही तिने विचार केला नसेल का? आम्ही दिलेलं प्रेम हे प्रेम नव्हतच का? म्हणजे तिच्या आयुष्यात आमचं स्थान काहीच नव्हतं? जिच्यासाठी आम्ही आमच्या अनेक स्वप्नांना कडेलोट केले, त्या गोष्टीचे काहीच तिला वाटलं नाही का? मी कोणाकडे जाऊ या प्रश्नाचे उत्तर मागायला? ती कुठे गेली ? काय करत असेल ह्याची मला जरा पण कल्पना नाहीये. आई-वडील म्हणून आम्हाला फार त्रास झाला,रागही आला आहे; पण आता या रागाची जागा चिंतेने घेतली आहे. तिची फार काळजी वाटते.


इतकं सगळं होऊन असं वाटतं की, तिने ज्या मुलाला निवडलं असेल त्याने तिला व्यवस्थित ठेवावे. "


शामिकाचे वडील तिच्या आईला जेही सांगत होते ते ऐकून शमिकाची आईसुद्धा बैचेन होत होती.

शामिकाचे वडील तिला पुन्हा सांगू लागले, आणि शमिकाची आई पुन्हा लक्ष देऊन ऐकू लागली.


हे सर्व सांगत असताना शमिकाच्या वडिलांचे अश्रू अनावर झाले होते.


"सदाने माझा हात पकडला आणि अगदी व्याकुळ होऊन पुन्हा तोच प्रश्न विचारू लागला"


सदा म्हणाला "गणेश मूल असं का करतात?

माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एकदाच तीने माझ्यासमोर यावे.फक्त एकदाच तिने माझ्यासमोर यावं.जाब तर मी विचारून राहणार आहे. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजेच. गणेश माझा जीव खूप कासावीस होतो आहे.आता वाटतंय माझा जीव गेला तरी बेहत्तर. पण ही जी वास्तविक परिस्थिती आहे ती स्वीकार करणे मला जमतच नाही . दिवस-रात्र तिचा चेहरा डोळ्यासमोर येतो. गणेश खूपच मन अस्वस्थ झाले आहे. तेव्हापासून खूप विचार डोक्यामध्ये येतात. नकारात्मक विचार.काय करू? असं वाटतंय की मला वेड लागेल गणेश. विश्वासघात केला तिने. गणेश मी तिला खूप प्रेमाने वाढवलं, सर्वच सर्वच विस्कळीत झालं माझं आयुष्य.


किती छान स्वागत केलं होतं मी माझ्या मुलीचे. ती आली आणि आमच्या घरामध्ये भरभराट झाली. मुलीला लक्ष्मीचं रूप मानतात आणि खरंच तिचे पहिलं पाऊल खूप काही देऊन गेलं; पण कधी असं वाटलं नव्हते तिची पाऊलं ह्या दिशेने जातील.

गणेश मला जगायची इच्छाच राहिली नाही. गणेश खरंच नको वाटतंय .आयुष्यात सर्व संपलं.


मी म्हणालो " अरे तू वेडा आहेस का? का तुझं आयुष्य इतकं स्वस्त आहे? मान्य आहे जी गोष्ट घडली, ती व्हायला नको होती पण तू जर असं म्हणणार असशील माझा जीव गेला तरी बेहत्तर .तर खूप चुकीचे बोलतो आहेस. सदा तू स्वतःला सावर. स्वतःचं मन दुसरीकडे वळव.

सदा पुढे बोलत होता

" गणेश मी माझं मन वळवेलही; पण माझ्या बायको स्मिताचं काय? पोरीच्या विचारांमध्ये नुसती दिवस-रात्र रडत राहते. कुठे असेल माझी मुलगी? काय करत असेल? कोणा बरोबर गेली असेल? तिचं काही बरंवाईट तर झालं नाही ना? अनेक प्रश्न ती मला विचारत असते आणि मी सुद्धा हतबल होतो. मी वडील म्हणून माझं मन वळवेल; पण माझ्या बायको स्मिताचे काय गणेश?

या प्रसंगामुळे आम्ही पूर्ण हादरून गेलो आहे. काय करू? मला स्वतःला समजत नाही. माझं मन खूप नाराज झाला आहे .एकांतात बसलो की खूप खराब वाटतं. रडू येतं आणि मी स्मिता समोर रडूही शकत नाही .

ज्याक्षणी मला कळलं की ती आम्हाला सोडून गेली आहे, त्या क्षणी आमच्या पायाखालची जमीन सरकली. खरंच विश्वास बसत नाही. कसा मार्ग काढू?

शामिकाचे बाबा म्हणाले "मी काय सांगू मार्ग त्याला"

शमिका आणि शमिकाची आई दोघीना फारच आश्चर्य वाटलं .एखादी मुलगी लग्न तोंडावर असताना असं पाऊल उचलू कसं शकते ?


शमिकाही विचार करू लागली...
प्रेमापोटी जर हे तिने पाऊल उचललं तर मग त्या प्रेमाचं काय तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच दिलं? एकदाही विचार करू नये? शमिका स्वतःच्या रूममध्ये निघून गेली.

शमिकाचे वडील शमिकाच्या आईला म्हणाले वडील " मी जाऊन जरा रूम मध्ये आराम करतो"

शमिकाची आई म्हणाली "दोन घास खाऊन घ्या ,जरा बरं वाटेल"



वडील म्हणाले

" नको मला खायची इच्छा नाही. फक्त सदाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो आहे .माझंही मन कशातच नाही"



शमिका सुद्धा रूम वर जाऊन बसली तिने पुन्हा देवाकडे हात जोडले आणि म्हणाली " देवा तू सदा काकांचा जीव वाचवला, त्यासाठी आभार. आता तू त्यांना आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती दे .


शमिकाला त्यादिवशी नीट झोप लागली नाही..


शमीकाने त्यादिवशी एक शपथच घेतली.

मी माझ्या आई बाबांना त्रास होईल असे कधीच वागणार नाही.मी माझ्या आई बाबांना ,माझा अभिमान वाटेल असेच वागेल. माझे आई बाबा माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझ्या आई बाबांची सर्व स्वप्न मी साकार करेल. मी त्यांना नेहमीच आनंदी ठेवणार. मी माझ्या आयुष्यात इतक्या उच्च पदावर जाणार की, माझ्या आई बाबांची मान नेहमी ताठ राहील.


पुढच्याला ठेच मागचा शहाणा.

शामिकाचे अगदी तसेच झाले होते.
सदा काकांची अगतिकता पाहून ती अस्वस्थ झाली होती.आपलं चुकीचे पाऊल आई वडिलांना किती अस्वस्थ करतं, किती त्रास देते हे ती समजून चुकली होती.तिचे आई बाबा तिच्यासाठी खूप प्रिय होते म्हणून तर तिने स्वतःच्या मनाला आताच ठणकावून सांगितले होते. पुढे काहीही झाले तरी आई बाबांना वाईट वाटेल असे कधीच वागणार नाही.



क्रमश.

©®अश्विनी ओगले..

🎭 Series Post

View all