शमिका भाग 3

शमिका तो काळा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. तिने तिच्या कपाटातील आईचा फोटो काढला आणि छातीशी कवटाळून धरला.आई बोलू लागली "आईचे कार्य खूप मोठे आहे.खूप वेगळी होती आई. चारचौघाहून निराळी होती.चार लोक काय म्हणतील ह्या विचारापासून अलिप्त अशी. मनाला आणि बुद्धीला पटेल असेच वागणारी ती.सरळमार्गाने जाणारी अशी. ती गेली आणि जणू शरीरातून चेतना निघून गेली.


शमिका घरी जात असताना विचार करू लागली की विभा जे काही म्हणाली ते खरंच असेल? का खरंच ही प्रेमात पडली असेल का? उगाच आपलं माझ्याशी पुन्हा गंमत करत नसेल ना ?

पण काहीही असो ती जेव्हा सांगत होती . रवी बद्दलच्या भावना , तेव्हा तिलाही अगदी कुणीतरी मोरपीस शरीरावर फिरवावं असं वाटत होतं .प्रेम किती सुंदर भावना आहे ना.अगदी प्रेम हा शब्द उच्चारला तरी पण ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. काय जादू आहे या शब्दातच. खरंच एक वेगळी जादू. अशी जादू जी मनाला भुलवते. फक्त खर प्रेम करणाऱ्याला अनुभवता येते. आपण तर कधी ह्या बाबतीत विचार केलाच नाही आणि हा प्रेम वगैरे करण्याचा मनात कधी विचार आलाच नाही .

विभाचे बोलणे आठवून आठवून तिला फार हसू येत होते आणि ती स्वतः लाजत होती. खरं तर या वयामध्ये किती बालिशपणा करतो आपण उगाचच काहीही विचार करत असतो. पण कुठेतरी असं वाटत असतेच की कुणीतरी आपलं असावं ,आपल्याला समजून घेणारं. आपल्या सोबत कायम असणारं. आई-वडील हे तर नाती आपल्यासोबत जन्मजात असतात; पण असंही एक नातं असतं जिथे फक्त आणि फक्त प्रेम असतं.

असं हे नेहमी विचारांच्या भोवती असणारी शमिका आजही अनेक विचारात रमून गेली होती. ती विचार करत होती, रवी असेल तर कसा असेल? कसा दिसत असेल? तो विभा सारखाच वेडा असेल का? आणि असही ती म्हणतच होती की, तो अगदी माझ्यासारखा आहे कसा बरं असेल आपल्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड?

ती स्वतः शी गप्पा मारत होती. प्रेम करण्यासाठीसुद्धा धाडसच लागते आणि तिच्या सारखी मुलगी प्रेमात पडू शकते. तर मग मी का नाही? एक वेगळाच विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला आणि नंतर ती स्वतःला समजाऊ लागली.शमिका तू काही वेडी आहे का? प्रेम वगैरे तुझ्याच्याने होणार नाही .प्रेम करण्यासाठी जे धाडस लागते ते काही तुझ्यात नाही. एका विचाराची दुसऱ्या विचारांशी लढाई जणू सुरू झाली होती. विभा जे काही म्हणाली होती त्यात किती तथ्य होतं ते माहीतच नव्हतं पण तरीही शमिका कधी नव्हे ते विचार करू लागली. आपण ही पडू शकतो का प्रेमात?? आपल्यालाही भेटू शकतो का एखादा चांगला मुलगा?? तो आपल्यावर मनापासून प्रेम करेल का?आपल्याला समजून घेईल ?


आपण चित्रपटात पाहतो किती वेडे असतात ना चित्रपटामध्ये नायक-नायिका एकमेकांमध्ये इतके गुंतून जातात की, त्यांना आजूबाजूचं भान राहत नाही आणि अगदी वेळ पडली तर स्वतःच्या परिवाराशी सुद्धा ते लोक लढतात ,स्वतःच प्रेम मिळवण्यासाठी ते लोक धडपड करतात. खरंच इतकं माणूस प्रेमात बदलतो की आई-वडिलांशी सुद्धा ते दूर होतात ? पुन्हा स्वतःला ती समजावू लागली तुझ्याच्याने काहीही होणार नाही .तू आई वडिलांच्या विरोधात जाऊन हे सगळं असलं काही करू शकत नाही. आणि हे सर्व करायची आपल्याला काही गरज पण नाही नको बाबा नको त्या वाटेला जाणं चुकीचंच आहे आपला अभ्यास बरा आणि मी बरी आहे. नको त्या लफड्यात उगाच पडायला नको. मी एकटीच बरी एकटा जीव सदाशिव.

शमिका जरा शांत बसली आणि पुन्हा विचार करू लागली" अरे देवा मी हे सगळं काय विचार करत होते. कशात काहीच नाही. त्या विभाने मला सांगितलं काय आणि मी पुरती वेडी झाली. ही विचार करायची सवय कधी सुटणार देवाला माहीत .देवा ह्या विचारापासून माझं रक्षण कर.

विचाराच्या तंद्रीत असताना तिने बेल वाजवली . आईने दार उघडलं . आईने तिला विचारले " शमिका कोणत्या विचारात आहेस?

शमिका म्हणाली "काही नाही गं असंच आपलं"

आई म्हणाली " कशी झाली शॉपिंग"?

शमिका आईला म्हणाली
"हो आई तिला जे हवं होतं अगदी तसंच मिळालं"

आई म्हणाली "नक्कीच तिने तुझ्या चॉईसची कपडे घेतली असणार. स्वताच्या आवडीनिवडी पेक्षा तिला तुझी आवड जास्त महत्त्वाची वाटते"


शमिका म्हणाली "हो आई तिने माझ्या मन पसंतीचा ड्रेस निवडला आणि तिने तोच घेतला"

आई म्हणाली "अशीच मैत्री कायम ठेवा. खरी मैत्री सुद्धा नशिबानेच मिळते. बरं तू हातपाय तोंड धुऊन घे मी तुला जेवायला वाढते"

शमिका म्हणाली "आलेच मी आणि बाबा कुठे राहिले कधी येणार आहे ते?" .

शमिकाची आई म्हणाली येतीलच ,खरं तर आज उशीर झाला त्यांना.म्हणे मित्राची तब्येत बरी नाही. येतीलच थोड्यावेळात .तोपर्यंत तू आवरून घे.

शमिका म्हणाली " आई नक्की कोणाची तब्येत खराब झाली आहे .बाबांचा कोणता मित्र?


शमिकाची आई म्हणाली " शमिका ते मला माहित नाही गं , फक्त फोनवर म्हणाले आज थोडा उशीर होईल घरी यायला. मित्राची तब्येत बरी नाही .त्यामुळे मी सुद्धा जास्त त्यांना प्रश्न विचारले नाही. ते खूप घाई गडबडीत होते.त्यांनी फोन लगेचच ठेवला. शमिकाला फार चिंता लागून राहिली .बाबांच्या मित्राची तब्येत तर बरी असेल ना?


शमिका फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेली. फ्रेश होत असताना सुद्धा तिच्या डोक्यामध्ये बाबाच्या मित्राचे विचार चालू होते. तिने देवाकडे प्रार्थना केली ." देवा बाबाच्या मित्राची तब्येत बरी नाही, त्यांची तब्येत बरी होऊ दे .त्यांचे रक्षण कर. अशी प्रार्थना करतच जेवायला बसली.


शमिकाचा चेहरा उतरला होता .तिचा उतरलेला चेहरा पाहून आईच्या लक्षात आले नक्की शमीकाला काय झाले आहे. आईला माहीतच होते की कोणाला त्रास झाला ,कोणी दुःखी असेल तर शमिकाचे कशातच मन लागत नसे. ती नाराज होत असे, चेहरा पाडून बसत असे.

आईने शमिकाच्या पाठीवरती हात ठेवला आणि तिला समजाउ लागली "शमिका बाबांचे मित्र बरे होतील , तू काळजी करू नकोस .तू जर नेहमी अशी हळवी राहिलीस तर तुझा निभाव कसा लागणार? इतकं मृदू असून चालत नाही. तू अशी दुःखी राहिलीस तर त्यांची तब्येत सुधारणार आहे का? त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो."


आईने तिचे डोळे पुसले आणि तिच्या खांद्यावर ठेवलेला हात घट्ट करत म्हणाली "अगं शमिका काय तुझं चालू आहे? आता तू काय लहान राहिली आहेस का? मला कधीकधी तुझं कौतुक ही वाटतं आणि कधी कधी तुझ्यासाठी खूप काळजीही वाटते .शमिका तुझं आहे असं जर वागणार राहिलं तर कसं व्हायचं तुझं?. तू स्वतःला किती त्रास करुन घेते हे तुला माहित आहे का?"



शमिका रडतच आईला बिलगली आणि म्हणाली आई सकाळी विभासुद्धा अगदी मला असंच म्हणाली बघ , की तू तुझा जर असा स्वभाव ठेवलास तर तुझा निभाव कसा लागणार आहे? मी खरं सांगते की मला खरंच बदलणं शक्य नाही .मी खुप प्रयत्न करते विचार न करण्याचा किंवा स्वतःला त्रास न करून घेण्याचा पण हे असलं काही ऐकले की मला सहनच होत नाही. मला खरंच खूप त्रास होतो आणि बाबांच्या मित्रांचं ऐकल्यापासून माझं खरच कशातच मन लागत नाही अगदी अशी धाकधूक लागून राहते की बरे होतील ना ?खरंच मला स्वतःला समजत नाही की मी का अशी आहे.

आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली "शमिका याच्यामध्ये तुझी चूक खरच नाही तू अगदी तुझ्या आजीसारखी आहेस.माझ्या आईसारखी . तुझी आज्जी सुद्धा अशीच होती अगदी मायाळू. दुसऱ्याचं दुःख बघवतच नसे. सर्वांच्या मदतीला पुढे जात असे. तिच्या हातावर हात मारला आहेस बघ तू .माझी कमी आणि तिचीच सावली आहेस तु. माहित आहे तुझी आज्जी कशी होती ?


आता आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकू लागली. आई पुढे बोलतच होती.
आई म्हणाली "शमिका तुझी आजी म्हणजे प्रेमाने ,मायेने स्वयंपूर्ण अशी होती. गावामध्ये तिला कोणी ओळखत नाही असे कोणीच कोणीच नव्हते .बघ प्रत्येक व्यक्तीला इतकं प्रेम देत असे की बस त्यांच्यातलीच होऊन जाई.

कधीकधी तिच्या या वागण्याने आम्हा भावंडांना अभिमान वाटायचा पण कधीतरी वागण्याचा रागही येत असे ,कारण की ती स्वतः दोन घास कमी खात पण समोर दारी आलेल्या व्यक्तीला भरपेट जेवण घालूनच पाठवत असे. साक्षात अन्नपूर्णा देवी प्रसन्न होती तिच्यावर. आमची गरिबी असली तरी सुद्धा ती मनाने इतकी श्रीमंत होती की तिला दुसऱ्याला भरभरून कसे द्यावं हे चांगलंच माहीत होतं . तिचे एक वाक्य मनात कायम कोरले गेले ते म्हणजे आपल्याला दोन घास कमी भेटले तरी चालेल, पण आपल्या दारी आलेल्या व्यक्तीला कधीच कधीच उपाशी पाठवू नये. तिचे विचार खूप प्रेरणादायी होते. आपल्याला आयुष्यात काही भेटो किंवा नाही पण आपली ओंजळ समाधानाने भरलेली हवीच.

शमिका आजीचा प्रत्येक विचार हा अनमोल होता. जे काही म्हणत असे अगदी तन्मयतेने म्हणत. तिला शिक्षण घेता आले नाही ; पण उच्चशिक्षित लोकांपेक्षाही पुढारलेल्या विचारांची होती. तिच्या पोटी जन्म घेतला हे आमचं नशीब होतं. जेव्हा पण मी तुला पाहते तेव्हा मला तुझ्यात आजी स्पष्ट दिसते.


माया लेकींचे डोळे पाणावले होते आणि मन सुद्धा भरून आले होते .ती आईला म्हणाली "आई खरंच गं , माझी आजी किती छान होती तिला कधीच पाहता आले नाही हे माझं नशिब. खूपच कमनशिबी आहे .

आई म्हणाली "तुझ्या जन्माच्या अगदी सहा महिन्या आधी देवाकडे गेली आणि खूप सारे स्वप्न अपुरे राहिले.

शमिका आईला म्हणाली नक्की आजीला काय झालं होतं ?अशी एकाएकी ती आपल्याला सोडून का गेली? आईचे डोळे भरले होते तिला मागचे दिवस आठवून खूपच वाईट वाटत होतं. शमिकाच्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे बघून आई बोलू लागली " देव चांगल्या माणसाला खरंच लवकर घेऊन जातो हे काही खोटं नाही. तुझी आजी कदाचित देवाला खूप प्रिय होती म्हणूनच ती आपल्याला लवकर सोडून गेली आणि निमित्त झालं ते तिच्या पडण्याचं तिचा पाय घसरून पडली आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि काही दिवसात आपल्याला सोडून गेली, तिला ट्युमर झाला होता हे निदान झाले..


शमिकाला खूप रडू येत होते ..आईचा उदास झालेला चेहरा बघून तिला खूप गलबलून आलं. तिने स्वतः वरती खूप कंट्रोल केला. खरं तर आईला गच्च पकडून मिठी मारावी आणि तिला शांत बसवावे असेच वाटत होते पण आता काही केल्या गप्प बसणार नाही हे तिलाही माहीत होतं. भावना अनावर झाल्यावर त्यांना सहजासहजी लगाम घालता येत नाही हेच खरे. आज किती वर्षानंतर तिने आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले होते. शमिका आईकडे डोळे भरुन पहात होती. आई म्हणाली :"तुला माहित आहे का ज्या दिवशी आई जाणार त्या दिवशी तिने मला जवळ बोलावले आणि माझ्या पोटावरती हात ठेवून ती खूप आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते जणू काही तिला माहित पडलं होतं की ती जाणार आहे.

डोळे पुसतंच आई म्हणू लागली " शमिका तो काळा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. तिने तिच्या कपाटातील आईचा फोटो काढला आणि छातीशी कवटाळून धरला.आई बोलू लागली "आईचे कार्य खूप मोठे आहे.खूप वेगळी होती आई. चारचौघाहून निराळी होती.चार लोक काय म्हणतील ह्या विचारापासून अलिप्त अशी. मनाला आणि बुद्धीला पटेल असेच वागणारी ती.सरळमार्गाने जाणारी अशी. ती गेली आणि जणू शरीरातून चेतना निघून गेली. आम्ही भावंड एकमेकांना धीर देत राहिलो आणि पुन्हा तिच्याशिवाय पण तिच्या आठवणींसोबत जगायला शिकलो.

माझे बाबा खरं तर खूपच खचून गेले होते त्यांना सावरणाऱ्या माझ्या आईचे हात आता त्यांच्या सोबत नव्हते. आईने बाबांच्या पडत्या काळात तटस्थपणे साथ दिली होती.बाबांची नोकरी गेली आणि खायप्यायचे हाल झाले. अगदी रोड वर आले होते दोघं; पण तरीसुद्धा आईने धीर सोडला नव्हता. बाबा खचून गेले होते; पण आई अजिबात नाही. तिला माहीत होतं की, आपल्याला मार्ग मिळणार. प्रत्येक दिवस एक सकारात्मक ऊर्जा घेऊन जगत होती आणि येणारी प्रत्येक रात्र तिला सांगत होती उद्याचा दिवस प्रकाश घेऊन येईल . तुला लढायचं आहे आणि हार मानायची नाही .माझ्या आईने पडेल ते काम केलं.तिने स्वाभिमान जपला होता,कोणासमोर अजिबात हात पसरले नव्हते.मेहनत करूनच जगणार हा ठाम निश्चय होता. कलाकुसर होती तिच्या अंगामध्ये, वेगवेगळ्या कलामध्ये पारंगत होती. स्वतःच्या हाताने वेगवेगळ्या वस्तू बनवत, मातीची भांडी. लोकरीच्या वस्तू .तर कधी भाजीपाला विकत.आम्हीही जात असू तिच्यासोबत . गावोगावी फिरत असे आणि तरीसुद्धा घरी आल्यावर ती आम्हा भावंडांना प्रेमाने घास भरवत असे. खरं तर आम्ही तीच्याकडून खूप काही शिकलो. शमिका कितीही हलाखीची परिस्थिती आली तरी सुद्धा आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं हाच महत्वाचा उपाय असतो आणि त्या प्रसंगाला सामोरे गेल्यावर ती शक्ती आपल्याला येते .दोन हात करण्याची शक्ती.ती नेहमी म्हणायची सुख आणि दुःख हे ऊन-सावली सारखे असतात सुखानंतर दुःख आणि दुखा नंतर सुख हे ठरलेलं असतं त्या काळामध्ये स्वतः वरती विजय मिळवता आला पाहिजे. स्वतःच्या शक्ती वरती विश्वास ठेवला पाहिजे . संकटांना सामोरे जाता आले पाहिजे .असे थोर विचार आम्हाला नेहमीच ताकद देत राहिले आणि आम्ही घडत गेलो खरंच शमिका एकही दिवस जात नाही तिची आठवण येत नाही ;पण तिने दिलेल्या संस्कारांची शिदोरी ,अनुभवांची शिदोरी, आजही सोबतीला आहे ,कायम सोबतीलाच राहणार. तिचं अस्तित्व आम्ही जपून ठेवलं आहे.

तुझा जन्म झाला तेव्हा असं वाटलं जणूकाही माझी आई पुन्हा माझ्या सोबतीला आली . तिचे आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच आहे. खरंच शमिका तू इतकी हळवी आणि इतकी प्रेमळ आहे खरं तर तू तुझ्या आज्जीची सावली आहे .

आता दोन्ही मायालेकींचा संवाद संपला होता; पण आजीच्या आठवणी मध्ये शमिकाचे डोळे पाणावले होते आणि शमिकाची आई सुद्धा आज आईच्या आठवणीत मोकळी झाली होती.शमिकाची आई बोलू लागली .आई म्हणजे असते प्रेमाची मूर्ती, आई असते त्यागाची मूर्ती. आई शिवाय आयुष्य श्वासाशिवाय शरीर. आई सोबत असते आणि सावलीही .आई असते वज्राहुन कठीण तर कधी मृदू.आई सर्वस्व असते.आईची माया ज्याला मिळते त्याच्यापेक्षा मोठा नशीबवान व्यक्ती नक्कीच कोणी नाही. म्हणूनच तर म्हणतात तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी. आयुष्यात आपण कितीही संपत्ती कमावली आणि आपल्या वडीलधाऱ्या माणसाची सोबत नसेल तर त्या संपत्तीला खरंच काही अर्थ नसतो .जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपल्या वडिलधाऱ्या माणसाचा साथ आणि त्यांचे आशीर्वाद हेच असतात.

शमिका बोलू लागली "खरंच माझ्यासाठी ही तू आणि बाबा जगातील सर्वात मोठी संपत्ती आहात आणि मी खूप खूप श्रीमंत आहे की, मला तुम्हा दोघां सारखे आई-बाबा मला देवाने दिले .आई आपल्या आजीने संस्काराची शिदोरी दिली आहे ती सुद्धा आपण जपायची. तिलाही अभिमान वाटेल. मला माहित आहे आपली आजी कुठेतरी आहे .आपल्या सोबतच आहे .ती आपल्याला पाहत आहे आणि तिच्यासाठी आपण सकारात्मकपणे जशी ती जगत होती .तसंच आपण जगणं हे महत्वाचं आहे .

शमिका आता कुठे जरा स्थिरावली
हे पाहून शमिकाची आई तिला म्हणाली "शमिका बेटा, तुला माहित आहे आई नेहमी म्हणायची की, आपल्या ताटातील अन्नाचा अपमान हा कधी करू नये आपल्याला जे वाढले आहे,तो प्रत्येक कण देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करावा.


आता तू बाबांच्या मित्राचा विचार करणं सोडून दे आणि दोन घास खाऊन घे बेटा.तेवढ्यात आईला विभाचा फोन आला. ती शमिकाच्या आईला म्हणाली "काकू सकाळी शमिकाला कॉलेजमध्ये चक्कर आली होती,काळजी घ्या तिची"

ती पडली होती हे ऐकून आई चिंतातूर झाली आणि तिने शमिकाला विचारलं .

"तू सकाळी पडली होती चक्कर येऊन तू मला सांगितलं का नाहीस?

"सॉरी आई पण आता मी ठीक आहे ." शमिका म्हणाली .

शमिकाच्या आईने पटकन ताटातील घास शमिकाला भरवला .

शमिका म्हणाली "अगं आई मी ठीक आहे आता .ह्या विभाला काय गरज होती फोन करून सांगायची खूपच आगाऊ आहे . थांब तिला उद्या मी बघतेच. ते मी सकाळी नाष्टा केला नव्हता म्हणून मी कॉलेजमध्ये पडले"

शमिकाची आई म्हणाली " मला अजिबात आवडलेलं नाही बरं का. पुन्हा असं करत जाऊ नकोस, कॉलेजला जात असताना काहीतरी खाऊन जा नेहमी सांगत असते पण तू कधी माझं ऐकतच नाही. तुला अभ्यासापेक्षा काहीच महत्वाचं वाटत नाही का? तू तुझ्या शरीराकडे लक्ष दिले पाहिजे. असं करत नको जाऊस. तुला माहित आहे ना तुला जरा जरी त्रास झाला तर आम्हाला किती त्रास होतो.

शमिका म्हणाली "अगं आई तू किती टेन्शन घेतेस? तू अगदी आता माझी आई शोभतेस . तू नेहमी मला म्हणतेस की मी टेन्शन घेते पण खरंतर तू सुद्धा टेन्शन घेतेस .


शमिका ची आई म्हणाली "शमिका हे तुला आता कळणार नाही जेव्हा तू स्वतः आई होशील तेव्हा कळणार. चल आता पटकन जेवून घे"

दोघींचे जेवन झाले,शमीकाची आई आणि शमिका बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या.

बेल वाजली.
शमिकाचे बाबा आले होते. त्यांचा चेहरा पडला होता. त्यांचा उतरलेला चेहरा पाहून शमिका आणि शमिकाची आई त्यांच्यापाशी गेले.

क्रमशः

अश्विनी कुणाल ओगले.
वाचकहो रोज एक भाग नियमित टाकण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्हाला जर कथा आवडत असेल तर जरूर लाईक, कंमेंट ,शेअर करायला विसरू नका. तुमचे लाईक, कंमेंट लिखाण करण्यास नेहमीच ऊर्जा देतात.धन्यवाद.


🎭 Series Post

View all