क्षमा- एक सद्गुण

क्षमा-एक सद्गुण

मराठी बोधकथा

एकदा एक सज्जन साधू पुरुष एका गावाहून दुसऱ्या गावी जात होते. तेव्हा पक्के रस्ते नव्हते. जाण्यासाठी वाहन नव्हते. वाट जंगलाची होती. त्या सज्जन साधू पुरुषाच्या मागे मागे एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती येत होता. आता गुंडचं तो. त्याने त्या सज्जन पुरुषाला शिव्या द्यायला सुरुवात केली. पण न ऐकल्यासारखे करून ते पुढे चालत राहिले.

त्या दुर्जन व्यक्तीला आणखीनच चेव आला. त्याने अजून जास्त प्रमाणात अर्वाच्य शब्दांत बडबड सुरू केली. त्याला वाटले ते साधू पुरुष थांबतील. पण व्यर्थ. ते परमेश्वराचे नामस्मरण करीत पुढे पुढे जात होते. गाव जवळ येत होते. एखाद दुसरा माणूस दिसायला सुरुवात झाली होती. गावच्या वेशीवर येताचं ते साधू पुरुष थांबले.

आणि त्या व्यक्तीला म्हणाले, मी मघापासून तुझी बडबड ऐकत आहे. आता मी थांबलो आहे. तुला जेवढ्या शिव्या द्यायच्या असतील तेवढ्या दे. मारायचे असेल तर मार. कारण आता आपण गावात प्रवेश करणार आहोत. गावातील प्रत्येकाच्या मी ओळखीचा आहे. तू मला विनाकारण शिव्या देत आहेस हे जर त्या लोकांनी पाहिले तर ते तुझी यथेेच्छ धुलाई करतील, तुला चांगले बदडून काढतील.

आणि तुला कुणी मारलेलं मला आवडणार नाही. मी आजपर्यंत कधीच कुणालाही एका शब्दाने दुखावले नाही. म्हणून मी दुःखी नाही आणि इतरांना दुःखी पाहणे मला आवडत नाही. तुला ते लोक मारतील याचं दुःख तुझ्या पेक्षा मलाच जास्त होईल. म्हणून तू लवकर येथून निघून जा.

त्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. त्याने त्या साधू पुरुषाला नमस्कार केला. व आता परत मी कधीच असे वागणार नाही. माझी चूक मला समजली. असे म्हणून तो व्यक्ती तिथून दिसेनासा झाला.

तात्पर्य

आपण जशास तसे वागलो तर समोरच्या व्यक्तीमध्ये आणि आपल्या मध्ये काहीच फरक राहणार नाही. दोन सारख्या प्रवृत्तीच्या व्यक्ती जर एकमेकांमध्ये भिडल्या तरच भांडण होते. एकाने जरी समजून घेतले किंवा माघार घेतली तर भांडण होणारच नाही.

 "क्षमा हा सज्जनांचा गुण आहे "परंतु प्रत्येक वेळी आपल्या मधील अहंकार आडवा येतो. इथेच गफलत होते आणि क्षणात काहीतरी भयानक घडून जातं. सांसारिक बाबतीतही असचं आहे. मग ते नवरा बायको असो, सासू सून असो, ननंद भावजय असो, वा इतर.

प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतले किंवा एक जर आक्रमक होत असेल तर दुसऱ्याने थंड डोक्याने (डोक्यावर बर्फ ठेवून) घेतले तर कितीतरी गोष्टीपासून आपण वाचू शकतो कारण राग हा क्षणिक असतो पण त्यामुळे कितीतरी अनर्थ घडू शकतात.

         विवाह व्हावा पूर्ण यशस्वी...

         काय असावी शर्थ?

          एक पक्ष असावा धूर्त...

          तर एक अति मठ्ठ.

सौ. रेखा देशमुख