Feb 26, 2024
वैचारिक

'ट्रान्सफॉर्मेशन' चा श्रीगणेशा...

Read Later
'ट्रान्सफॉर्मेशन' चा श्रीगणेशा...

आजकाल जिकडे पाहाल तिकडे सोशल मीडियावर ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओज ची मांदियाळी आहे.
बिफोर अमुक वजन आणि आफ्टर 10 किलो, 20 किलो, 30 किलो कमी झाल्यानंतरचे हे व्हिडिओ आपल्याला प्रेरित केल्या वाचून राहत नाहीत.
आपलाही असाच एक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ बनवावा, ही सुप्त इच्छा नकळत मनात जन्म घेतेय, अनेकांच्या !
आणि मग सुरू होतो या 'ट्रान्सफॉर्मेशन' चा प्रवास....

जिम ला जायचंच असं पक्कं ठरवलं की, मग चौकशी केली जाते.
जिम मध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर, तिथल्या भिंतीवरचे मोटिवेशनल कोट्स वाचून, उत्साहवर्धक म्युझिक ऐकून, अनेक बॉडी बिल्डर मंडळींना 'हिरो' स्टाईलने वजन उचलताना पाहून भारावून जायला होतं.
कल्पनेतलं 'ट्रान्सफॉर्मेशन' डोळ्यासमोर तरळायला लागते आणि ते प्रत्यक्षात उतरणार, हे अगदी खरं वाटायला लागतं.
जिम मध्ये सहा महिन्यांची, वर्षाची फी एकत्रित भरली की 'एवढा डिस्काउंट मिळेल' अशी आकर्षक ऑफर बिंबवून सांगितली जाते. आणि आपणही आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात मान डोलावून मोकळे होतो.
चला, पहिलं काम तर झालं ! जिमची फी भरली...
आता एवढे भारी व्यायाम प्रकार करायचे तर त्याला शोभून दिसणारे कपडे नकोत, साजेशे शूज नकोत ?
चला, बाजारात खरेदीला.... हुश्श ! सगळी तयारी परफेक्ट झाली... आता जिमला जायचं फक्त बाकी राहिलं...

जिमच्या पहिल्या दिवशी शरीराला सवय नसल्याने, कमी व्यायाम करायचा असतो.
पण काही उत्साही वीरांनी निश्चित टार्गेट एकाच दिवसात निम्मं संपवायचं असं जणू ठरवलेलं असतं..
सगळा व्यायाम आटोपला की थोड्यावेळाने अंगाची ओरडाआरडी सुरू होते.. हात हलवले तरी दुखतात... चालण्यासाठी पाय मुश्किलीने उचलावे लागतात... संपूर्ण शरीर ठणकत असतं...
आणि मग....मग, काय ?
दुसऱ्या दिवशी जिमला सुट्टी !!!
मला कोणत्याही पद्धतीने व्यायाम, जिम अथवा जिम लावणारे यांच्यावर कोणताही आक्षेप घ्यायचा नाही.
वर सांगितलेलं हे फक्त एक रंजित पण खरं उदाहरण आहे.
अनेक जण नियमितपणे व्यायाम करणारे आहेत, आरोग्याबाबत जागरूक असणारे आहेत व जिमला रेग्युलर जाणारे आहेत.
पण माझं म्हणायचा मुद्दा एकच !

जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बाह्यरूपी शरीरात हवंय,
ते होण्यासाठी आणि ते करण्याअगोदर आपण आपल्या अंतररुपी मनोधारणेत बदल करणं खूप आवश्यक आहे,
असं मला वाटतं.

स्वतःला प्रत्येकाने प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारला पाहिजे..

"मला माझ्या शरीराबद्दल किती आदर वाटतो ?"

एकदा मनुष्याने स्वतःच्या आरोग्याचा सन्मान करायला सुरुवात केली की, ह्या बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशन चा प्रवास सोपा होतो आणि तो पूर्ण व्हायला मदत होते.
हे माझे स्वानुभवाचे बोल आहेत.

अनेकदा आपण आपलं निश्चित ध्येय गाठतो, परंतु कमी केलेलं वजन परत वाढतं आणि आपण पुन्हा पूर्वपदाला येऊन पोहोचतो.
असं का ?
एकदा ध्येय गाठलं की संपलं...
पुन्हा खमंग आणि गोडाधोडाचे पदार्थ खाणं सुरू होतं.
जिभेचे चोचले आणि पोटाचे लाड पुरवणं सुरू होतं.
आणि मग, जैसे थे !
जर आपल्याला आपल्या शरीर आणि आरोग्याबद्दल रिस्पेक्ट असेल तर सगळं बदलतं...

आता गणपती बाप्पाचं आगमन होतंय.

दहा दिवस खाण्यापिण्याची मस्त रेलचेल असेल तर मग मी तीस मिनिट जरा एक्सट्रा फिरतो..
घरात मिठाई बनवताना साखरेचे प्रमाण मी कमी करते..
बाहेरून मिठाई आणताना लक्षात ठेवून मी कमी गोड मिठाई आणतो..
बाप्पा घरी सुट्टी साठी आलाय, पण मी माझ्या व्यायामाला अजिबात बुट्टी होऊ देणार नाही..
बाप्पाला वेगवेगळ्या फळांचा प्रसाद ठेवूयात..
घरच्या घरी प्रयोगशील बनून, बाप्पाला आरोग्यदायी रेसिपीची नवलाई चाखवूया..
वगैरे, वगैरे ...असे काही मार्ग आपण अवलंबवू शकतो.

कोणत्याही मोहाला बळी पडताना, एक क्षण थांबून आपण स्वतःला म्हणावं..
मला माझ्या शरीर आणि आरोग्याबद्दल आदर आहे.
मग ही कृती माझ्या आरोग्यासाठी हितदायक आहे का ?
ही कृती केल्याने माझ्या आरोग्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार असेल, तर या क्षणिक मोहाला मी बळी पडणार नाही !

या 'आंतरिक ट्रान्सफॉर्मेशन' चा आपण नियमित सराव केलात,
की तुमच्या 'बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशन' चा व्हिडिओ 'व्हायरल' झालाच म्हणून समजा..!!!
मग ट्रान्सफॉर्मेशन चा 'श्रीगणेशा' करूयात ?

-डॉ. प्राप्ती गुणे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr. Prapti Gune

MBBS Intern

I have profound love for marathi language and for everyone speaks in Marathi. Assal Marathi mulgi at heart.

//