
शाळा माझी स्वप्नात दिसते
सुट्टी आता नकोशी वाटते
जून महिना उजाडला
नवीन पुस्तकं,नवीन वह्या
खाकी कव्हर,बार्बीचे लेबल्स
काहीच नाही बाबा आणत
ऑनलाईन तासिका होतात रोज
पण नाही त्यात भावनिक ओढ
शाळेचा डबा एकत्र खायचाय
मैत्रिणींशी खूप गप्पा मारायच्यात
बसकाकांना किती दिवस भेटलेच नाही
काय करत असतील बरं कळत नाही
रंगीत छत्री,गुलाबी दप्तर..माझी संपत्ती
सारी झाली आहे गायब
शाळेच्या खिडकीतून पाऊस पहायचाय
पावसाच्या कविता मिळून म्हणायच्यात
सई,चैतन्यचा बर्थडे पुढच्या महिन्यात
त्यांना खूप शुभेच्छा द्यायच्याहेत
सगळंच असं हातातून जातंय
तन्मयची मम्मी बाप्पाकडे गेली
याच आजाराने कायमची गेली
तन्मयला मला धीर द्यायचाय
आईबाबा घरात बसलैत
पैशांची गणितं मांडून राहिलेत
मीपण हट्ट सोडून दिलाय
परिस्थितीचा एकूण अंदाज आलाय
लहान लहान म्हणतात आम्हाला
पण बरंच काही कळतय आताशा
रोज करतेय एकच प्रार्थना
सगळं सुरळीत कर रे बाप्पा
----सौ.गीता गजानन गरुड.