Jun 15, 2021
ललित

शाळंच्या बोळात

Read Later
शाळंच्या बोळात

शाळंच्या बोळात...

               म्या तिसरीला हुतो कनाय तवाच्ची गोष्ट. आमच्या शाळंला उन्हाळ्याची सुट्टी लागल्याली. दिसभर माकडावानी समद्या गावभर उड्या हाणून सांच्याला आमची चिल्लर गॅंग पाक दमून भागून जायाची. आवं थोडं काम व्हतं व्हयं तवा आमच्या गांडीमागं. आता तुमीचं बगा की सकाळंपारी उठलं की पयलं गट करून, टमऱ्यालं हातात घिवून वळीनं खालच्या आंगाच्या वड्याला जायाचं. आंदीचं कुणी करीक्रम न केल्याली जागा हुडकून तिथं आपला कारीक्रम उरकायचा. पुना उधळतं घरला येचं. कुणी पवाय शिकवणारं आसलं गावात तर त्येज्यामागं आमाला हिरीवं घिवून चल म्हणून तगादा लावायचा. हिरीतलं खॉलं पाणी बघून पयल्यांदा गांडीवं लय गार यची. पण तरीबी पवाय शिकायच्या आगीनं पाटाणीला भोपळं बिपळं बांदून मोठ्या पोरांच्या भरोश्यावं त्ये टाक म्हंतील तिथनं हिरीत उडी टाकायची. लयी रडल्यागतं आन वायीचं पवल्यागतं करायचं. पुना मोठ्या त्वांडानं आमी लगा कसलं पवलो हिरीत आसं म्हणत म्हणत हातात वल्या आंडरपॅंटी अन डोक्यांव टावेल घिवून कालवा करत गावात मागारी यचं. 
             आयनं गरम गरम कढईत परातल्यालं फवं पॉटं भरून खायाचं. नवं वाजता देवळापशी जमायचं. बॅटबॉल घिवून रामुस्नीचा माळ घाटायचा. बारा वाजेतोवर मनमुराद बॅटबॉल खेळायचं. खेळता खेळता निब्बार भांडायचं. भांडताना तेवढ्या डावापुरता दुस्मन आसणाऱ्या आपल्याचं जीवाभावाच्या दोस्ताचं त्वांड रागारागानं वरबाडायचं. भांडणात त्येज्या शर्टाचं पयलं बटाणं जवर तुटत न्हाय तवर वडायचं. त्येला आयवरनं शिव्या द्येच्या. दोन चार आपुन बी त्येज्याकडनं खायाच्या. पुना घटकत दोस्त व्हयाचं. आन दोन मिंटा पुरवीचं समदं भांडाण इसरून, फिटाफिट झाली म्हणून नव्या डावाला सुरवात करायची. घरी आल्यावं उब्या उब्याचं फडकं गुंडळून ठिवल्याल्या हांड्यातलं गार गार पाणी प्येचं. “ आरं मुडद्या उन्हातनं आलायसं... नीट बसून पिकी पाणी... का डचमळायचंय पोटात बांबूवाल्या ” आसं आजीचं बोलणं खायाचं. घटकाभर थांबून उलीकसं जेवायचं. मंग पुना घरातनं चटणी, मीठ, हळदीच्या पुड्या बांदून खिशात घालायच्या. चाकू, जुनं पेपरं आन पाण्याच्या बाटल्या गोळा करून रानात जायाचं. 
                गावातला ज्यो माणूस लय खवाट त्वांडाचा हाय कनाय त्येज्या कैऱ्या लागल्याल्या आंब्याच्या झाडावं डल्ला हाणायचा. जर त्येज्या तावडीला न्हाय गावलो तर आंब्याची भेळ खायाची आन जर त्येज्या तावडीला गावलो तर त्येजा हाग्या मार खायाचा ह्यो नेम ठरल्याला. पुना वायीचं इकडं तिकडं टंगळमंगळ करायची आन चारच्या सुमारास पुना बॅटबॉल घिवून रामुस्नीचा माळ घाटायचा. पाक सांच्याच्या सात वाजेतोवर खेळायचं. संध्याकाळी वायीचं आंधार पडला की चोर पुलिस निदान लपाछपी खेळायची.
               रात्री साडे आठ वाजता आजीच्या हातनं जेवायचं आन नवं वाजता शाळंच्या कट्ट्यावं मोठ्या पोरांच्या बरं झोपायं जायाचं. समद्या दिवसाचं ह्ये शेम यळापत्रक ठरल्यालं. त्या टायमाला आठवड्यातनं फकस्त तीनंच दिस लाईट आसायची गावात. सुक्कुरवार, शनवार आन रयवार. जवा लाईट आसायची तवा ज्येच्या घरी टीवी हाय त्येज्या घरी जाऊन राच्च्याला एकांदा पिक्चर बिक्चर बगायचा आन लय झॉप आली की सरळ आपलं झोपायं निगुन येचं.
                तर यकदा काय झालं. आसचं यक बुदवारचा दिस हुता. गावात लाईट नसल्यामुळं आमी पाटदिशी जिवुन बिवून वाकळा खांद्यावं घिवून शाळंकडं झोपायं आलो. वाकळा हातारल्या आन आमी वाकळंवं पडलो. तेवढ्यात गावातली तीन चार मोठी पोरं बी तिथं आली. त्येंनी बी आमच्यापशी वाकळा टाकल्या आन आपापल्या वाकळंवं पडली. त्यांचा आंदीचं प्लान झाल्याला आमाला घाबरावायचा का काय माहीत न्हाय. पर आयघाल्यांनी आल्याआल्याचं भुताबितांचा इशय काढला आन यकामेकाला भुताच्या श्टोऱ्या सांगायं लागली. त्ये बी यकदम धीर गंभीर आवाजात. जसजशी त्ये यक यक गोष्ट सांगायं लागले तसतशी आमच्या तिगाचौगांच्या गांडीवं गार यला लागली. गावातल्याचं जुन्या माणसांची उदाहरणं सांगायं लागली. कोण म्हणलं पांडा तात्याला रानातनं घरी यताना रातच्या बारा वाजता यक ससं दिसल्यालं. त्येला हातात घेतलं तसं ती पाय लांबवायं लागलं. पांडा तात्याच्या गांडीवं गार आली. त्येनं ती ससं टाकून दिलं आन त्यो पळत पळत घरी आला तवा वाचला. कोण म्हणलं सदाबापूला कामावनं घरी यताना थडग्यापशी पिपळाच्या झाडाला नागडा करून, उलटा टांगून भुतानी मारल्याला. आणिक कोण म्हणलं का दर आमावसेला भुतांची पालखी जाती आपल्या गावच्या डांबरी रस्त्यावनं. यक म्हणला आमी मी बगितलीया राच्च्या बारा वाजता. ह्ये समदं आयकता आयकता आता आमची पाक चड्डीत हुती का काय आसं आमाला वाटू लागलं व्हतं. 
               पुना त्यातला यक खंडूखपक्या फाडदिशी म्हणला, “ आरं लय लांबचं कशाला... ह्या इथं शाळंच्या बोळात बी यका पैलवानाचं भुत हाय. आपला सुन्या आण्णा माहितेय ना त्येज्याबरं न्हाय व्हय लगा कुस्ती केल्याली त्या भुतानं बोळात. त्येजं काय झालं यकदा कनाय आण्णाच्या घरी मटाणं केल्यालं जेवायला. मंग काय सुन्या आण्णा निब्बार जेवला आन खंडीबरं दारू बी पेल्याला त्येदिशी. पुना बारा वाजता मुताय म्हणून त्यो शाळंच्या बोळात आला. आता तुमाला तर माहित्ये वशाटाचं न भुतांचं किती वाकडं आसतंय त्ये. सुन्या आण्णा जसा मुताय उबा ऱ्हायला तसं भुतानं त्येज मानगुट धरलं अन त्येला खाली पाडला. घाणीत निब्बार घोळासला आण्णाला आन वरनं त्येला दारू न तंबाकू बी मागितली. आवं गांडफाटी कुस्ती केली भुतानं आण्णा बर न काय. जवा दारूची बाटली आन तंबाकुची पुडी तिथं ठेवली तवा सोडला बगा आण्णाला त्या पैलवानानं."
              त्यो तसं म्हणल्या बगर आमच्या पोटात फूटभर खड्डाचं पडला. आमी यकामकाला आजून खसटून चिकटून झोपायचा पिरेत्न करायं लागलो. आंदीचं उन्हाळा त्यात आजून घाम फुटला. आवं आमच्यापस्नं कासऱ्याच्या आंतरावं ती बॉळं. आमी त्या बोळाकडं बगून लाटलाट कापायं लागलो. कारण आमी बी तवा समदीजणं मटाणं खाऊन आल्यालो. आमाला बी त्या बोळाच्या काळुखात दंड बैठका काढणारा पैलवान दिसायं लागला. आमी हाळूहाळू यकामेकात खुसफुसायं लागलो. जसा यक इचार झाला तस आमी यका सेकंदात उठून वाकळा गोळा केल्या आन घराकडं धूम ठोकली. पुना काय आमी पाक जाणत्या वयाचं हुईस तवर त्या शाळंकडं झोपायं गेलो न्हायी. जवा शाळा चालू झाली तवा बी आमी खालच्या आळीच्या वड्याकडं मुतायं जायाचो पर त्या बोळात कशाला म्हणून कशालाचं गेलो न्हायी कंदी.
               पुना आमी जवा त्या पोरांच्या वयाचं झालो तवा आमाला कळलं का त्या गाबड्यांनी आमाला तवा भुताखेताच्या त्या गोष्टी का सांगितल्याल्या त्ये. त्येंचं आयघाल्यांचं तिथं चाबरं चाबरं इशय चालायचं राच्च्याला. आन आमी झोपायं आसल्यामुळं त्येनला नीट मोकळीक मिळत नव्हती बोलायला. म्हणून त्येंनी ह्यो डाव टाकल्याला. पुना जवा आमी तिथं झोपायं जाया लागलो तवा आमच्याबरं बी आमच्यापेक्षा बारक्या वयाची पोरं तिथं झोपायंला यला लागली. जवा आमाला वाटू लागलं का आता आपल्या बी स्वातंत्र्यांवं गदा यला लागलीया तवा आमी बी मंग त्येंचंच हत्यारं उपासलं. अशाचं यका लाईट नसलेल्या राती आमी बी हाळूहाळू आमच्या आमच्यात खुसफुसायं लागलो, “ व्हय रं सुभन्या तुला माहित्ये का ? आरं यकदा कनाय त्या शाळंच्या बोळात हाय ना....!” ????????

------  विशाल घाडगे ©™✍️

Circle Image

विशाल घाडगे

Student

Writer, Poet, Storyteller, Lyricist, Author, Rapper. I write the stories about village and its rural culture.