शलाका दिगंबर मराठे भाग १

“अहो तुम्ही एका जत्रेत हरवलेल्या मुलीला उचलून आणलं, तिच्या आई वडिलांच काय झालं असेल? पोलिस तिच??

शलाका दिगंबर मराठे.

भाग १

छोटी सहा वर्षांची शलाका भारावून गेली होती. भिरभिरत्या नजरेने त्या जत्रेतली दृश्य डोळ्यात सामावून घेत होती. तिच्या बरोबर तिचे बाबा होते. शलाका आणि तिचे आई बाबा परळी वैजनाथ ला दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यावर, तिची आई, हॉटेलवर आराम करत होती आणि तिचे बाबा तिला घेऊन एक जत्रा भरली होती, तिथे शलाकाला घेऊन आले होते. ती विस्फारलेल्या नजरेने आकाश पाळणा बघत होती, उंच उंच जाणारा झोका तिला खुणावत होता. थोडा वेळ फिरल्यावर तिच्या बाबांनी तिला विचारलं  की आकाश पाळण्यात बसायचं का? तिने खुशीत मान डोलावली. मग तिचे बाबा तिला घेऊन आकाश पाळण्यात बसले. पण पाळणा वर गेल्यावर शलाका घाबरली आणि रडायला लागली. पूर्ण वेळ ती रडतच होती. खाली उतरल्यावर सुद्धा तिचं रडणं काही थांबत नव्हतं. शेवटी आइस क्रीम च्या स्टॉल वर जाऊन तिच्या बाबांनी आइसक्रीम घेतलं तेंव्हा तिचं रडणं  थांबलं. दिगंबर ला म्हणजे शलाकांच्या बाबांना कोणी ओळखीचं भेटलं म्हणून ते त्यांच्याशी बोलत होते. शलाका बाजूलाच उभी राहून आइसक्रीम चा आस्वाद घेत होती. मनाला भुरळ पाडणाऱ्या इतक्या गोष्टी आजूबाजूला होत्या, की ती त्यात रमून गेली. खाता खाता ती थोडं इकडे तिकडे फिरत होती, आणि फिरता फिरता थोडं दूर निघून गेली, दिगंबर बोलण्यात गुंतला होता, शलाका आणखी थोडं दूर गेली आणि मग गर्दीत हरवली. आता तिला बाबा दिसेनात, ती इकडे तिकडे धावायला लागली रडायला लागली. तिला रडताना पाहून एक माणूस तिच्या जवळ आला आणि तिला विचारलं की, “का रडतेस बाळा, नाव काय तुझं?” पण शलाकाचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. ती रडता रडता, बाबा, बाबा असं ओरडत इकडे तिकडे पळत होती. दिनकर तिच्या मागे मागे. आता पर्यन्त त्याच्या लक्षात आलं होतं की मुलगी हरवली आहे म्हणून. थोडा वेळ गेल्यावर ती थकली आणि उभी राहिली. भिरभिरत्या नजरेने तिच्या बाबाला शोधत होती. दिनकर तिच्याजवळ पोचला. म्हणाला “ बाबांना शोधते आहेस का बाळा? चल आपण दोघं मिळून शोधू.” शलाकाने  त्यांच्याकडे बघितलं तिला जरा आधार वाटला. सहा वर्षांची चिमुरडी, जगाची न ओळख न देख. तिने मान हलवली. तिचं रडणं आता थांबलं होतं. तिला दिनकर बद्दल विश्वास वाटला.

दिनकरने तिला उचलून कडेवर घेतलं आणि तो जत्रेत तिच्या बाबांना शोधू लागला. त्याने तिला चॉकलेट घेऊन दिलं. आता शलाका शांत झाली होती. जत्रेच्या परिसरात बराच वेळ फिरल्यावर सुद्धा तिचे बाबा दिसेनात, मग जत्रेच्या बाहेर शोधावं असा विचार करून फिरता फिरता दिनकर हळूच जत्रे बाहेर पडला. “इथे तुझे बाबा दिसत नाहीयेत, आपण समोरच्या रस्त्यावर शोधू तुझ्या बाबांना” असं त्यांनी सांगितलं आणि तो रस्त्यावर चालू पडला. शलाका चॉकलेट खात खात बाबा कुठे दिसतात का ते बघत होती. तिला आता भूक लागली होती आणि ती दिनकरला  भूक लागली असं म्हणाली. दिनकर तिला एका हॉटेल मधे घेऊन गेला. आता पर्यंत शलाका आणि दिनकरची चांगली दोस्ती झाली होती. ती दिनकरला मामा म्हणत होती. जेवण झाल्यावर शलाकाला झोप आली आणि ती दिनकरच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेली. दिनकर मनात विचार करत होता, की या पोरीचे आई, बाबा तर सापडत नाहीये, मग आता काय करायचं? एक विचार आला की पोलिसांकडे जाऊन त्यांच्या कडे मुलीला सुपूर्त करावं, पण दूसरा विचार मनात आला की ते तिला सुधार गृहात पाठवतील, मग इतक्या गोड मुलीच्या आयुष्याला काय वळण लागेल हे सांगणं अवघड आहे, त्यापेक्षा आपल्याला दहा वर्ष झालीत, मूलबाळ नाहीये, या पोरीमुळे, आपल्या आयुष्यात पण आनंद येईल,  आपण आपल्या घरी घेऊन गेलो तर? शलाका खूप लोभस आणि निरागस होती, तेवढ्या कमी वेळातच त्याला तिचा लळा लागला होता. बराच विचार केल्यावर त्याने शलाकाला घरी नेण्याचा विचार पक्का केला, आणि तो रेल्वे स्टेशन वर पोचला. कुर्डूवाडीला पोहोचेतो, रात्रीचे अडीच वाजले होते. उतरून तो रिक्शेने त्यांच्या चिंचगावाला घरी गेला. त्यांच्या बायकोने त्यांच्या कडेवर एका मुलीला पाहीले, तिला वाटले की अजून कोणी बरोबर आहे, म्हणून ती वळून दिनकरच्या मागे पाहू लागली. पण कोणी दिसलं नाही.

“अहो, हे काय? ही कोण मुलगी? आणि हिचे आई वडील कुठे आहेत? तुम्ही तर दर्शनाला गेला होता न?” निर्मलाने म्हणजे दिनकरच्या बायकोने प्रश्नांचा भडिमार केला.

“अग हो जरा दम धर, सगळं सांगतो. आधी हिच्या झोपण्यासाठी अंथरुण तयार कर.” – दिनकर. निर्मलाने अंथरुण तयार केलं शलाकाला नीट झोपवलं  पांघरूण घातलं. शलाका अगदी गाढ झोपली होती. तिचा निरागस चेहरा बघून निर्मलाला एकदम भरून आलं. दोन मिनिटं ती शलाकांच्या केसांतून मायेने हात फिरवत राहिली. दिनकर निर्मलाकडे अनिमिश नजरेने बघत होता. किती तरी वर्षांनंतर निर्मलाचा असा समाधानाने खुललेला चेहरा तो बघत होता. शलाकाला घरी आणण्याचा निर्णय घेतला त्याचा त्याला आनंद झाला.

“किती छान आहे ही मुलगी. काय नाव आहे? तुमच्या बरोबर कशी? मला जरा नीट सांगा.” – निर्मला आता अधीर झाली होती.

मग दिनकरने सगळं नीट खुलासेवार सांगीतलं. सगळं ऐकून घेतल्यावर निर्मलाचा चेहरा जरा चिंताग्रस्त झाला. “काय ग काय झालं? तुला मान्य नाही का?” – दिनकर

“अहो तुम्ही एका जत्रेत हरवलेल्या मुलीला उचलून आणलं, तिच्या आई वडिलांच काय झालं असेल? पोलिस तिचा शोध घेत असतील, मुलीला पळवून आणलं म्हणून आपल्याला जेल मधे घालतील. मग आपलं काय होईल यांचा विचार केला का तुम्ही?” – निर्मला आता रडवेली झाली होती.

“अरे बापरे, अग मी हा विचारच केला नाही. खूप शोधलं तिच्या वडीलांना पण सापडलेच नाहीत. इतकी गोड मुलगी आहे, तोपर्यन्त हिच्या बद्दल इतकी माया दाटून आली की असं वाटलं की आपलीच मुलगी म्हणून हिला वाढवू. इतकी वर्ष आपला संसार सुना सुनाच आहे, म्हणून मी हिला घरी घेऊन आलो. पण आता काय करायचं? तूच सांग.” दिनकर म्हणाला. बराच वेळ ती दोघं या समस्येवर विचार करत होती पण उत्तर मिळत नव्हतं. शेवटी उद्या बघू, असा विचार करून दोघंही झोपी गेले.

सकाळी शलाका उठली आणि आई कुठे, बाबा कुठे असं विचारू लागली. निर्मला धावतच आली, म्हणाली “अग मामा, तुझ्या बाबांना शोधायला गेले आहेत आत्ता येतीलच मग कळेल. तुला दूध हवं का?” शलाकाने होकार दिला. मग निर्मलाने तिला दूध दिलं, तिच्याशी गप्पा मारत मारत, तिला खुलवत तिची वेणी फणी, आंघोळ उरकली. तो पर्यन्त दिनकर तिच्या साठी दोन चार ड्रेसेस आणि काही खेळणी घेऊन आला होता. नवीन फ्रॉक पाहिल्यावर शलाका खुश झाली. नवीन खेळण्यांशी खेळताना शलाका रमून गेली. तिला विचारून, तिच्या आवडीचा स्वयंपाक करून निर्मलाने तिला जेवायला घातलं.

जवळ   रोज दिनकर कामावर जातांना तिला सांगून जायचा की तो शलाकाच्या बाबांना शोधायला चालला आहे म्हणून. दिवस असेच चालले होते, आता शलाका त्या घरात रमून गेली होती. आजूबाजूच्या लोकांना दिनकरने सांगीतलं की त्यांच्या बहि‍णीची मुलगी आणली आहे आणि आता तिला शाळेत घालणार आहे म्हणून. ती दिनकरला मामा आणि निर्मलाला मामी म्हणायची, म्हणून लोकांना पण काही संशय आला नाही.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

🎭 Series Post

View all