शलाका दिगंबर मराठे भाग २

“ते माझे खरे मामा नाहीत. मी त्यांना कुर्डूवाडीच्या रस्त्यावर फिरताना सापडले. मी हरवले होते. दो??

शलाका दिगंबर मराठे.

भाग 2

शलाका आता नवीन वातावरणात चांगलीच रूळली होती. तिला मैत्रिणी पण मिळाल्या होत्या. दिनकरने तिचं गावातल्या शाळेत नाव घातलं.

“नाव काय बेटा तुझं?” – मुख्याध्यापक

“माझं नाव शलाका दिगंबर मराठे.” शलाकाने उत्तर दिलं.

“हे कोण तुझे? बाबा का?” – मुख्याध्यापक

“नाही. माझा मामा आहे. दिनकर रघुनाथ भागवत” – शलाका.

शाळा सुरू झाली. निर्मलाच तिला शाळेत ने आण करायची. शलाका हुशार होती. शाळेतली सर्वोत्तम विद्यार्थिनी होती. पाहता पाहता चार वर्ष उलटून गेली, शलाका आता चौथीत गेली होती. बरीच समजूतदार झाली होती. दिनकर आणि निर्मलाने आपसात विचार करून ठरवलं की शलाकाला सगळं खरं नीट समजाऊन सांगायचं. उगाच कोणी बाहेरचा माणूस काही बोलायचा आणि आयुष्य भर गैर समज व्हायचा. नकोच ते, त्यापेक्षा तिला आपणच नीट समजाऊन सांगीतलं तर पुढे काही नवीन प्रश्न निर्माण होणार नाही. त्या प्रमाणे निर्मलाने शलाकाला नीट सर्व सांगीतलं. शलाकाला काहीच फरक पडला नाही. ती मजेत होती. काही दिवसांनी शलाका पहिल्या नंबराने चौथी पास झाली. दिनकर आणि निर्मलाला आकाश ठेंगणं झालं. शलाका आल्यानंतर त्यांचं आयुष्यच बदलून गेलं होतं. तिच्या पायगुणाने दिनकराचा व्यवसाय पण बराच वाढला होता. आर्थिक स्थिती बरीच सुधारली होती. शलाकाचे लाड पुरवताना त्यांना असीम आनंद मिळायचा.

पण काही लोकं नतद्रष्ट असतात. कोणाचं काही चांगलं होत असेल तर ते त्यांना पाहावंत नाही. हा त्यांचा आनंद कोणाला तरी पाहवला नाही. त्यांनी चिंचगाव च्या पोलिस  चौकी वर तक्रार केली की दिनकरला बहीणच नाहीये, मग ही भाची कुठून आली? काही तर गडबड आहे तपास व्हायला पाहिजे म्हणून. चिंचगाव एक छोटं गाव होतं. हवालदार दिनकरला थोडं फार ओळखत होते, त्यांच्या मते दिनकर एक साधा आणि सज्जन माणूस होता. पण तक्रार मिळाली आहे म्हंटल्यांवर चौकशी करणं जरुरीचं होतं. त्यांनी एकाला शेजारी, पाजारी चौकशीला पाठवलं आणि स्वत: शाळेत गेले. मुख्याध्यापकांशी बोलले. त्यांनी तर शलाकाची खूपच तारीफ केली. मग त्यांनी शलाकाला बोलावलं.

“नाव काय बाळ तुझं?” -  हवालदार

“शलाका दिगंबर मराठे.” – शलाका.

“तुझे बाबा काय करतात?” – हवालदार

“माहीत नाही. मी मामा कडे राहते.” – शलाका.

“तुझ्या मामाला पण माहीत नाही?” – हवालदार

“नाही.” – शलाका.

“बरं तुझे आई वडील कुठे राहतात? कोणचं गाव?” – हवालदार

“मला नाही माहीत. मी मामा कडेच राहते.” – शलाका.

“तुझ्या मामांना त्यांची बहीण कुठे राहते हे तर माहीत असेल, त्यांनाच विचारावं  लागेल.” – हवालदार

“ते माझे खरे मामा नाहीत. मी त्यांना कुर्डूवाडीच्या रस्त्यावर फिरताना सापडले. मी हरवले होते. दोन तीन दिवस मामा मला कडेवर घेऊन रस्त्या रस्त्यातून फिरत होते, पण बाबा काही भेटले नाही. मग तेंव्हा पासून तेच माझे बाबा झाले आणि मामी, आई.” – शलाका.

“तुला काही त्रास होतो आहे का त्या घरी?” – हवालदार

“नाही बुवा, कसला त्रास?” – शलाका.

“तुला बरोबर जेवायला देतात ना? तुझे हट्ट पुरवतात का? कधी तुला रागवतात का मामा, मामी?” – हवालदार.

“तुम्ही असं का विचारता आहात? माझे सगळे हट्ट पुरवतात माझे मामा आणि मामी. मामा आणि मामी खूप चांगले आहेत. तुम्ही असं नका बोलू.” – शलाका.

हवालदार साहेबांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. गदगद स्वरात म्हणाले “खूप गोड मुलगी आहे. नवल नाही, दिनकरला एवढा लळा लागला. खूप लाघवी आहे पोर. खूप शिक खूप मोठी हो बाळा. या काकांचा आशीर्वाद आहे.”

हवालदारांनी मग मुलाखत आटोपती घेतली. संध्याकाळी, शिपाई आला आणि म्हणाला, “साहेब, त्या मुलीचा दिनकर आणि त्यांची बायको उत्तम सांभाळ करताहेत सर्वांना कौतुकच दिसलं. कुठेच खोट नाहीये साहेब.” मग साहेबांनी सुद्धा शाळेत काय झालं ते सांगीतलं. ते ऐकल्यावर शिपाई म्हणाला “साहेब, चौकशी पुढे न्यायची, तर कुर्डूवाडीला कळवावं लागेल. मग तिची रवानगी सुधार गृहात होईल. पुढे काय होऊ शकतं याची आपण कल्पना करू शकतो.  त्यापेक्षा साहेब, दिनकर तिचा उत्तम सांभाळ करतो आहे. उत्तम संस्कार देतो आहे. इथेच राहिली तर उत्तम शिकेल आणि नाव काढेल साहेब. तिचं भविष्य सुधारून जाईल. दिनकर पुण्याचं काम करतो आहे.” हवालदार साहेबांना पण ते पटलं आणि त्यांनी चौकशी थांबवली. ज्याने तक्रार दिली होती, त्याला बोलावून चांगली समाज दिली.    

दिनकरने शलाकाला कुर्डूवाडीच्या  शाळेत घातलं. शलाका तिथेही चमकली. दर वर्षी पहिल्या नंबराने पास होत गेली. दिनकर आणि निर्मलाला तिचा खूप अभिमान वाटायचा. निर्मलाने तिच्यावर उत्तम संस्कार केले होते. तिच्या आजूबाजूच्या परिसरात पण शलाका खूप लोकप्रिय होती. शलाका सातवी पर्यंतच्या मुलांच्या शिकवण्या घ्यायची. यथावकाश शलाका ९२ टक्के घेऊन दहावी पास झाली. आता तर दिनकर आणि निर्मलाचा हर्ष गगनात मावेना. चिंचगाव एक छोटसं गाव होतं. दिनकरने एक छोटीशी पार्टी दिली. आता पुढच्या शिक्षणासाठी शलाकाला बार्शी च्या कॉलेज मधे पाठवायचं दिनकरने ठरवलं. तिने इंजीनियर व्हावं असं दिनकरला वाटत होतं, पण शलाकाने सांगीतलं की तिला इकनॉमिक्स ची आवड आहे म्हणून कॉमर्स मधे पदवी घ्यायची आहे.

त्या दिवशी बऱ्याच उशिरा पर्यन्त दिनकर, निर्मला आणि शलाका बोलत होते. दिनकर तिला आपलं म्हणण पटवून द्यायची पराकाष्ठा करत होता, पण शेवटी त्याने हार मानली आणि शलाकाला तिच्या आवडी प्रमाणे कॉमर्स ला प्रवेश घेण्यासाठी होकार दिला. आता शलाका मोठी झाली होती, त्यामुळे ती एकटीच बार्शीला जायची, निर्मलाला तिच्या बरोबर जाण्याची काही आवश्यकता नव्हती. शलाका उत्तम मार्क मिळवून बारावी झाली आणि तिने एक वेगळच वळण घेतलं. तिला आता चार्टर्ड अकाऊंटंट बनायचं होतं. त्या प्रमाणे तिने CPT म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंट ची प्रवेश परीक्षा दिली. दिनकरला यातलं काही कळत नव्हतं. त्याने विचारलं की “नेमकं काय करणार आहेस तू? आणि या कोर्स ला पुढे किती वाव आहे?”

“बाबा, तुम्ही व्यापार करता, पण मोठ मोठे जे व्यापारी आणि कारखानदार असतात, त्यांना बॅलेन्स शीट बनवावी लागते. किती नफा झाला किंवा तोटा झाल्यास किती झाला वगैरे, आणि हा CA कडून तपासून घ्यावा लागतो. ही गोष्ट कायद्याने अनिवार्य आहे. त्यामुळे मी CA बनल्यावर मला पुढे भरपूर स्कोप आहे. तुम्ही चिंता करू नका. आता पर्यंत दिनकर समजून चुकलं होतं की शलाकाची झेप खूप मोठी असते. त्याने संमती दर्शक मान हलवली. B. Com. होता होता शलाकाने CA ची इंटरमिजिएट परीक्षा पण पास केली. आता तीन वर्ष आर्टिकलशीप करायची. शलाका दिनकरला समजाऊन सांगत होती. दिनकर आणि निर्मला कान देऊन ऐकत होती, पण दोघांनाही काही कळलं नाही. पण आता त्यांना सवय झाली होती की शलाका जे म्हणते त्याला होकारच द्यायचा असतो. म्हणून त्यांनी होकार दिला.

शलाकाचा CPT मधला  आणि इंटर च्या परीक्षे मधला स्कोर बघून तिला कोल्हापूराच्या एका नामवंत CA फर्म कडून बोलावणं आलं. आता खरा प्रश्न उपस्थित झाला. इतक्या लांब एकट्या मुलीला पाठवायचं निर्मलाला काही पटत नव्हतं. नाही म्हंटलं तरी साडे चार, पांच तासांचा प्रवास होता. कोल्हापूरला रोज येणं जाणं काही शक्य नव्हतं, तिथेच राहावं लागणार होतं. बऱ्याच चर्चे नंतर असं ठरलं की सध्या शलाका आणि निर्मला जातील आणि तिथे घर भाड्याने घेऊन राहतील. मग नंतर दिनकर वर्ष सहा महिन्यात, आपला इथला व्यवसाय गुंडाळून, कोल्हापूरला नव्याने सुरवात करेल.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

🎭 Series Post

View all