शाईचा पेन

आजकाल फक्त नावच उरलंय. शाळेलतल्या अन कॉलेज मधल्या मुलांनाही शाईचा पेन माहित असेल की नाही शंकाच

        आजकाल फक्त नावच उरलंय. शाळेलतल्या अन कॉलेज मधल्या मुलांनाही शाईचा पेन माहित असेल की नाही शंकाच आहे. सगळीकडे बॉलपेन, जेलपेन याचंच अधिराज्य, वापरा अन फेकून द्या. त्यातून संगणक युग, सगळं डिजिटल झालंय. लिहिणे हा प्रकारच विरळ झालाय. हवा तो मजकूर टाईप करा, आवडीचा फॉन्ट निवडा अन द्या प्रिंट, लेखन तयार. लिहिणं तसं दुरापास्तच. काही सरकारी, बँकांची कामं / अर्ज सोडले तर सगळं ऑनलाईन झालंय. पेन फक्त सही करण्यापूरता उरलाय. त्यातही बॉलपेनन सगळं मार्केट खाल्लंय. शाई पेन जवळजवळ हद्दपारच झालाय. स्टेशनरीच्या दुकानात शाई पेन मागितला तर बंद झालेत म्हणतात नाहीतर कसला असतो शाई पेन अशी उत्तरं मिळतात.

               शाळेत असताना आम्हाला कटाक्षानं शाई पेनच वापरा म्हणून शिक्षक सांगायचे. कारण आत्ता समजायला लागलंय ते का सांगायचे असं? शाई पेनच्या वापरामुळे कोणत्या अक्षरावर दाब द्यायचा, हे समजत. काना, मात्रा, उकार, वेलांटी, रफार हे सगळं कसं नीट जमून येत शिवाय अक्षरही आपोआप वळणदार होतं. बॉलपेनंच तसं नसतं, सगळ्या अक्षरांवर दाब देऊन लिहावं लागतं, परिणामी अक्षर बिघडतं. पण बॉलपेनचा फायदा एक असतो, सारखी सारखी शाई नाही भरावी लागत. रिफिल संपली की एक तर नवीन घ्या नाहीतर पेनच नवीन घ्या. आजकाल तर नवीनच घेतात, रिफिल बदलून आणणे पण कधीच बंद झालंय. अहो जिथे नवीन पेनच पाच दहा रुपयांना विकत मिळतो तिथं दोन चार रुपयांची रिफिल कोण विकत घेणार. वापरा अन फेकून द्या. शाई पेन मध्ये मात्र शाई संपली की भरावी लागते. मग पुन्हा पुन्हा भरावी लागते म्हणून कंटाळा करावा का? आपण एक रोजचंच उदाहरण घेऊया. चपला रोज पायात घालतो, खूपदा काढतो, पुन्हा घालतो. त्याचा कंटाळा नाही करत आपण. कपड्यांच्या बाबतीतही तसंच मग शाई पेनच्या बाबतीतच का कंटाळा? नामवंत लेखक, कवी, ग्रंथकार यांनी आजवर जे लेखन केलं ते या शाई पेननच. मग शालेय जीवनातच फक्त शाई पेन वापरावा का? तर सगळ्यात वयोगटाने शाई पेन वापरा बाबत सतर्क असावं. सहिसाठी जरूर बॉलपेन वापरा. पण शक्यतो लेखनासाठी शाई पेनच वापरावा. लहानांनाही शाई पेन वापराबाबत पालकांनी आग्रही असावं.

         चौथीपर्यंत आम्ही पेन्सिलनेच लिहायचो. आजही मार्केटमध्ये नटराज अन अप्सरा पेन्सिल्स तग धरून आहेत, पारले-जी अन लाईफबॉय सारखं. पाचवीला गेल्यावर आमच्या हातात पहिल्यांदा पेन पडलं. अन तेही एयरमेलचं. आजकाल एयरमेल चा पेन कोणत्या स्टेशनरीच्या दुकानात विचारले तर नावही माहिती नसतं. जिथे शाई पेन मिळायची पंचाईत तिथं एयरमेल पेन म्हणजे कुणी एलियन असल्यासारखं वाटतं. पण आजही पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या मंदिराशेजारी उजव्या हाताला  शाई पेनच एक छोटेखानी दुकान तग धरून आहे. एयरमेल चा पेन म्हणजे आमचा जीव कि प्राण असायचा. जाडसर, नाजूक निप अन शाई पण भरपूर बसायची. हिरव्या, लाल, निळ्या, काळ्या रंगामध्ये पेन असायचा. एकदा भरली कि दोन तीन दिवस चिंताच नसायची. त्याच काळात म्हणजे नव्वदच्या दशकात चायनीज मालाची आवकही भारतीय बाजारपेठांमध्ये वाढली होती. त्याचबरोबर चायनाचा हिरो पेनही खूप लोकप्रिय झाला. सोनेरी टोपण अन काळ्या, हिरव्या, चॉकलेटी रंगामध्ये तसेच पूर्ण चंदेरी रंगामध्ये पेन असायचा. ज्याच्याकडे हिरोचा पेन तो खूप मोठा व मोठ्या बापाचा वाटायचा. एयरमेल पेनसारखी उघडून त्यात शाई भरावी लागायची नाही. शाई साठवायला एक रबरी नळी असायची, त्यावर एक स्टिलच आवरण अन आतमध्ये एक स्टीलची पट्टी. पेनच टोक शाईच्या बाटलीत बुडवायचं अन स्टीलची पट्टी दाबत राहायचं, रबरी नळीत आपोआप शाई जमा व्हायची. एक मात्र तोटा होता की त्याची शाई लवकर संपायची अन पुन्हा भरायला लागायची, कधी कधी तर रोजच भरावी लागे. याउलट एयरमेल पेनचं आठवड्यातून दोनदा किंवा जास्तीत जास्त तीनदा शाई भरावी लागायची. वर्षेभर म्हणा किंवा वर्षानुवर्षे आम्ही एकच पेन वापरायचो. त्या पेनशीही एक मैत्रीचं घट्ट नातंच तयार झालेलं असायचं. पेन हरवला तरच नवीन पेन मिळायचा. बॉलपेनसारखं नाही, वापरा अन फेकून द्या. कुणाचं अक्षर किती चांगलं येतंय चढाओढी लागायच्या, अक्षरलेखनाच्या स्पर्धा व्हायच्या अन बक्षीसही मिळायची. स्टेजवर जाऊन प्राचार्य किंवा सरपंचाच्या हातून प्रशस्तिपत्रक / शाईचा पेन - वही घेताना जग जिंकल्याचा आनंद व्हायचा.

         आज तो आनंद कुठेतरी हरवलाय. ऑफिस मध्ये केलेल्या कितीही चांगल्या कामाची प्रशंसा मॅनेजरचे दोन गोड शब्द अन क्लायंटच्या ई-मेल पुरत्याच मर्यादित असतात. अन दिवस संपला की त्या विरून अन विसरूनही जातात. Annual Party मध्ये मिळालेली ट्रॉफी सुद्धा त्या शाळेतल्या स्टेजवर जाऊन घेतलेल्या प्रशस्तिपत्रक / शाईचा पेन - वहीसारखा आनंद कधीच नाही देऊ शकली.