शाही पनीर मसाला Recipe in marathi

स्वादिष्ट चवदार शाही पनीर मसाला भाजी नक्की करून पहा खाऊन सांगा


 "पनीर" म्हटलें की लहान मुलांपासून ते मोठयांपर्यंत सगळ्यांनाच आवडते . घरात कुठलाही कार्यक्रम असो त्यात पनीरची भाजी हमखास असते .

मी ज्या पद्धतीने पनीरची भाजी बनवते , त्याची सगळे जण तारीफ करत करत जेवतात . मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी माझी पनीरची रेसिपी .


शाही पनीर मसाला

साहित्य : पाव किलो पनीर , ४ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे , ४ मध्यम आकाराचे टोमॅटो , काजू ७ ते ८ , मगज बी २ ते ३ चमचे , एक चमचा आल लसूण पेस्ट  , दोन चमचे लाल तिखट , हळद पाव चमचा , शाही पनीर मसाला दोन चमचे , लवंग मीरे प्रत्येकी ४ , तेजपत्ता दोन पाने , एक दालचिनी तुकडा , वाटाणे तुम्हांला आवडत असतील तर एक वाटिभर , एक वाटी ताज्या दुधावरची जाड साय , कोथंबीर , फोडणीसाठी तेल , बटर दोन चमचे , चवीनुसार मिठ आणि साखर .

कृती : प्रथम काजू आणि मगज बी अगदी थोड्या तेलात परतवून घेणे आणि मिक्सरमध्ये बारीक करणे नंतर त्याच भांड्यात टोमॅटो , आल लसूण घालून बारिक पेस्ट तयार करणे . बाजूलाच वाटाणे एका पातेल्यात पाणी घालून थोडेसे शिजवून घेणे म्हणजे ५ ते १० मिनिटे .
आता कढईत तेल घालून त्यात पनीरचे छोटे तुकडे करून थोडा वेळ परतवून घेणे म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत , तुम्हांला आवडत असेल तर असे परतवून घ्या नाहीतर न परतवता भाजीत घातले तरी चालते . ( पनीरचा एक तुकडा मात्र तसाच न तळता बाजूला काढून ठेवणे )

पनीरचे तुकडे बाजूला काढून घेणे . आता त्याच तेलात लवंग मीरे दालचिनी तेजपत्ता घालणे नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतवणे , कांदा गुलाबी झाल्यावर त्यात टोमॅटोचे वाटण घालणे आणि चांगले परतवणे . तेल सुटेपर्यंत चांगले परतवणे नंतर त्यात सगळे मसाले घालणे लाल तिखट , हळद , शाही पनीर मसाला घालून मिक्स करणे . नंतर त्यात मलाई घालणे म्हणजे दुधावरची ताजी साय घालणे त्याआधी तिला चांगलं फेटून घेणे चमच्याने मग त्यात घालायची . सगळा मसाला एकजीव झाला कि त्यात गरजेनुसार आपल्याला जेव्हडी ग्रेव्ही हवी तेव्हढे पाणी घालणे . मीठ आणि साखर तुमच्या चवीनुसार घाला . आपल्या ग्रेव्हीला एक उकळी आली की लगेच त्यात पनीरचे तळून ठेवलेले तुकडे घालणे आणि वाटाणे पण लागलीच घालणे . आता पुन्हा भाजीला एक उकळी आल्यावर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आधी बाजूला काढून ठेवलेल्या पनीरचा किस करून त्या भाजीवर घालणे म्हणजे बघा आपली पनीरची भाजी कित्ती छान दिसेल .

चवदार आणि दिसायलाही सुंदर अशी आपली पनीरची भाजी तयार आहे . गरमागरम चपाती , पराठा किंवा मग फुलके असो तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता . एक चपाती खाणारी मुलं ह्या भाजी बरोबर चक्क दोन दोन चपात्या मागून खातील की नाही बघाच तुम्ही .
         
पाहिलत किती सोपी रेसिपी आहे ह्या भाजीची . चव तर त्याहून भारी , बोटे चाटून खाल तुम्ही . तुम्हांला व तुमच्या मुलांना नक्की आवडेल . मी तर नेहेमीच बनवते आता तुम्ही पण करून बघा आणि समीक्षा द्यायला मात्र विसरु नका .

असेच खात रहा आणि माझ्या नवनवीन रेसिपीज वाचत रहा .


धन्यवाद


सौं तृप्ती कोष्टी ©®


🎭 Series Post

View all