शादी का लड्डू

कथा लग्नापासून दूर पळणार्‍या वराची

शादी का लड्डू..



" आज काय स्पेशल?"

" काही नाही ग रोजचेच रडगाणे.." लंचटाईम मध्ये बायकांच्या गप्पा सुरू झाल्या आणि समस्त पुरूषवर्गाने कान टवकारले..

" रडगाणे कसले ग?"

" कसे आहे ना.. एक संपले कि दुसरे सुरू होते.. रोज सकाळी ती शाळेत जाताना मुलांची गडबड.. कितीही उठवा, उठत नाहीत.. मग चिडचिड रडारड.. नको वाटते ग.." राखी म्हणाली..

" अग, आपली मुले परवडतात ग, पण सासूची मुले? जीव नको नको करतात.. समोर ठेवलेल्या वस्तू पण हातात द्याव्या लागतात.. असा राग येतो ना. आपली मुले असती ना एक दणका दिला असता.. पण यांना कसा द्यायचा?" वर्षा वैतागली होती..

" झाली यांची नवर्‍याची बदनामी सुरू.. यांना कंटाळा कसा येत नाही रोज बोलून तेच कळत नाही.." प्रशांत म्हणाला..

" त्यांच्याकडे दुसरे विषय तरी कुठे असतात.." सारंगने पुडी सोडली..

अर्थात पुरूष मंडळी हळू आवाजात बोलत होती.. कारण नाहीतर ऑफिसमध्ये स्त्री विरूद्ध पुरुष असे महायुद्ध झाले असते.. 

" लग्न एवढे भयंकर असते?" त्यांच्यातल्या उपवधू पार्थने विचारले..

" घाबरलास कि काय?" नुकतेच लग्न झालेल्या राघवने विचारले..

" थोडासा.." पार्थने कबूल केले..

" अरे त्यात काय घाबरायचे? अरे ला कारे करता आले कि झालेच लग्न यशस्वी. बरोबर ना मयुरेशसर?"

ते ऐकून मयुरेशसरांना थोडा ठसका लागला.. "नाही म्हणजे बरोबर आहे राघव म्हणतो ते.. बायकोसमोर बोललेच पाहिजे.."

" काय गप्पा चालू आहेत?" सगळ्यात वरिष्ठ दिलीपसरांनी एन्ट्री केली..

" काही नाही सर.. लंच ब्रेक सुरू आहे ना.. थोड्या गप्पा सुरू होत्या.." 

" मी ऐकले शेवटचे वाक्य.. काय म्हणे बायकोसमोर बोललेच पाहिजे.. अरे साक्षात पुल सांगून गेलेत. लग्नाच्या छत्तीस गुणांपैकी माझ्याकडे फक्त एकच गुण आहे तो म्हणजे गप्प बसणे.. तो आहे सुखी संसाराचा मंत्र."

" हे ऐकून मला तर लग्नच करू नये असे वाटायला लागले आहे.." पार्थ पुटपुटला..


पार्थ.. सध्याच्या पिढीतला एक उपवधू म्हणजे लग्नाळू तरूण आणि आपल्या कथेचा नायक.. तो ज्या ऑफिसमध्ये कामाला होता तिथे स्त्री पुरूष वाद नेहमीच असायचा.. घरी बहिणभावांची त्यांच्या जोडीदाराशी होणारी भांडणे.. सध्यातरी लग्न या शब्दाचीच त्याला भिती वाटायला लागली होती.. त्यात घरातून आईचा सततचा हट्ट लग्न कर, लग्न कर.. त्याच्याही मनात लड्डू फुटत होतेच.. पण हि भांडणे बघितली कि त्याच्या मनाचा थरकाप उडायचा.. त्यामुळे सध्यातरी त्याने लग्न या शब्दाचीच धास्ती घेतली होती.. तोच विचार करत तो बाईकवरून निघाला होता.. त्याची बाईक सिग्नलवर थांबली.. समोर अजून दोन मिनिटे सिग्नल होता. तो नेहमीप्रमाणे इथे तिथे बघायला लागला.. समोर एक मुलगी तावातावाने टॅक्सीवाल्याशी भांडत होती.. पार्थला टॅक्सीवाल्याची दया आली.. किती भांडतात या बायका.. त्याने स्वतःशीच विचार केला.. त्याचा सिग्नल सुटला.. गाडी पुढे काढणार तोच ती मुलगी त्याच्यासमोर येऊन आपटली.. ती काही बोलणार तोच तो तिला सॉरी बोलून पुढे निघाला.. ती त्याच्याकडे बघतच राहिली.. पार्थला तिचा चेहरा आठवून हसू येत होते. तसाच हसत तो घरी आला.. आल्या आल्या आईने विचारले, 

" अहो, ऐकलत का?"

" बोला.. लग्न झाल्यापासून फक्त ऐकतोच आहे.." इति बाबा.. "झाली यांची पण सुरुवात..." पार्थच्या कपाळावर आठी आली..

" आज काय सूर्य पश्चिमेला उगवला कि काय?"

" नाही.. पण असे का विचारताय?"

" नाही तुमचा लेक हसत आला आहे ना म्हणून.." बाबांनी टीव्हीवरून नजर पार्थकडे टाकली.. खरेच आज त्याचा चेहरा नेहमीसारखा चिडका दिसत नव्हता..

" अरे व्वा.. चांगली गोष्ट आहे.. यासाठी एक चांगला चहा होऊ द्या.."

" हो.. देते हो चहा.. पार्थ तू जरा हातपाय धुवून ये.." पार्थ आत गेलेला बघून आईने बाबांना विचारले..

" त्याचा मूड चांगला आहे तर दाखवू का फोटो?"

" कोणाचा फोटो? कोणाला दाखवायचा आहे?" बाबा परत टीव्हीत गुंतले होते..

" माझा फोटो.. माझ्या मित्राला.."

" तुमचा मित्र.. अरे व्वा.. तेवढाच आमचा त्रास कमी झाला.."

" डोंबल माझे.. तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही.. अहो ते पार्थसाठी स्थळ नाही का आले, त्याबद्दल बोलते आहे.. रोज असा चेहरा करून येतो कि त्याच्याशी बोलायचीही भिती वाटते.. पण आज जरा हसतो आहे तर.."

" तुम्हाला जे हवे ते करा.. मी नाही पडत तुमच्या मध्ये.."

" कोणाच्यामध्ये तुम्ही पडत नाही बाबा?" हात पुसत पार्थने विचारले..

" अजून कोण? तुझी आई.."

" असे कोणतेच जोडपे न भांडता राहू शकत नाही का? कसे सतत तुम्हीपण भांडत असता?"

" मग ते तू दाखवून दे ना?" आई संधी साधत म्हणाली..

" काय दाखवून देऊ?"

" कि न भांडता पण लग्ने होतात.."

"नाही.. अजिबात नाही.. सध्यातरी लग्न हा विषयच नको आहे मला.. "

" अरे पण असे कसे ठरवतोस तू? एखाद्या मुलीला भेट.. मग बघना लग्न करायचे कि नाही.. हि फोटोतली मुलगी तर बघ.. कसली सोज्वळ गुणी दिसते रे.. " आई मस्का मारत म्हणाली..

" आता म्हणते आहेस सोज्वळ, गुणी. लग्नानंतर तूच बडबडशील.. नको रे बाबा.. ऑफिसमध्ये बघतो ना ती नुसती भांडणे.. सासू सुनेला बोलणार, सुन सासूला.. आणि नवराबायको तर नेहमीच युद्धाच्या पावित्र्यात.. नो लग्न. हे फायनल.."

" अरे पण एकदा हा फोटो तरी..." आई बोलेपर्यंत पार्थ निघूनही गेला होता.. पार्थ वैतागून गच्चीवर जाऊन बसला.. लग्न लग्न जिथे तिथे लग्न.. जसे काही लग्नाशिवाय आयुष्यच नसते.. बस मग ठरले आपले लग्न करायचे नाही.. अजिबात नाही.. स्वतःशी बोलल्यावर पार्थला बरे वाटले. कारण आजकाल त्याच्याशी बोलायला कोणीच नसायचे.. त्याच्या परममित्राचे राघवचे तर लग्न झाल्यापासून रात्रीचे फोनही बंद झाले होते.. नाहीतर आधी दोघेही रात्र रात्र बसून गप्पा मारायचे, पिक्चर बघायचे काहीच नाही तर पुस्तके वाचायचे.. दोघांचेही ऑफिस एकच.. मग एकत्र ऑफिसला जाणेयेणे.. मजेत चालू होते सगळे.. पण आता राघवला बायकोला आणायचे आणि सोडायचे असायचे त्यामुळे पार्थ तिथेही एकटा पडला होता.. तो सुस्कारा टाकून तिथून निघणार होता.. तोच समोरच्या घरात त्याला मगाशी दिसलेली मुलगी दिसली.. त्याने डोळे चोळले.. समोर काही मुली पेईंग गेस्ट म्हणून राहतात हे त्याला माहीत होते.. पण ती इथे??

चल भास होत आहेत आपल्याला.. असे म्हणत तो तिथून निघाला.. घरी येऊन झोपला.. पण आज झोपेतही ती आली होती आणि चक्क चक्क त्याच्याशी भांडत होती.. पार्थ बोलायचा प्रयत्न करत होता.. पण ती बोलूच देत नव्हती.. 

" मी बोलू का?" 

" ऊठ, ब्रश कर, आवर आणि मग जेवढे बोलायचे तेवढे बोल.." आई ओरडली. पार्थ खडबडून जागा झाला.

" काय रे कोणाशी बोलायचे आहे?" आईने बारीक नजरेने विचारले..

" कोणाशी? मी कुठे काय बोललो?" पार्थ हसत म्हणाला.. या खडूसच्या चेहर्‍यावर हास्य? आई विचार करत होती.. नक्कीच कोणीतरी आहे.. पार्थ ऑफिसला निघाला.. ती दिसणार नाही याची खात्री असूनसुद्धा त्या सिग्नलपाशी रेंगाळला.. हसत ऑफिसला गेला.. त्याने ऑफिसच्या बिल्डींगमध्ये पाऊल ठेवले.. परत समोर ती.. "पार्थ सांभाळ स्वतःला.. आपल्याला लग्न करायचे नाही.." असे स्वतःशीच बडबडत तो पुढे गेला..




काय वाटते, लग्न करायला तयार नसणाऱ्या पार्थला त्याची जीवनसाथी मिळेल? बघू पुढील भागात..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all