शादी का लड्डू अंतिम भाग

कथा लग्नापासून दूर पळणार्‍या मुलाची

शादी का लड्डू अंतिम भाग..




पार्थ आणि प्राची रोज एकमेकांसोबत जायला यायला लागले.. कधी वेळ मिळाला तर एकत्र कॉफी घ्यायला लागले. पार्थ सातव्या आसमानात होता.. हे सोनेरी दिवस संपूच नये असे वाटत होते. एका बाजूला तिच्याशीच लग्न करावे असे फार वाटत होते.. पण मनातली लग्नाची भिती मात्र जात नव्हती.. काय करावे ते सुचत नव्हते.. आईशी काही बोलावे तरआजकाल आईने सुद्धा घरी लग्नाचा विषय काढणे सोडून दिले होते.. आज आपणच आईशी बोलावे असे त्याने ठरवले.. प्राचीला घरी सोडून पार्थ आपल्या घरी गेला..

" आई, मी आलो.."

" ते दिसले.. आवरून या.. चहा आणते.." आई त्याच्याकडे न बघताच बोलली..

"आईला काही झाले आहे का?" पेपर वाचत बसलेल्या बाबांना त्याने विचारले..

" मला काय धाड भरली आहे? करते आहे ना काम एकटी.."

" मग कशाला एकटी कामे करतेस? आण ना सोबतीला कोणीतरी.." पार्थ म्हणाला.. तसे लगेचच बाबांनी पेपर मधून डोके बाहेर काढले..

" सोबतीला आण म्हणे.. इतके दिवस सांगत होते, तो फोटो बघ, फोटो बघ.. तर नाही.. "

" आई तुला मदतनीस हवी कि सून?"

" सून मदत नाही का करणार? पण नाही.. माझे नशीबच खोटे.." आई चिडत म्हणाली.. बाबांनी परत पेपरमध्ये डोके घातले..

" बरं मग मी सून आणली तर चालेल तुला?" पार्थ टीव्हीकडे बघत म्हणाला.

" काय?" आई आणि बाबा दोघेही ओरडले..

" तू तर छुपा रूस्तम निघालास रे.." बाबा म्हणाले..

" हो ना.. इतके दिवस अशा प्रकारे नाही म्हणत होता, मला तर टेन्शन आले होते, हा मुलगा लग्न तरी करतो का नाही.. आणि आता डायरेक्ट सून.."

" आई बाबा तुम्हाला चालणार नाही का?"

" चालणार? अरे धावेल, पळेल.. पण आधी तिचा चेहरा तरी दाखव.."

" जरा शांत हो आई. मी अजून तिला लग्नासाठी विचारले नाही. तुम्हाला चालणार असेल तरच तिला विचारतो."

" विचार बाबा एकदाचा तिला.. तुझे लग्न झाले ना कि सुटेन मी.."

" आणि मी ही.. " बाबा म्हणाले..

" ते कसे?" इतके दिवस हि माझ्याशी भांडत होती.. आता नवीन भिडू येईल.."

" तुम्ही पण ना.. अजिबात नाही भांडणार हो मी माझ्या सुनेशी.. अगदी प्रेमाने करेन तिचे सगळे.."

आई बाबांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यावर पार्थने शेवटी प्राचीला विचारायचे ठरवले.. तो नेहमीप्रमाणे ऑफिसला जायच्या वेळेस प्राचीच्या घराच्या इथे थांबला.. प्राची आली..

" आज तुला ऑफिसला दांडी मारायला जमेल का?" पार्थने जमिनीकडे बघत विचारले..

" दांडी? आता तर कायमचे ऑफिस बंद करायची वेळ आली आहे.."

" म्हणजे?" पार्थने आश्चर्याने विचारले.

" मी चालले परत.."

" का? " पार्थ एवढ्या जोरात ओरडला कि आजूबाजूचे सगळे त्यांच्याकडे बघायला लागले..

" जरा हळू.." प्राची इथेतिथे बघत म्हणाली..

" तू बस गाडीवर.. मला बोलायचे आहे तुझ्याशी.." प्राचीला घेऊन पार्थ समुद्रावर आला..

" आता सांग.."

" काय सांगू?"

" तू ऑफिस का सोडते आहेस?"

" का म्हणजे? मुली का सोडतात काम.. लग्न ठरवले माझे माझ्या आईबाबांनी.. त्यांनी घरी परत बोलावले आहे.."

" तुझे लग्न ठरले पण? तुला मुलगा पसंत आहे?" पार्थ हळूहळू पॅनिक होत होता..

" त्यात काय बघायचे? मुलासारखा मुलगा.. नंतर टिपीकल नवर्‍यासारखाच वागणार.. दारू पिणार, संशय घेणार.."

" तुला कोणी सांगितलं नवरे असे असतात म्हणून?"

" सांगायला कशाला पाहिजे? आजूबाजूला दिसतेच कि.." प्राची सुस्कारा टाकत म्हणाली..

" अग पण सगळे नवरे तसे नसतात." पार्थ तिला समजावत म्हणाला.

" ते लग्न झाल्याशिवाय कसे समजणार? जाऊ दे आपण तरी कशाला चर्चा करतो आहोत.. पण तुला भेटून खरेच बरे वाटले.. चल निघूया? मला ऑफिसमध्ये राजीनामा द्यायला जायचे आहे.." प्राची उठायला लागली..

" प्राची......."

" बोल ना..."

" माझ्याशी लग्न करशील?"

" काय?"

" हो.. "

" अरे पण तुझा तो निश्चय? नवरा बायकोची भांडणे?" प्राचीने जीभ चावली..

" एक मिनिट.. तुला कोणी सांगितले?"

" आधी सांग.. चिडणार नाहीस.. मत बदलणार नाहीस.."

" आता हे काय नवीन?"

" नवीन नाही जुनेच आहे..."

" बोल पटापट.."

" मी राघवजिजूंच्या लग्नात तुला पाहिले.. आणि पाहताक्षणीच तुझ्या प्रेमात पडले.. पण तू माझ्याकडे बघितलेच नाहीस.. मग मी जिजूंना थोडा मस्का मारला.. मग त्यांनी तुझी अट सांगितली.. माझ्या हट्टामुळे त्यांनी तुझे स्थळ माझ्या आईबाबांना सुचवले आणि माझे स्थळ तुझ्या घरी.. तू फोटोही बघायला तयार नाहीस असे तुझ्या आईने जिजूंना सांगितले.. मग काय प्रेमासाठी मला एवढे सगळे करायला लागले.."

पार्थचे डोके भणभणले होते.. राघव???? माझ्याशी गेम..

" आणि ते पेईंग गेस्ट?"

" त्या खरेच माझ्या मैत्रिणी आहेत.. लकिली त्या तुझ्या घरासमोरच रहात होत्या.. म्हणून जिजूंकडे न राहता मी तिथे राहिले.. "

" जिजू म्हणजे?" पार्थचा मेंदू हळूहळू ताळ्यावर येत होता..

" त्यांची बायको माझी आतेबहिण.."

" ओके.. आणि मग बाजूच्या ऑफिसमध्ये जॉब?"

" जॉब वगैरे काही नाही.. जिजूंनी तिथे सेटिंग केली होती.. मी तिथे बसून त्यांची छोटीमोठी कामे करून द्यायचे.. पण एवढे सगळे करून सुद्धा तू काहीच बोलत नाहीस म्हणून मी चालले होते उद्या घरी.." पार्थ त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही हे पाहून खट्टू झालेली प्राची म्हणाली..

"घरी? कोणत्या घरी?"

" इथून ताईकडे जाते.. तिथून माझ्या आईबाबांच्या घरी.." प्राचीचा चेहरा अजूनही पडलेलाच होता..

" चल मी सोडतो.." पार्थच्या चेहर्‍यावरून त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाजच प्राचीला येत नव्हता.. आपण केलेली सगळी मेहनत पाण्यात गेली या विचाराने ती रडवेली झाली होती.. गाडीवर बसताना ती मुद्दाम पार्थला चिकटून बसली.. तर तो अजून पुढे सरकला.. तिचा सगळा मूडच गेला.. ती उदास नजरेने पाठी जाणारा समुद्र बघत होती.. पार्थ आरशात प्राचीला बघत होता..

" उतर.." विचारात गुंतलेल्या प्राचीला पार्थने सांगितले..

" आपण इथे का आलो आहोत?" आश्चर्याने प्राचीने विचारले..

" आत गेल्यावर समजेल.. आई, आई.."

" अग बाई.. हि का मुलगी?" आईने तोंडावर हात ठेवत विचारले..

" हो..."

"मग मूर्खा आधी फोटो तरी बघायचा.. इतके दिवस आम्हाला फालतूचे टेन्शन.." 

" जाऊ दे.. देर आये दुरुस्त आये.. बरोबर ना चिरंजीव?" बाबा म्हणाले..


लवकरात लवकरचा मुहूर्त काढून पार्थ आणि प्राचीचे लग्न झाले.. लग्नाला अख्खा ऑफिसचा स्टाफ आला होता..

" जोडा अगदी छान शोभतो आहे हो." राखीने सर्टिफिकेट दिले..

" हो.. अगदी तोंडात मारण्यासारखा.." पाठून आवाज आला..

ऑफिसच्या स्टाफने पार्थला गिफ्ट म्हणून काचेच्या लाडवाची प्रतिकृती दिली होती.. त्यावर लिहिले होते.. शादी का लड्डू.. तो देताना सारंग म्हणाला.. " हा लग्नाचा लाडू आहे बरे.. इथे न खाणारे हि पस्तावतात.."

" आणि आमच्यासारखे नाही आता आपल्यासारखे खाणारे हि पस्तावतात.." हे ऐकून पार्थ फक्त हसला.. आणि प्राचीचा हात हातात घेऊन तिला म्हणाला.."हे कोणी काहिही म्हणोत आपले वेगळे आहे.. बरोबर ना.."

उत्तरार्थ प्राची फक्त गोड हसली..


कथा कशी वाटली नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

🎭 Series Post

View all