पितृच्छाया - रंगच्छटा पितृत्वाच्या #fathers_day #अलक

Pitruchchhaya, fathers, day, fathers_day, alak, alk, father, pita, baap, baba, personality, shades, of

पितृच्छाया - रंगच्छटा पितृत्वाच्या ...


1. अडाणी म्हणून आयुष्यभर कमी लेखत आलेल्या शेतकरी बापाला आज आदित्यने येऊन नमस्कार केला . स्वतः शेतात काम करून मुलाच्या मनात कलेक्टर होण्याचे स्वप्न आणि जिद्द पेरणारा आणि त्याच्या शिक्षणासाठी कसेही करून पैशांची तजवीज करणाऱ्या या बापाने स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलाच्या आयुष्यभराच्या जेवणाची सोय केली होती.  सकाळ संध्याकाळच्या जेवणाची काळजी करते ती आई आणि आयुष्यभराच्या जेवणाची सोय करतो तो बाप , हे आदित्यला कळले होते.

_________________________________________

2. नात झाली म्हणून नाराज झालेल्या आपल्या आईला समजावून , मुलगा जर दिवा असेल तर मुलगी ही पणती असते . ही मुलगी म्हणजे माझा मुलगाच आहे असं म्हणून त्याने हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पेढे वाटले होते. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिथला प्रत्येक जण त्याचे कौतुक करत होता. काही वर्षांनी , आज तीच नात यशस्वी विख्यात हार्ट स्पेशालिस्ट झाल्यावर, आजी म्हणत होती , "पोरीने बापाचे नाव काढले हो". आज त्या बापाचा मुलीवरचा विश्वास जिंकला होता.

_________________________________________

3. "आई, बाबा म्हणजे काय ग?" तीन वर्षांचा अंकुर शाळेतून आल्या आल्या आईला विचारत होता. तो चार महिन्याचा असताना नवऱ्यावर पडलेला काळाचा घाला सोसून एकटीनेच अंकुरला आई वडील दोघांच्याही मायेचे छत्र देत वाढवत असलेल्या तिच्याकडे मात्र त्याच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.

_________________________________________

4. पुराचे पाणी घरात शिरल्यावर महादूने आपल्या  लहानग्या मुलाला खांद्यावर बसवून कमरेइतक्या पाण्यातून सात किलोमीटर पायपीट करून माहेरी कामानिमित्त गेलेल्या बायकोजवळ सुखरूप नेऊन पोचवले.  मुलाला सुखरूप पाहून बायकोच्या डोळ्यात समाधान तरळलं . आतापर्यंत कसाबसा रोखून ठेवलेला, महादूच्या डोळ्यात आलेला पूर नदीच्या पुरापेक्षाही मोठा असल्याचं त्याच्या बायकोला जाणवलं होतं.  महादूमधल्या सतर्क पण हळव्या बापाचे तिला पुनश्च दर्शन झाले होते.

_________________________________________

5. अमेरिकेत तीन चार वर्षांसाठी गेलेला मुलगा परत आला की गोविंदराव त्याच्याकडे त्यांनी आयुष्यभर काबाडकष्ट करून उभारलेला उद्योग सोपवणार होते. मुलाचा तिकडूनच फोन आला, बाबा मी आता तिकडे परत येणार नाही . इकडेच स्थायिक होतो.  गोविंदराव म्हणाले, अरे पण माझं मन तिकडे नाही रमणार. मुलगा म्हणाला मग तुम्ही तिकडेच रहा, मी इकडे अमेरिकेत राहतो . मोठे उद्योजक म्हणून मान मिळवलेल्या गोविंदरावांना बाप म्हणून मात्र हरल्यासारखं वाटत होतं. त्यांचे प्रेम मुलगा समजू शकला नव्हता का?

_________________________________________

6. तो हमाली करायचा.  क्विंटलभर वजन असलेले पोते पाठीवर उचलून न्यायचा. लेकीला पाचव्या वाढदिवसाला पैंजण हवेत म्हणून गेले पंधरावीस दिवस तो रोज दुप्पट पोते उचलून पैसे जमा करायचा . लेकीच्या हातात पैंजण दिल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून उन्हातान्हात अनवाणी काम करताना पायाला आलेल्या फोडांचाही त्याला विसर पडला होता. त्याच्या पायांकडे लक्ष जाताच मुलगी म्हणाली, "बाबा मला नको हे पैंजण, हे परत करून येताना आपण तुमच्यासाठी चांगली चप्पल घेऊ या , चला". अश्रू पुसत तो विचार करू लागला, आज त्याच्यातला परिस्थितीशी झुंजणारा बाप हरला होता की जिंकला होता?

_________________________________________

7 . आज सात वर्षांनी विक्रांतने वडिलांना मिठी मारली होती. सिगारेटचे पहिले थोटुक मुलाच्या हातात दिसताच त्याच्या कानशिलात लगावणाऱ्या जागरूक बापाला तो इतकी वर्षे मागासलेल्या विचारांचा , फक्त धाकदपटशा दाखवणारा समजत होता. ती पहिली सिगारेट हातात देणाऱ्या चेन स्मोकर असलेल्या मित्राचा आज फुफ्फुसाच्या कॅन्सरने देहांत झाला होता.
_________________________________________

8. एक यशस्वी आणि कार्यमग्न डॉक्टर म्हणून आज उत्कर्षचा सत्कार समारंभ होता. सत्कार स्वीकारून त्याने माधवरावांना नमस्कार करत आपल्या यशाचे श्रेय दिले होते. अनाथ उत्कर्षला दत्तक घेऊन त्यांनी डॉक्टर बनविले होते. काही वर्षांपूर्वी बाप होऊ शकत नसणाऱ्या माधवरावांना हिणवणाऱ्या लोकांची तोंडे आज आपसूकच बंद झाली होती , कारण त्यातील काहींची मुले व्यसनाधीन झाली होती तर काहींच्या मुलांनी बापाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला होता. आज माधवरावांना कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटत होते.

_________________________________________

9. एक वर्षाच्या मुलीला पाळणाघरात सोडायला घेऊन गेलेला तो , तिथल्या बाईंच्या हाती मुलीला सोपावल्यानंतर तिचे रडणे ऐकून तसाच परत घेऊन आला. "आयुष्यभर जपलेला माझ्या काळजाचा तुकडा तुम्हाला देतोय , जावईबापू . तिच्या डोळ्यांत अश्रू येऊ देऊ नका, तिचे काही चुकलेमाकले तर समजावून सांगून माफ करा" , मुलीची पाठवणी करताना सासऱ्याच्या या शब्दांमागील वेदना , आणि अश्रूंमागील अगतिकता त्याला आज कळली होती.

_________________________________________


10. "नेहमी हॉटेलात खाणं म्हणजे जास्त पैसे देऊन निकृष्ट दर्जाचे खाणे. त्यापेक्षा घरचे आईने बनवलेले जेवण कधीही उत्तम" असे समजावत मुलाला बाहेरचे खाण्यापासून रोखणारे वडील म्हणजे फारच कंजूष माणूस, असे अंकितला नेहमी वाटायचे. करोना काळात जेव्हा प्रत्येक डॉक्टर जेव्हा पौष्टिक जेवणाचे महत्त्व सांगत आहेत तेव्हा त्याला कळले, बाबांची काळजी आणि त्यांनी लावलेल्या योग्य शिस्तीचे महत्त्व.


© स्वाती अमोल मुधोळकर

पितृच्छाया - रंगच्छटा पितृत्वाच्या. अलक लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. कसा वाटला जरूर कळवा.