शब्द झाले मुके 5

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 5

ऑफिस सुटल्यानंतर मेघना नेहमीप्रमाणे तिच्या घरी जायला निघाली. ती आज प्रचंड खूश होती. राजनने तिला मिठी मारली होती, तेव्हाचा तो त्याचा सुखद स्पर्श तिला आपलासा करून गेला होता. त्या स्पर्शाने ती मोहरुन गेली होती. तिला आजूबाजूच्या परिस्थितीचे मुळीच भान नव्हते. ती फक्त आणि फक्त राजनने मारलेली ती मिठी याच एका धुंदीत होती. राजन हा तिच्या आयुष्यातील पहिलाच मुलगा असेल की ज्याने तिला मिठी मारली होती. याआधी ती कोणत्याही मुलाच्या मिठीत गेली नव्हती. ही पहिलीच वेळ होती, त्यामुळेच तो स्पर्श तिला खूप भावला होता.

मेघना तिच्या विचारातच घरी आली. ती सोसायटीमध्ये आल्यानंतर घराकडे जाऊ लागली, इतक्यात एका लहान मुलीचा आवाज तिच्या कानावर पडला. हा आवाज नक्कीच आपल्या ओळखीचा आहे असे तिला वाटल्यामुळे ती त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. ज्या फ्लॅटमधून आवाज ऐकू येतोय तिथे जाऊन मेघना थांबली. आता इथे कुणाला, कसे विचारायचे? कोणी ओळखीचे देखील नाहीत? मग आत जायचे की नको असा बराच वेळ विचार करत ती दारातच थांबली. शेवटी धाडस करून तिने दारावरची बेल वाजवली. बेल वाजल्यानंतर थोड्या वेळातच एका बाईने दार उघडले.

"नमस्कार, मी मेघना शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहते. इथून जाताना मला एका लहान मुलीचा आवाज ऐकू आला. कदाचित तो मला भास झाला असेल; पण त्या मुलीचा आवाज मला ओळखीचा वाटला म्हणून मी या दिशेने आले. तुमच्या घरात कोणी लहान मुलगी आहे का?" मेघनाने विचारले.

"हो. माझी मुलगी आहे. ती पाच वर्षांची आहे. तिच्या मैत्रिणीसोबत खेळत बसली आहे. तुम्ही आत या ना. तुम्ही तिला भेटू शकता." असे म्हणून त्या बाईने मेघनाला आत बोलावून घेतले. मेघना देखील आतुरतेने ती मुलगी नक्की कोण आहे? हे पाहण्यासाठी आत गेली. ही पहा माझी मुलगी अनन्या आणि ही तिची मैत्रीण स्वरा. दोघीजणी मगापासून येथे खेळत आहेत. स्वराला तिथे पाहून मेघनाला खूपच आश्चर्य वाटले. 'स्वरा इतक्या लांब आली कशी? तिला कोणी सोडले? घरच्यांना माहित आहे की नाही? सांगून आली आहे की नाही?' अशा अनेक प्रश्नांनी तिच्या डोक्यात थैमान माजले होते. मेघनाला पाहताच स्वरा चटकन उठली आणि मेघनाला येऊन बिलगली.

"अगं मेघना, तू इथे कशी? मी बघ अनन्यासोबत खेळायला आले आहे. तू पण ये ना आमच्यासोबत खेळायला. येशील ना आमच्यासोबत खेळायला?" स्वरा मेघनाचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागली.

"स्वरा, तू मला सांग; तू इथे कशी आलीस? तुझ्या घरी माहित आहे का? तू सांगून आली आहेस ना?" मेघनाने स्वराला विचारले.

"नाही. मी शाळेतूनच अनन्यासोबत आले आहे. मला तिथे करमत नाही. माझ्यासोबत कोणी खेळायला नाही, म्हणून अनन्यासोबत खेळायला मी इथे आले आहे." हे ऐकून मेघनाला तिची काळजी वाटली. ही मुलगी इथे एकटी आली आहे आणि तिकडे आई बाबा तिची शोधाशोध करत असतील, असा विचार तिच्या मनात येत होता.

"मग तू फोन करून तरी सांगायचं ना घरी. मी अनन्यासोबत खेळायला आले आहे म्हणून. आता ते काळजी करत असतील ना? तुला शोधत असतील. तू असं का केलंस?" मेघना थोडासा आवाज वाढवून बोलू लागली.

"माझ्याकडे त्यांचा फोन नंबर नाही आणि तू मला सारखी सारखी ओरडू नकोस ना. तू माझी मैत्रीण आहेस ना. मला तिथे करमत नाही, माझ्याशी खेळायला कोणीही नाही, म्हणून मी माझ्या मैत्रिणीसोबत इथे आले आहे." स्वरा लाडात येऊन म्हणाली.

"घरी सांगून आली आहेस की न सांगताच आली आहेस आणि तू इतक्या लांब आलीसच कशी? शाळेचा ड्रेस आहे तसाच आहे याचा अर्थ तू शाळेतून डायरेक्ट इथेच आली आहेस? घरी कोणालाच काहीच माहित नाही हे खरं खरं सांग स्वरा." मेघना काळजीने म्हणाली.

"हो. मी शाळेतूनच आले आहे आणि घरात कोणालाच काहीच माहित नाही. मी माझ्या मैत्रिणीसोबत इथे आले आहे." स्वरा तिलाच ओरडत म्हणाली.

मेघनाने मैत्रिणीच्या आईकडे चौकशी केली असता ती म्हणाली की, "अनन्या तिच्या स्कूलच्या व्हॅनमधून येताना सोबत हिला घेऊन आली. हिचे नाव, गाव, फोन नंबरही नाही आमच्याकडे. मग आम्ही चौकशी करणार कशी? मी सुद्धा आत्ताच आले आहे आणि पाहते तर या दोघी खेळत होत्या. अनुच्या आजीने तिला खूप वेळा विचारले; पण तिने काहीच उत्तर दिले नाही, म्हणून मला फोन केला. माझ्या ऑफिसमध्ये बरेच काम रखडल्यामुळे मला यायला जमले नाही; पण आता येऊन मी यांच्या मॅडमना फोन केले आणि यांच्या मॅडमनी हिच्या घरचा फोन नंबर मेसेज करतो म्हणून सांगितले आहे. थोड्या वेळातच तिच्या घरचा फोन नंबर मला मिळेल मग मी त्यांना फोन करून सारं काही सांगेन." अनन्याची आई म्हणाली.

"ही माझ्या ओळखीची आहे. म्हणजेच माझ्या बॉसची मुलगी आहे. मी त्यांना फोन करून सांगते की त्यांची मुलगी इथे आहे म्हणून. ते काळजी करत असतील." असे म्हणून मेघनाने लगेच सरांना फोन केला. दोन तीन वेळा तिने फोन केला तरीही राजनने तिचा फोन उचललाच नाही. चौथ्या काॅलला त्याने फोन उचलला.

"तुझं काय चाललंय मधे मधे. इथे मी सध्या खूप मोठ्या टेन्शनमध्ये आहे. मला आता कोणतायाच गोष्टी ऐकून घ्यायच्या नाहीत. उद्या सुट्टी पडलेली मला चालणार नाही. नेहमीप्रमाणे ऑफिसला यायला उशीर झालेला मला चालणार नाही आणि सगळ्या फाईल्स व्यवस्थित तपासण्याचे काम सांगितले तरी व्यवस्थित करायचं." राजन रागारागाने बोलत होता. मेघनाला मात्र त्याचा खूप राग येत होता.

"एक, एक मिनिट सर. तुम्ही कोणत्या टेन्शनमध्ये आहात त्याची मला कल्पना आहे." मेघना त्याला थांबवत म्हणाली.

"आता तुमचे ऑफिसचे काम असेल, तुम्हाला लोड झाला असेल, सगळे प्रोजेक्ट फाईल चेक करायचे त्याचा त्रास असेल, घरची जबाबदारी असेल यातलं काहीच नाही. तू तुझं तोंड बंद कर आणि फोन सुद्धा बंद कर. मला कोणत्याच विषयावर तुझ्याशी बोलायचं नाही." राजन पुन्हा रागानेच म्हणाला.

"माझं ऐकून घ्याल का? तुम्ही स्वराची काळजी करत आहात ना? ती शाळेतून कुठे गेली आहे याचं टेन्शन आलंय ना तुम्हाला? ती घरी आली नाही ना याबद्दलच तुम्हाला टेन्शन आलं आहे ना?" मेघनाच्या तोंडून असे ऐकताच राजन स्तब्ध झाला. भर उन्हात वाऱ्याची लकेर यावी आणि मन प्रसन्न व्हावे असे काहीसे वाटले.

'स्वराबद्दल हिला कसे माहित?' असे समजून राजन खाड्कन उठून उभा राहिला. त्याला थोडे आश्चर्य वाटले. 'स्वरा घरी आली नाही ही गोष्ट कोणालाच माहीत नाही आणि ऑफिसमध्ये तर कोणी चकार शब्द काढला नाही. कसे काढणार? कोणालाच माहित नव्हतं ना. मग हिला कसे कळले मला काय माहित?' राजन स्वतःशीच पुटपुटला.

"हो. पण तुला कसे माहित स्वरा घरी आले नाही म्हणून." राजनने आश्चर्याने विचारले.

"ती सध्या माझ्याजवळ आहे." मेघना ठसक्यात म्हणाली; पण तिचे इतकेच वाक्य ऐकून राजन संतापला.

"तू तिला किडन्याप वगैरे केली नाहीस ना? तुला किती पैसे हवे आहेत बोल, मी द्यायला तयार आहे; पण माझ्या स्वराला सुखरूप दे. मुलीच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी तुला जिवंत सोडणार नाही. तुला काही हवं असेल तर बोल, मी द्यायला तयार आहे. मला माझ्या सगळ्या इस्टेटीपेक्षा माझी मुलगी महत्वाची आहे. माझ्या काळजाचा तुकडा आहे ती. तिला काही होता कामा नये. किती पैसे घेऊन येऊ." राजन चिडूनच म्हणाला.

राजनच्या अशा बोलण्याने मेघना भडकली. 'हा स्वतःला समजतो तरी काय? पैसा असला म्हणजे सर्वकाही असते असं नाही. याला माणसाची थोडीसुद्धा पारख नाही. त्याची पोरगी एक तर इथे आली आहे आणि हा माज दाखवतोय." मेघनादेखील थोडी चिडली होती.

"वीस लाख घेऊन या." असे रागातच म्हणून मेघनाने फोन बंद केला.
क्रमशः

🎭 Series Post

View all