शब्द झाले मुके 3

कथा तिच्या कर्तव्याची.. कथा एका प्रेमाची..
शब्द झाले मुके 3

मेघना राजनच्या घराजवळ गेली. गेटसमोर असलेल्या वॉचमनला तिने ऑफिसचा आयडी दाखवला आणि तिने घरात प्रवेश केला. आत गेल्यानंतर हॉल पाहूनच ती थबकली. इतका सुंदर हॉल! जणू काही राजवाडाच आहे की काय? असे तिला वाटत होते. ती दबकतच आत जाऊ लागली. एक एक पाऊल ती विचारपूर्वक टाकत होती. इकडे तिकडे पाहून अलगद जात होती.

'अरे, आपण इतके का घाबरतोय? जणू चोरपावलांनीच घरात प्रवेश करतोय; पण मला तर काही घाबरण्याचे कारण नाही. मी ऑफिसच्या कामासाठी इथे आले आहे. मग इतकी का घाबरत आहे? मी पण ना.' असे मनातच बडबडत मेघना आत जाऊ लागली.

आत जाऊन तिने पाहिले तर काय? साधारण चार-पाच वर्षाची मुलगी सोफासेटवर उभारून उड्या मारत होती, ती ओरडत होती, कोणालातरी हाक मारत होती. कदाचित तिच्या आईला हाक मारत असेल?
'ही सरांची मुलगी आहे का? पण ही अशी का ओरडत आहे? आणि तिच्या आजूबाजूला कोणीच नाही? घरातील सगळे कुठे गेले असावेत? अरे देवा, मग मी फाईल कशी घेऊ? सरांच्या पत्नी असतील का घरात? ही मुलगी कोणालातरी हाक मारत आहे? पण इथे तर कोणीच दिसत नाही, बापरे! घरात कोणी नसेल तर? मी फाईल कशी नेणार आणि जर फाईल नेली नाही तर फुकटचा ओरडा खाऊन घ्यायचा. आता काय करू?' अशा विचारातच मेघना त्या मुलीजवळ गेली.

"बाळा तू अशी का ओरडत आहेस? तुला काय झालंय? काही हवे आहे का? घरात कोणी नाही का? तुझी आई कुठे आहे?" मेघनाने तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला; पण ती मुलगी काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.

"कॉकरोच कॉकरोच" असे म्हणून ती फक्त ओरडत होती आणि कॉकरोच हा शब्द ऐकून मेघनादेखील भीतीने उड्या मारू लागली. तीसुध्दा पटकन सोफासेटवर चढून उभारली.

"कुठे आहे कॉकरोच? कुठे आहे?" मेघना घाबरतच म्हणाली.

"तिकडे" म्हणून त्या छोट्या मुलीने बोट करून दाखवल्यावर मेघना तिकडे पाहू लागली. बऱ्याच लांब ते कॉक्रोच होते आणि आपण या मुलीपेक्षाही लहान होऊन सोफासेटवर चढलो आहे हे पाहून मेघना शरमली आणि हळूच ती खाली उतरली.

"हे बघ बाळ, ते खूप लांब आहे आणि इथे तुझ्यापर्यंत अजिबात येणार नाही. तू शूर वीर झाशीची राणी आहेस ना. मग इतक्या लांब असलेल्या काॅकरोचला का बर घाबरतेस? कशालाच घाबरायचे नाही. तू खूप धीटाची मुलगी आहेस ना." असे मेघना त्या मुलीला समजावत होती.

"मग तू का घाबरून वर उभा राहिलीस? तू धीटाची नाहीस का?" ती मुलगी पटकन म्हणाली.

"मी धीटाची नाही ग; पण तू धीटाचे आहेस ना? झाशीची राणी आहेस ना? मग तू घाबरायचं नाही बरं. कशालाच घाबरायचं नाही. सगळ्या परिस्थितीशी सामना करायचा." मेघना त्या मुलीला समजावत होती.

"झाशीची राणी कोण होती ग? मला सांगशील का?" ती मुलगी पुन्हा म्हणाली.

"हो हो, नक्की सांगेन; पण आता नाही. पुन्हा कधी भेटलो ना तर नक्की सांगेन." मेघना म्हणाली.

"प्रॉमिस" ती मुलगी हात पुढे करत म्हणाली.

"पक्कावाला प्रॉमिस." असे म्हणत मेघनाने तिच्या हातावर हात ठेवला.

"बरं, मला सांग. तुझी मम्मी कुठे आहे?" मेघनाने त्या मुलीला विचारले.

"मला नाही माहित माझी मम्मी कुठे आहे ते?" ती मुलगी नाराजीच्या सुरात म्हणाली.

"बरं, मग तुझ्यासोबत आता घरी कोण आहे? माझं थोडसं काम आहे." असे म्हणत असतानाच समोरून व्हिल चेअरवरून एक बाई येताना तिला दिसली.

"नमस्कार, मी मेघना. ऑफिसमधून फाईल नेण्यासाठी आले आहे, म्हणजे सर जाताना ती फाईल विसरून गेले होते आणि आता मला घेऊन येण्यास त्यांनी सांगितले. आत्ता महत्त्वाची मीटिंग असल्याने ती फाईल घेऊन जाणे गरजेचे आहे. प्लीज, मला मोहिते कंपनीजची फाईल द्याल का?" हे मेघनाच्या तोंडून ऐकल्यावर त्या बाईने लगेच राजनला फोन केला.

"राजन कोणती फाइल हवी आहे? या मुलीला तूच पाठवून दिले आहेस ना? मेघना नाव आहे तिचे." असे वाक्य एकदाच ही बाई सरांची आई आहे हे मेघनाने ओळखले.

राजनला विचारून झाल्यानंतर राजनच्या आईने मोहिते कंपनीची फाईल आणून दिली. त्या व्हिल चेअरवरूनच रूममध्ये गेल्या आणि कपाटातून फाईल घेऊन आल्या.

"हे घे फाईल." असे म्हणून त्यांनी मेघनाच्या हातामध्ये फाईल दिली. मेघना ती फाईल घेऊन ऑफिसकडे यायला निघाली.

"हे काय? तू लगेच निघालीस. माझ्यासोबत थांबणार नाहीस." हे त्या चिमुकलीच्या तोंडून शब्द ऐकून मेघनाचे पाय तिथेच थबकले. ती लगेच पाठीमागे वळून पाहू लागली, तर ती चिमुकली केवीलवाणा चेहरा करून तिच्याकडे पाहत होती.

"हो ग, मला ऑफिसला तर जावेच लागणार ना. खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ही फाईलसुध्दा द्यायची आहे. मला लवकरच जावे लागणार. उशीर झाला तर ओरडा बसेल." मेघना इवलासा चेहरा करत तिला समजावणीच्या सुरात म्हणाली.

"मी बाबाला सांगते, तू जाऊ नकोस ना. इथेच थांब ना. माझ्यासोबत कोणीच नाही. मी एकटीच खेळत आहे, मला खूप कंटाळा आला आहे. थोडा वेळ माझ्यासोबत थांब ना." ती लहान मुलगी मेघनाला विनवू लागली.

"सो सॉरी बेटा; पण मला जावंच लागेल. आपण पुन्हा नक्की भेटू, मी तुला झाशीच्या राणीची गोष्ट सांगणार आहे ना. मग आपल्याला भेटायचं आहे." मेघनाचे हे बोलणे ऐकून ती चिमुकली खूश झाली.

"बरं मला सांग, या गोड परीचं नाव काय आहे?" मेघना म्हणाली.

"परी म्हणजे मी काय?" ती मुलगी पुन्हा म्हणाली.

"हो हो. तूच गोड परी." मेघना हसतच म्हणाली.

"स्वरा. स्वरा राजन देशमुख. तुझं नाव मेघना आहे ना?" ती मुलगी म्हणाली.

"हो. माझं नाव मेघना." मेघना म्हणाली.

"मेघना, आपण नक्की भेटू या." मेघना हे नाव ऐकून तिची आजी अर्थातच राजनची आई तिला ओरडली.

"अरे बाळा, मोठ्यांची नावे घ्यायची नसतात. मावशी म्हणावं किंवा अँटी म्हण." राजनची आई म्हणाली.

"इट्स ओके मॅडम. काही हरकत नाही. स्वरा, तू मला मेघना म्हणालीस तरी चालेल हं." मेघना म्हणाली.

"बरं मेघना, आपण नक्की भेटू. तू मला गोष्ट सांगणार आहेस ना?" स्वरा हलकीशी हसतच म्हणाली.

"हो हो. नक्की मी तुला गोष्ट सांगेन. चल बाय बाय." मेघना म्हणाली.

"बाय बाय मेघना." स्वरा हात हालवत म्हणाली.

स्वराचा निरोप तसेच फाईल घेऊन मेघना घरातून निघाली. वाटेत तिला बऱ्याच ठिकाणी सिग्नल लागले, त्यामुळे ऑफिसमध्ये जायला आपसूकच उशीर झाला. त्यात घरामध्ये स्वराशी बोलताना थोडावेळ आधीच झाला होता. त्यात हे सिग्नल आलं. तिने हातातील घड्याळात पहिले तर ऑलरेडी पंधरा मिनिटे होऊन गेले होते.

'अरे बापरे! इतका वेळ. खूप उशीर झाला आता. ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला बोलणी खावी लागतील. आता गेस्ट आले असतील. त्यांना दाखवण्यासाठी फाईल नसेल. सरांची चिडचिड होणार आणि सगळा राग माझ्यावर निघणार. कितीही प्रयत्न केला तरी उशीर होतोच. याला आता मी काय करणार?' अशा विचाराच मेघना ऑफिसजवळ आली.

'हुश्श! आले बाबा एकदाची. आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय होतंय पाहुया.' असे म्हणून ती आत गेली.

भराभर पायरी चढत ती वर गेली तिला सगळे ऑफिस शांत दिसले याचा अर्थ बहुतेक मीटिंगला सुरुवात झाली असणार. 'घ्या. आता ओरडा खायला तयार व्हा मॅडम.' असे ती मनातच म्हणत आत गेली. मेघना खूप घाबरली होती. आलेल्या गेस्टसमोर इंम्प्रेशन खराब होईल असे तिला वाटत होते. राजन ओरडू नये म्हणून ती देवाला प्रार्थना करत होती.

मीटिंगला सुरूवात झाली असेल का? राजन पुन्हा मेघनाला ओरडेल का?
क्रमशः

🎭 Series Post

View all